प्राण्यांचा, पक्ष्यांचा ‘उपयोग’च माणूस करत आलेला आहे… मग तो मारून खाण्यासाठी असो, ओझ्याच्या कामांसाठी असो की पुण्य कमावण्यासाठी!
श्वानप्रेमी आणि श्वानविरोधक यांची रस्त्यावरील श्वानांवरून जुंपणारी लढाई ही आपल्याकडची नेहमीची गोष्ट. पण या संघर्षाची कबुतरांपासून ते हत्तींपर्यंत विस्तारलेली व्याप्ती आणि त्याला असलेले वेगवेगळे पैलू यांच्या नुकत्याच झालेल्या दर्शनातून माणूस आणि प्राणी यांचे सहजीवन किती विस्मयचकित करणारे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कोल्हापुरातील महादेवी हत्तिणीवरून झालेला वाद असो की मुंबईतील ५१ कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात दादर येथील कबुतरखाना परिसरात झालेले आंदोलन असो, प्राणी-पक्षी आजही माणसाच्या भावविश्वाचा भाग आहेत, ही खरे तर आजच्या यांत्रिकीकरणाचे टोक गाठू पाहणाऱ्या, सगळ्याच नातेसंबंधांमध्ये व्यावसायिकतेचा कळस गाठणाऱ्या जगण्यातली सुखद, दिलासादायक गोष्ट. पण प्राण्यांविषयीचे माणसाचे हे प्रेम खरोखरच्या प्रेमाच्या उमाळ्यातून, खऱ्याखुऱ्या भूतदयेतून येते का, याचे उत्तर संदिग्ध असते आणि प्राणीप्रेम निवडक असेल तर त्याकडे कसे बघायचे असा प्रश्न उपस्थित होतो.
माणूस आणि प्राणी यांच्या सहजीवनाचा इतिहास मुळात भूतदयेतून सुरू होत नाही. माणूस हा इतर सर्व प्राण्यांसारखाच निसर्गातील एक प्राणी असल्यापासून ते त्याच्या आजच्या अत्यंत प्रगत अशा टप्प्यापर्यंतच्या वाटचालीत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याने त्याचे जगणे अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नांत त्याला उपयोगी असलेल्या प्राण्यांना माणसाळवले आणि विविध कामांसाठी, विविध पद्धतींनी त्यांचा वापर करून घेतला. गोवंशीय प्राणी, शेळ्या-मेंढ्यादी प्राणी, हत्ती, उंट, हरणे, घोडे, गाढवे, डुकरे, कुत्रे-मांजरे, कोंबड्या या सगळ्याच प्राण्यांचा त्याला या ना त्या प्रकारे उपयोग होता. मनोरंजनासाठी पोपट पाळणे, निरोप देण्यासाठी कबुतरे पाळणे याची मूळ प्रेरणा भूतदया नाही. मुळातच स्वतंत्र असलेल्या आणि आपल्याहून दुबळ्या अशा कोणत्याही जिवाला आपल्या अंकित करून घेणे आणि पाळणे म्हणजेच त्याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करणे हे क्रौर्याचेच लक्षण. वाघ, सिंह, बिबट्यासारख्या एखाद्या प्राण्याने मी माणसाला पाळतो, असे म्हटले असते, तर?
हत्ती तसेच कबुतरांवरून सुरू असलेला सध्याचा संघर्षही फारसा वेगळा नाही. जंगलात वावरण्यासाठी जन्माला आलेला हत्तीसारखा प्राणी एखाद्या मठाचे भूषण का असावा? हत्ती हा प्राणी ऐश्वर्याचे, समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या अत्यंत बुद्धिमान आणि तितक्याच ताकदवान प्राण्याचा माणूस आपल्या स्वार्थासाठी वापर करत आला आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तिणीवरून निर्माण झालेला संघर्ष एक गाव, त्यातील सामान्य माणसे विरुद्ध बलाढ्य न्यायसत्ता आणि अर्थसत्ता एवढाच नाही तर हत्तिणीच्या ताब्यावरून दोन्ही बाजूकडचे दुखावले गेलेले अहंकारही त्यामागे आहेत. गावातील लोकांना महादेवी ही हत्तीण त्यांच्या गावाचे भूषण वाटत होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तिला गावातून वनतारा इथे नेणे या गोष्टीला त्यांचा विरोध होता. इथल्या सामान्य लोकांनी त्यांना फोन सेवा पुरवणारी विशिष्ट कंपनी बदलणे, त्याच कंपनीचे पेट्रोल न वापरणे अशा छोट्या छोट्या पण प्रतीकात्मक गोष्टींमधून आपला निषेध अधिक तीव्र करत नेल्यामुळे शेवटी संबंधितांना या विरोधाची दखल घ्यावी लागली. पण मुळात कोणालाही हत्ती ताब्यात हवाच कशाला?
याउलट मुंबईतील संघर्ष राजसत्ता- न्यायसत्ता विरुद्ध एक विशिष्ट समाज असा होता. परिसरातील माणसांच्या आरोग्याच्या कारणास्तव टप्प्याटप्प्याने मुंबईतील ५१ कबुतरखाने बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि या निर्णयाला भूतदयेच्या मुद्द्यावर विशिष्ट समुदायाचा विरोध यातून माणूस महत्त्वाचा की प्राणी किंवा पक्षी हा नेहमीचा वादाचा मुद्दा पुढे आला. कबुतरांची विष्ठा व पिसे यांच्यामुळे माणसाच्या श्वसन यंत्रणेला धोका असतो, त्यामुळे मानवी वस्तीच्या परिसरात कबुतरखाने असता कामा नयेत असे एक बाजू सांगते, तर कबुतरखाना बंद केल्यामुळे कबुतरे रस्त्यावर मरून पडत आहेत, हा निर्णय आमच्या धर्माच्या विरोधात जाणारा आहे, असे दुसरी बाजू सांगते. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत कबुतरखाने सुरू झाले आणि वाढत गेले, असे सांगितले जाते. पण तेव्हाची नागरी वस्ती, लोकसंख्या यांची आजच्या काळाशी तुलनाच होऊ शकत नाही. लोकसंख्येची घनता प्रचंड असलेल्या मुंबईसारख्या शहरात कबुतरांमुळे माणसांच्या आरोग्याला त्रास होणार असेल तर हळूहळू करत कबुतरखाने बंद करत जाणे हाच मार्ग असू शकतो. पण त्याला धर्माचा पैलू जोडला गेल्यामुळे आता तो कठीण होऊन बसला आहे. कबुतर घरात येऊ नये म्हणून जाळ्या लावल्या जातात आणि पुण्य कमावण्यासाठी तेच कबुतर रस्त्यावर किंवा घराच्या आसपास कुठे तरी असावे याची सोय केली जाते यातला दुटप्पीपणा संबंधितांच्या लक्षातही येत नाही, याला कारण त्यांचे निवडक प्राणीप्रेम हेच आहे.
नांदणी गावातील हत्तीण वनतारामध्ये नेली म्हणून राज्यभरातून आरडाओरडा होतो आहे. पण ही ओरड करणाऱ्यांपैकी काही जण घरात पाळलेला कुत्रा नकोसा झाला म्हणून कुठे तरी रस्त्यावर सोडून देत असतील, त्याचे काय? हत्तिणीला परत आणा म्हणणाऱ्यांपैकीच कुणीतरी त्यांच्या भागातील रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करणाऱ्यांपैकी नसतील कशावरून? अनेकांना घरात मांजर हवी असते, पण तिला झालेली पिल्ले नको असतात. ती कुठे तरी दूर नेऊन सोडून दिली जातात, त्याचे काय? गाय हा आपल्याकडचा पवित्र प्राणी. गायीचे, म्हशीचे दूध हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. आपल्याला नियमित आणि भरपूर दुग्धपुरवठा व्हावा यासाठी गायी-म्हशींना कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे आपल्याला माहीत असते का? राज्यातील गोवंश हत्याबंदीमुळे परवडत नसलेल्या भाकड गायी सोडून दिल्या जातात. त्या रस्त्यावर भटकत राहतात तेव्हा आपले प्राणीप्रेम कुठे जाते? याउलट, रोज शेकडो कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या- बोकड यांची कत्तल झाल्याविना अनेकांना पूर्ण आहार मिळणार- किंवा मिळाल्यासारखे वाटणार- नाही, याची कल्पना भूतदयावाद्यांना असते का? जलीकट्टूसारखी प्रथा, कोंबड्यांपासून बोकडांपर्यंत वेगवेगळ्या प्राण्यांच्या झुंजी लावणे ही परंपरा नव्हे, हे माणसांना प्राणीप्रेमी कधी पटवून सांगणार? ओझी वाहणारी गाढवे, रेससाठी धावणारे घोडे यांचे समर्थन करताना आपले प्राणीप्रेम कुठे जाते? वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी चालत जाणे शक्य नसते तिथे यात्रेकरूंना खेचरावर बसवून नेले जाते. आपल्याला हव्या असलेल्या तथाकथित पुण्यासाठी या खेचरांची पायपीट आपण का गृहीत धरतो? आपल्या मनोरंजनासाठी पोपटादी पक्ष्यांनी पिंजऱ्यातील बंदिस्त जीवन का जगायचे?
आपले प्राणीप्रेम किती बेगडी आहे, याचे असे आणखी किती तरी मुद्दे मांडता येतील. पण प्राणी अभ्यासकांच्या मते माणूस त्याहूनही वाईट गोष्ट करतो आहे, ती म्हणजे पशुपक्ष्यांच्या सवयी बदलणे. सगळ्याच सजीवांकडे आपले अन्न आपले आपण शोधण्याची आणि मिळवण्याची उपजत, नैसर्गिक क्षमता असते. ते मिळवणे हाच त्यांचा जगण्याचा नैसर्गिक संघर्ष वा प्रेरणा असते. ते मुबलक आणि सहज उपलब्ध होते तेव्हा आपोआपच त्यांची वीण वाढते. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची, कबुतरे, कावळे यांसारख्या पक्ष्यांच्या वाढलेल्या संख्येमागे सहज उपलब्ध असलेले अन्न हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. मथुरेसारख्या धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शहरांत भरपूर प्रमाणात माकडे आहेत. भक्तांनी दिलेले अन्न खाऊन खाऊन लठ्ठंभारती झालेल्या माकडांची छायाचित्रे काही काळापूर्वी प्रसिद्ध झाली होती. आपली ही अशी भूतदया प्राणीपक्ष्यांच्या जिवावर उठणारीही आहे, हे आपल्याला कळू लागणे ही आपल्या मानगुटीवरून भूतदयेचे अतार्किक भूत उतरण्याची सुरुवात ठरेल.