सीमावर्ती भागातील भारतीयांवर हल्ले करून पाकिस्तान दबाव आणू शकत नाही, असे बजावत प्रत्येक आगळिकीला जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण ठेवून पाकिस्तानी रेंजर्स व लष्कराला नरमाईची भूमिका भाग पाडण्याची व्यूहरचना सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक देवेंद्रकुमार पाठक यांच्या युद्ध कौशल्य व अनुभवाची प्रचीती देत आहे.
बीएसएफच्या महासंचालकपदाची जबाबदारी स्वीकारून पाठक यांना सात महिन्यांचा कालावधी होत आहे. या कालावधीत पाकिस्तानी रेंजर्स व सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून बेछूट गोळीबार व तोफगोळ्यांचा भडिमार केला. काही जवान जखमी झाले, परंतु काही नागरिकांना प्राण गमवावे लागले. घुसखोरी करण्यासाठी जाणीवपूर्वक युद्धजन्य स्थिती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा नेहमीच प्रयत्न असतो. या आगळिकीला तितक्याच ताकदीने ठोस प्रत्युत्तर देण्याचे निर्देश देऊन पाठक यांनी सीमेवरील तणावग्रस्त स्थिती हाताळण्यासाठी आघाडीवरील तळांना भेट देऊन जवानांचे मनोबल उंचाविण्याचे काम केले. मुक्तहस्ते प्रत्युत्तर देण्याची मुभा मिळाल्याने जवानांनी उखळी तोफांना (मॉर्टर) उखळी तोफांनी, रॉकेटला रॉकेट लाँचरने जोरदार उत्तर दिले. या धडाक्याने पाहता पाहता सीमेवरील स्थिती बदलण्यास सुरुवात झाली. तणाव निवळल्याचे वातावरण किती दिवस कायम राहील याची कोणी शाश्वती देऊ शकत नाही. तथापि, सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न झाल्यास भारतीय जवान तत्क्षणी प्रहार करतील याची स्पष्टपणे जाणीव या व्यूहरचनेद्वारे करून देण्यात आली. शत्रूचे डावपेच जोखून त्यावर मात करण्यासाठी सेनापतीला व्यूहरचना आखावी लागते. पाठक यांच्यातील कुशल सेनापतीने तेच केले.
तीन दशकांहून अधिक काळ असलेल्या अनुभवाचे हे फलित म्हणता येईल. १९५६ मध्ये जन्मलेले पाठक हे २३व्या वर्षी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. आसाममध्ये विशेष पोलीस अधीक्षक, अशांत राज्यातील कायदा व सुव्यवस्था शाखेचे पोलीस महनिरीक्षक व अतिरिक्त महासंचालक, जम्मू-काश्मीरमधील स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय राखीव दलात अतिरिक्त महानिरीक्षक, प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक, कर्मचारी शाखेचे महानिरीक्षक आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस खात्यातील विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, गुणवंत रौप्यपदक आणि राष्ट्रपती पदक तसेच तीन ताऱ्यांसह सुवर्ण पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीर या राज्यांत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्याच्या अनुभवाचा पाठक आता सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी कौशल्यपूर्वक वापर करत आहेत.