मुंबईतले महत्त्वाचे चित्रकार, कवी, नाटककार, पेशाने आणि शिक्षणाने डॉक्टर यापेक्षाही डॉ. गीव्ह पटेल लक्षात राहात ते निव्र्याज हसणारा, सहज कुणाचाही मित्र बनू शकणारा संवेदनशील माणूस म्हणून. पटेल यांची ही मैत्री विवान सुंदरम, सुधीर पटवर्धन, टिमथी हायमन अशा त्यांच्या समवयस्कांना लाभली तशीच अतुल व अंजू दोडिया, रणजीत होस्कोटे, अरुंधती सुब्रमणियन अशा पुढल्या पिढीलाही लाभली. डॉ. पटवर्धन हे डॉ. पटेल यांचे सहप्रवासी मानले जातात आणि दोघांनीही भोवतालाची, माणसांची परिस्थिती चित्रांतून मांडली; पण त्या परिस्थितीकडे तटस्थतेने पाहावे की आपल्या संवेदनांचे कलम चित्रातल्या माणसांवर करावे या मुद्दय़ावर दोघांचे मार्ग निरनिराळे. कुलाब्याच्या त्यांच्या दवाखान्याच्या आसपास खंक वार्धक्यात दिवस काढणाऱ्या एका पारशी आजीबाईंचे दोन्ही डोळे अधू होते.. पण तिचे चित्र गीव्ह पटेलांनी रंगवताना तिला एक डोळा दिला! रस्त्यात कुठल्याशा अवजड चाकाखाली चिरडली गेलेल्या घुशीच्या कलेवराला ‘सुग्रास भोजन’ मानणारे कावळेही त्यांच्या चित्रात दिसले आणि खोल विहिरींमधल्या प्रतिबिंबांच्या चित्रमालिकेने तर गीव्ह पटेल यांना भयानकासह सुंदराचेही आकर्षण कसे आहे, पटेलांच्या चित्रांमधले ‘सबलाइम’ म्हणजे काय, याचा आरसाच प्रेक्षकांपुढे धरला. निसर्गाजवळच्या रंगछटा न वापरता काहीशा कृत्रिम, अनवट छटांना पसंती देणारी गीव्ह पटेल यांची चित्रे असत आणि त्यांचे विषयही नैसर्गिक/ स्वाभाविक परिस्थितीपेक्षा जरासे निराळे असत. आवश्यक तेवढय़ाच आकृती, बाकी अवकाश सपाट एकरंगी अशा चित्रभाषेतून ‘जेवढे चित्राचे आहे तेवढेच चित्राला देईन’ अशी वृत्तीच जणू दिसे. कदाचित कवी आणि नाटककार म्हणून शब्दांच्या नेमकेपणाला, कमीत कमी शब्दांत आशय मांडण्याला महत्त्व दिल्यानेही चित्रात ही सवय आली असेल. पण ‘डॅफ्ने- एकलव्य’ या शिल्पमालिकेत आणखी निराळे गीव्ह पटेल दिसले. स्वसंरक्षणार्थ झाड झालेली डॅफ्ने आणि अंगठा कापून देणारा एकलव्य यांची मृत्तिकाशिल्पे त्यांनी घडवली, त्यावरून पुढे कांस्य-शिल्पेही करण्यात आली. मातीला पटेल यांनी नवख्या अधीरपणे हाताळले असेल, पण त्या हाताळणीतून जो अपरिष्कृत ओबडधोबडपणा या शिल्पांच्या बाह्यभागावर उरला, त्यातून सांस्कृतिक असुरक्षिततेचा आक्रोश (सन २००७ मध्ये) दिसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजाच्या स्थितीबद्दल विचार करत राहणे, समाजातले बदल टिपता- टिपता काही इशारे समाजाला द्यावेसे वाटल्यास तेही देणे, हे कवीचे काम; ते गीव्ह पटेल यांच्या चित्र-शिल्पांनी अधिक थेटपणे केले. त्यांची कविता ही तत्कालीन नव्या फळीच्या (आदिल जस्सावाला, अरिवद कृष्ण मेहरोत्रा, अरुण कोलटकर आदी) तत्कालीन कवींसोबत प्रवास करणारी होती. यश त्यांना दोन्ही क्षेत्रांत मिळालेच, पण त्यांच्या निधनानंतरची रुखरुख सांस्कृतिक कार्यकर्ता गमावल्याचीही आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh givh patel painter poet dramatist doctor amy
First published on: 06-11-2023 at 00:28 IST