व्यक्तीच्या उद्यमशीलतेस सुयोग्य प्रतिसाद देणारी संस्कृती, ही मुंबईची खरी श्रीमंती. ती गुजराती- मारवाडय़ांच्या चरणी वाहणाऱ्यांचे बौद्धिक दारिद्रय़ तेवढे दिसले..

आज देशाच्या सर्वोच्च नेतेपदी पोहोचल्यावरही गुजराती व्यक्तीस धन्यता वाटते ती मुंबईचा एखादा प्रकल्प गुजरातेत नेण्यात..

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

राज्यपालपदासाठी भाजप जे काही एकापेक्षा एक नग शोधून काढते त्यास तोड नाही. याबाबतही त्या पक्षाने काँग्रेसला सपशेल मागे टाकले हे खुद्द काँग्रेसजनही मान्य करतील. ताजे उदाहरण महाराष्ट्राचे. वास्तविक महामहीम झाले नसते तर भगतसिंग कोश्यारी या गृहस्थांबाबत येथे चार ओळीही छापून आल्या नसत्या. पण राज्यपाल झाले आणि कोश्यारी यांचे उपद्रवमूल्य उफाळून आले. अर्थात तेही महाराष्ट्र आहे म्हणून. या राज्याच्या तुलनेने सुसंस्कृत राजकारण परंपरेत राज्यपालास हाताळण्यात सहसा मर्यादाभंग होत नाही. राज्यपालपद हे राजकारणाचाच भाग असले तरी काही एक मर्यादा येथे पाळली जाते. त्यामुळे कसेही असले तरी राज्यपाल ‘सहन’ केले जातात. गेली तीन वर्षे हेच सुरू आहे. या सज्जनाने राजभवनास भाजपच्या मुंबई कार्यालयाची विस्तार खिडकी बनवले असले तरी, वेळीअवेळी औरस-अनौरस मंत्रिमंडळास शपथ दिली वा पेढे भरवले तरी, न्यायालयाने टोकल्यानंतर दोन-दोन वर्षे विधान परिषद नेमणुका केल्या नाहीत तरीही त्यांना गोड मानून घेतले गेले. त्यामुळेही असेल त्यांची भीड चेपली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या इभ्रतीलाच हात घातला. ‘गुजराती, मारवाडी येथून गेले तर मुंबईची श्रीमंती ती काय,’ अशा अर्थाचे वक्तव्य या महामहिमांनी केले. त्यावरून त्यांना इतिहासाच्या मात्रेचे चार वळसे चाटवणे किती आवश्यक आहे ते दिसते.

तत्पूर्वी त्यांना हे सांगायला हवे की गुजराती-मारवाडी येथे आल्यामुळे मुंबई-ठाणे श्रीमंत झाले हे निखळ असत्य असून मुंबई-ठाणे श्रीमंत होते म्हणून आपल्या संपत्तीवृद्धीसाठी गुजराती-मारवाडी येथे आले हे खरे सत्य. केवळ गुजराती-मारवाडी असणे हेच श्रीमंतीसाठी पुरेसे असते तर गुजरात आणि मारवाडी-बहुल राजस्थान ‘मुंबई’ झाले असते. पण या दोहोंचा भरणा असूनही त्या राज्यांत एकही मुंबई तयार झाली नाही; ती का? असा प्रश्न महामहिमांस पडावयास हवा. पण प्रश्न न विचारण्याच्या राजकीय संस्कृतीचे ते प्रतीक असल्याने अशी अपेक्षा त्यांच्याकडून करणे व्यर्थ. या वास्तवानंतर आता इतिहासाविषयी. कोणताही प्रांत, शहर यांची श्रीमंती तेथील धनिकांच्या धनावरून मोजली जात नाही. मोजता येत नाही. तर एखादा प्रांत वा शहर अशा संपत्तीकर्त्यांच्या कर्तृत्वास किती वाव देते, त्याच्या कल्पनाशक्तीस कोणत्या प्रांतात मुक्त वाव मिळू शकतो यावर त्या त्या शहराचे, प्रांताचे भलेबुरे ठरते. अन्यथा गुजराती वा मारवाडी यांचे कोठेही भलेच झाले असते. त्यांस मुंबईत येण्याची गरज भासती ना. महामहिमांच्या इतिहासज्ञानात प्रकाश पडावा यासाठी याबाबत काही उदाहरणे.

नुसेरवान हे पारशी धर्मगुरू हे महामहिमांची काशी असलेल्या गुजरातेतील नवसारीचे. पण त्यांच्यातून टाटा विकसित होण्यासाठी नुसेरवानाने मुंबईची कास धरली. वास्तविक राज्यातील मोठे शहर म्हणून त्यांना ‘अम्दावाद’ जवळचे वाटायला हवे होते. पण त्यांना मुंबईत येणे गरजेचे वाटले. इतके की त्यानंतर त्यांचे चिरंजीव जमशेटजी यांनी टाटा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतरही पहिले काही उद्योग या भूमीतच सुरू केले. आपले मूळ गाव असलेल्या गुजरातेत एखादा कारखाना काढावा असे काही त्यांना वाटले नाही. त्यांच्याही आधी दोन-अडीचशे वर्षे सह्याद्रीच्या या प्रांतात जन्मलेल्या तरुणालाच समग्र मुघलशरण देशात छत्रपती व्हावे असे वाटले. एरवी मारवाडात आपल्या बायकांनाच जोहार करावयास लावणाऱ्या सत्ताधीशांची कमतरता नव्हती. हे बडेबडे हिंदू सरदार-दरकदार मुघलांच्या दरबारात मुजरे करण्यात धन्यता मानत असताना शिवाजी शहाजी भोसले या तरुणाने साध्या शेतकरी कुटुंबातील आपल्याच वयाच्या तरुणांना हाताशी घेऊन स्वत:चे राज्य उभे केले. भौगोलिक आणि सांपत्तिकदृष्टय़ा त्यांच्यापेक्षा मोठय़ा सत्ता राजस्थान-गुजरातेत खंडीभर होत्या. पण त्यातील किती जणांस स्वत: छत्रपती व्हावे असे मुळात आधी वाटले, नंतर त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याचाही विचार महामहिमांनी एकदा करावा. इंग्रजांच्या काळात समाजसुधारणेची मुहूर्तमेढ भले राजा राममोहन रॉय यांनी रोवली असेल. पण तिचा वसा चालवला तो महाराष्ट्रानेच. शूद्राची वागणूक दिल्या जाणाऱ्या महिलांच्या शिक्षणाची सुरुवात या महाराष्ट्रात झाली. ती समाजसुधारकांच्या बंगालात अथवा कसल्याही सुधारणेचा वारा न शिरलेल्या गुजरात-राजस्थानात झाली नाही याचे काही मोल महामहिमांस नसेलही पण हा या प्रांताचा लखलखीत इतिहास आहे. अमेरिकेत राइट बंधूंच्या विमानोड्डाणाच्या आसपासच शिवकर बापूजी तळपदे या ‘जातिवंत’ मुंबईकरांचे विमान उडाले ते याच गिरगावच्या चौपाटीवर. आणि संमतिवयाचा मुद्दा धसास लावणारी रकमाबाई राऊत ही वैद्यक स्त्रीदेखील याच मुंबईची आणि तीस आवश्यक पाठिंबा दिला तो याच मुंबईने. गल्ल्यात पैसे आहेत म्हणून विमान बनवून पाहावे अथवा आपल्या घरातील मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी पाठवावे असे काही एखाद्या गुर्जर कुटुंबास वाटल्याची नोंद नाही. मूळचे गुजरातीच; पण परदेशातून भारतात स्थलांतरित व्हायची वेळ आल्यावर धीरुबाई अंबानी यांना काही परत गुजरातेत जावे असे वाटले नाही. त्यांनी आपले बिऱ्हाड हलवले ते मुंबईत. गुजरातेतील बडोदे या श्रीमंत मराठी संस्थानात असूनही चित्रपट बनवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादासाहेब फाळके यांस मुंबईत यावेसे वाटले. सर्वच क्षेत्रात अशी असंख्य उदाहरणे सापडतील. त्यातून एकच मुद्दा अधोरेखित होतो.

तो म्हणजे व्यक्तीच्या उद्यमशीलतेस सुयोग्य प्रतिसाद देणारी प्रांतसंस्कृती नसेल तर व्यक्ती आणि तो प्रांत दोघेही दरिद्रीच राहतात. प्रत्येक प्रांताची अशी जनुकीय व्यवस्था असते. त्याचे प्रतिरूप होऊ शकत नाही. हे वास्तव इतके कटू आणि काळय़ा दगडावरची रेघ आहे की महाराष्ट्रालासुद्धा दुसरी मुंबई या राज्यात करता आली नाही. याच इतिहासाचा विसर पडल्यामुळे मूळचे गुजराती असलेल्या मोरारजी देसाई यांनी कोश्यारी यांनी केली तीच चूक केली. त्यातून जे हिंसक महाभारत घडले तो इतिहास ताजा म्हणून महामहिमांस परिचित असण्यास हरकत नाही. त्याहीआधी देशाच्या पारतंत्र्याची जाणीव होऊन त्या विरोधातील राष्ट्रीय हुंकार उमटला तो मुंबईतच आणि मूळच्या गुजराती मोहनदास करमचंद यांस १९४२ चे ‘चले जाव’ आंदोलन सुरू करावेसे वाटले ते मुंबईतच. ही या शहराची खरी श्रीमंती आहे. गुजराती आणि मारवाडी यांच्या चरणी ती वाहून महामहिमांनी आपले बौद्धिक दारिद्रय़ तेवढे दाखवून दिले. सर्व काही गल्ल्यात जमलेल्या खुद्र्याच्या साहाय्याने मोजावयाची सवय लागल्यास असेच होणार.

तेव्हा खरी समस्या आहे ती गल्लाशरण मानसिकतेची. आज देशाच्या सर्वोच्च नेतेपदी पोहोचल्यावरही गुजराती व्यक्तीस धन्यता वाटते ती मुंबईचा एखादा प्रकल्प गुजरातेत नेण्यात. मग ते आंतरराष्ट्रीय वित्तकेंद्र असो वा विमा व्यवसायाच्या नियंत्रकाचे मुख्यालय असो. या अशा संस्था मुंबईला नाकारण्यासाठी या सर्वास जिवाचा आटापिटा करावा लागतो, यातच मुंबईचे मोठेपण अधोरेखित होते. तथापि मुंबईच्या नावे आणाभाका घेणारे आणि मुंबईपुरताच जीव असणारे सर्व राजकीय पक्ष या ‘सर्व काही गुजरात’च्या मागे फरफटत जातात हे मुंबईचे दुर्दैव. त्यामुळेच ही अशी नामांकित मंडळी महाराष्ट्राच्याच वाटय़ास येतात! आणि म्हणून हे असे महामहीम स्थानिकांच्या अस्मिता पायदळी तुडवू धजतात.

पूर्वीच्या मराठी कादंबऱ्यांत नवऱ्याने टाकलेली वा अकाली विधवा झालेली कथानायक/ नायिकेची राधाक्का वा तशाच नावाची आत्या संसारात बिब्बा घालत असे. आलवणातील या आत्याच्या अतृप्त इच्छांचे राजकीय प्रतीक म्हणजे हे सध्याचे महामहीम. त्यांना त्यांच्या राज्यात कोणी विचारत नसेल. त्यांच्या तेथील राजकारणात राहिलेल्या अतृप्त इच्छा राजभवनातून पूर्ण करताना दिसतात. तेव्हा राजभवनात या अशा राधाक्का नेमण्याची आणि त्यांना गोड मानून घेण्याची प्रथा जोपर्यंत दूर केली जात नाही तोपर्यंत हे असेच चालणार.