दूरदर्शन आणि नंतर खासगी चित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट आणि व्यावसायिक मराठी नाटक या क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवताना बाळ कर्वे यांनी आपला साधेपणा कधीही सोडला नाही. हा साधेपणा घरच्या वस्तू ‘रिपेअर’ करण्यासारख्या त्यांच्या छंद/सवयीतून जसा कुटुंबीयांना दिसायचा, तसाच सहकलावंतांशी- अगदी नाटकदौऱ्याच्या बसचालकाशीही- सौहार्दपूर्ण वर्तणुकीतून अनेकांना जाणवत असे. आजकाल ज्याला ‘ग्लॅमरचे जग’ म्हणतात त्या या क्षेत्रांत, आपण कोण आहोत याचे भान न सोडता वावरणाऱ्या पिढीचा आणखी एक दुवा त्यांच्या निधनाने निखळला आहे.

‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या मुळात स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिल्या गेलेल्या व्यक्तिरेखा १९७७ सालच्या मालिकेतून मराठीजनांना भिडल्या, त्यात दिलीप प्रभावळकर यांच्या चिमणरावप्रमाणेच बाळ कर्वे यांच्या गुंड्याभाऊचाही वाटा होता. पंचाहत्तरी-निमित्त त्यांच्या विवाहित कन्या प्रा. स्वाती वाघ यांनी त्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात ‘तुमचा पिंडच स्वयंसेवकाचा. गुंड्याभाऊ तुमच्या रक्तातच आहे,’ असे निरीक्षण नोंदवले होते. प्रभावळकरांनी चिमणरावाचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केला, तसा बाळ कर्वे यांनी केला नाही. मात्र ६० ते ८० या वयात आपोआप तो ठसा पुसला जाईल इतक्या चरित्रभूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. ‘आई रिटायर होतेय’मध्ये भक्ती बर्वे यांच्या पतीची त्यांची भूमिका निराळी होती, तशीच ‘स्वामी’ मालिकेतील भूमिकाही.

‘रंगायन’ची प्रायोगिक नाट्यचळवळ जेव्हा जोरात होती, तेव्हा पार्ले मुक्कामी सहज बालनाट्ये सादर करणारे; पण एरवी आपण बरे, महापालिकेतला अभियंता ही नोकरी बरी, असा खाक्या जपणारे बाळ कर्वे काही काळ रंगभूमीकडे आकृष्ट झालेही होते. पण ‘तब्येत’, आवाजाची पट्टी आणि सानुनासिकपणा यांमुळे भूमिकांसाठी निवड होण्यात मर्यादा आल्या. या कथित मर्यादाच ‘गुंड्याभाऊ’त खुलल्या! मोहन गोखले यांच्यासह ‘बन्या बापू’मध्ये ते चमकले खरे, पण फिल्मी नायकाप्रमाणे नायिकेमागे धावत गाणी म्हणणारे अभिनेते ते हे नव्हे, हेही स्पष्ट झाले. या सुरुवातीच्या मोठ्या भूमिकांतला त्यांचा आवाज आणि नंतरच्या भूमिकांसाठी आवाजाचा बुद्धिपुरस्सर वापर हे मात्र ‘रंगायन’च्या दिवसांमध्ये विजया मेहतांचा संस्कार त्यांच्यावरही झाला होता, याचे द्याोतक ठरले. विजयाबाईंकडून थेट एखाद्या भूमिकेसाठी अभिनयाची संथा त्यांना मिळाली नव्हती, पण तालमींना हजर राहून भरपूर शिकता आले.

‘अजब न्याय वर्तृळाचा’साठी परदेशातही घेऊन जाण्याजोगे, घडीचे नेपथ्य कसे असावे हे कर्वे यांनी ठरवले. ‘यशवंत नाट्यगृहा’च्या फेरउभारणीसाठी सूचना केल्या. नोकरी सांभाळूनच सारे करायचे, हा दंडक त्यांनी पाळला; पुण्यात बालपणी झालेले संघाचे संस्कार पुढे ‘वनवासी कल्याण आश्रम’सारख्या संस्थेला देणगी देऊन त्यांनी जपले.