प्रक्षेपण भूमी अमेरिका. प्रक्षेपित वाहन अमेरिकेतील एका नवउद्यामीने तयार केलेले. प्रक्षेपण केलेला अग्निबाण दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्याने बनवलेला आणि या वाहनातील प्रवासी पोलंड, हंगेरी, अमेरिका आणि भारत या चार देशांचे. ते गेले त्या अंतराळ स्थानकासाठी ही ७३ वी फेरी. त्या स्थानकावर सध्या अमेरिका, रशिया, कोरिया अशा देशांचे सात अंतराळवीर तैनात आहेत. कोणाही भारतीयाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल टाकण्याची ही पहिलीच वेळ. तो मान ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांस मिळाला. त्याआधी १९८४ साली राकेश शर्मा यांनी पहिली अंतराळवारी केली. त्यानंतर जवळपास ४१ वर्षांनी दुसरा भारतीय अंतराळात झेपावला. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांची ही अंतराळफेरी १८ दिवस चालली आणि त्यात त्यांनी तब्बल एक कोटी ३० लाख किलोमीटर इतके अंतर कापले. या काळात पृथ्वी आणि ते अंतराळ स्थानक यातील ३१० इतक्या कक्षा त्यांनी ओलांडल्या. अमेरिकी कंपनीने बनवलेल्या, अमेरिकी यानाने प्रक्षेपित केलेल्या, हंगेरी आणि पोलिश या लहानशा देशांचेही अंतराळवीर सहप्रवासी असलेल्या ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या या प्रवासासाठी भारताने सुमारे ५५० कोटी रु. मोजले असे सांगितले जाते. ही अंतराळ सफर यशस्वी ठरली. त्यासाठी ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचे तसेच अमेरिकेची अवकाश यंत्रणा ‘नासा’ आणि आपली अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ यांचे अभिनंदन. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीपासून ते सामान्य भारतीयापर्यंत सर्वच या यशाने सुखावले असून या कौतुकाने ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या आई-वडिलांचा आनंद द्विगुणित होईल. शुक्ला आणि कुटुंबीयांचे अभीष्टचिंतन करून इतरांनी या अवकाश मोहिमेचे डोळस विश्लेषण जरूर करावे. तसे केल्यास विचार कराव्या अशा अनेक बाबी समोर येतील.
जसे की ज्या वाहनातून ग्रुप कॅप्टन शुक्ला आणि अन्य तिघांनी शब्दश: कोट्यवधी किलोमीटर्सचा प्रवास केला ते ‘अॅक्झिऑम’ हे अवकाशयान ही एका साध्या अमेरिकी स्टार्टअपची निर्मिती आहे. अवघ्या आठ वर्षे वयाच्या या नवउद्यामींचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवसाय विस्तार अधिकारी भारतीय आहेत. ‘भारतातील नवउद्यामी हे खाद्यान्न घरपोच आणून देणारे उद्याोग करतात’, अशी टीका आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडे केली. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्टार्टअपचे असे गगनाला नव्हे तर थेट अवकाशाला गवसणी घालणे विशेष उल्लेखनीय. या यानाने जे प्रक्षेपक वापरले त्याची निर्मितीही खासगी क्षेत्रातीलच. इलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या दोन कंपन्या अवकाश क्षेत्रात अनेक प्रयोग करतात. ताज्या अवकाश यात्रेतील प्रक्षेपक हे मस्क याच्या कंपनीचे होते. अवकाशातील भरारीनंतर आपली मोहीम फत्ते करणारे हे प्रक्षेपक एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे पुन्हा आपल्या अवकाश प्रक्षेपण संचात येऊन बसतात. त्यांचे हे परतणे हे विज्ञानाचे यश. ग्रुप कॅप्टन शुक्ला आणि अन्यांचा प्रक्षेपक मात्र समुद्रात उतरवला गेला. एका निर्वात पोकळीत हे चार अवकाशयात्री होते आणि त्यांना घेऊन उतरणाऱ्या यानाने पॅराशूट योग्य वेळी उघडून सर्वांस सुखरूप पृथ्वीवर आणले. गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडणे, नंतर गुरुत्वशून्यावस्थेत राहणे आणि कोट्यवधी किलोमीटरचा प्रवास सुखरूपपणे करून पृथ्वीवर परतणे हे सारेच विज्ञानाची महती अधोरेखित करणारे. आता या चौघांनी अवकाशात काय केले या विषयी.
त्यांनी अवकाश केंद्रावर ६० प्रयोग केले. त्यातील सात प्रयोग भारताने प्रस्तावित केलेले होते. या सात प्रयोगांत धारवाड येथील कृषी विद्यापीठ, आपली जनुकीय अभियांत्रिकी संस्था, बंगलोर येथील विज्ञान संस्था, जैव-रासायनिक विभागांतर्गतचे स्कंद पेशी (स्टेम सेल) संशोधन केंद्र अशा संस्थांचा सहभाग होता. आपण केलेल्या प्रयोगांकडे नजर टाकल्यास ठळकपणे जाणवणारी बाब म्हणजे आपले प्रयोग होते ते अवकाशात बुरशीची (अल्गी) वाढ कशी होते, धान्यास/कडधान्यास अवकाशात मोड येतात किंवा काय, गुरुत्वाकर्षणशून्य अवस्थेत व्यक्तीच्या स्नायू ऱ्हासाची निरीक्षणे आणि कारणे, वातावरणशून्यावस्थेत जिवाणूंची वाढ इत्यादी. ते महत्त्वाचेच. पण त्याचबरोबर अतिउच्च कोटीचे तंत्रज्ञान, त्यामागील गणिती मांडणी, इलेक्ट्रॉनिक्स आदींबाबत काही महत्त्वाच्या प्रयोगात भारतीयाचा वाटा असता तर ते अधिक कौतुकाचे होते. याचे कारण आपण लवकरच ‘गगनयान’ अवकाशात प्रक्षेपित करू पाहतो. एखाद्या भारतीय सजीवाने भारतीय बनावटीच्या यानातून अवकाशात झेपावण्याचीही आपल्याला प्रतीक्षा आहेच. परंतु आपल्या चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर प्रवासापेक्षाही बेझोस आणि मस्क यांच्या कंपन्या सुरक्षितपणे अवकाशयात्रा घडवू लागलेल्या असताना आपणास अवकाशयात्रा प्रगतीचा वेग वाढवावा लागणार; हे निश्चित. अशा वेळी अधिक गहन वैज्ञानिक प्रयोग करण्याची संधी आपणास मिळणे महत्त्वाचे आहे. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या यशामुळे भावनेने भारलेल्या वातावरणात या वास्तवाची जाणीव महत्त्वाची.
याचे कारण विज्ञान हे फक्त बुद्धीवर चालते. त्यात भावनेस थारा नाही. म्हणजे वैज्ञानिक निकष चोख पाळले गेले असतील तर सुमुहूर्त/कुमुहूर्त यावर प्रयोगाचे वा प्रवासाचे यश अजिबात अवलंबून नसते. अशा विज्ञानाधिष्ठित यानाच्या चाकास लिंबू-मिरची बांधली नाही तरी काहीही फरक पडत नाही आणि विज्ञानच कच्चे असेल तर कितीही गंडे-दोरे बांधले, अंगारे/धुपारे केले तरी यश मिळणे अवघड. याची जाणीव असलेल्या पं. नेहरू यांच्यासारख्या द्रष्ट्या पंतप्रधानाने १९६२ साली ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ची स्थापना केली. तिचेच रूपांतर पुढे ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेन’, म्हणजे ‘इस्रो’ या संस्थेत झाले. इतकेच नाही तर याच्या जोडीला ‘हिंदुस्थान एअरोनॉटिक्स’, ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’, ‘आयआयटी’ आणि अन्य अनेक महत्त्वाच्या विज्ञानवादी संस्था पं. नेहरू यांच्या विज्ञानवादी धोरणांतून आकारास आल्या. ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास गतवर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘विज्ञानधारा’ योजनेचे तोकडेपण अधिक टोचेल. या विशेष विज्ञानोत्तेजक योजनेसाठी करण्यात आलेली तरतूद फक्त १,४२५ कोटी रु. इतकी आहे आणि गतसाली विज्ञानासाठी वाढवलेली रक्कम २० हजार कोटींपेक्षा अधिक नाही. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या या एकाच प्रवासासाठी भारताने ५०० हून अधिक कोटी रुपये खर्च केले असले तरी इतक्या तरतुदींत आपली ‘विज्ञानधारा’ कुठपर्यंत धावेल याचा अंदाज बांधणे अवघड नाही. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य राजकीयदृष्ट्या(च) महत्त्वाच्या ‘लाडकी बहीण’सारख्या योजनेवर जितका खर्च करते त्याच्या निम्मी रक्कमही विज्ञान संशोधन कार्यासाठी वाढवण्यात आलेली नाही. आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्काही तरतूद उच्च विज्ञान संशोधनासाठी आपण करू शकत नाही, हे आपले वास्तव.
ते तातडीने बदलायला हवे. आताच्या अवकाशयात्रेत भारतीय अवकाशवीर सहभागी होता ही आनंदाची बाब असली तरी आपल्यापेक्षाही सर्वार्थाने कित्येक पट लहान पोलंड आणि हंगेरी देशांचे अवकाशयात्रीही या यात्रेत होते. तेव्हा ग्रुप कॅप्टन शुक्ला यांचे कौतुक करताना वास्तवाचे भान हवे. कोट्यवधी किलोमीटर उंचावरून ठिपक्याइतक्या दिसणाऱ्या पृथ्वीस पाहताना ‘सारे जहाँसे अच्छा’ वगैरे वाटणे ठीक. पण या असल्या भाबड्या-बोलांची मर्यादा लक्षात घेऊन विज्ञानावर लक्ष केंद्रित केल्यास आज ना उद्या आपणही इतर देशांच्या अवकाशयात्रींना ‘‘आजा मेरी गाडी में बैठ जा…’’ असे म्हणू शकू, यात शंका नाही.