यश आले नाही तरी चालेल, पण नेत्याने प्रयत्न थांबवता कामा नयेत, असेच आपल्या देशातील जनतेस आणि नेत्यांच्या अनुयायांस वाटत असते.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ आजपासून दक्षिणेतून कन्याकुमारीत सुरू झाली. ही पदयात्रा आहे. सुमारे ३५७० किमी अंतर चालून राहुल गांधी भारत जोडू इच्छितात. वास्तविक स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपली भारत जोडणी सुरूच आहे. त्यात आता ‘अखंड भारत’ची हाक. म्हणजे; आहे तो भारतच एकजीव करायचा की आसपासचे अन्य देशही त्यात जोडून घ्यायचे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ती येईपर्यंत राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ पूर्ण झालेली असेल, अशी आशा. साधारण १५० दिवसांत राहुल गांधी हे अंतर पूर्ण करू इच्छितात. म्हणजे प्रतिदिन किमान २४ किमी अंतर त्यांस कापावे लागेल. सर्वसाधारण गतीने चालल्यास निरोगी व्यक्तीस एक किमी अंतर कापण्यास कमाल १५ मिनिटे लागतात. याचा अर्थ एका तासात चार किमी. या गतीने २४ किमी अंतर कापण्यास त्यांना सहा तास लागतील. पण वाटेत जनसामान्यांशी संवाद, सत्कार, जेवणखाण आदीसाठी लागणारा वेळ गृहीत धरावा लागेल. रात्रीचा त्यांचा मुक्काम रस्त्यावरच असणार आहे. अशा तऱ्हेने १२ राज्यांतील इतके अंतर कापून ते फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचतील. साधारण ४२ वर्षांपूर्वी तत्कालीन जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यानंतर अशी समग्र पदयात्रा झालेली नाही. एकेकाळी समाजवादी आणि गांधीवादी खूप चालत. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, चंद्रशेखर ही अशा पदयात्रींतील महत्त्वाची नावे. नव्वदच्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा गाजली. पण ती रथयात्रा होती आणि नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन आदींच्या हाती या रथाची सूत्रे होती. अलीकडची पदयात्रा म्हणजे नव्या पिढीत जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या आंध्र भूमीत हाती घेतलेली. या यात्रेकरूंस त्या त्या यात्रांचा निश्चित फायदा झाला. वैयक्तिक असो वा राजकीय; चालण्याने आरोग्य सुधारते असा इतिहास आहे.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘ट्रसट्रसती’ जखम!

या ‘ऐतिहासिक’ पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या पदयात्रा संकल्पाचे मूल्यमापन व्हायला हवे. यावर किमान दोन प्रतिक्रिया सहज उमटतील. एक तुच्छतावादी. ‘याने काय साधणार?’ किंवा ‘जोडलेल्यांस पुन्हा काय जोडणार?’ अशी. या प्रतिक्रिया बेदखल केलेल्या बऱ्या. दुसरी प्रतिक्रिया काँग्रेसींची असेल. या यात्रेमुळे आपला दुभंगलेला पक्ष पुन्हा एकसंध होऊन सत्ताधारी भाजपशी दोन हात करण्यास सिद्ध होईल, असे या काँग्रेसींना वाटत असेल. त्याकडेही दुर्लक्ष केलेले बरे. पहिल्या प्रतिक्रियेत जसा सत्यांशाशिवाय विद्वेष भरलेला आहे तसाच दुसऱ्या प्रतिक्रियेत वास्तवापेक्षा आशावादच जास्त आहे. तेव्हा या दोन टोकाच्या भावना दूर ठेवून राहुल गांधी यांच्या या उपक्रमाकडे पाहायला हवे. तसे केल्यास राहुल गांधी यांच्या या प्रयत्नांचे मर्यादित मोल जाणवेल. देश उभा पिंजून काढायचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला कारण असे काही करण्यावाचून त्यांच्यासमोर अन्य पर्याय नाही. अवघ्या आठ वर्षांत या पक्षाची पिसे निघाली असून त्यास पुन्हा उडणे सोडा, पण जिवंत राहायचे असेल तर असेच काही अघोरी करावे लागेल. या काळात काँग्रेस पक्षाच्या कमालीच्या रखडलेल्या पक्षांतर्गत निवडणुका होतील. यात आपण अध्यक्षीय उमेदवार नसू असे राहुल गांधी म्हणत असले तरी त्यावर खुद्द काँग्रेसींचाच विश्वास नाही. ‘आपण त्यांची या पदासाठी मनवळवणी करू’ असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यापासून त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे अशा अनेकांस वाटते. त्यांचे वाटणे खरे की राहुल गांधी यांची जाहीर भूमिका खरी हे अवघ्या काही आठवडय़ांत स्पष्ट होईल. पण अध्यक्षपदाचा निर्णय काहीही लागो, काँग्रेसी राजकारणाचे केंद्र आपल्याभोवतीच राहील याची हमी राहुल गांधी यांस या पदयात्रेतून मिळेल. कोणा गांधी कुटुंबीयाने मध्यवर्ती भूमिकेत असणे त्या पक्षासाठी आवश्यक असते. हे सत्य मान्य केल्यास राहुल गांधी यांचे स्मशानवैराग्य निरुपयोगी. तेव्हा हे सत्य लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाबाबतचा धुरळा स्वच्छ करायला हवा. अध्यक्षपद स्वीकारायचे नसेल तर पक्षाच्या निवडणुका तरी प्रामाणिकपणे व्हायला हव्यात.

हेही वाचा >>> अग्रलेख : रक्तरंजित रस्ते!

राजकीय  पक्षाच्या नेत्यांनी काही ना काही कार्यक्रम देणे आवश्यक असते. भले ते साधे रक्तदान शिबीर असेल वा अन्य काही. पण कार्यक्रमच दिला नाही तर कार्यकर्ते सैरभैर होतात आणि स्वत:च्या पक्षाकडे संशयाने पाहू लागतात. काँग्रेसबाबत हे सर्रास आणि सातत्याने होत आले आहे. त्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी उपलब्ध नाहीत आणि डोक्यात राख घालून बसलेल्या राहुल गांधींचा पत्ता नाही. अशा अवस्थेत नेते आणि कार्यकर्ते आपोआप भाजपवासी होतात. याची फिकीर नसेल तर राहुल गांधी यांनी सगळय़ाचा त्याग करून सरळ दूर व्हावे आणि पक्षाच्या भानगडीतच पडू नये. पण ते तसेही करताना दिसत नाहीत. मोटारीत बसल्यावर आहे त्या जागी गुमान बसावे आणि चालकास त्याचे काम करू द्यावे. तसेही करायचे नाही. मोटार चालवण्याची जबाबदारी घ्यायची नाही आणि मागच्या आसनावर निवांत बसायचे असे झाल्यास ते वाहन जागच्या जागी थबकून राहणार हे उघड आहे. काँग्रेसचे हे असे झाले आहे. वास्तविक ही पदयात्रा राहुल गांधी यांनी २०१४ साली पहिला पराभव झेलावा लागला त्यानंतर लगेच काढावयास हवी होती. आपला पक्षनेता हात-पाय हलवतो आहे असे दिसले असते तरी काँग्रेसचे नुकसान काही प्रमाणात तरी कमी झाले असते. पण या काळात राहुल गांधी यांनी काही केले नाही. ते निष्क्रिय राहिले. त्याचा परिणाम काँग्रेस पक्षाच्या केवळ लढण्याच्या क्षमतेबाबतच नव्हे तर लढण्याच्या इच्छेबाबतही प्रश्न निर्माण होण्यात झाला. राहुल गांधी यांना त्यांच्या भवितव्याची फिकीर असेल/नसेल. पण अन्य काँग्रेसजनांस ती निश्चित होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा मार्ग धरला.

हेही वाचा >>> अग्रलेख : ‘नेमेचि’ अहवाल..

बरे, जे अन्यत्र निघाले आहेत त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस नेतृत्व काही करताना दिसते म्हणावे तर तसेही नाही. म्हणजे पक्षात राहिल्याची काही किंमत नाही आणि पक्षत्यागाचे काही मोल नाही अशी काँग्रेसजनांची अवस्था झाली. आपल्या देशात ‘नेता कसा दिसतो आननी’ याचे काही ठाम संकेत आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनतेस नेता काही करताना दिसावा लागतो. त्याच्या प्रयत्नांस यश आले नाही तरी चालते. पण त्याने प्रयत्न थांबवलेले जनता आणि अनुयायांस रुचत नाही. राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेने अन्य काँग्रेसजनांवर ही वेळ आली. ते जनतेस रुचेनासे झाले. तेव्हा आता पदयात्रा आदी उपायांखेरीज पर्याय नाही. वर्षांच्या सुरुवातीपासून अभ्यास न केल्यास परीक्षेच्या आदल्या रात्री जागून तयारी करावी लागते. राहुल गांधी यांच्यावर ही वेळ आलेली आहे. त्यास केवळ तेच जबाबदार आहेत. दिवसाचे २४ तास राजकारण केले जाण्याच्या काळात राहुल गांधी यांचे अर्धवेळ आणि हौशी राजकारण जनतेस मान्य होणे अशक्य. तसेच झाले. याचे भान या पदयात्रेमागे असेलच असेल. आपल्याकडे नेत्यांनी चुका मान्य करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ही बाब कोणी मान्य करणार नाही. पण त्याची जाणीव या पदयात्रेच्या गरजेतून दिसते.  संस्कृतमधे ‘चराति चरतो भग:’ अशा अर्थाचे सुभाषित आहे. म्हणजे जो चालतो त्याचे नशीब चालते. उशिराने का असेना, पण असे जमिनीवर चालण्याची गरज काँग्रेस नेतृत्वास वाटली. त्या पक्षाचे नशीब चालते करण्यासाठी हे चालणे पुरेसे आहे का, हे आता पाहायचे.