‘कलिप्सो’ म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगो या बेटांवरचे लोकसंगीत. प्रामुख्याने ऊस आणि केळय़ांची निर्यात करणाऱ्या या क्षेत्रातील कामगार आणि मजुरांची सूरशैली जगभरात पोहोचली ती १९५६ साली हॅरी बेलाफॉण्टे या कृष्णवंशीय कलाकाराने ‘डे-ओ’ (बनाना बोट साँग) हे गीत असलेला ‘कलिप्सो’ हा अल्बम काढल्यानंतर. अमेरिकी संगीतपटलावर १९५६ सालाचे महत्त्व दोन गोष्टींसाठी आहे. एलविसप्रेस्ले या कलाकाराच्या उदयामुळे या वर्षांला ‘रॉक ॲण्ड रोल’ संगीताचे जन्मवर्ष म्हणून संबोधले जाते. पण त्या वर्षी कृष्णवंशीय तारा हॅरी बेलाफॉण्टे याच्या ‘कलिप्सो’ संगीताने एलविस प्रेस्लेलाही पूर्णपणे झाकोळून टाकण्याची किमया करून दाखविल्याचीही ऐतिहासिक नोंद सापडते. ‘कलिप्सो’ हा काही अवघड प्रकार वाटत असला, तर आपल्याला त्या प्रकारातील कर्णओळखी उदाहरण म्हणजे ‘किंगफिशर’ ब्रॅण्डची ‘उलालाला..’ जिंगल. पण ज्यांना बप्पी लाहिरी यांच्या करामतींची जाणीव असेल, त्यांनी ‘चिडीया चू चू करती है’ या किशोर कुमार यांच्या गीताचे मूळ असलेले ‘मेरी ॲन’ गाणे (कलाकार रोअिरग लायन) यूटय़ूबवर ऐकावे. या संगीतप्रकाराला मुख्य धारेत आणले हॅरी बेलाफॉण्टे यांनी. पण त्यांचे कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्व केवळ संगीतपरिघातच उरले नाही, तर चित्रपट, समाजकारण, राजकारण आणि औदार्याच्या क्षेत्रात त्यांनी दरेक दशकात आपल्या योगदानाची ठळक नोंद केली. आर्थिक मंदीच्या काळात जमैका ते न्यू यॉर्क केळीबोटींवर खानसामा म्हणून काम करणाऱ्या आणि अमेरिकी घरांत मोलकरीण म्हणून राबणाऱ्या पालकांच्या कुटुंबात हॅरी बेलाफॉण्टे यांचा जन्म झाला. सहाव्या वर्षी परागंदा झालेल्या बापामुळे हॅरी यांची रवानगी न्यू यॉर्कमधून जमैका बेटावरील खेडय़ात झाली. दुसऱ्या महायुद्धात नौदलात नोकरी. युद्ध संपल्यानंतर रोजंदारीत रमलेल्या अवस्थेत परिचिताकडून मिळालेल्या नाटकाच्या तिकिटांवर रंगभूमीचे पहिले दर्शन झाले. त्या हौसवेडातून अभिनयाच्या शिक्षणासाठी हॉटेल्स-क्लब्जमध्ये गाता-गाता युद्धोत्तर काळात उभरत्या हॉलीवूड कलाकारांशी त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. पुढे लोकसंगीताचा अभ्यास करून त्यांनी ‘कलिप्सो’ संगीताचा प्रसार केला.
नाटक आणि चित्रपटांमध्ये पहिल्यांदा श्वेतवर्णीय अभिनेत्रीबरोबर झळकण्याचा मानही त्यांना मिळाला. टोनी, ऑस्कर आणि एमी मिळविणाऱ्या अत्यल्प अमेरिकी कलाकारांमध्ये ते मोडतात. तारांकितांमध्ये गणले जाऊनही कृष्णवंशीय म्हणून होणारा दुजाभाव संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी नागरीहक्क चळवळीत उडी घेतली. मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनिअर या मित्राच्या खांद्याला खांदा भिडवत हा कलाकार मोर्चे, सभा गाजवत राहिला.
बिटलोत्तर युगात बेलाफॉण्टे यांच्या संगीताचा प्रभाव आटला, तरी सामाजिक योगदानात ते अगदी गेल्या दशकापर्यंत सक्रिय होते. राष्ट्राध्यक्षांच्या चुकीच्या धोरणांना जाहीरपणे झापणाऱ्या आणि उदात्त कार्यासाठी पैसा उभारण्याच्या कार्यक्रमांमध्ये आघाडी घेणाऱ्या या कृष्णवंशी कलाकाराच्या निधनानंतर त्यांच्या कार्याची उंची मोजण्यात संपूर्ण जग सध्या कार्यरत आहे.