‘धपापत्या उराच्या लेखिका’ असे १९६०-७० च्या दशकात ज्यांना म्हटले (हिणवले) गेले अशा लेखिकांनी मराठीत, आधुनिक स्त्रीचे भावविश्व पहिल्यांदा आणले. त्याहीआधी आधुनिकपूर्व मराठी स्त्रीची हकीगत सांगणाऱ्या काशीबाई कानिटकर होत्याच. पण या धपापत्या उराच्या लेखिकांनी शहरी व शिक्षित असणे, मध्यमवर्गीय आर्थिक स्थितीत असणे ही तत्कालीन समाजाने लादलेली आधुनिकतेची पूर्वअट पूर्ण केली. अशा पूर्वअटींच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न मराठीत केला तो गौरी देशपांडे यांनी. याहीपुढल्या पिढीतल्या मेघना पेठे यांनी ‘नातिचरामि’मधून, ‘आपणच आपल्यासाठी आणि आपल्यापुरते नियम बनवणं ही आपली नैतिकता’ असे लेखकीय विधान केले. हा सारा मराठीतल्या अव्वल लेखिकांचा पैस ‘नोबेल’च्या पासंगाला का पुरत नसावा, याचे उत्तर मराठीजनांना मिळण्यासाठीच जणू फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो (वय ८२) यांना यंदा साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. साहित्यातून मिळणारी उत्तरे सरळ नसतात. इथे तर, अ‍ॅनी अर्नो जणू मराठीच्या स्त्री-लिखाण परंपरेवर प्रश्नांची सरबत्तीच करताहेत : स्त्रीच्या परिस्थितीची हकीगत कोणासाठी, कोणत्या हेतूने सांगायची? समाजाने लादलेल्या पूर्वअटी म्हणजे काय, याची तपासणी केलीत का कधी? स्वकथनात्मक लिहिताना स्वत:ची तरफदारी करणे ही लबाडीच म्हणावी की स्वत:ला खोदण्याकामी केलेला आळशीपणा? ‘पुरुष सगळे सारखेच’ म्हणा खुशाल, पण हे सारखेपण कुठून येते, याचा थांगपत्ता शोधाल की नाही?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..या आणि अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग अ‍ॅनी अर्नो यांच्या २० कादंबऱ्यांतून जातो, असा निर्वाळा अभ्यासकांनी दिलेलाच आहे आणि म्हणून अनेक पाश्चात्त्य विद्यापीठांत त्यांचे साहित्य शिकवलेही जाते. पाश्चात्त्यपणाच्या पलीकडे त्या गेलेल्या नाहीत. किंबहुना फ्रान्समधली शहरे-गावे हाच परिसर या कादंबऱ्यांतून येत राहतो. उदाहरणार्थ, ‘आरईआर’ म्हणजे फ्रान्समधली उपनगरी रेल्वे हे माहीत नसणारे वाचक अडखळू शकतात, इतके परिसर-बद्ध बारकावे त्यांच्या कादंबऱ्यांत असतात. स्वत:ची किंवा (तिऱ्हाईत निवेदनशैली असली तरी) जणू स्वत:च्याच भूतकाळाची वर्णने असलेल्या या कादंबऱ्यांचा वण्र्यविषय मात्र समाजाची बदलती मूल्यव्यवस्था, स्त्रीला दुय्यमत्व देण्याच्या तऱ्हा आणि त्यांमागली बदलती ‘नैतिक’ अधिष्ठाने, तथाकथित ‘व्यक्तिवादी’ समाजात व्यक्तीची घालमेल समाजामुळेच होणे.. असे असतात. त्यातून समाजशास्त्रीय तत्त्वचिंतन उलगडते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh annie arno authors modern woman spirit world ysh
First published on: 08-10-2022 at 00:02 IST