गेले काही दिवस आपण जे चिंतन केलं त्यानुसार साधनावस्थेच्या सुरुवातीला म्हणजे बालपणी ‘मीपणा’पायी होणारा घात आणि कित्येक वर्षे साधना करूनही अंत:करण खुजे राहिलेल्या लहानपणात ‘मीपणा’पायी होणारा घात, याबाबत श्रीमहाराजांनी सावध केलं आहे, हे आपण जाणलं. त्याला जोडून लहानाहून लहान होण्याचा तुकाराम महाराज यांचा बोधही पाहिला. हे ‘लहानाहुनि लहान’ होण्याच्या आड येतो तो पैसाच. माझ्या वृत्तीवर थेट आघात करतो तो पैसाच. हा पैसाच माझ्यातला अहंकार वाढवत असतो. मग या पैशाचं करावं तरी काय? एक गोष्ट खरी की भरल्यापोटी मी हे लिहीत आहे आणि पोट भरलं आहे म्हणून वाचण्याची तुम्हालाही शक्ती आहे. तेव्हा आपण दोघे पैशापासून मुक्त नाही आणि होणारही नाही. तेव्हा उगाच पैसाबिसा झूठ आहे, हे वरकरणी सांगणंही खोटं आहे. मग झूठ काय? त्या पैशाचा प्रभाव खोटा आहे. त्या पैशाचा मोह व्यर्थ आहे. त्या पैशाची आसक्ती घातक आहे. पैशाची ओढ माझ्यात श्रीमंतीची ओढ निर्माण करते. श्रीमंत होण्यात काहीच गैर नाही की पाप तर त्याहून नाही. पण आपल्या मनातली ‘श्रीमंती’ ही जगाचा मान मिळवण्याच्या आसक्तीतून निर्माण झालेली कल्पना असते. थोडा पैसा साठू द्या, आपलं मन त्या मानानं दरिद्री बनत जातं, अशी गत आहे. तेव्हा त्या श्रीमंतीची ओढही परमार्थाची नासाडी करते. श्रीमहाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, ‘‘आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे?’’ (चरित्रातील पैसाविषयक बोधवचने, क्र. ३०). आपल्या आजच्या प्रपंचाची रीत पाहिली तर मात्र जितका पैसा मिळत जातो तितक्या आपल्या गरजा वाढतच जातात, मग जरुरीपुरता पैसा मिळत असल्याची तृप्ती आपल्या कधीच अनुभवाला येत नाही. कितीही पैसा मिळाला तरी आपली नड आणि अडचण काही संपत नाही. तेव्हा प्रपंचासाठी पैसा मिळवताना आणि साठवतानाही हा प्रपंच परमार्थासाठी आहे, हे भान टिकवण्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या गरजांवर मर्यादा आणून पैसा वाचवला पाहिजे. आपल्यातला हवेपणा कमी करण्याचा अभ्यास केला पाहिजे. पैशाची गरज आहे. एखादा रोग उद्भवला तर वैद्यकीय खर्चासाठी किती अमाप खर्च होतो. तेव्हा पैसा असला पाहिजे आणि तो वाढवलाही पाहिजे पण त्यानं वृत्ती दरिद्री बनत जाता कामा नये. आता इथेच एक धोक्याचं वळणही आहे. प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? मागेच आपण पाहिलं की, ‘नाही म्हणणं हेही वैराग्य नव्हे’, असं श्रीमहाराजच सांगतात. म्हणजेच प्रारब्धानुसार किंवा प्रारब्धाच्या चौकटीतील प्रयत्न व परिश्रमांनुसार जर साधकाच्या वाटय़ाला धनयोग आला तर त्याला नाकारणंही वैराग्य नाही. अशा ‘श्रीमंत’ साधकाला एक धोक्याचं वळण मात्र लक्षात ठेवावं लागतं.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
९६. धनवास्तव
गेले काही दिवस आपण जे चिंतन केलं त्यानुसार साधनावस्थेच्या सुरुवातीला म्हणजे बालपणी ‘मीपणा’पायी होणारा घात आणि कित्येक वर्षे साधना करूनही अंत:करण खुजे राहिलेल्या लहानपणात ‘मीपणा’पायी होणारा घात, याबाबत श्रीमहाराजांनी सावध केलं आहे,
First published on: 16-05-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanavastava