पूर्वी हिंदी चित्रपटात सर्व गुन्हे घडल्यावर पोलीस दंडुके घेऊन गुन्हास्थळी येताना दाखवले जात. ‘जेन स्ट्रीट’प्रकरणी ‘सेबी’चे वर्तन यापेक्षा वेगळे नाही…

एखाद्यास ज्या गैरकृत्यासाठी दंडित केले त्यास लगेच तेच कृत्य करू द्यायचे आणि वर ‘‘आम्ही नजर ठेवून आहोत बरे’’ असा केवळ इशारा द्यायचा यास शहाणपणा म्हणावे काय? आपल्या भांडवली बाजारातील नियंत्रक ‘सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ ऊर्फ ‘सेबी’ने अमेरिकी वित्त कंपनी ‘जेन स्ट्रीट’ हिच्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या वृत्ताने सदर प्रश्न पडतो. सेबीने अवघ्या काही दिवसांपूर्वी भांडवली बाजारात ‘गडबड घोटाळा’ (मॅनिप्युलेशन) केला असा ठपका ठेवून ‘जेन स्ट्रीट’ला सणसणीत ४८०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. ‘जेन’ने ‘सेबी’चा हा आरोप अर्थातच फेटाळला; पण दंडाची रक्कम भरून या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे जाहीर केले.

आपल्या बेकायदा कृत्यातून ‘जेन’ने अवाच्या सवा नफा कमावला आणि हजारो सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान केले; असे ‘सेबी’ म्हणते. ‘जेन’चे कृत्य भांडवली बाजार नियंत्रकास मान्य नाही आणि ‘सेबी’चे हे म्हणणे ‘जेन’ला अमान्य. एखाद्या धनाढ्याने नियमभंगासाठी वाहतूक पोलिसाने लावलेल्या किरकोळ दंडाची रक्कम त्याच्या तोंडावर भिरकवावी आणि आपली महागडी मोटार बेदरकारपणे तशीच दामटून निघून जावे त्याप्रमाणे ही ४८०० कोटी रुपयांची रक्कम ‘जेन स्ट्रीट’ने सहज भरली आणि बाजारात गुंतवणूक करण्याची परवानगी मागितली. आपल्या ‘सेबी’ने उदार अंत:करणाने ती दिली आणि ‘जेन स्ट्रीट’ पुन्हा या खेळात उतरली. हे गंभीर आहे.

‘जेन स्ट्रीट’ ही न्यूयॉर्क-स्थित गुंतवणूक संस्था. अलीकडे बाजाराचे अर्थशास्त्रीय ज्ञान असलेल्यांस संगणक प्रणाली, गुंतवणूक समीकरणे आदींची जाण असलेले तंत्रज्ञ येऊन मिळालेले आहेत. ‘जेन स्ट्रीट’ हे याचे उत्तम उदाहरण. यात तंत्रज्ञ बाजारपेठेच्या हालचालींचे, त्यात होणाऱ्या कंपन्यांच्या उलाढालींचे संगणकीय विश्लेषण करून त्यानुसार आपले गुंतवणूक प्रारूप आखतात. ‘जेन स्ट्रीट’ने भारतीय बाजाराबाबत नेमके हे केले. भांडवली बाजारात दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. पहिला आपापल्या मगदुराप्रमाणे कंपन्यांच्या समभागांची थेट खरेदी-विक्री करतो. हा वर्ग पैसे घालून हवे ते समभाग घेतो आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार नसेल तर नफा कमावून ते विकून टाकतो.

दुसरा वर्ग या व्यवहारांच्या उलाढालीतून तयार होणाऱ्या काल्पनिक उत्पादनांत (डेरिव्हेटिव्ह्ज) व्यवहार करतो. ‘फ्यूचर्स अँड ऑप्शन्स’ (एफअॅण्डओ) या नावाने हे व्यवहार ओळखले जातात. यातील गुंतवणूकदार प्रत्यक्षात काहीही खरेदी करत नाहीत आणि त्यामुळे काही विकतही नाहीत. ते भाकितांवर पैजा लावतात. म्हणजे अमुक एखाद्या कंपनीत वा क्षेत्रात उलाढाल कमी होईल की वाढेल, कोणत्या क्षेत्रास/ कंपनीस नफा/ तोटा होईल इत्यादी. हे असे करणे पूर्णपणे कायदेशीर असते ही बाब येथे लक्षात घ्यायला हवी. याचे कारण संपूर्ण भांडवली बाजारास सट्टा समजण्याची प्रथा अजूनही आपल्यात असताना हे ना खरेदी ना विक्री तरीही कोट्यवधींचे व्यवहार हे प्रकरण समजून न घेतले जाण्याची शक्यता अधिक. प्रत्येक जुगारचाल ही पैज असते पण प्रत्येक पैज हा जुगार असेलच असे नाही. ‘एफअॅण्डओ’ उलाढाल ही यातील दुसऱ्या गटात मोडते.

या बाजारात ‘जेन स्ट्रीट’ने दुहेरी व्यवहार केले. म्हणजे सकाळी बाजार उघडताना पहिल्या पद्धतीचा अवलंब करत मिळेल त्या दराने समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. म्हणजे त्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्या समभागांस चांगली मागणी आहे असे चित्र निर्माण होऊन त्यांचे दर वाढू लागले आणि हे वाढते दर असेच राहतील असे समजून इतरांनीही त्या समभागांची खरेदी सुरू केली. म्हणजे त्या समभागांच्या किमतीत एक चांगलाच फुगवटा तयार होत गेला. त्याच वेळी ‘जेन स्ट्रीट’च्या दुसऱ्या म्हणजे ‘एफअॅण्डओ’त उलाढाल करणाऱ्या विभागाने या समभागांचे दर मोठ्या प्रमाणावर पडतील यावर पैज घेतली. म्हणजे ‘फ्यूचर्स’वर बोली लावली. याचा अर्थ ‘जेन स्ट्रीट’चा एक विभाग चढ्या भावाने समभाग खरेदी करत होता त्याच वेळी दुसरा विभाग हे समभाग आपटतील यावर होड घेत होता.

समभाग खरेदीच्या मागणीचा व्यवहार ठरलेल्या मुदतीत पूर्ण करायचा असतो. या खरेदीच्या पूर्ततेची, म्हणजेच ‘डील क्लोजिंग’ची, मुदत संपत येत असताना ‘जेन स्ट्रीट’ने हे समभाग घाऊकपणे विकले. त्यामुळे ते आपटले आणि त्यांचे भाव कोसळले. ‘जेन स्ट्रीट’ने हा खेळ प्राधान्याने भारतीय बँकांच्या निर्देशांकाबाबत केला. सकाळी बाजार सुरू असताना तेजीत असणारे भारतीय बँकांचे समभाग बाजार बंद होताना मातीमोल होऊ लागले. हे व्यवहार पाच-दहा हजार समभागांपुरते मर्यादित राहिले असते तर या उलाढालींची व्याप्ती कळलीही नसती. तथापि लाखो समभागांची खरेदी आणि तितक्याच लाखोंची विक्री यात होत होती. त्यामुळे अनेकांचे हात पोळले.

बँक समभागांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांचे बरे चाललेले दिसते असे अनुमान सामान्य गुंतवणूकदारांनी काढले आणि आपले पैसे या समभागांच्या खरेदीत लावले. पण ते फसले. या व्यवहारात ‘जेन स्ट्रीट’चा प्रचंड फायदा झाला. किती? या व्यवहारात जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ या काळात ‘जेन स्ट्रीट’ला सणसणीत ४३,२८९ कोटी रुपयांचा नफा झाला. ज्या काळात या क्षेत्रात भारतीय गुंतवणूकदार एक लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा तोटा सहन करत होते त्या वेळी ही कंपनी गडगंज नफ्यात लोळत होती. ‘सेबी’च्या मते हे बाजारपेठेस फसवणे. पूर्वी हिंदी चित्रपटात सर्व गुन्हे घडल्यावर पोलीस दंडुके घेऊन गुन्हास्थळी येताना दाखवले जात.

‘सेबी’चे या प्रकरणातील वर्तनही यापेक्षा वेगळे नाही. परस्परविरोधी भूमिकांवर पैजा लावणे (हेजिंग) हा गुन्हा नाही. डॉलर आणि रुपयाच्या दराबाबत अनेक वित्तसंस्था असे करतात. पण ‘जेन स्ट्रीट’चे हे वर्तन ‘गडबड घोटाळा’ आहे असे जर ‘सेबी’स वाटते तर प्रश्न असा की हा कथित घोटाळा होताना ‘सेबी’ काय करत होती? ‘जेन स्ट्रीट’ने जे काही केले ते राजरोसपणे. त्या व्यवहारात सरकारी मालकीच्या बँकांच्या तब्बल २०-२५ टक्के इतक्या समभागांची खरेदी-विक्री ‘जेन स्ट्रीट’कडून होत होती.

‘सेबी’च्या हे लक्षात आले नाही? एखाद्या सूचिबद्ध कंपनी/ आस्थापनेत कोणाच्याही पाच टक्के वा अधिक मालकीची उलाढाल समभाग खरेदीतून होत असेल तर धोक्याची घंटा अनेक ठिकाणी वाजते/ वाजायला हवी. येथे तर सरकारी बँकांच्या त्यापेक्षाही अधिक समभागांची खरेदी-विक्री झाली आणि तरीही ‘सेबी’ ढिम्म. हे कसे? एखादा सत्ताधीश-स्नेही उद्योगसमूह अविश्वसनीय तऱ्हेने आपली वित्तस्थिती सुधारतो. तरीही ‘सेबी’ ढिम्मच. मग सर्व काही घडल्यावर हा नियंत्रक जागा होणार आणि गैरकृत्याची आरोळी ठोकणार. हे असे वारंवार होत आले आहे.

बरे, हे गैरकृत्य होते, तर मग त्या गैरकृत्यास जबाबदार असणाऱ्यास पुन्हा व्यवसायाची परवानगी का? जागे राहून जे करायला हवे ते करायचे नाही आणि नंतर जाग आल्यावर भोकाड पसरायचे हे ‘सेबी’चे नेहमीचेच. असल्या लेपळ्या नियामकामुळे सामान्य गुंतवणूकदार भरडला जातो. पण त्याची चिंता ना नियामकास ना नियामकांच्या नियामकास. सगळेच निजलेले. त्यांचे रडगाणे हे निजलेल्या नियामकाचे नक्राश्रू ठरतात. या असल्या नियंत्रकास कोणीही भीक घातली नाही, घालत नाही आणि घालणारही नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.