एकेका विषयात स्वत:ला गाडून घेऊन आयुष्यभर त्या विषयाचा ध्यास घेणाऱ्या उत्तम अभ्यासकांची थोर परंपरा या राज्यास आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ‘ज्ञानकोश’कार केतकर, त्र्यं. चि. शेजवलकर, सेतुमाधवराव पगडी, अलीकडच्या काळातील रा. चिं. ढेरे असे अनेक महानुभावांचे दाखले यासंदर्भात देता येतील. गजानन भास्कर मेहेंदळे हे या मालिकेतील. ते आकस्मिक गेले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा प्राण घेतला. गुरुगृही राहून २४ तास संगीतसाधनेची पूर्वीची परंपरा ज्याप्रमाणे कालानुरूप लुप्त होत गेली, तशीच एकेका विषयासाठी आयुष्य वेचणाऱ्यांची परंपराही लुप्त होत चालली आहे. गजाभाऊ मेहेंदळे हे एखाद्या विषयाला वाहून घेऊन अशा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांतील बहुधा शेवटचे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने काय गमावले याचा विचार करू गेल्यास बरेच काही वजा होताना दिसते.
त्याची सुरुवात गजाभाऊंच्या निधनवृत्तानेच व्हावी. ‘शिवचरित्रकार’ गेले ही उपाधी विविध माध्यमांनी त्यांच्या निधनवृत्तात दिल्याचे आढळते. मेहेंदळे यांच्यावरील अन्याय येथूनच सुरू होतो. त्यांच्या अभ्यासवृत्तीचे वर्णन करताना फक्त ‘शिवचरित्रकार’ असा त्यांचा उल्लेख हा त्यांच्या कार्यकर्तृत्वावर तसेच छत्रपतींच्या देदीप्यमान इतिहासावरही अन्याय करणारा ठरतो. ‘शिवचरित्रकार’ ही उपाधी हे त्यांचे माध्यमी सुलभीकरण ठरते. मेहेंदळे हे छत्रपतींचे आणि त्यानिमित्ताने इतिहासाचे डोळस, चिकित्सक आणि विचक्षण अभ्यासक होते. यातील डोळस अभ्यासक हा उल्लेख महत्त्वाचा. याचे कारण अलीकडच्या काळात या राज्यात इतिहासाचे मोठ्या प्रमाणावर कप्पेकरण वा (दंत)कथा-करण झाले असून मेहेंदळे यांनी स्वत:स अशा कोणत्याही कप्प्यात कधीही अडकवून घेतले नाही, याला कारण त्यांची अथक अभ्यास तपश्चर्या. हे त्यांचे आणि अर्थातच त्याहीपेक्षा त्यांच्या अभ्यासाचे मोठे यश. मेहेंदळे हे ब्राह्मण आणि त्यांचा अभ्यासविषय मराठ्यांचा इतिहास. त्यांच्या अभ्यासाचा आणि त्या अभ्यासाधारित निष्कर्षांचा प्रामाणिकपणा असा की त्यांची जात आणि अभ्यासविषय यांत कधी संघर्ष झाला नाही. वास्तविक असे न होणे ही सुसंस्कृततेची किमान पातळी. पण तीच अलीकडे अनेकांनी ओलांडलेली असल्याने बहुसंख्यास न रुचणारे काही नोंदवल्यास तसे करणाऱ्याचे मूळ आणि कूळ यांचा उद्धार सर्रास केला जातो. मेहेंदळे यांच्याबाबत तसे कधी झाले नाही.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी इतिहास आणि दंतकथा यांची गल्लत होऊ दिली नाही. जे काही मांडावयाचे ते शुद्ध पुराव्यांच्या आधारे आणि जी निरीक्षणे नोंदवायची ती कोणत्याही अभिनिवेशाशिवाय हे इतिहास लेखनाचे प्रामाणिक तत्त्व. आधीच्या पिढीतील अनेकांनी या तत्त्वास सोडचिठ्ठी दिली नाही, याची खात्री छातीठोकपणे देता येणार नाही. मेहेंदळे यांच्याइतकेच दुसरे अभिनिवेशशून्य इतिहासाभ्यासक य. दि. फडके यांनी आपल्या व्यापक आठखंडीय ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ मालिकेत इतिहासाचे ब्राह्मणीकरण कसे झाले ही बाब प्रामाणिकपणे नमूद केलेली आहे. मेहेंदळे यांनी स्वत:स यापासून अलिप्त ठेवले. हे त्यांच्या अभ्यासाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे विशेष मोठेपण. म्हणून ते लक्षात घेऊन केवळ ‘शिवचरित्रकार’ या एका विशेषणावर त्यांची बोळवण करणे अन्यायाचे ठरते. मेहेंदळे हे छत्रपती-अभ्यासक होते. फक्त चरित्रकार नव्हते.
हा अभ्यास मुळातूनच करता यावा यासाठी मेहेंदळे यांनी आधी मुळात त्या त्या भाषा शिकून घेतल्या. म्हणजे इतिहासकालीन पत्रव्यवहार पर्शियनमध्ये झालेला असेल तर त्याच्या अन्य कोणी लावलेल्या अन्वयार्थावर आपले मत बनवण्याऐवजी मूळ पर्शियन व्यवहार तपासण्याची क्षमता हवी. ती मेहेंदळे यांनी स्वत:मध्ये निर्माण केली. त्यामुळे त्यांचे इतिहास लेखन अधिक अस्सल ठरते. आपल्या अभ्यासाचा विषय एकदा नक्की केला की त्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न नकळतपणे अभ्यासकाकडून होण्याचा धोका असतो. तो मेहेंदळे यांनी कटाक्षाने टाळला. तसेच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी केवळ त्या व्यक्तीच्या गुणगानासाठी इतिहास लेखन केले नाही. तर त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या व्यवस्थेवर त्यांनी अत्यंत डोळस भाष्य केले. त्याचे अनेक नमुने त्यांच्या लेखनात दिसतात. उदाहरणार्थ ‘मुझुमदार’ (म्हणजे अर्थमंत्री) या पदाचे ‘अमात्य’पदात झालेले रूपांतर असो वा मुघलांच्या काळात जे ‘वाक्यानवीस’ (अपभ्रंश: वाकनीस) होते त्यांचे शिव-कालात मंत्री होणे असो. मेहेंदळे असे अनेक तपशील संदर्भासह सादर करतात. छत्रपतींचा त्यांनी लिहिलेला इतिहास इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबरापासून सुरू होतो. ही बाब महत्त्वाची अशासाठी की इतिहास लेखन, चरित्र आदी एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित असले तरी ती व्यक्ती ही काळाच्या अथांग प्रवासातील एक टप्पा असते. त्यामुळे त्या काळाच्या प्रवासाकडे दुर्लक्ष करून केवळ त्या टप्प्याचा विचार करणे अपुरे आणि अयोग्य. त्या तुलनेत मेहेंदळे यांचे इतिहास लेखन व्यापक कालाचा वेध घेणारे. म्हणून इतिहासाची गोष्ट वाचण्यात रमणाऱ्या सर्वसामान्य वाचकांपेक्षा अभ्यासकांस ते अधिक रुचत असे. साधारण दीड दशकापूर्वी ‘शिवाजी: हिज लाइफ अँड टाइम्स’ या महाग्रंथाच्या प्रकाशन समारंभानिमित्ताने त्यांच्याशी स्नेह जुळला. त्यानिमित्ताने आणि नंतरही एकूणच इतिहासास वाहून घेणारी त्यांची वृत्ती थक्क करत गेली. शिवाजी महाराजांचे अर्थकारण या विषयावर फारसे लिहिले गेलेले नाही. त्यांच्या लष्करी कौशल्याचे जितके रास्त कौतुक होते तितकी त्यांच्या अर्थविचारांची चर्चा होत नाही ही बाब नमूद केली असता त्यांनी त्याबाबतही लिखाण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.
त्या वेळी; दुसरे महायुद्ध हा पुढचा आपला अभ्यासविषय असेल असे मेहेंदळे म्हणाले होते. त्यानुसार त्यांच्या शैलीप्रमाणे त्यांनी खोल खोल जाणे सुरू केले. त्यासाठी ते जर्मन भाषा शिकले आणि महायुद्धग्रस्त देशांतील मूळ दस्तावेजांचा अभ्यास त्यांनी सुरू केला होता. जर्मनप्रमाणेच फ्रेंच, मोडी लिपी, संस्कृत आदी अनेक भाषांवर त्यांची हुकमत होती. खरे तर दुसऱ्या महायुद्धावर इतके लिखाण, कादंबऱ्या, चित्रपट आदी कलाकृती तयार झालेल्या आहेत की त्यांची गणतीच नसावी. तरीही भल्याभल्यास त्या दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास-मोह सुटत नाही. ‘द राइज अँड फॉल ऑफ द थर्ड राईश’, ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘अ वुमन ऑफ नो इंपॉर्टन्स’ असे एकापेक्षा एक भारावून टाकणारे ग्रंथ दुसऱ्या महायुद्धावर लिहिले गेले आणि अजूनही ते लिहिले जात आहेत. मराठीत त्यामानाने या विषयावर तितकी सकस निर्मिती नाही. पण हा भाषेचा नव्हे; तर भाषकांचा दुर्गुण. इतकेच काय देशाची फाळणी आदी विषयांवरही दक्षिणेकडील लेखकांच्या साहित्यकृती नाहीत. ही सांस्कृतिक उणीव गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या लिखाणाने दूर झाली असती. दुसऱ्या महायुद्धावरील लेखनासाठी त्यांनी जवळपास सहा हजारांहून अधिक कागदपत्रे जमाही केली होती. आता त्यांचे काय होणार हा प्रश्न. धुळे येथील राजवाडे अभ्यास केंद्रात इतिहासाचार्यांची लाखभराहून अधिक हस्तलिखिते प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. आपली इतिहासाविषयीची उदासीनता वा निवडक प्रेम लक्षात घेता मेहेंदळे यांच्या छत्रपतीतेतर इतिहासाचे असे होऊ नये, ही अपेक्षा. या प्रामाणिक इतिहासाभ्यासकास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे वंदन.