धरणे कोरडीच, पण भूजलसाठाही ओरबाडला जातो आहे आणि नगदी पिकांसाठी पाणी वाहात असताना शेतकरी आत्महत्या सुरू आहेत, हे दाहक वास्तव..

निवडणुकीच्या हंगामात शहाणपण, विवेक इत्यादींचा तुटवडा असतो हे ठाऊक होते. पण निवडणुकांच्या काळात अवर्षणही असते हे सध्याच्या वातावरणाने सिद्ध होते. याआधीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या २०१९ साली. त्या वेळी १० मार्चला निवडणुकांची घोषणा झाली आणि २३ मे रोजी मतमोजणी झाली. महाराष्ट्राने याच काळात नेमकी दुष्काळी स्थिती अनुभवली. त्याही वेळी आचारसंहिता आडवी येत असल्याने सरकार फार काही भरीव मदत शेतकऱ्यांस करू शकले नाही. आधीच सरकारी कार्यक्षमतेचा उल्हास. त्यात हा आचारसंहितेचा फास. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणूक हंगामात ‘लोकसत्ता’ने ३० एप्रिल (२०१९) रोजी ‘संहिता संपवा’ हे संपादकीय लिहून आचारसंहिता ही शेतकऱ्यांच्या मदतीच्या आड कशी येत आहे दाखवून दिले. यंदा परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी तीत अधिकच बिघाड झाल्याचे दिसते. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्रास केवळ दुष्काळाचाच सामना करावा लागला.  त्या वेळी भाजप आणि शिवसेना असे दोन पक्षांचे सरकार होते. या वेळी राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे त्रिपक्षीय सरकार आहे आणि राज्यासमोर दुष्काळी स्थितीच्या जोडीला अवकाळीही आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष वाढले आणि राज्यासमोरील संकटही वाढले. राज्याच्या काही भागांत जमिनीलाच काय पण शरीरासही भेगा पाडेल अशी उष्णता आणि ऊन आणि दुसरीकडे काही भागांत जमिनीवर उभे आहे त्यास आडवे करणारे वादळ आणि पाण्यात बुडवणारा पाऊस. काही प्रदेश कोरडे ठाक आणि त्यांस किमान ओलाव्याची आस. तर काही इतके ओले की ते कधी कोरडे होतील की नाही; असा प्रश्न. खरे तर कोणत्याही सरकारला नामोहरम करण्यास यातील एक संकटही पुरेसे आहे. येथे तर दोन दोन संकटे एकाच वेळी उभी ठाकलेली दिसतात. पण लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा उत्सवात मग्न सरकार मोठय़ा प्रमाणावर मदतकार्यास लागलेले आहे, असे काही दिसत नाही. या संकटाचा आवाका किती असावा?

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial drought situation in maharashtra farmer suicide amy
First published on: 23-05-2024 at 01:43 IST