स्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात. अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो त्याचे हे एक कारण. त्या केवळ मासिक पाळीच्या काळातच अपवित्र नसतात. तर त्यामुळे एरवीही अपवित्रच असतात. म्हणून त्यांना अनेक ठिकाणी सरसकट प्रवेशबंदी असते. केरळातील साबरीमलच्या भगवान अय्यप्पा मंदिरात त्यांना जाताच येत नाही. महिलांची मासिक पाळी तपासण्याचा स्कॅनर एकदा आला की मग प्रवेशाचे बघू, हे तेथील पुजा-याचे उद्गार! असेच पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराच्या गाभा-यात जाता येत नाही. दिवे घाटावरच्या कानिफनाथ मंदिरात प्रवेश करता येत नाही, की आळंदीतल्या अजानवृक्षाखाली किंवा जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला असलेल्या चौथ-यावर बसता येत नाही. स्त्रिया मासिक पाळीमुळे अपवित्र असतात हे त्याचे कारण. अशी भली मोठी यादी आहे. हे झाले हिंदूंचे. (तुम्हाला केवळ ) इस्लाममध्येही अशीच गत आहे. स्त्री-पुरुष हे समान असल्याचे आधुनिक विचारांचे लोक मानतात. मुस्लिमांचे केरळमधील एक धर्मगुरू सांगतात की स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्वच मुळी इस्लामच्या विरोधी आहे. त्यामुळे प्रश्नच मिटला. मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील कबरीनजीक महिलांना प्रवेशबंदी आहे. त्याविरोधात एका मुस्लिम महिलेने न्यायालयात खटला गुदरला आहे. पण हल्ली धर्माच्या मामल्यात न्यायालयाचे हातही बांधलेले असतात. प्रश्न परंपरा टिकवण्याचा असतो. शनि शिंगणापूरचा वादात अनेकांचे म्हणणे हेच आहे, की तेथील शनिदेवाच्या चौथ-यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. तेथील विहिरीला स्पर्श करण्याचीही बंदी आहे. त्या विहिरीच्या पाण्याने देवाचे स्नान होते. तेव्हा बाईच्या स्पर्शाने ते पाणी अपवित्र होता कामा नये. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. ती कशाला मोडायची? एका तरूणीने नुकतीच ती मोडली. त्यात अनेकांना विद्रोह वगैरे दिसला. पण झाली गोष्ट ती अनवधानाने किंवा अज्ञानाने. मात्र त्यामुळे तेथील परंपरावाद्यांनी मोठा कालवा केला. चौथरा अशुद्ध झाला. तो दुस-या दिवशी दुधाचा अभिषेक घालून शुद्ध करण्यात आला. गावात लोकांनी बंदही पाळला व त्यात अर्थात तेथील महिलाही सहभागी झाल्या. हे नीट लक्षात घ्यायला हवे. कारण महिलांना अपवित्र ठरविणा-या परंपरांचे वहन करण्यात महिलांचाही मोठा हातभार असतो. आपणांस समानतेचा हक्क तर डावलला जातोच, परंतु त्यासाठी अपवित्रही ठरविले जाते हे त्यांच्या गावीही नसते. धर्माचा पगडा म्हणतात तो हाच. मुद्दा असा आहे की याला धर्म म्हणायचे का? इस्लामसारख्या धर्मातील परमेश्वर हा पुरूषच असतो. हिंदुंमध्ये तर स्त्रीदेवता आहेत. पण तरीही हे दोन्ही – खरेतर सगळेच – धर्म स्त्रीला दुय्यम दर्जा देत असतात. धर्माचा हा भाग बुरसटलेला म्हणून तो टाकून द्यावा असे अनेक सुधारक-संतांनी कळकळीने सांगितले आहे. पण परंपरा म्हणून तो सडलेला नारळ आजही पुजला जातो. विषमतेला समर्थनच नव्हे तर पावित्र्यही देतो. आणि ही धर्माधिष्ठीत गुलामगिरीची मानसिकता आहे हेही कुणाच्या नीट लक्षात येत नाही. वर महिलांना नाही दिला एखाद्या ठिकाणी प्रवेश तर काय बिघडले असा सवाल केला जातो. असाच सवाल यापूर्वी महाराष्ट्राने काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी ऐकलेला आहे. अस्पृश्यांना नसेल मंदिर प्रवेश तर कशाला हट्ट धरायचा. त्यांनी त्यांची स्वतंत्र मंदिरे बांधावित असा शहाजोग सल्ला तेव्हा देण्यात आला होता. आजची सनातनी मंडळी तर त्याही पुढे गेली असून, ‘हा विषय स्त्रीमुक्तीचा नसून पूर्णतः अध्यात्मिक स्तरावरचा आहे. त्याची चिकित्सा समाजिक दृष्टीकोनातून, तसेच धर्माचा अभ्यास नसणा-यांनी करणे अयोग्य ठरते,’ असे सांगत आहेत. पुन्हा ‘स्त्रीमुक्तीचा टाहो फोडणारे धर्मद्रोही मशिदींमध्ये महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आरडाओरडा का करत नाहीत,’ असा नेहमीचा बुद्धीभेद करणारा प्रश्नही विचारत आहेत. पण धर्म हा समाजाची धारणा करणारा असेल तर धर्माची प्रत्येक गोष्ट सामाजिकच असली पाहिजे. धर्माचे ज्ञान आम्हांसिच ठावे अशी मक्तेदारी ठसवून ज्यांना आपली पोटे भरायची आहेत त्यांनी अशी भूमिका घेणे त्यांच्या फायद्याचेच असले तरी ती स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या विरोधात असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हिंदु महिलांबाबतच का बोलता, मुस्लिम महिलांच्या समानतेच्या हक्कांबाबत का बोलत नाही, ही भूमिका स्वागतार्हच असून, हिंदु सनातन्यांना मुस्लिम महिलांचा एवढा कळवळा येत असल्याचे पाहून कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त आपल्या धर्मातील महिलांबाबत बोलणे हा धर्मद्रोह कसा होतो हे मात्र त्यांनी समाजाला नीट समजावून दिले पाहिजे. राज्यघटनेने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा एकवेळ बाजूला ठेवला तरी चालेल, आधुनिक समाजातील स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये अधार्मिक म्हणून फेकून दिली तरी चालतील, पण संतांनी सांगितलेल्या – भेदाभेद भ्रम अमंगळ अशा असंख्य वचनांचे काय करायचे ते मात्र त्यांनी सांगितले पाहिजे. ‘परब्रह्मतत्त्वात लिंगभेद नाही… ज्या देशात, ज्या जातीत स्त्रियांचा योग्य सन्मान होत नाही तो देश कधीही उन्नतावस्थेत पोचू शकत नाही,’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनाचे काय करायचे हेही त्यांनी – त्यात हिंदु, इस्लामादी सर्वच धर्मांतील परंपरावादी आले – सांगितले पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2015 रोजी प्रकाशित
भेदाभेद भ्रम अमंगळ
स्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात.
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 30-11-2015 at 15:53 IST
मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman breaks tradition to enter shrine in maharashtra villagers upset