विनेशच्या संघर्षाचे, लढ्याचे अप्रूप असलेले समग्र क्रीडाप्रेमी अंतिम फेरीकडे नजर ठेवून होते. जे झाले ते नुकसान भरून काढता येणारे नाही…
विनेश फोगट या जिगरबाज, लढाऊ आणि कमालीच्या प्रतिकूलतेतही स्पर्धात्मकता कायम ठेवू शकणाऱ्या जिद्दी खेळाडूविषयी अतीव करुणा, सहानुभूती, सहवेदना व्यक्त केल्यानंतर ही काही उदाहरणे : २०१७ च्या आशियाई स्पर्धांत भारतीय धावपटू संघ बाद केला गेला, कारण धावताना त्यांच्याकडून ‘अनवधानाने’ मार्गिका (लेन) बदलली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी २०१९ साली आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धांत भारतीय संघ आपल्या महामंडळाच्या दफ्तर दिरंगाईने पोहोचूच शकला नाही. त्याआधी एक वर्ष २०१८ च्या जाकार्ता आशिया स्पर्धेच्या उद्घाटनात भारतीय ध्वजवाहकांची भलतीच फजिती झाली. गेल्या टोकियो ऑलिम्पिक्समधून आपली कमलप्रीत कौर अशीच बाद ठरली. गेल्या सहस्राकात १९९८ सालच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पी. टी. उषा खिळ्यांचे बूट घालून धावल्या होत्या आणि २०१६ साली द्याुती चांदकडूनही असाच प्रमाद घडला. नव्या सहस्राकाच्या पहिल्याच वर्षी २००० सालच्या स्पर्धांत सीमा पुनिया थाळीफेक स्पर्धेतून बाद केली गेली. आपला कोणी खेळाडू स्पर्धाकाळात खोकल्याचे औषध घेतल्याने बाद ठरतो तर कधी अन्य काही सेवन करू नये ते सेवन केल्याने स्पर्धेबाहेर काढला जातो. वरील उदाहरणे अगदी वानगीदाखल. क्रीडाप्रेमी, अभ्यासक अशी आणखी काही उदाहरणे देऊ शकतील. या सगळ्यांतून आपले काही दुर्गुण पुन:पुन्हा समोर येतात.
हेही वाचा : विनेश फोगटची ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर क्रीडा कोर्टात धाव, रौप्यपदक मिळावं अशी केली विनंती
व्यवस्था/ नियमन यांस गांभीर्याने न घेण्याची वृत्ती, सर्वत्र ‘चलता है’ मानसिकता, शास्त्रकाट्याच्या कसोट्यांपेक्षा उत्स्फूर्ततेवर वेळ मारून नेण्याची वृत्ती आणि या सगळ्यांच्या जोडीला याच दुर्गुणांनी युक्त भारतीय क्रीडा व्यवस्थापनाची बेफिकिरी. देशात काहींना काही वा त्यातील आणखी काहींना ‘सर्व काही’ मॅनेज करता येत असेल. येतेही. वाटेल ते गैरव्यवहार, नियमांकडे सर्रास काणाडोळा केला तरी त्यांचे काही बिघडत नाही आणि ते बिघडत नाही म्हणून सामान्यांनाही त्याबाबत काही वाटत नाही. ‘‘कायद्यासमोर सर्व समान असले तरी काही अधिक समान असतात’’, हे ऑर्वेली सत्य आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान! त्यामुळे नियम काटेकोरपणे पाळायचे असतात आणि आपण तसे नसलो तरी जगाच्या पाठीवर असे नियम पाळणारे असतात याचेच आपणास विस्मरण होते. हे वास्तव एकदा लक्षात घेतले की विनेश फोगट हिच्यासंदर्भात काय झाले, त्याचा विचार-विश्लेषण करणे सोपे ठरेल. विनेश ज्या वजनी गटात खेळत होती त्या गटात स्पर्धेआधी आणि नंतर वजनात किमान आणि कमाल किती फेरफार खपवून घेतला जातो, याचे नियम ऑलिम्पिक स्पर्धेआधीच निश्चित केले गेलेले असतात आणि इतक्या उच्च दर्जाच्या स्पर्धांत हे नियम कसोशीने पाळण्यासाठी काय काय खबरदारी घ्यायला हवी हेही विनेश आणि त्यापेक्षा तिच्या व्यवस्थापकांस ठाऊक असते. निदान तसे अपेक्षित असते. इतक्या उंचीवर स्पर्धक गेल्यावर त्याच्यासमवेत मानसोपचारतज्ज्ञासह आहार-विहारतज्ज्ञही असतोच असतो. स्पर्धा काळात काय खावे, काय खाऊ नये याचे नियमही या सर्वांस माहीत असतात. अशा स्पर्धांत एक फेरी संपल्यानंतर आणि पुढच्या फेरीच्या आधी वजन, अमली पदार्थ सेवन आदी चाचण्या होतात याचीही माहिती या सर्वांना अर्थातच असणार. असे असतानाही अंतिम फेरीच्या आधी तब्बल दोन किलोंनी विनेशचे वजन वाढू देण्याइतकी बावळट चूक या सर्वांकडून होतेच कशी? या दोन किलोंनी वाढलेल्या वजनांतील एक किलो आणि सुमारे ९०० ग्राम तिने रात्रभर घाम गाळून कमी केले. तरीही तिचे वजन कमाल वजनापेक्षा १०० ग्रामने जास्त भरले. साहजिकच अंतिम फेरीसाठी ती अपात्र ठरली. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर देशभर गदारोळ उडणे साहजिक. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुष्टियोद्धा विजेंदर सिंग म्हणाला : अवघ्या १०० ग्राम वजनवाढीसाठी विनेशला अपात्र ठरवणे अयोग्य आहे.
हीच खरी आपली शोकांतिका. कमाल मर्यादा जर ५० किलोची आहे, त्यात आणखी एक किलोची सवलत मिळत असेल तर स्पर्धकाचे वजन ५१ किलोच्या आत हवेच हवे, हे अध्याहृत आहे. असे असताना ते विहित मर्यादेपेक्षा ‘फक्त शंभर ग्राम’ जास्त असल्यास ‘गोड मानून’ घ्यायला हवे, असे वाटतेच कसे? शास्त्रकाट्याच्या अचूक, नेमक्या कसोटीस सामोरे जाण्याची आपली मानसिकता का नाही? सगळ्यात आपले अनमानधपका धोरण आणि ‘होऊन जाईल’ ही वृत्ती! या सर्व नियम काट्यांकडे खेळाडूंनी लक्ष ठेवायचे की खेळावर लक्ष केंद्रित करायचे, असा प्रश्न यावर काहींचा असेल. त्याचे उत्तर असे की स्पर्धकांस खेळाकडे लक्ष देता यावे म्हणून तर व्यवस्थापकादी मंडळीचा इतका फौजफाटा त्यांच्या दिमतीला असतो. ते या प्रकरणात काय करत होते? हे सर्व सरकारी अधिकारी. एखादी फाइल इकडून तिकडे हलवणे आणि एखाद्या खेळाडूस उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी नेणे यातील किमान फरक या सर्वांस कळणे अपेक्षित. पण त्यांच्या कृतीवरून तसे म्हणता येत नाही. ‘‘लष्करातील जवानांना ऑलिम्पिकला पाठवा… पाच-दहा पदके ते ‘यूँ करके’ आणतील’’, असे विधान आपल्याकडे सर्वोच्च सत्ताधीशच जर करत असतील तर ऑलिम्पिक स्पर्धा, त्यात सर्व गुणांचा लागणारा कस, एका सेकंदाच्या हजारपाचशेव्या सूक्ष्मातिसूक्ष्म कालमापनाची क्षमता आणि त्या कसोटीवर उतरण्यास तयार असलेले देशोदेशींचे स्पर्धक आदींचे गांभीर्य समाजास कसे असणार? अशा दर्जाच्या स्पर्धांमध्ये खिळे लावलेल्या बुटांनी स्पर्धेत धावायचे नसते, सर्दी-खोकल्याची औषधेही या काळात घ्यायची नसतात, धावताना मार्गिका बदलायची नसते इतक्या साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या नियमांची आणि त्यांचे पालन करण्याच्या गांभीर्याची जाणीव याच समाजातील खेळाडूंना कोण आणि कशी करून देणार?
हेही वाचा : अग्रलेख : एक ‘बांगला’ बने न्यारा…
दुसरे असे की हे सर्व यम-नियम डोळ्यात तेल घालून एरवीही पाळले जायलाच हवेत. पण विनेशच्या बाबतीत तर ही गरज अधिकच होती. याचे कारण तिच्याभोवती झालेले दुर्दैवी राजकारण. कुस्तीगीर महासंघाच्या फालतू पदाधिकाऱ्याविरोधात तिने ठाम भूमिका घेतली आणि देशाच्या सर्वोच्च स्थानावरील व्यक्तींकडूनही त्याच्या पापांकडे दुर्लक्ष केले जात असताना विनेश आणि अन्यांनी त्याविरोधात रस्त्यावर येण्याची हिंमत दाखवली. त्याबदल्यात तिला काय मिळाले, ‘बेटी बचाओ’ म्हणणाऱ्यांनी तिला कशी वागणूक दिली याचा काळा कोळसा पुन्हा उगाळण्याचे कारण नाही. अन्यत्र आपल्या खेळाडूंची काळजी निगुतीने घेणारे असताना आपल्या संभाव्य पदक विजेत्यांस आपण दिलेली वागणूक ही शरम वाटावी अशी बाब. इतके सगळे झाल्यावर एखादा ऐरागैरा असता तर मोडून पडला असता. पण विनेशने या सर्व मानहानीकारक इतिहासावर कमालीच्या मनोधैर्याचे दर्शन घडवत मात केली आणि ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली. तिच्या संघर्षाचे, लढ्याचे अप्रूप असलेले समग्र क्रीडाप्रेमी विनेशच्या अंतिम फेरीकडे नजर ठेवून होते. असे असताना तिच्याविषयी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यायला हवी होती. विशेषत: पी. टी. उषा यांच्यासारख्या व्यक्तीकडे संघटनेची धुरा असताना तर ही जागरूकता अधिक अपेक्षित होती. भले उषा यांची राजकीय मते वेगळी असतील आणि त्यांचे सत्ताधीश लांगूलचालन लपून राहिले नसेल!
जे झाले ते नुकसान भरून काढता येणारे नाही. यानिमित्ताने अशा अजागळ चुका आपण आणखी किती काळ करत राहणार हा प्रश्न विनेशच्या दु:खाइतकाच अस्वस्थ करतो. ही आपली विपरीत बुद्धी ‘विनेश’च्या निमित्ताने तरी दूर व्हायला हवी.