पश्चिम बंगालसारख्या राज्यात स्वत:स ‘सिद्ध’ केल्यानंतर पदोन्नती मिळून धनखड यांची थेट उपराष्ट्रपतीपदी प्रतिष्ठापना झाली होती.

भाजपने उपकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीने जरा जरी स्वत:ची स्वतंत्र बुद्धी वापरण्याचा प्रयत्न केला की काय होते हे सत्य पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने अधोरेखित होते. धनखड यांच्या आकस्मिक राजीनाम्याचे स्वागत करावे की त्याबद्दल खेद व्यक्त करावा हे विरोधी पक्षीयांना कळले नाही आणि ‘वरून’ आदेश नसल्याने भाजपवासीयांना उमगले नाही. विरोधी पक्षीयांना धनखड यांच्याविषयी ममत्व वाटावे असे त्यांचे कधी वर्तन नव्हते ना विचार! उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. अशा पदांवरील व्यक्तीने तटस्थ, पक्षनिरपेक्ष असावे अशी घटनाकारांची अपेक्षा असते.

लोकसभा, राज्यसभा, सर्व राज्यांच्या विधानसभा, राज्यपाल, राष्ट्रपती आदींनी ही अपेक्षा धुळीस मिळवली त्यास कित्येक दशके उलटली. हे सर्व महामहीम सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर होण्यात धन्यता मानतात. धनखड हे अशांच्याच मालिकेतील. वास्तविक हा मार्ग पत्करणाऱ्यांचा प्रवास सुखाचा होतो आणि गंतव्य स्थानी पोहोचल्यानंतरही सर्व बडदास्त चोख राखली जाते. धनखड यांचेही मार्गक्रमण या सुखाच्या दिशेनेच सुरू होते. धनखड यांस शासकीय इतमामाचा भलताच शौक. देशात असोत वा परदेशात.

आपली व्यवस्था उंची हॉटेलांतील अतिश्रीमंत कक्षात व्हावी, प्रवासासाठी खासगी विमान असावे, आगतस्वागत आणि दिमतीस सरकारी अधिकारी हजर राहावेत असा त्यांचा कटाक्ष असे आणि तो पाळला जाण्यात जरा जरी हयगय झाली की हे महामहीम आगपाखड करण्यास कमी करत नसत. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांस जे हवे ते केले जाण्याची हमी असल्याने त्यांचे हे चोचले आनंदाने पुरवले जात. तरीही त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. हा राजीनामा ही धनखड यांच्यापेक्षा भाजपची अपरिहार्यता होती.

कारण उपराष्ट्रपतींनी केलेला अक्षम्य गुन्हा. सत्ताधारी भाजप सर्व प्रमाद, आरोपांकडे काणाडोळा करू शकतो. हे आरोप भ्रष्टाचाराचे असोत वा अन्य त्याहूनही गंभीर. या आरोपांच्या ओझ्याखाली दबलेले अनेक भाजपवासी झाले आणि मग लगेच त्यांना आरोपमुक्ती मिळाली. धनखड यांचेही तसे बरेच सुरू होते. पण त्यांना स्वत:ची बुद्धी वापरण्याची अवदसा आठवली आणि त्यांच्या सगळ्या ‘पुण्याई’वर पाणी ओतले गेले. वास्तविक धनखड यांची पश्चिम बंगालातील राज्यपालपदाची कारकीर्द किती देदीप्यमान! पश्चिम बंगालात लोकनियुक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मार्गात अडथळे उभे करण्याची एकही संधी त्या राज्याचे महामहीम असताना धनखड यांनी सोडली नाही.

ममताबाईंना त्यांच्या उभ्या आयुष्यात अन्य कोणी इतके जेरीस कधी आणले नसणार. त्यातून महाराष्ट्राचे माजी महामहीम भगतसिंग कोश्यारी, तमिळनाडूचे विद्यामान महामहीम ए. रवी अशा अनेकांस प्रेरणा मिळाली. भाजपविरोधी राज्यातील अनेक महामहिमांनी धनखड यांचा आदर्श ठेवला आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तो मार्ग चोखाळला. भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या, न्यायिक, राजभवनी साहाय्यानंतरही अभेद्या राहिलेल्या पश्चिम बंगालसारख्या राज्यात स्वत:स सिद्ध केल्यानंतर धनखड यांस पदोन्नती न मिळती तरच नवल. ती मिळाली आणि देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक म्हणून थेट उपराष्ट्रपती भवनात त्यांची प्रतिष्ठापना झाली.

‘‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’’, या उक्तीचे जाज्वल्य अनुयायी असलेल्या धनखड यांचे त्यानंतरचे वर्तन सत्तापक्षाचे अनुयायी असल्यासारखे होते, यात आश्चर्य ते काय! त्यामुळेच वैफल्यग्रस्त विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. पण सत्ताधीशांचा भरभरून विश्वास असताना विरोधकांच्या अविश्वासास विचारतो कोण? धनखड यांनी तसे विचारले नाहीच. पण खाविंदांस इतके वाहिलेले असूनही त्यांच्यावर ही राजीनाम्याची वेळ आली. कारण वर उल्लेखलेला त्यांचा तो प्रमाद. इंदिरा गांधींच्या उत्तरकालीन काँग्रेसप्रमाणे विद्यामान भाजपतही स्वतंत्र बुद्धी चालवणे या गुन्ह्यास क्षमा नाही. सत्ताधारी हवे ते चोचले पुरवतील, गंभीरातील गंभीर प्रमाद पोटात घालतील; पण आपले डोके चालवण्याचा प्रयत्न काय; पण विचार जरी कोणी केला तरी त्याच्या हाती लगेच श्रीफल देऊन ‘आता या’ असे म्हणतील. धनखड यांस आता याची प्रचीती आली असेल.

त्याच वेळी जे झाले त्याने मूल-भाजपवासीयांस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. याचे कारण धनखड हे रक्ताने भाजपीय नव्हते. तसे ते असते तर अशी स्वतंत्र विचाराची इच्छाच त्यांच्या मनी उद्भवली नसती. धनखड यांचे कुल समाजवादी. त्यांनी काही काळ जनता दलात घालवला आणि नंतर काँग्रेसचीही साथ केली. म्हणजे भाजपसाठी ते संस्काराने तसे बाहेरचेच. पण विद्यामान सत्ताधीशांस ‘बाहेर’च्यांना ‘आत’ घेऊन आपलेसे करण्यात वा घरचे वाट पाहात असताना बाहेरच्यांचे कौतुक करण्यात बरेच स्वारस्य. म्हणजे संघ आणि भाजपतील अनेक प्रतीक्षा यादीत असताना, सावरकरांबाबत चर्चा होत असताना प्रणब मुखर्जी, चौधरी चरणसिंग वा कर्पुरी ठाकूर आदींस ‘भारतरत्न’ने सन्मानित करणे इत्यादी.

धनखड यांस उपराष्ट्रपतीपदी बसवण्याचा निर्णय याच मालिकेतील. असाच दुसरा प्रयत्न म्हणजे सत्यपाल मलिक यांस दिलेले जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद. धनखड यांच्याप्रमाणे मलिक हेदेखील समाजवाद्यांच्या कळपातील. यातील मलिक यांस तर ‘अर्बन नक्षल’ही ठरवता येईल, इतकी त्यांची पात्रता. तरीही त्यांना भाजपने जवळ केले आणि त्यांच्याच काळात ‘जम्मू-काश्मीर’ला ‘अनुच्छेद ३७०’ मुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण केले. पण पुढे मलिक ‘आपले’ राहिले नाहीत. भले त्यांना नंतर गोव्यासारख्या राज्यात पाठवले गेले! पण तरीही मलिक यांचे शेपूट भाजप नेतृत्वास सरळ करता आले नाही ते नाहीच. या दोहोंत आणखी एक साम्य आहे. ते म्हणजे हे दोघेही जाट.

भाजपने त्यांना जवळ करताना ते आपल्याशी जुळवून घेऊ शकतील किंवा काय यापेक्षा त्यांच्या जाट असण्यास अधिक महत्त्व दिले होते. राजस्थान, हरयाणा आणि अन्य उत्तर भारतातील जाट हे भाजपसाठी आव्हान आहेत. त्यातील एखाद्यास जवळ केले की जाट शांत होतील, असा त्या पक्षाचा होरा असणार. त्यातून मलिक आणि धनखड यांस भगवे वस्त्रविलेपित करण्याचा प्रयत्न भाजपने केला. या दोघांनी भाजपची भगवी उपरणी खांद्यावर घेतली खरी. पण तात्पुरतीच. नंतर त्यांनी ती झटकून आपल्या मूळ स्वभावाचे दर्शन घडवले आणि स्वतंत्र विचार करण्याचा प्रयत्न केला. तो उभयतांच्या अंगाशी आला.

विचार न करणे राजभवनी सुखासीन आयुष्याची हमी देते आणि विचार करण्याची किंमत मोजावी लागते. ती या दोहोंस द्यावी लागली. याउप्पर प्रश्न असा की मलिक यांच्याप्रमाणे धनखड हेदेखील आपले मन मोकळे करू लागणार का? मलिक हे पुढे भाजपचे कडवे टीकाकार बनले आणि बाकी कोणी नाही तरी त्यांनी संघातून प्रतिनियुक्तीवर भाजपत गेलेल्या राम माधव यांच्या अब्रूस हात घातला. धनखड यांस तसे काही करावयाची गरज नाही. आपणास राजीनामा देण्याचा ‘आदेश’ कोणाकडून आणि का आला असावा यावर जरी त्यांनी भाष्य केले तरी पुरे. धनखड हे मलिक यांच्यापेक्षा अधिक तडफदार आहेत. शिवाय वकिली केलेली असल्यामुळे त्यांना अशा भाष्याचा अनुभवदेखील अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वोच्च न्यायालयाविषयी, घटनेविषयी त्यांनी अनेकदा केलेले भाष्य त्यांच्यातील तडफदारपणा दाखवून देते. त्याचप्रमाणे त्यांनी उपराष्ट्रपतीपदावरून मुक्त झाल्यावर आपल्या मुक्तीविषयी बोलून असा तडफदारपणा दाखवावा. तसे केल्यास धनखड ही भाजपची नवी धडधड ठरू शकतील. ती त्यांनी ओढवून घेतलेली आहे.