दरायस फोर्ब्स हे भारतीय अभियांत्रिकी विश्वात आदराने घेतले जाणारे नाव. फोर्ब्स यांनी जे. एन. मार्शल यांच्यासमवेत ‘फोर्ब्स मार्शल’ कंपनीची पायाभरणी केली. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कंपनीने बाष्प अभियांत्रिकीला नवी दिशा दिली. अनेक आयात निर्बंध असतानाही त्यावर मात करत त्यांनी या क्षेत्राचा विकास घडविला.
फोर्ब्स यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२६ रोजी पारशी कुटुंबात मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नईमध्ये झाले. बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी काही काळ शिक्षण घेतले. विशेष म्हणजे, त्या वेळी सर्वपल्ली राधाकृष्णन हे तिथे कुलगुरू होते. त्यांनी फोर्ब्स यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी कराचीमध्ये (फाळणीपूर्व भारत) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नंतर दोन दशकांनी त्यांनी पुन्हा मुंबईत येऊन व्यावसायिक कारकीर्द सुरू केली.
फोर्ब्स यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ‘जे. एन. मार्शल अँड कंपनी’त उमेदवारी सुरू केली. तिथे त्यांनी वाफेच्या इंजिनाचे विपणन केले. भारतात १९५० च्या मध्यात परकीय चलन संकट निर्माण झाले, त्या वेळी त्यांनी मुंबईतील गॅरेजमध्ये छोटा कारखाना सुरू केला. कारण त्या वेळी अनेक सुटे भाग आयात करणे अवघड झाले होते. आयात निर्बंध असतानाही त्यांनी परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करून त्यातून मार्ग काढला. कोणत्याही लिखित व्यवहारांशिवाय करण्यात आलेली ही भागीदारी हे परस्पर विश्वासाचे आणि प्रामाणिकपणाचे द्योतक होते.
या माध्यमातून बॉयलर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. ताजमहाल हॉटेल, ब्रेक उत्पादक कंपनी ‘फेरोडो’, काडीपेटीनिर्माती ‘विम्को कंपनी’ यांच्या कारखान्यात बॉयलर बसविण्याचे काम त्यांनीच केले. एवढेच काय, अमूलचे शिल्पकार वर्गीस कुरियन यांनी त्यांच्या पुस्तकातही फोर्ब्स यांचा आणंदमधील प्रकल्पात बॉयलर बसविण्यात सहभाग असल्याचा उल्लेख केला आहे.
मुंबईतील जागा अपुरी पडू लागल्यानंतर फोर्ब्स यांनी पुण्याकडे मोर्चा वळविला. त्यांनी पुण्यात कासारवाडी येथे मुंबई-पुणे महामार्गावर जागा निवडली. तिथे त्यांनी स्थापन केलेली ‘फोर्ब्स मार्शल कंपनी’ आजतागायत उभी आहे. या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षांपर्यंत काम केले. नंतर ते मानद अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले. पुण्यातील रोहिंग्टन आगा, पुनावाला, कयानी यांच्या पंक्तीत फोर्ब्स यांनी स्थान मिळविले.
केवळ उद्योग क्षेत्रातील योगदान म्हणून नव्हे, तर फोर्ब्स यांची ओळख त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही आहे. ‘सेंटर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थ्रॉपी’ या संस्थेचे ते सहसंस्थापक होते. या संस्थेला सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वत:च्या कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली. केवळ सामाजिक कार्याबद्दल गप्पा मारण्यापेक्षा ते करून दाखविण्यावर त्यांचा भर राहिला. कंपन्यांचे सामाजिक दायित्व हा प्रकार सुरू होण्याआधी त्यांच्याकडून हे काम सुरू होते. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. फोब्र्ज यांच्या निधनाने कृतिशील उद्योजक आणि दातृत्व असलेली व्यक्ती हरपली आहे.
