लोकसभा निवडणुकीतील कंबरतोड पराभवानंतर सात महिने झाले तरी काँग्रेसच्या डोळ्यांसमोरील तारे काही हटलेले नाहीत. त्या पराभवाने जे खचलेपण आले, त्यातून काँग्रेसचे नेते अजून सावरलेले  नाहीत. खरे तर या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार हे त्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी मनोमन जाणले होते. हा पराभव कशामुळे होणार याचा अंदाज पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, बाळराजे राहुल  गांधी आणि त्यांच्याभोवती कोंडाळे करून असलेल्या दरबारी नेत्यांना नव्हता असे मानले तरी इतरांना मात्र ते चांगलेच ठाऊक होते. ज्यांना आपण कशामुळे निपचित झालो हेही समजले नव्हते, त्यांच्यासाठी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची शोधसमिती नेमून पराभवाची विविध कारणे शोधली गेली. पण  रोग रेडय़ाला आहे हे समजले असूनही औषध मात्र पखालीला लावण्याचा सल्ला समितीने दिला. परिणामी पक्ष तसाच हतबलतेच्या अंधारात  ठेचकळत राहिला. खरे तर शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या राष्ट्रीय पक्षाची अशी दुर्गत होणे  हे लोकशाहीसाठीही वाईटच. लोकशाही म्हटले की तेथे सत्ताधारी हवेत, तसेच त्यांच्यावर अंकुश ठेवू शकणारे प्रबळ विरोधकही हवेत; अन्यथा ती बहुसंख्यांची हुकूमशाही बनते. देशात आज मोदी म्हणजे भारत अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. जसे एके काळी इंदिरा म्हणजे भारत हे चूक होते, तसेच हेही अयोग्य आहे. अशी परिस्थिती निर्माण होत असते तेव्हाच खरे तर मजबूत विरोधी पक्षाची आवश्यकता असते. परंतु काँग्रेसची सध्याची दुरवस्था पाहता हा पक्ष अजून पाच वर्षे तरी उठून बसू शकेल असे वाटत नाही, असे सर्वसामान्यांचेच नाही तर राजकीय अभ्यासकांचेही मत दिसते. या अत्यंत प्रतिकूल अशा कालखंडातून काँग्रेसला सलामत राखण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांची आहे. सीताराम केसरी अध्यक्ष असतानाच्या काळात काँग्रेसची अवस्था अगदी अशीच होती. तेव्हा सोनिया यांनीच त्या पक्षाला संजीवनी दिली  होती. आताही त्यांच्याकडून काँग्रेसजनांची हीच अपेक्षा आहे. पण स्वत: त्यांना मात्र ही जबाबदारी राहुलबाबाने उचलावी असे वाटते. समस्या नेमकी तेथेच आहे. त्यामुळेच सोनियांनी गेल्या शनिवारी पक्षाच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्राला एक उपचार या पलीकडे काही अर्थ उरत नाही. पक्षाची तत्त्वे, संघटना, संपर्क आणि राजकीय व्यूहरचना याबाबत विचार करून या  सर्वानी एक ठोस कृतीयोजना तयार करावी अशी सूचना सोनियांना या पत्रातून केली आहे. मात्र हे पत्र पाहता काँग्रेस अजूनही आपल्या पराभवाच्या     नेमक्या कारणांना थेट भिडू इच्छित नाही असेच दिसते. पक्ष चालविणे हे अर्धवेळ काम असल्यासारखे वागणाऱ्या राहुल यांचे नेभळट  नेतृत्व, पक्षनेत्यांचा भ्रष्टाचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिकीकरणानंतरच्या सामाजिक-आर्थिक आकांक्षांशी तुटलेली मूल्यात्मक नाळ या गोष्टी काँग्रेसच्या पतनास कारणीभूत होत्या. याचे भान एव्हाना पक्षातील अनेक धुरीणांना आले असेलही. मात्र, पक्ष नेतृत्वावर निर्भर राहण्याच्या सवयीला मुरड घालण्याची कोणाची तयारी दिसत नाही. म्हणूनच  वरवरची मलपट्टी करण्यातून पक्षाचे काहीही भले होणार नाही, हे पक्षनेतृत्वास कळेल तोच काँग्रेससाठी सोनियाचा दिन असेल.