सामान्य रशियनांनी पुतिन यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवताना विवेकास रजा दिली. त्याची शिक्षा म्हणजे नवाल्नींसारख्यांचे मरण..
अलेक्झांडर लित्विनेन्को, बोरीस नेम्त्सॉव, बोरीस बेरेझोवस्की, बदारी पतारलत्सिविली, निकोलाय ग्लुश्कॉव, युरी गोलुबेव, सर्जेई युशेन्कोव, नताल्या एस्तिमिरोवा, सर्जेई मॅग्तेस्की, ॲना पोलित्कोवस्काया आणि तिच्यासारखे १५७ पत्रकार, अलीकडे युक्रेनयुद्धात साथ देणारे येव्गेनी प्रिगोझिन, व्लादिमीर कारा-मुर्झा, मिखाईल खोदोर्कोवस्की, बुद्धिबळातील जग्गजेता गॅरी कास्पारॉव इत्यादी किती नावे सांगावीत? हे सारे पुतिनबळी. यातील कारा-मुर्झा तूर्त तुरुंगात आहेत आणि खोदोर्कोवस्की, कास्पारॉव देशत्याग केल्याने जिवंत आहे. यातील काही अब्जाधीश उद्योगपती होते, काही तर पंतप्रधानपदासारख्या महत्त्वाच्या पदांवरील राजकारणी होते, काही वकील तर काही मानवाधिकार कार्यकर्ते! यातील काही घराजवळ, काही तर अगदी क्रेमलिनसमोर, काही परदेशांत गोळय़ा घालून तर काही विषबाधेने मारले गेले. या सगळय़ांचा समान दोष एकच. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ध्येयधोरणांशी असहमती किंवा थेट विरोध. जो जो रशियात पुतिन यांस आडवे जाण्याचा प्रयत्न करतो तो मारला जातो. यातील काही उदाहरणार्थ बेरेझोवस्की हे खरे तर पुतिन यांचे सुरुवातीचे आधारस्तंभ. पण वरच्या पायरीवर गेल्यावर आपणास चढवणाऱ्यास पहिल्यांदा दूर करायचे असते हे जगद्विख्यात राजकीय सत्य ते विसरले आणि हा उद्योगपती त्याच्या लंडनमधल्या घरी बेवारसासारखा मारला गेला. अशा हत्यांचा प्रघात पुतिन सत्तेच्या केंद्रस्थानी आल्यापासून गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि पुतिन हयात असेपर्यंत तो विनासायास सुरू राहील. अलेक्सी नवाल्नी या कडव्या विरोधकाच्या भीषण आणि गूढ मृत्यूमुळे पुतिन यांची रक्तलांच्छित राजवट हा विषय चर्चेस येत असताना या नेत्याचे मरण हा एकच घटक विचारात घेऊन चालणार नाही.
हेही वाचा >>> अग्रलेख: विक्राळ अंतराळ..
त्यांच्या मरणाची वेळ लक्षात घ्यायला हवी. युरोपातल्या जर्मनीत म्युनिच येथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उद्घाटन होत असताना आणि या परिषदेत सहभागी होण्यासाठी नवाल्नी यांची पत्नी युलिया या तेथे गेलेल्या असताना रशियातल्या तुरुंगात नवाल्नी मरण पावतात हा केवळ योगायोग नाही. इतकेच नाही. ज्या दिवशी नवाल्नी मृत झाले तो याच परिषदेत पुतिन यांच्या सहभागाचा १७ वा वर्धापन दिन होता. या परिषदेत १६ वर्षांपूर्वी पुतिन यांनी आपल्या घणाघाती भाषणात पाश्चात्त्य, लोकशाहीवादी देशांविरोधात कडाडून टीका केली होती आणि आपली राजकीय दिशा काय असेल ते दाखवून दिले होते. यंदा पुतिन यांच्या कडव्या टीकाकार अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस या परिषदेत भाषण करणार असताना काही तास आधी नवाल्नी मरण पावतात हे सूचक. रशियात निवडणुका नावाचा फार्स अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. या निवडणुकांत कोण विजयी होणार याचे भाकीत त्या देशातीलच काय, पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा गंधही नसलेले शेंबडे पोरही वर्तवू शकेल. निवडणुकांचे निकाल मतदानाच्या आधीच जेव्हा इतके स्वच्छ वर्तवता येतात तेव्हा ती लोकशाहीच्या अवमूल्यनाची सुरुवात असते. रशियात ही प्रक्रिया पूर्णत्वाकडे निघालेली आहे. नवाल्नी यांचा मृत्यू हा या प्रक्रियेच्या अंताचा निदर्शक. त्या मृत्यूच्या ‘योगायोगा’वरून पुतिन हा किती पाताळयंत्री, खुनशी आणि रक्तपिपासू सत्ताधीश आहे याची कल्पना येईल. चेचन्या धोरणाबाबत मतभेद दर्शवणारे, युक्रेनयुद्धाला विरोध करणारे, शासकीय भ्रष्टाचाराविरोधात बोंब ठोकणारे आणि तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणारे अशा शब्दश: हजारो जणांस या पुतिनाने कोणतीही दयामाया न दाखवता यमसदनास पाठवले आहे. हे पुतिनोद्योग थांबवता आले असते तर तसे ते थांबवण्याची क्षमता एकाच माणसाने दाखवली.
अलेक्सी नवाल्नी. म्हणूनच ते पुतिन यांस नकोसे झाले होते. वास्तविक हे नवाल्नी काही लोकशाहीवादी, उदारमतवादी नव्हेत. कमालीचे उजवे आणि वंशवादी नवाल्नी हे स्थलांतरित आणि चेचन्यातील गरीब मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करीत. मुसलमानांस झुरळ संबोधण्यापासून त्यांना कसे ठेचावे याचा अभिनय करून दाखवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तथापि पुतिन यांस विरोध करण्यास सुरुवात केल्यापासून नवाल्नी यांस मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा या दोहोंत वाढ झाली. अलोकशाही ठासून भरलेल्या वातावरणात नागरिकांसमोर वाईट आणि अतिवाईट असाच आणि इतकाच पर्याय असतो. त्याचमुळे सामान्य रशियनांनी आणि रशियात लोकशाही यावी अशी इच्छा बाळगणाऱ्या परदेशीयांनी ‘कमीवाईट’ नवाल्नी यांस मदत करणे सुरू केले. नवाल्नी यांनी आपल्या पाठीराख्यांची निराशा केली नाही. मिळेल त्या माध्यमातून आणि मंचावरून ते पुतिन यांस ललकारत गेले. हे सोपे नाही. विशेषत: राज्यकर्ता पुतिन यांच्यासारखा अमानुष असतो तेव्हा त्या विरोधात भूमिका घेणे अधिकाधिक अवघड होत जाते. नवाल्नी यांस याचा अनेकदा प्रत्यय आला. त्याचमुळे कधी त्यांच्या चेहऱ्यावर औद्योगिक रंग टाकला गेला तर कधी खोटय़ानाटय़ा खटल्यांचा ससेमिरा लावण्यात आला. अशातही नवाल्नी यांनी पुतिन यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धैर्य दाखवले. त्यात यश येणे अशक्यच. तरीही नवाल्नी खचले नाहीत. तुरुंगात डांबल्यावरही ‘बाहेर’ असलेल्या आपल्या सुप्त समर्थकांमार्फत आंतरजालात, स्वत:च्या यूटय़ूब वाहिनीतर्फे ते पुतिन यांस उघडे पाडण्याचा उद्योग अव्याहत करत राहिले. तीन वर्षांपूर्वीची गूढ विषबाधा ही त्यांच्या मृत्यूची पहिली घंटा होती. त्या वेळी जर्मनीच्या चॅन्सेलरपदी अँगेला मर्केल यांच्यासारखी धडाडीची बाई नसती तर नवाल्नी यांचे चवथे वर्षश्राद्ध एव्हाना झाले असते.
हेही वाचा >>> अग्रलेख : …झाले मोकळे आकाश!
मर्केलबाईंनी त्या वेळी नवाल्नी यांस आश्रय दिला आणि त्यामुळे जर्मन वैद्यक त्यांच्या विषबाधेवर उतारा देऊ शकले. वास्तविक त्याच वेळी रशियात परत न जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर होता. अनेकांनी तसे सुचवलेही. पण परदेशातील उबदार उदारमतवादाच्या पांघरुणाचे सुख भोगत मायदेशाविषयी कढ काढणाऱ्या लबाडांतले नवाल्नी नसल्याने ते रशियात परतले. तेव्हापासूनच त्यांचा मृत्यू हा केवळ उपचार होता. तो पार पडला. रशियाविषयी मर्यादित आणि मतलबी माहिती असणाऱ्यांना पुतिन हे सर्व कसे काय करू शकतात याविषयी आश्चर्य वाटेल. त्याचे उत्तर पुतिन यांच्या राजकीय कथानकात (पोलिटिकल नॅरेटिव्ह) आहे. मायभूमीस मोठे करण्याचे स्वप्न दाखवणारा खोटा राष्ट्रवाद हा या कथानकाचा गाभा. त्याची तुलना ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाकड घोषणेशीच होईल. विचारांधळय़ा बावळटांस या, अशा घोषणा आकर्षून घेतात. कारण देश महासत्ता करायचा म्हणजे काय करायचे, म्हणजे काय होणार इत्यादी प्रश्न या अशांस भेडसावत नाहीत आणि जनता अशी खंडीभर दुधाचे आश्वासन देणाऱ्या सांडांच्या मागे जात राहते. पुतिन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. गोर्बाचेव्होत्तर रशियास अमेरिकेइतके वैभवी बनवण्याच्या त्यांच्या आश्वासनावर रशियन भाळले आणि हा मतपेटीतील सैतान आकारास आला. काळाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक देशांत असे होते. ते का याचे विश्लेषण विख्यात तत्त्ववेत्ते बट्र्राड रसेल यांनी करून ठेवलेले आहे. ‘‘श्रीमंत महाजनांनी उत्साही नेत्यामागे उभे राहणे हे फॅसिझमचे पहिले पाऊल. ते पाहून विवेकशून्यांचे चेकाळणे आणि त्यांच्या उन्मादासमोर शहाण्यांचे मौन हे पुढचे पाऊल’’, असे साम्यवादाविरोधात भूमिका घेणारे रसेल म्हणत. या भविष्यवेधी तत्त्ववेत्त्याचा प्रत्येक शब्द आज रशिया वा अन्यत्र प्रत्ययास येताना दिसतो. सामान्य रशियनांनी पुतिन यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवताना विवेकास रजा दिली. त्याची ही शिक्षा. आपण तहहयात रशियाच्या अध्यक्षपदी राहू अशी घटनादुरुस्ती पुतिन यांनी करून घेतलेली असल्याने फक्त काळ हा एकच घटक त्यांस सत्ताच्युत करू शकतो. शहाण्यांच्या मौनाचे मोल किती भयंकर प्रकारे चुकवावे लागते हे आता तरी रशियनांस कळावे.