गुंतवणुकीसाठी संशोधन आणि विश्लेषणासाठी विशेषत: गुंतवणूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी संख्याशास्त्राचा प्रथम वापर करणारे हॅरी मॅक्स मार्कोविट्झ यांचे अमेरिकेत सॅन दिएगो येथे गुरुवारी २२ जून रोजी ९५ व्या वर्षी निधन झाले. पूर्वनिश्चित परतावा मिळविण्यासाठी गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा समतोल साधावा लागतो आणि हे निश्चित करण्यासाठी संख्याशास्त्रातील संकल्पना वापरता येतात हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यांनी हा सिद्धान्त मांडण्यापूर्वी गुंतवणूक जगताने असे गृहीत धरले होते की सर्वोत्तम स्टॉक-मार्केट खरेदी करणे म्हणजे अशा कंपन्या निवडणे ज्या सर्वाधिक परतावा देतील. गुंतवणूक जगतात वापरण्यात येणारी कंपन्यांची विश्लेषण पद्धत बेन्जामिन ग्रॅहम यांनी १९३० साली विकसित केली. पण अशा उत्तम कंपन्यांचा पोर्टफोलिओ बांधण्याची आणि त्याची कार्यक्षमता मोजण्याची पद्धत हॅरी यांनी मांडली. हीच ‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी’ची सुरुवात होती.

हॅरी मार्कोविट्झ यांनी त्यांच्या ‘पोर्टफोलिओ सिलेक्शन’ या शोधनिबंधात हा सिद्धान्त पहिल्यांदा मांडला. जर्नल ऑफ फायनान्समध्ये १९५२ साली प्रकाशित झालेल्या या सिद्धान्तासाठी त्यांना १९९० सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषक देऊन गौरविण्यात आले. गुंतवणुकीची कार्यक्षमता मोजताना केवळ कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत झालेल्या/ होणाऱ्या वाढीइतकीच निधी व्यावस्थापकाने तो परतावा मिळविण्यासाठी घेतलेली जोखीमसुद्धा महत्त्वाची असते. एखाद्या निधी व्यवस्थापकाने कमी जोखीम घेऊन कमी परतावा मिळविला आणि एखाद्याने अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवला तर अधिक परतावा मिळविलेला पोर्टफोलिओ अधिक चांगला असेही नव्हे तर गुंतवणुकीशी संबंधित किती जोखीम घेतली हे महत्त्वाचे असते. यासाठी पोर्टफोलिओची रचना महत्त्वाची असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोखीम-मुक्त परताव्याचा दर हा परताव्याचा सैद्धान्तिक दर आहे. इथे गृहीत धरलेले आहे की, गुंतवणूकदार शून्य जोखीम असलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षा करतो. शून्यापेक्षा जास्त जोखीम पातळी असलेल्या कोणत्याही गुंतवणुकीला उच्च दराने परतावा देणे आवश्यक आहे. ही ‘शून्य जोखीम’ गुंतवणूकदारागणिक बदलू शकते. कारण ‘मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरी’चे गुंतवणूकदार त्यांच्या वैयक्तिक जोखमीच्या सहिष्णुतेच्या मूल्यांकनावर आधारित दोघांचे इष्टतम संतुलन साधून त्यांचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त करू शकतात. या व्यक्तिनिष्ठ दराच्या मोजणीत वस्तुनिष्ठता आणणारी, ‘रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न’ ही संकल्पना हॅरी मार्कोविट्झ यांनी मांडली. जोखीम-मुक्त परताव्याचा दर हा प्रमाण मानून त्याच्या सापेक्ष किती परतावा मिळविला आणि त्यासाठी किती जोखीम घेतली याचे मापन करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. एखाद्या गुंतवणुकीतील जोखीम (अस्थिरता) जितकी अधिक तितका त्या पोर्टफोलिओचा परतावा अधिक असायला हवा. आणि जोखीम कमी करायची असेल तर गुंतवणुकीत वैविध्य हवे ही संकल्पना याच मॉडर्न पोर्टफोलिओ थिअरीतून जन्माला आली. भारतात आर्थिक बाजारपेठा विकसित होत असताना ‘जोखीम न स्वीकारणे हीच सर्वात मोठी जोखीम असते’ हे त्यांचे वाक्य सर्वानी लक्षात ठेवायला हवे.