इतिहासाची पाने उलटल्यास राज्यपुरस्कृत हिंसेचा पुरस्कार जागोजागी केलेला आढळेल. हात-पाय छाटणे, कातडी सोलून काढणे, उकळत्या पाण्यात टाकणे, ठेचून मारणे, जाहीररीत्या फाशी देणे वगैरे नृशंस प्रकारांचा अवलंब करून राज्यकर्त्यांचा वचक राहील याची काळजी घेतली जायची. मनुस्मृतीपासून इंग्रजांच्या राजवटीपर्यंत आणि युरोपपासून टोळ्यांच्या स्वरूपात राहणाऱ्या आफ्रिकेपर्यंत स्थळ, काळ आणि धर्माची बंधने सोडून या शिक्षांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. मात्र आधुनिक राज्यसंस्थेमधील शिक्षेचे विश्लेषण करताना फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फुको म्हणतात की काळाच्या ओघात या शिक्षांचे स्वरूप सौम्य होत गेले. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांच्या नजरेत सरकारची राजमान्यता टिकून राहावी हा खटाटोप!
दहशतीच्या बळावर टिकवलेल्या राज्याविरुद्ध झालेली क्रांतीदेखील तितकीच टोकाची असते म्हणून राज्यांनी कायदे, शाळा, तुरुंग अशा आस्थापना तयार करून त्यातील नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा सन्मान तर नियम तोडणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून शिक्षा करण्यासाठी जनमत तयार केले. यातूनच कुणी जगायचं, कसं जगायचं, ‘डिग्निटी’ म्हणजे काय हे ठरविण्याचा अधिकार सार्वभौमाकडे आला. राज्याच्या या नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारात असलेल्या हस्तक्षेपाला फुको ‘बायोपॉवर’ असे संबोधतो.
सत्तेची पूर्वीची प्राथमिकता ठरावीक जणांना मारणे आणि इतरांना जगू देणे अशी होती तर बायोपॉवरमुळे ती ठरावीक जणांना जगू देणे आणि इतरांना मरण्यासाठी सोडणे अशी बदलत गेली. तंत्रज्ञानामुळे, विशेषत: आधुनिक अल्गोरिदम, समाजमाध्यमे आणि एआयच्या जमान्यात मारण्याच्या पद्धतीदेखील बदलत चालल्या आहेत. मृत्यू म्हणजे केवळ ‘देहावसान’ या लघू दृष्टीपेक्षा ‘प्रतिसादांचा अभाव’ असा व्यापक अर्थ लावल्यास डिजिटल मृत्यू हादेखील एक नवीन प्रकार उदयास येत आहे. तंत्रज्ञानाचे आणखी एक उत्सुकतेचे क्षेत्र म्हणजे ‘मृत्यूनंतरचे जीवन’! मृत्यू हा मोक्षाचा मार्ग असेल तर इतिहासातील राजकीय नेत्यांना तो मोक्ष दुरापास्त ठरतो. आजच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय समस्यांना जबाबदार म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा यावे लागते. या त्यांच्या स्मृती जागरणासाठी आणि ठरावीक जणांच्या जनविस्मृतीसाठी राज्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. त्यासाठी तंत्रज्ञान व्हायरलीकरणातून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या पार्श्वभूमीवर या लेखातून तंत्रज्ञानामुळे मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवनदेखील कसे प्रभावित होत आहे याचे सूक्ष्म विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.
एके ठिकाणी फुको शासन जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हणतो त्याचवेळी हिटलरने दुसऱ्या महायुद्धात ज्यूंच्या केलेल्या शिरकाणाचे मुद्देसूद विवेचन करत नाही. तत्त्वज्ञ अकिली एम्बेंब (Achile Mbembe) यांनी ‘नेक्रो पॉलिटिक्स’ म्हणजेच ‘मृत्यूचे राजकारण’ ही संकल्पना मांडली. सार्वभौमत्व, राजकारण आणि मृत्यू यांच्यातील संबंध अधिक स्पष्टपणे मांडणे हा यामागील उद्देश होता. एम्बेंब यांच्या मते, राज्याची सत्ता केवळ लोकांना ‘मरू देण्यासाठी’ वापरली जात नाही, तर ती सक्रियपणे ‘मृत्यू-जगत’ (death- worlds) तयार करते. ‘मृत्यू-जगत’ म्हणजे अशी ठिकाणे, जिथे लोकांना अशा परिस्थितीत जगायला भाग पाडले जाते की ते ‘जिवंत असूनही मृत’ ( living dead) बनतात. एम्बेंब यांच्यासाठी, सार्वभौमत्वाचे अंतिम स्वरूप ‘कोण जगू शकते आणि कोणी मेलेच पाहिजे, हे ठरवण्याच्या शक्ती आणि क्षमते’मध्ये आहे. नेक्रो पॉलिटिक्स म्हणजे ‘जीवनाला मृत्यूच्या शक्तीच्या अधीन करणे’. थोडक्यात फुको म्हणतो ठरावीक लोकांना राज्यसंस्था मरायला सोडते तर एम्बेंब म्हणतो की मरण्याची ही क्रिया नैसर्गिक नसून राज्य यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ‘नेक्रो पॉवर २.०’ ही नियंत्रणाची एक त्रि-स्तरीय व्यवस्था आहे. ही व्यवस्था मानवी अस्तित्वाच्या संपूर्ण जीवनचक्रावर मृत्यूचे नियंत्रण पसरवते: आपल्या जैविक शरीरापासून, डिजिटल ओळख आणि अगदी मृत्यूनंतरच्या आपल्या डिजिटल अस्तित्वापर्यंत!
ड्रोन हत्या
ड्रोन आणि स्वयंचलित शस्त्रांच्या जगात राज्य संस्थेने घडविलेले मृत्यू म्हणजे क्रूर, रक्तलांच्छित ही प्रतिमा बदलत आहे. कमालीच्या अचूकतेमुळे मोठे स्फोट वगैरे टाळून, विनाकारण रक्तपात न घडवता लक्ष्यावर निशाणा साधणे सोपे जाते. यामुळे बऱ्याचदा निरपराधांचा बळी जाणे नियंत्रणात आले आहे. दूरस्थ वातानुकूलित केंद्रात बसून मॉनिटर, जॉयस्टिक आणि कीबोर्डच्या साहाय्याने नियंत्रित केलेल्या हत्या युद्धामधील तणाव, जोखीम आणि मानवी जीवनाची सर्वोच्चता यांशिवाय होत असल्याने त्या वीडियो गेम खेळण्याइतक्या गांभीर्यानेच केल्या जातात. हत्या करण्यासाठी ऑपरेटर्स आणि धोरणनिर्माते यांच्यामध्ये नैतिकतेची जाणीव दुय्यम झाली आहे. असे हल्ले आणि युद्धखोरीविरुद्ध देशांतर्गत पातळीवर होणारा उद्रेक याच्यामध्ये होणारी घट हादेखील या अचूकतेचा परिणाम म्हणता येईल. व्हिएतनाम युद्धात ‘नापाम गर्ल’ म्यूल युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तसा क्षण गाझा युद्धात प्रचंड मनुष्य आणि बालकांची हानी होऊन देखील आला नाही. ड्रोनहल्ल्यांमुळे सैनिकांची टळणारी जीवितहानी पाहता नागरिकांचा युद्धांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. सायबर हल्ल्यांमुळे हिंसेचे स्वरूप अजून अदृश्य होत आहे. एखाद्या हॉस्पिटलवरील सायबर हल्ला, त्यामुळे लागलेली आग किंवा जीवनरक्षक प्रणाली यामुळे झालेली हानी यामुळे हल्ल्याप्रति संवेदनशीलता निर्माण होते. मात्र हल्लेखोरांविरोधात रोष दृश्य परिणामाच्या अभावामुळे पुरेसा निर्माण होण्यास रोध होतो. या तंत्रपुरस्कृत हत्यांचा महत्त्वाचा प्रभाव म्हणजे हल्ल्याची बदललेली नामावली! अचूकतेमुळे ‘सर्जिकल स्ट्राइक’सारखी गोंडस नावे देऊन या हत्या शस्त्रक्रियेसारख्याच प्रभावी आहेत हे जनतेच्या मनावर बिंबविले जाते. मात्र त्यातून मिळालेले निकाल, हल्ल्याची परिणामकारकता, बळींची संख्या आणि त्यांच्या ओळखी यांचा राष्ट्रवादाच्या उन्मादात कुणाला फरकच पडलेला दिसत नाही.
डिजिटल मृत्यू
डिजिटल मृत्यू म्हणजे समाजमाध्यमांवरून व्यक्तीचे अस्तित्व नष्ट करणे. यामुळे समर्थकांशी संवादाचा अभाव असल्याने विशिष्ट व्यक्तीचे विचार प्रसार होण्यासाठी अटकाव होतो. यामध्ये एकत्र विशिष्ट व्यक्तीचे खाते बंद केले जाते किंवा त्या व्यक्तीचा अल्गोरिदम असा बनविला जातो की त्याच्या पोस्ट लोकांच्या नजरेपासून दूर ठेवल्या जातात. या दोन्ही बाबींमध्ये विरोधकांचे खच्चीकरण होऊन विरोधात ‘ब्र’ देखील उमटत नाही. नियंत्रणाचा हा प्रकार अनेकदा हत्या किंवा तुरुंगवासापेक्षा सामरिकदृष्ट्या अधिक धूर्त असतो. ज्या राजकीय विरोधकाला तुरुंगात टाकले जाते किंवा मारले जाते, तो शहीद होऊ शकतो आणि आपल्या अनुयायांसाठी एक शक्तिशाली प्रतीक बनू शकतो. मात्र, डिजिटल हत्या झालेली व्यक्ती चर्चेतून सहजपणे नाहीसा होते. तिथे ना मृतदेह असतो, ना खटला चालवला जातो, ना विरोधात एकत्र येण्यासाठी दडपशाहीचे कोणतेही दृश्य कृत्य असते; असते ती फक्त एक डिजिटल पोकळी!
पारलौकिक जीवन
नेक्रोपोलिस २.०चा आणखी एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या वारशाचे, स्मृतींचे आणि विचारांचे नियंत्रण! सरदार पटेल कुणाचे यावर वाद निर्माण करणे डिजिटल माध्यमांमुळे सोपे झाले आहे. त्यापुढची पायरी म्हणजे नेहरूंचे झपाटणे! रोजच विविध गोष्टींसाठी नेहरूंना अथवा तत्कालीन नेत्यांना जबाबदार धरण्यासाठी एखाद्याला तरी अभिलेख, दस्तऐवज, पुस्तके यांचे वाचन करावे लागते. मात्र ५० वर्षांनंतर आजच्या नेत्यांचे सर्व जगणे ऑनलाइन डोमेनमध्ये सार्वजनिक असेल. अशावेळी प्रत्यक्ष व्हिडीयो, संवाद इत्यादीमुळे तत्कालीन संदर्भानुसार त्याचे विकृतीकरण अधिक सोपे होईल. भविष्यातील एआय प्रणाली, विशेषत: लार्ज लँग्वेज मॉडेल्स, या डिजिटल अवशेषांचे सखोल ‘फॉरेन्सिक विच्छेदन’ करण्यास सक्षम असतील. एखादी एआय प्रणाली नेत्याच्या संपूर्ण कारकीर्दीतील डिजिटल माहिती आत्मसात करू शकते आणि अत्यंत कठोर कार्यक्षमतेने दशकानुदशकांच्या विधानांची एकमेकांशी पडताळणी करून प्रत्येक विरोधाभास उघड करू शकते. यामुळे एकीकडे कार्यरत असताना नेतेमंडळी अधिक सावध होऊन प्रशासन अधिक संथ होईल तर दुसरीकडे यापुढील इतिहासात नायक तयार न होता ट्रोल करण्याच्या प्रवृत्तीमुळे इतिहास ही सर्वच विचारधारांसाठी खलनायकांनी समृद्ध खाण बनेल.
तंत्रज्ञानाची व्यापकता प्रचंड आहे. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ या ओळी सर्वार्थाने सार्थ करण्याचे काम अल्गोरिदम परिसंस्था करत आहे. अशा वेळी गरज आहे तात्कालिक राजकीय फायद्यापलीकडे मूलभूत विचार करण्याची! अन्यथा कवी ग्रेस यांचे ‘‘हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे… भय इथले संपत नाही…’’ हे शब्द नेक्रोपोलिस २.०च्या जमान्यात अनाकलनीय वळण घेतील!
पंकज फणसे
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक
phanasepankaj@gmail.com