व्हर्गिस कुरियन यांना दूध अजिबात आवडत नसे. दूध मला आवडत नाही आणि त्यामुळे ते मी पीत नाही, इतक्या प्रामाणिकपणे कुरियन आपले मत नोंदवीत. पण म्हणून दूध पूर्णान्नाच्या जवळ जाणारे आहे, हे ते नाकारत नसत.
दुधाला भारतीय संस्कृतीत, समाजजीवनात विलक्षण महत्त्व आहे आणि त्यास योग्य बाजारपेठ मिळवून दिली तर देशातील कोटय़वधी ग्रामीण महिलांना स्थिर रोजगाराचे कायमस्वरूपी माध्यम उपलब्ध होईल याची डोळस जाण त्यांना होती. भारतात कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी देशात रोजगाराचे मुख्य साधन हे कृषीविषयक उद्योग हेच असणार आहेत आणि १८ ते ५५ या वयोगटात असणाऱ्या कोटय़वधी महिलांना दुग्धजन्य पदार्थाचा व्यवसाय हा उपजीविकेचा स्वयंपूर्ण मार्ग असणार आहे, असा त्यांचा सिद्धांत होता. याच डोळस अभ्यासाने कुरियन यांना आयुष्यभराचे श्रेयस आणि प्रेयस मिळवून दिले. केरळातल्या आताच्या कोझिकोड येथे अल्पसंख्य अशा सीरियन ख्रिश्चन कुरियन कुटुंबात जन्माला आलेल्या व्हर्गिस याने देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हा एक स्वप्न पाहिले व पुढे आयुष्यभर त्या स्वप्नाच्या परिपूर्तीचा ध्यास घेतला. त्यातूनच आकाराला आली अशिक्षित, मातृभाषेतच शिकलेला, उच्चशिक्षणापासून दुरावलेला भारत काय करू शकतो याची एक अद्वितीय अमूल प्रेमकहाणी; जिने पुढे शहरांपुरतेच मिरवणाऱ्या, उगाचच आंग्लाळलेल्या इंडियालाही झाकोळून टाकले.
नियतीशी भारताचा करार करणारा १५ ऑगस्ट अजून एक वर्षे दूर होता त्या वर्षी सरदार वल्लभभाई पटेल या द्रष्टय़ा नेत्याने पहिल्यांदा हे स्वप्न पाहिले. देशातील शेतकऱ्यांस स्वावलंबी करावयाचे असेल तर त्याच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळायला हवी. दलालांच्या हाती शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची नाडी जाताच कामा नये, हे सरदार पटेल यांना पूर्णपणे उमजलेले होते. बुद्धीला जे पटते त्याची बांधीलकी मानून कार्य करणाऱ्या राजकीय नेत्यांचा तो काळ. १९४६ साली त्यांनी पहिल्यांदा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि गुजरातेतील आणंद जिल्ह्य़ात पहिल्यांदा सहकारी क्षेत्रातला दूध प्रकल्प जन्माला आला. त्या कामाचे मोल आता जाणवावे. देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर स्वतंत्र भारतास उत्तम अभियंत्यांची गरज लागेल हे ओळखून त्यासाठीची संस्था जन्माला घालणारे जे. आर. डी. टाटा आणि स्वतंत्र भारतातील शेतकऱ्यांना रोजगाराचे स्वतंत्र साधन असायला हवे, असा ध्यास घेणारे सरदार पटेल आणि पुढे त्यांचे स्वप्न साकार करणारे व्हर्गिस कुरियन ही खऱ्या अर्थाने द्रष्टी माणसे. ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसे एकाच काळात का संपून गेली, असा प्रश्न आता पडावा. यातील गमतीशीर योगायोगाचा भाग असा की, ४ जानेवारी १९४६ या दिवशी गुजरातेतील समरखा येथे भरवलेल्या या बैठकीची सूत्रे होती मोरारजी देसाई यांच्याकडे. मोरारजीभाई यांना या बैठकीची सूचना केली होती सरदार पटेल यांनी आणि या सगळ्यात तीनच वर्षांनी सामील झाला केरळातील अवघा २५ वर्षांचा तरुण व्हर्गिस कुरियन. त्या दिवशी या बैठकीत या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, सहकारी संस्था स्थापन करायची आणि त्या परिसरातील दूध थेट बाँबे मिल्क स्कीमला पोहोचवायचे. त्याच वर्षी १९४६ सालातील १४ डिसेंबर या दिवशी आणंद या सहकारी संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला या सहकारी संस्थेतून दूध विकत घ्यायला सरकारचाच विरोध होता आणि या सहकारी संस्थेच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण केले जात होते.
कुरियन मुळात अभियांत्रिकीचे विद्यार्थी. त्यातील पदवी घेतली त्यांनी आताच्या चेन्नईमध्ये. नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले जमशेदपूरला, टाटा यांच्या पोलाद संशोधन संस्थेत. तिथून त्यांनी उड्डाण केले ते थेट अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात. परदेशात गेल्यावर डॉलरप्रेमात आकंठ बुडून जगणे सार्थक मानायचा काळ अजून यायचा होता त्या वेळी. हा अध्ययनयज्ञ पूर्ण होत असताना इकडे १५ ऑगस्ट उजाडलेले होते आणि स्वतंत्र भारतात उजाडलेला सूर्य प्रतिभावंतांना खुणावू लागला होता. कुरियन परत आले ते थेट केंद्र सरकारच्या सेवेत रुजू होण्यासाठीच. तोपर्यंत आणंद येथील दुग्धसंस्था जन्माला येऊन स्थिरावलेली होती. कुरियन यांनी या संस्थेला आकार दिला. सुरुवातीपासूनच तो इतका डोळ्यात भरणारा होता की अमूल या- पुढे देशाचा अत्यंत लाडका झालेल्या- ब्रँडच्या पहिल्या कारखान्याच्या उद्घाटनास अशा अनेक संस्थांची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. देशी उत्पादने, संकल्पना याकडे पाहून नाके मुरडणारा वर्ग त्याही वेळी होता. त्यामुळे अमूल या संस्कृतातील अमूल्यवरून बारसे झालेल्या ब्रँडचे काही खरे नाही, ही धारणा सर्वाचीच होती. जगात दुग्धजन्य पदार्थात काही कोणी करू शकत असेल तर ती फक्त नेस्ले ही स्विस कंपनीच असे मानणारे निवासी अभारतीय तेव्हाही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे सुरुवातीला जसे आपल्याकडे कोणत्याही नव्या संकल्पनेस विरोधाला सामोरे जावे लागते, तसेच अमूल या ब्रँडचेही झाले. कुरियन यांचे मोठेपण हे की या क्षेत्रातील युरोपीय संकल्पना त्यांनी बाजूला ठेवल्या. युरोपात आणि पाश्चात्त्य जगतात गायीच्या दुधाला महत्त्व असते आणि त्याचीच भुकटी करून विविध उत्पादने तयार केली जातात. भारतात गोमातेऐवजी महिषकन्येचे दूध वापरायला हवे, हे कुरियन यांना सुचले. भारतात म्हशी मोठय़ा प्रमाणावर असतात तेव्हा त्यांच्याच दुधावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने तयार व्हायला हवीत हा कुरियन यांचा विचार. तो त्यांनी सत्यात आणला. त्याच्या यशाबाबत कुरियन यांना एवढा विश्वास होता की सहकारी दूध संघ जन्माला आल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी अमूल ब्रँडची निर्मिती झालीदेखील. या कामाची महती इतकी होती की पंडित नेहरूंच्या नंतर पंतप्रधानपदी आलेले लाल बहादूर शास्त्री यांनी त्याच्या प्रचारासाठी स्वतंत्र यंत्रणाच जन्माला घातली आणि त्याची संपूर्ण सूत्रे कुरियन यांच्या हाती दिली. ज्या देशात एकेकाळी सणासुदीला गोडधोड खाण्यासाठी दुधाची आगाऊ नोंदणी केल्याशिवाय ते मिळत नसे त्या देशात दुधाचा महापूर वाहू लागला. ज्या देशातील हजारो बालकांना केवळ उपलब्धतेअभावी दूध पाहायलाही मिळत नसे त्या देशात हवे तितके हवे तेव्हा आणि हवे तिथे दूध मिळू लागले. या श्रेयाचे एकमुखी धनी हे कुरियन.
यश मिळवणे आणि यश राखणे यांत तफावत असते. याची जाणीव कुरियन यांना होती. त्यामुळे प्रचंड प्रसार होऊनही अमूलचा दर्जा घसरला नाही. मर्यादित आकारात उत्तम काम करता येते. परंतु आकारही वाढवायचा व दर्जाही राखायचा ही तारेवरची कसरत यशस्वी करण्यासाठी स्वप्नांना उद्यमशीलता आणि अर्थसाक्षरतेची साथ लागते. या तिन्हींचा समुच्चय कुरियन यांच्या ठिकाणी होता. दर्जात कोणतीही तडजोड न करता, रास्त दरात ग्राहकांना उत्पादन देताना ती निर्मिणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरेसा मोबदला देता येऊ शकतो हे अमूलने दाखवले. ब्रँड वगैरे संकल्पना या थोतांड आहेत, असे मानणारा एक तुच्छतावादी वर्ग आपल्याकडे आहे. कुरियन त्यांत कधीच सामील झाले नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील असूनही कुरियन आधुनिक होते. त्यामुळे अमूल उत्पादनांच्या जाहिराती आणि विपणन व्यवस्था याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. अमूलचे वर्णन ‘टेस्ट ऑफ इंडिया’ असे झाले ते कुरियन यांना या विषयात रुची होती आणि या आधुनिक वाटणाऱ्या विषयांची चव होती म्हणूनच. त्यामुळेच जागतिकीकरणानंतर भारतीय बाजारात प्रचंड ताकदीचे डेनॉन आदी आंतरराष्ट्रीय ब्रँड येऊनही अमूलने आपले स्थान गमावले नाही. जातिवंत प्रज्ञावान स्पर्धेतून उजळतो. अमूलने ते दाखवून दिले. भारताला एक नाही, तर अनेक अमूलची गरज आहे, असे लाल बहादूर शास्त्री यांना म्हणावेसे वाटले ते त्यामुळेच.
कुरियन यांचे मोठेपण असे की, सहकारात असूनही त्यांचा कधी सहकारसम्राट वा सहकारमहर्षी झाला नाही. संपत्तीनिर्मिती करताना अनेकांना सामावून घेण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या प्रारूपाचे अप्रूप औद्योगिक विश्वालाही होते. म्हणूनच एका आर्थिक नियतकालिकाने त्यांना आणि दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यास जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्याच्या समारंभात उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून मानवंदना दिली ती कुरियन यांना, त्या उद्योजकास नव्हे. खंत इतकीच की २००६ साली कुरियन यांना आपल्याच संस्थेतून अपमानित होऊन जावे लागले. निर्मात्याने आपल्या कृतीपासून योग्य वेळी दूर व्हायचे असते, निर्मितीस निर्मात्याची गरज नसते, हे तत्त्व कुरियन विसरले आणि त्यांच्या साधनेचे दूध अकारण विरजले.
तरीही गुजरात आणि आसमंतातही लाखो महिला, शेतकरी यांच्या जगण्यामागील ताठ कण्याचा आधार कुरियन होते हे विसरता येणार नाही. आपल्यालाही आणि त्या हजारो, लाखो शेतकऱ्यांनाही. त्यांच्या यशोगाथेने चित्रपटाच्या मोहमयी दुनियेलाही नोंद घ्यायला लावली. भारतीय संस्कृतीत पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा एक वर्ग आहे. त्यांच्या विचारानुसार कुरियन यांना खरोखरच पुनर्जन्म मिळणार असेल तर या भारतातील लाखो वंचित भूमिपुत्र कुरियन यांच्यावरील सिनेमातील गाण्यातूनच आपली अमूल इच्छा प्रकट करतील.
म्हारे घर अंगना ना भूलो ना..!