‘एअर इंडिया’च्या विमान अपघातप्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल बरेच वादळ उठवताना दिसतो. ते साहजिक. घातपात, मानवी चुका वा तांत्रिक बिघाड ही कारणे बहुतांश अपघातांमागे असतात. त्यास १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळावरील अपघात अपवाद असण्याचे कारण नाही. जवळपास पावणेतीनशे जणांचा जीव घेणाऱ्या या अपघाताची चौकशी विविध स्तरांवर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय संघटना, बोइंग कंपनी, आपले नागरी हवाई वाहतूक मंत्रालय अशा अनेकांकडून विविधांगांनी या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात असून त्याचे निष्कर्ष अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्याकडे सर्वच संबंधित लक्ष ठेवून आहेत. या सगळ्यांतील ‘द एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो’चा प्राथमिक चौकशी अहवाल गेल्या आठवड्याच्या अखेरीस प्रसृत झाला. या चौकशी समितीत हवाई दलात विमान तंत्रज्ञान अभियांत्रिकीचा (एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग) दांडगा अनुभव गाठीशी असलेले संबंधित यंत्रणेचे महासंचालक, अमेरिकेच्या वाहतूक सुरक्षा मंडळातील तज्ज्ञ, विमान वाहतूक नियंत्रण कक्षातील ज्येष्ठ आणि हवाई-वैद्याक आदींचा समावेश आहे. केंद्र सरकारची निर्धारित मुदत समाप्त होण्यास काही तासांचा अवधी असताना या तज्ज्ञांचा १५ पानी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला. आजाराचे निदान करणाऱ्या तपासणी अहवालामुळे उपचाराची दिशा स्पष्ट होऊन गोंधळ कमी होण्याऐवजी आजाराविषयीच संभ्रम निर्माण व्हावा तसे या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालामुळे होताना दिसते. म्हणून त्यावर भाष्य गरजेचे.
या अहवालानुसार विमानाच्या इंजिनांस इंधन पुरवठा करणारी कळ बंद आढळली. वैमानिकाने तसे केल्याशिवाय ही बटणे बंद होऊ शकत नाहीत. सबब वैमानिकाकडून चुकून हे घडले किंवा काय यावर हा अहवाल शंका व्यक्त करतो. यावरून वैमानिकाचा प्रमाद ते आत्महत्या करण्याची त्याची इच्छा असे वाटेल ते बरळणे सुरू झाले. त्यात या अपघातासाठी वैमानिकांवर ठपका ठेवण्याचे प्रयत्न पाहून वैमानिकांची संघटनाही चवताळली. त्यांनीही या वैमानिकांस ‘बळीचा बकरा’ करण्याच्या प्रयत्नांस आक्षेप घेतला. यात नवल नाही. बोइंग कंपनी आदी यंत्रणा या अपघाताचे पाप आपल्या कपाळावर फोडणार असे वैमानिकांस वाटणे साहजिक. कारण बोइंग कंपनीची चूक/ त्रुटी आदींपेक्षा वैमानिकांवर खापर फोडणे सोपे. त्यामुळे तसे काही होणार ही शक्यता ओळखून वैमानिकांच्या संघटनेने बोंब ठोकली. ते त्यांच्या व्यावसायिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य. परंतु आपल्या देशातील याआधीचे तीन विमान अपघात हे वैमानिकांच्या चुकीमुळे घडले होते या वास्तवाकडे कसे दुर्लक्ष करणार? कोझिकोड विमानतळावर पाच वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये झालेला, त्याआधी २०१० सालचा मंगलोर येथील आणि तत्पूर्वी २००० साली पाटणा विमानतळावरचा अपघात! या तीनही अपघातांस वैमानिकाची चूक/ हलगर्जी कारणीभूत असल्याचे चौकशी समित्यांस आढळले. मुळात धोकादायक जागी वसलेल्या कोझिकोड विमानतळाजवळील अपघातग्रस्त विमानाचा मुख्य वैमानिक सहवैमानिकाने दिलेला धोक्याचा इशारा धुडकावताना आढळल्याचे, तर मंगलोर अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकाने स्वयंचलित यंत्रणेने दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात आढळले. तसेच त्यांची अनावर झोप हेदेखील कारण या अपघातामागे असू शकते अशी नोंद चौकशी समितीने केली. याच धर्तीवर पाटणा विमानतळावरील अपघातही कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा ठपका संबंधित चौकशी समितीने ठेवला. अर्थात इतिहासातील या त्रुटी वर्तमानातील या अपघातासही कारणीभूत असतील असे सुचवणे अन्यायकारक ठरेल हे मान्य. परंतु यातून असे होऊ शकते ही बाब दिसून येते. सबब अहमदाबाद अपघातामागे आमचा काहीच दोष नाही, असे वैमानिक संघटनेने इतक्यातच म्हणणे घायकुतीचे.
तथापि हा अपघात, त्यामागील कारणे ही वैमानिकांपेक्षाही अधिक बोइंग कंपनीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. याचे कारण भारत आगामी काही वर्षांत तब्बल २०० हून अधिक विमाने बोइंग कंपनीकडून खरेदी करणार असून अहमदाबाद अपघातास विमानातील दोष जबाबदार आहे असे सिद्ध झाल्यास या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही २०० विमानांची मागणी रद्द होणे बोइंगला परवडणारे नाही. काही अभ्यासकांच्या मते भारताने विमानांच्या मागणीबाबत हात आखडता घेतल्यास बोइंगसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहील. आधीच युरोपीय ‘एअरबस’ कंपनीने बोइंगपुढे आव्हान निर्माण केलेले आहे. चीन या अन्य बड्या देशाने स्वत:ची देशांतर्गत विमान निर्मिती सुरू केलेली आहे. तो देश ना अमेरिकेवर अवलंबून आहे ना युरोपवर. त्यामुळे एक बडा ग्राहक कमी झाला. त्यात पश्चिम आशियातील अनेक देशांनी ‘बोइंग’पेक्षा ‘एअरबस’ला अधिक पसंती दिलेली आहे. हे कमी म्हणून की काय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छेडलेल्या व्यापारयुद्धाचाही फटका बोइंगला बसणार आहे. त्यात हा अपघात. तो जर उत्पादनातील त्रुटी, दोष इत्यादी कारणांमुळे झाला असे निष्पन्न झाले तर ‘बोइंग’चे कंबरडे मोडेल हे निश्चित. ते तसे होऊ नये यासाठी ही कंपनी तर प्रयत्न करेलच; पण त्याचबरोबर अमेरिकी अध्यक्षही आपले वजन वापरतील. अन्य अनेक मुद्द्यांवर या वजनाचा परिणाम भारतावर होऊ लागला असून अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी ते इलॉन मस्क याच्या टेस्ला ते स्टारलिंक कंपन्यांचा भारतात होत असलेला शिरकाव हे त्या वजनाचे द्याोतक असल्याचे मानले जाते.
या पार्श्वभूमीवर स्वत:च्या प्रतिमेस धक्का लागू नये म्हणून बोइंग कंपनी तसेच अन्य संबंधित अहमदाबाद अपघाताचा ठपका अन्य कोणावर ठेवतील असा संशय आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यास अनाठायी आणि अस्थानी ठरवता येणे अवघड. या वास्तवामुळे अहमदाबाद-लंडन विमानाचे सारथ्य करणाऱ्यांकडे अपघातासाठी बोट दाखवणे हे वादळ निर्माण करणारे ठरले. न्याय केवळ करून चालत नाही; तो करताना दिसणे आवश्यक असते हे न्याय प्रक्रियेबाबतचे वचन अपघात चौकशीबाबतही लागू पडते. तेव्हा आम्हास बळीचा बकरा बनवू नका; अशी वैमानिकांनी घेतलेली भूमिका अयोग्य ठरत नाही. ती उघड झाल्यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित यंत्रणा ‘‘एवढे गांभीर्याने घेऊ नका… हा अहवाल अंतिम नाही’’, अशा स्वरूपाचे खुलासे करताना दिसते. हे नंतर सुचलेले शहाणपण. हा अहवाल जर अंतिम नाही तर मग कोणा एका घटकास जबाबदार असल्याचे दर्शवणे संबंधितांनी टाळले का नाही? अहमदाबादचा अपघात भारतीय मानसिकतेवर खोल व्रण निर्माण करून गेलेला आहे. विमान कंपन्या, त्यामागचे अर्थकारण, आपल्या देशाची दबाव सहन करण्याची अलीकडे दिसून आलेली वृत्ती यामुळे आधीच या अपघाताचे ‘खरेखुरे’ कारण खरोखरच कधी तरी समोर येईल किंवा कसे याबाबत आपल्याकडे साशंकता आहे. असे असताना इतक्या नाजूक विषयाची हाताळणी करताना संबंधितांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक होते.
या जबाबदारीच्या जाणिवेची अनुपस्थिती प्राथमिक अहवाल निष्कर्षांच्या प्रसिद्धीतून दिसून आली. आता सरकार म्हणते अंतिम अहवालास किमान एक वर्ष तरी लागेल. असे होते तर मग इतक्या कालावधीत त्याचा काही अंश तरी प्रकाशित केलाच कशासाठी? यातून या सरकारचे ‘प्राथमिक’ निष्कर्षांवरचे प्रेम तेवढे समोर आले. मानवी जिवाशी, भावभावनांशी थेट संबंध असलेल्या विमान अपघाताबाबत तरी हे प्राथमिकप्रेम आवरणे गरजेचे होते. ते ध्यानात न घेतल्याने सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण होतो. असे होणे अयोग्य.