Absolute power corrupts absolutely.- Lord Acton
उदारमतवाद म्हणजे व्यक्तीच्या उत्कर्षासाठी राज्यसंस्थेला घ्यावी लागलेली माघार. ‘व्यक्तीच्या भावरूप स्वातंत्र्यासाठी मिळणारं सुरक्षित अभावात्मक स्वातंत्र्य- जेणेकरून व्यक्ती मुक्तपणे विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, कृतिस्वातंत्र्य अनुभवू शकेल’, अशी उदारमतवादाची प्राथमिक व्याख्या करता येते. व्यक्तीचा उत्कर्ष उदारमतवादाचं प्रमुख उद्दिष्ट असल्यानं सर्वव्यापी राज्यसंस्थेनं काढता पाय घ्यावा, ही बाब उदारमतवादात अनुस्यूत आहे. राज्यसंस्थेने कशा बाबतीत, किती प्रमाणात आणि कधी माघार घ्यावी यानुसार उदारमतवादामध्ये अनेक प्रवाह निर्माण झालेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसंस्थेनं माघार घ्यावी या गोष्टीचा आग्रह स्वत: राज्यसंस्था धरते की, प्रबुद्ध नागरी समाज धरतो की, इतर शक्ती करतात हे तपासून पाहणं आवश्यक आहे. याआधी आपण पाहिलं की व्यक्तीच्या उत्कर्षासाठी उदारमतवाद हे आधुनिक मूल्य १७व्या शतकात प्रामुख्यानं इंग्रजीभाषक जगात जन्माला आलं. जॉन लॉक हा तत्त्वज्ञ भांडवलशाहीपूर्व आणि लोकशाहीपूर्व उदारमतवादाचा आद्या प्रणेता मानला जातो.
पण जॉन लॉकपासून जॉन रॉल्सपर्यंत मानवी स्वातंत्र्यासाठी उत्क्रांत झालेल्या उदारमतवादानं अनेक वळणं घेतली. एका बाजूला, रूसोसारखे सामाजिक करारवादी ‘नैतिक व्यक्ती’ची संकल्पना मांडून व्यक्ती आणि समाज यातील तादात्म्य म्हणजेच व्यक्तीचं खरं स्वातंत्र्य आणि उत्कर्ष मानतात. मात्र दुसऱ्या बाजूला अॅडम स्मिथ आणि त्याचे वैचारिक वारसदार (विशेषकरून फ्रेडरिक हाईकसारखे) राज्यसंस्था आणि समाज यांसारख्या मध्यस्थी करणाऱ्या गोष्टींना स्वतंत्र आणि पृथक व्यक्तींच्या विनिमयातील अडथळा समजतात. उदारमतवादाचं अंतिम प्रयोजन व्यक्तींचा उत्कर्ष असं गृहीत धरलं तर राजकारणाचा मृत्यू क्रमप्राप्त ठरतो, असा युक्तिवाद करता येऊ शकतो. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण यांच्या ‘मृत्यू’विषयी विधानं आढळतात. खरंतर, या विधानांचा अर्थ असा होतो की जी द्वंद्वं आणि जे अंतर्विरोध या क्षेत्रांना कार्यान्वित करत असतात त्याचं पूर्णत: निरसन होऊन ती संपुष्टात आली आहेत. त्या क्षेत्रातील उद्दिष्टांची पूर्ती होऊन सर्वत्र निखळ शांती नांदत आहे.
राजकारणाचा मृत्यू दोन प्रकारे होतो, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. राजकारणाची शक्यताच संपवणं आणि राजकारणाची आवश्यकता नसणं. राजकारण म्हणजे राज्यसंस्था, समाज, व्यक्ती या घटकांतला ताण, अंतर्विरोध आणि झगडा असल्याने उदारमतवादात ‘राजकारणाचा मृत्यू’ म्हणजे अशा आदर्शवत मानवी अवस्थेची निर्मिती जिथं सगळी माणसं पूर्णत: स्वतंत्र, विवेकी, स्वायत्त, सार्वभौम असतील; जिथं एकमेकांच्या नैसर्गिक अधिकारांमध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व आढळणार नाही. त्यामुळे राजकारण आपोआप अनावश्यक ठरेल.
सध्याच्या परिस्थितीतही राजकारणाच्या मृत्यूची भाषा केली जाते. हा मृत्यू पहिल्या प्रकारात मोडतो की दुसऱ्या, याची चिकित्सा करणं आवश्यक आहे. उदा.- १९८७ मध्ये ब्रिटिश पंतप्रधान मार्गरेट थॅचर एका मुलाखतीत स्पष्ट करतात की ‘समाज’ असं काहीही नसतं- फक्त व्यक्ती असतात. व्यक्तींनी समस्यांना तोंड देताना समाजाकडे (सरकारकडे) हात पसरणं थांबवावं. स्वत: आत्मनिर्भर व्हावं. मार्गरेट थॅचरच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीचा उल्लेख ‘थॅचरिझम’ म्हणून केला जातो. ‘थॅचरिझम’ म्हणजे समाजवादी कल्याणकारी राज्याचा मृत्यू, आर्थिक उदारमतवादाचं सार्वभौमत्व आणि मुक्त बाजारपेठेत व्यक्तीला आत्मनिर्भर घोषित करण्याचा ऐतिहासिक प्रयोग. थॅचरिझममधील व्यक्ती आदर्शवत अवस्थेत उत्कर्ष पावलेली आहे की अवमूल्यन झालेली आहे? की लॉकनं दाखवलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे? हा प्रश्न उपस्थित होतो.
मार्च २०२५ मध्ये मँचेस्टरच्या लॉरा या २२ वर्षीय विद्यार्थिनीनं तिच्या कौमार्याचा ऑनलाइन लिलाव करून १८ कोटी रुपये कमवले, ही बातमी बरीच गाजली. या लिलाव प्रक्रियेत जगातील अनेक श्रीमंत उद्याोगपती, धनाढ्य राजकारणी आणि समृद्ध सेलिब्रिटी सामील झाले होते. हॉलीवूडच्या एका सेलिब्रिटीनं तिचं कौमार्य विकत घेतलं. धार्मिक वातावरणात वाढलेली लॉरा एका मुलाखतीत युक्तिवाद करताना दिसते की, काही ठोस न मिळवता असंख्य मुली कौमार्य असंच गमावतात. किमान मी माझं भविष्य सुरक्षित केलं. आत्मनिर्भर झाले! म्हणून मला पश्चात्ताप नाही. उलट माझा निर्णय मला विवेकी, उपयुक्त आणि व्यावहारिक वाटतो. खरंतर, लॉराचा हा युक्तिवाद थॅचरच्या उदारमतवादातल्या स्वतंत्र, स्वायत्त, सार्वभौम, विवेकी, आत्मनिर्भर व्यक्तिवादाला धरूनच आहे. सध्या लॉराप्रमाणेच अनेक स्त्रिया इतरांचं मूल जन्माला घालण्यासाठी स्वेच्छेनं गर्भाशय भाड्यानं देतात. ही उदाहरणं भडक असल्यानं सगळ्यांना जाणवतात; पण आजूबाजूच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवहाराचं सूक्ष्म निरीक्षण केल्यावर लक्षात येतं की संपूर्ण जगाचं रूपांतर एका हायपर मार्केटमध्ये झालेलं आहे- जिथं गरजा, गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवनिर्मित वस्तूंसोबत निसर्ग आणि मनुष्याचं सुद्धा वस्तूकरण झालेलं आहे. ब्लिन्कइट, झोमॅटो, उबर आदींच्या सेवा आपापल्या मोटरसायकलीवरून ‘स्वेच्छेनं’ पुरवणाऱ्या ‘आत्मनिर्भर’ व्यक्ती स्वायत्त ‘बिझनेस पार्टनर’ म्हणून वावरताना दिसतात.
मुद्दा हा की, थॅचरिझम म्हणजे आर्थिक उदारमतवादाचा वस्तुपाठच. आर्थिक जगातील ‘अदृश्य हाताला’ आपलं काम करू द्यावं. मुक्त बाजारपेठेच्या उत्स्फूर्त व्यवहारात राज्यसंस्थेनं ढवळाढवळ केली नाही तर व्यक्ती आपापल्या उपक्रमशीलतेनं उत्कर्ष पावतील. थॅचरिझममधला व्यक्तिवाद आणि जॉन लॉकच्या उदारमतवादातला व्यक्तिवाद यांत गुणात्मक फरक आहे का, हे समजून घेण्यासाठी जॉन लॉकच्या उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त परामर्श घ्यावा लागेल.
जॉन लॉकचा राजकीय उदारमतवाद
जॉन लॉकच्या उदारमतवादी राजकीय तत्त्वज्ञानातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ raison d’ etat’ या संकल्पनेचा नकार. या संकल्पनेनुसार व्यक्ती, समाज, राज्यसंस्था यांतून राज्यसंस्था अंतिम साध्य ठरते. समाज आणि व्यक्ती फक्त साधन ठरतात. समाज आणि व्यक्तींच्या कक्षेपलीकडची राज्यसंस्था हे सार्वभौमत्वाचं अर्थात अमर्याद, अविभाजित, निरंकुश सत्तेचं स्थान असतं. त्यामुळे, उदारमतवादाचा तसा लोकशाहीशी अनिवार्य संबंध येत नाही. कारण क्रॉमवेलनं राजेशाहीचा अंत घडवून रिपब्लिकची स्थापना केली; पण त्यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यात वाढ झाली नव्हती. फक्त निरंकुश सत्तेचं आणि जुलूमशाहीचं हस्तांतर झालं होतं. निरंकुश सत्तेत- मग ती राजाच्या, ईश्वराच्या किंवा बहुमताच्याही नावानं असो, कुणाचा तरी नाश अटळ असतो. त्यामुळे लॉकचा उदारमतवाद सर्वप्रथम राज्यसंस्थेच्या निरंकुश सत्तेला मर्यादित करण्याचं तत्त्वज्ञान आहे; जेणेकरून व्यक्तीच्या जीवनाच्या नैसर्गिक आणि पवित्र सीमांचं उल्लंघन होणार नाही. होत असेल तर, राज्यसंस्था कुठली का असेना- ती अन्यायीच ठरते.
लॉकच्या उदारमतवादातला पूर्वपक्ष अॅरिस्टॉटल, रॉबर्ट फिलमरसारखे विषमतामूलक विचारवंत आहेत. अॅरिस्टॉटलच्या मांडणीत निसर्गाची विभागणी भिन्न प्रकृतींमध्ये करण्यात आली आहे. सगळ्या माणसांची प्रकृती समान नसल्यानं फक्त काहींमध्ये शासनकर्ता असण्याचं नैसर्गिक सारतत्त्व असतं तर बहुतेकांमध्ये शासित असण्याचं नैसर्गिक सारतत्त्व असतं. माणसांमध्ये लॉकनुसार भिन्न तत्त्व नसून एकच नैसर्गिक प्रकृती आहे जिचा उलगडा करण्यासाठी समान नैसर्गिक नियम लागू होतात. अॅरिस्टॉटलीय तर्कानुसार शासक आणि शासितांमध्ये मूलभूत भिन्नता असल्यानं शासकांचे विचार शासितांना कळणं अवघड असतं. फिलमर तर टोकाचा युक्तिवाद करतो की राज्यकर्ता असणं हा ईश्वरी अधिकार असल्यानं स्वातंत्र्याची इच्छा पापाचं लक्षण आहे. अॅडमने हे पाप केल्यामुळे पतन झालं! त्यामुळे प्रजेने निमूटपणे मायबाप सरकारचा आदेश कितीही अनाकलनीय वाटला तरी पाळला पाहिजे.
याउलट, लॉकचं राजकीय तत्त्वज्ञान शासक आणि शासित यांच्यात अभेद्या भिंत उभारणाऱ्या सगळ्या विषमतामूलक सारतत्त्ववादी तत्त्वज्ञानाचं खंडण आहे. कारण अशा राजकीय तत्त्वज्ञानात राजकारणाच्या शक्यता दुर्मीळ असतात किंवा राजकारण मृतप्राय ठरतं. आपल्याला यातलं काय कळतं? आपण कशाला यात पडावं? मायबाप सरकार जे काही करत असेल ते काहीतरी योग्य विचार करूनच करत असेल. राज्यसंस्था आणि सर्वसामान्यांचा व्यवहार यांतली ही अभेद्याता मध्ययुगीन चौकटीत स्वीकारण्यात आली होती. त्यामुळे राज्यसंस्थेचा अपारदर्शक, अनाकलनीय व्यवहार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असे. मात्र, शासक आणि शासित यांच्यातील ज्ञानात्मक दुवा आधुनिक उदारमतवादी लोकशाहीचं ठळक वैशिष्ट्य आहे. राजकारण आणि ज्ञान व्यवहारामधील हा दुवा प्रस्थापित करून सर्वसामान्यांच्या भाषेत मांडण्याचं ऐतिहासिक काम जॉन लॉकनं केलेलं आहे.
राजकारणातून ईश्वरी अधिष्ठान, वारसाहक्क आणि जन्मसिद्ध गुणधर्म अशा गोष्टी बाद केल्यानंतर लॉकनं राजकीय अधिष्ठानाच्या शोधासाठी निसर्गावस्थेतल्या मनुष्याची संकल्पना मांडली. त्याच्या निसर्गावस्थेतल्या मनुष्याला नैसर्गिक अधिकार आहेत पण अधिकारांचं संरक्षण आणि न्यायनिवाडा करणारी अतीत शक्ती नसल्यानं त्याला सामाजिक कराराची कल्पना अनिवार्य वाटते. सहिष्णू, मध्यममार्गी लॉकला हॉब्जच्या करारातला (न्यायनिवाडा करणारा, पण कराराच्या पलीकडे असणारा) निरंकुश लिव्हायथन धोक्याचा वाटतो. लॉकनुसार राज्यसंस्थासुद्धा कराराला बांधील असली पाहिजे. त्यातून सत्तेचं विकेंद्रीकरण हे राजकीय तत्त्व जन्माला येतं. लॉकचा सामाजिक करार निसर्गावस्थेतल्या स्वतंत्र आणि समान व्यक्तींमधला समझोता आहे. लॉकच्या उदारमतवादात व्यक्तींना काही मूलभूत आणि पवित्र असे नैसर्गिक अधिकार आहेत : जीवन, स्वातंत्र्य, सुखाचा शोध आणि खासगी संपत्ती.
खासगी संपत्तीचं पावित्र्य नमूद केल्यामुळे लॉकचा उल्लेख ‘भांडवलवादी व्यवस्थेचा तत्त्वज्ञ’ असाही केला जातो. मात्र लॉकचे समर्थक युक्तिवाद करतात की, लॉकला अभिप्रेत असलेली संपत्तीची व्याख्या भांडवलवादपूर्व काळातली आहे. संपत्तीला प्रॉपर्टी हा शब्द वापरला जातो. Property means what is proper to man. माणसाचं जीवन, शरीर आणि त्याच्या शारीरिक श्रमातून कमावलेली संपत्ती या गोष्टी अनुल्लंघनीय अधिकारांमध्ये मोडत असल्यानं कुणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही. म्हणजेच, ‘प्रॉपर्टी’ आणि ‘प्रॉफिट’मधला मूलभूत फरक लॉकची संपत्तीची संकल्पना सूचित करतो.
थोडक्यात, उदारमतवाद आधुनिकतेच्या अंतर्विरोधाच्या मध्यभागी आहे. एका बाजूला सामाजिक राजकीय स्वायत्ततेसाठी प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला आर्थिक स्वायत्ततेचं तत्त्व. फ्रेंच विचारवंत पिएर रोझाँव्हालों नमूद करतो की या दोन ध्रुवांमधील ताण आधुनिकतेचं वैशिष्ट्य आहे. हा ताण संपवून एका ध्रुवाची निवड करणं धोक्याचं आहे; कारण त्यामुळे एकतर निरंकुश अधिकारशाही नाहीतर अराजकता जन्माला येईल.
