आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर गुन्हय़ाचा ठपका ठेवण्याने अनेकांचे उरलेले आयुष्यदेखील काजळून जाऊ शकते. त्याऐवजी, त्याच्या जगण्याच्या अधिकाराला आधार आणि बळ देण्याची गरज असते. हीच गरज आता अधोरेखित होऊन जिवंत झाली आहे.
काही घटना मनात कायमचे घर करून राहतात. त्यांच्या खोलात शिरून त्यांचा ठाव घेणे केवळ अशक्य असले, तरी त्यांच्याबद्दलचे कुतूहल मात्र सदोदित मनाचा पाठलाग करीत असते. त्या घटनांच्या खोलात डोकावण्याची ऊर्मी मात्र सतत उफाळत राहते. मृत्यू ही अशीच एक अतक्र्य घटना. मृत्यूनंतरचे जीवन हे मानवाला न उलगडलेले एक गूढ आहे. या गुढाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न सतत होत असला, तरी म्हणावे तसे काहीच हाती न लागल्यामुळे, हे गूढ गडदच राहिले आहे. मृत्यूविषयीच्या अनेक घटना मात्र हृदयाला चटका लावून जातात. दोन वर्षांपूर्वी, गुजरातेतल्या मेहसाणामधील रमेश देवमणी नावाच्या एका शिक्षकाने याच कुतूहलापोटी नर्मदेच्या कालव्यात उडी घेऊन आपले जीवन संपविले. आपल्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये, केवळ मृत्यूचा आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आपण स्वत:हून जीवन संपवत आहोत, अशी अंगावर शहारा आणणारी मृत्यूपूर्व नोंद या शिक्षकाने करून ठेवली होती. नर्मदेत आत्महत्या केलेल्या एका तरुणाच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून आत्महत्येचे त्याचे विचार दृढ झाले आणि अखेर त्या ऊर्मीच्या आहारी जाऊन त्याने आपले जीवन संपविले. मनात कायमचे घर करून राहील अशी ही घटना.. हे जीवन सुंदर आहे, त्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंदाने आस्वाद घ्यावा, आपल्या अस्तित्वाने आसपासचे अस्तित्व उजळून जाईल असे काही तरी करून जगणे अर्थपूर्ण करावे यासाठी एकीकडे मनामनांचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू असताना, आत्महत्या करून जगणे संपविण्याची इच्छा प्रबळ होण्यामागील मानसिकतेचादेखील आता असंख्य अंगांनी अभ्यास सुरू आहे. स्वत:चे जीवन सक्तीने संपविण्याचा अधिकार माणसाला नाही. तो केवळ निसर्गाचाच अधिकार असल्याने आत्महत्या हे निसर्गाच्या अधिकारावरील अतिक्रमण ठरते. तरीही, एखाद्या विशिष्ट, असहय़ अशा मानसिकतेमुळे जगणे संपविण्याचा विचार एखाद्या अनावर क्षणकाळात प्रबळ व्हावा आणि जिवंतपणात जोडलेल्या साऱ्या पाशांचा मोह क्षणात तुटून जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेतला जावा हेही मृत्यूनंतरच्या अवस्थेइतकेच अनाकलनीय गूढ आहे. जग सुंदर आहे, जगणेही सुंदर आहे, असे सांगितले जात असले, तरी अनेकांच्या जगण्याच्या वाटा काटय़ाकुटय़ांनी भरलेल्या असतात. त्यावरून वाटचाल करताना मने रक्तबंबाळ होतात आणि त्या वेदना असहय़ होतात, त्या क्षणी जगण्याचे सारे मोहपाश संपतात, असे काहींना वाटते. आजवरच्या अनेक आत्महत्यांमागील कारणे वेगवेगळी असली, तरी जगण्यावरचे प्रेम ज्या क्षणी संपते, त्या क्षणी मृत्यूला कवटाळण्याची ओढ अनावर होते, हेच आत्महत्येचे अंतिम कारण असते. जगण्यावर प्रेम करण्याचा संदेश मनामनांत रुजविण्याचे, जगणे संपविण्याच्या निर्णयाचा अधिकार आपला नाही, हे ठसविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून अधिक जोमाने सुरू झाले आहेत. मानसिक आरोग्य बिघडलेल्यांना योग्य उपचार मिळावेत, समाजाच्या प्रत्येक घटकाने त्यांची काळजी घ्यावी आणि आत्महत्येचे विचार वा प्रयत्न करणाऱ्यांचे जगण्यावरील प्रेम पुन्हा जागे करावे ही सामाजिक जबाबदारी असावी, असा आत्महत्याविरोधी प्रयत्नांचा गाभा आहे. गेल्या काही वर्षांपासून आत्महत्या ही जगभरातील समस्या ठरली असली, तरी ज्यांची आयुष्ये नुकती उमलू पाहत असतात, अशांमध्येच जगण्याची उमेद संपत चालल्याचे अनेक पाहण्यांचे निष्कर्ष आहेत, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे, आत्महत्येचा विचार हा मानसिक आजार तर आहेच, पण ती सामाजिक आरोग्यापुढीलही एक भीषण समस्या होऊ पाहत आहे. व्यक्तिगत जगण्याचा किंवा सामाजिक संघर्षांचा शेवट आत्महत्यांमध्ये होऊ नये, यासाठी संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित
माणसाच्या मनात सुरू असलेले संघर्ष हेदेखील एक गूढच असते. या गुढाच्या तळाशी जाण्याचे मार्ग आता सापडू लागले आहेत. मानसिक आजाराने ग्रासलेल्यांना पुन्हा नवे, आनंदी जीवन देण्याच्या प्रयत्नांना आता आशेचे किरण दिसू लागले आहेत. जगणे खडतर असते, पण मानसिक आरोग्य जपले, की ते सोपेही होऊ शकते, याची जाणीवही जागी होऊ लागली आहे. सुदृढ मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे, तो जपला गेला पाहिजे, या मानसिकतेची मुळेही आता रुजू लागली आहेत. समाजाचे मन सुदृढ असेल, तर माणसाच्या जगण्याच्या दैनंदिन चिंता कमी होऊ शकतात. समस्यांना तोंड देत जगणे खडतर झाले की या चिंता वाढतात. हाताशी असलेल्या तुटपुंज्या पुंजीत वाढत्या महागाईचा सामना करण्याची ताकदच नसते. मंदीसारख्या कारणांमुळे उत्पन्नदेखील तुटपुंजे ठरू लागते, पण एकदा राहणीमानाचा स्तर निश्चित झाला की तो खाली आणता येत नाही. अशा अपरिहार्यतेचा मानसिक बोजादेखील असहय़ ठरू शकतो. अशा सामाजिक समस्यांचे ओझे सांभाळणे अशक्य होते, तेव्हा जगण्याचे क्षण निरस होऊन जातात आणि त्यातीलच एखाद्या क्षणावर अविचाराचा विळखा पडतो. जगण्याचे कोणतेच पाश हा विळखा सैलावू शकत नाहीत. ही मानसिक विकलांगता दूर करण्यासाठी सामाजिक समस्यांची तीव्रता कमी करणे हाच सर्वोत्तम उपाय असतो. आता याची जाणीव जागी होऊ लागली असली, तरी तेवढे पुरेसे नाही. एखादी जादूची कांडी फिरवून समूळ नष्ट कराव्यात एवढय़ा या समस्या तकलादू नाहीत, पण त्यांचा सामना करण्याची उमेद आणि हिंमत मनामनांत जागविण्याच्या प्रयत्नांना मात्र सीमा असू नयेत. कारण, हे प्रयत्नच जगण्याच्या आशा जाग्या ठेवणार आहेत. आत्महत्या करून जीवन संपविण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरविणे म्हणजे, अगोदरच जगण्याच्या आशा संपलेल्याच्या उरलेल्या जगण्यावरील जखमांच्या खपल्या काढण्यासारखे असताना, या कायद्यातून त्याची मुक्तता करण्याचा एक विचार नव्याने जन्माला येऊ पाहत आहे. आत्महत्या हा गुन्हा ठरविला जाऊ नये, असा विचार मांडणारे नवे ‘मन:स्वास्थ्य विधेयक’ भारतात आकाराला येत आहे. मुळात, आत्महत्या करून अस्तित्वाच्याही पलीकडे गेलेल्यांच्या लेखी कायदा, गुन्हा अशा गोष्टी बेदखलच असतात. आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर गुन्हय़ाचा ठपका ठेवण्याने अगोदरच मानसिक दुबळेपणाची शिकार बनलेल्या अनेकांचे उरलेले आयुष्यदेखील काजळून जाऊ शकते. त्याऐवजी, त्याच्या जगण्याच्या अधिकाराला आधार आणि बळ देण्याची गरज असते. हीच गरज आता अधोरेखित होऊन जिवंत झाली आहे. मरणाची वेळ सांगू शकेल, असे काही संशोधन सध्या आकारास येत असल्याच्या बातम्या अलीकडे झपाटय़ाने पसरत आहेत. पण जे केवळ निसर्गाच्याच हातात आहे, त्यावरच ताबा मिळविण्याचा हा प्रयत्नच माणसाच्या जगण्याच्या आनंदावरचे विरजण ठरू शकतो, याची जाणीव असायलाच हवी. अखेरच्या श्वासाची वेळ अज्ञात असते, म्हणूनच जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालविण्याची उमेद जागी असते. ती वेळ कळली, तर त्या क्षणापासूनच्या जगण्याचा पुढचा प्रत्येक क्षण जिवंतपणीच मरणाचा जीवघेणा अनुभव देणारा ठरेल. तेव्हा जे गूढ आहे, ते गूढच राहिलेले बरे.. मरणाची वेळ शोधण्यापेक्षा, जगण्याचा आनंद जागविण्यातच मजा आहे!!
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
अंतरीच्या गूढगर्भी..
आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर गुन्हय़ाचा ठपका ठेवण्याने अनेकांचे उरलेले आयुष्यदेखील काजळून जाऊ शकते.
First published on: 24-08-2013 at 11:06 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conviction for attempted suicide should not be a crime