अमित शहा यांच्या मुंबईतील विधानात काहीही गैर म्हणता येणार नाही. त्यामुळे त्या विधानावर कुणाच्या सारवासारवीचीही गरज नाही….

धडधाकट, स्वत:च्या पायावर उभी असलेली, धावू शकणारी व्यक्ती कधी कुबडीस बरे वाटावे म्हणून ‘‘चला… आज कुबडी घेऊन चालू या’’ असे म्हणेल काय? कुबडी ही शारीरिक गरज की मानसिक? कुबडीचा आधार आणि उभे राहण्यासाठी वा अन्य शारीरिक कार्यासाठी कोणाचे सहकार्य यात मूलत: फरक काय? कुबडी आणि पांगुळगाडा हे दोन समानार्थी शब्द काय दर्शवतात? कोणतेही अपंगत्व नसतानाही बाह्य साधनांचा आधार बालवयात घेतला जाण्याची शक्यता असते. लहानगी मुले उभी राहू शकत नाहीत तोवर त्यांच्यासाठी पांगुळगाडा वापरण्याची पद्धत आहे. हाही खरे तर बाह्य आधार. पण कुबडीपेक्षा वेगळा.

कुबडी ही अपंगत्व दर्शवते तर पांगुळगाडा या शब्दाद्वारे बालवय डोळ्यासमोर येते. दोन्हींचे कार्य तेच. पण उद्देश आणि गरज वेगळी. शिवाय यांतील आणखी एक मूलभूत फरक म्हणजे पायांत जोर आल्यावर, बालक उभे राहू शकते आहे हे कळू लागल्यावर पांगुळगाडा दूर केला जातो आणि बऱ्याच घरांत पुढील अपत्यासाठी माळ्यावर रवाना होतो. त्या तुलनेत कुबडी दूर होईलच असे नव्हे. ती वापरण्याची वेळ ज्यांच्यावर येते त्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारले नाही, आधाराविना तोल साधणे शक्य झाले नाही तर कुबडी ही एखाद्यासाठी आयुष्याची साथ असू शकते. या उलट औषधोपचार, व्यायाम आणि श्रद्धाळू असेल तर तेलमालीश, गरम पाण्याचा शेक इत्यादींच्या आधारे पायांत पुन्हा शक्ती प्राप्त झाल्यास एखादी आत्मनिर्भर व्यक्ती कुबडीस लाथ मारून स्वत:च्या पायांवर उभी राहू शकते. भाजपचे अध्यक्ष नसूनही त्या पक्षाचे सर्वेसर्वा असे गृहमंत्री अमित शहा यांचे ताजे विधान ही या कुबडी कथानकाची पार्श्वभूमी.

मुंबईच्या अवघ्या एका दिवसाच्या दौऱ्यात अमित शहा यांनी ‘‘भाजपस कुबड्यांची अजिबात गरज नाही, आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम आहोत’’, अशा अर्थाचे विधान केले. या विधानाचे लक्ष्य अर्थातच गलितगात्र काँग्रेस वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची अनुक्रमे राष्ट्रवादी वा शिवसेना हे असणार नाही. कारण भाजपला हे पक्ष काही अजिबात आव्हान नाहीत. अर्थात एकनाथ शिंदे यांची शिवसेना वा अजितदादांची ‘कार्यालयीन लावणी’ फेम राष्ट्रवादी हेही काही भाजपस आव्हान नाहीत. पण वरील दोघांच्या तुलनेत हे दोन पक्ष निदान भाजपसाठी आव्हान नसले तरी किमान डोकेदुखी तरी निश्चितच आहेत.

शिवाय शरद पवार वा उद्धव ठाकरे हे दोघेही भाजपस ना टेकू देऊ इच्छितात ना भाजप त्यांचा टेकू घेऊ इच्छितो. आणि जो पक्ष या दोघांचे सध्याचे टेकू असलेल्या पक्षांनाही नाकारत असेल तर तो पक्ष त्या दोन सहकाऱ्यांच्या कुबड्याही घेऊ इच्छिणार नाही; हे उघड आहे. पण तरीही अमित शहा यांनी हे विधान केले त्या अर्थी ते ज्या दोन पक्षांना आपण भाजपसाठी आवश्यक कुबड्या आहोत असे वाटते त्यांनाच उद्देशून असणार. असे दोन पक्ष म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची ‘कार्यालयीन लावणी’ फेम राष्ट्रवादी. म्हणजेच शहा जेव्हा म्हणतात ‘‘भाजपस कोणत्याही कुबड्यांची गरज नाही’’ तेव्हा त्याचा खरा अर्थ त्यांच्या पक्षास एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ‘कार्यालयीन लावणी’ फेम राष्ट्रवादी यांच्या मदतीची गरज नाही असा असतो. हे लक्षात घेतल्यास अमित शहा यांच्या विधानात काहीही गैर म्हणता येणार नाही. त्यांच्या या विधानावर आता काही जण सारवासारव करतील की हे विधान सर्वसाधारण होते, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांस उद्देशून नव्हते इत्यादी. पण त्याची गरज नाही. कारण जे सर्वसाधारण परिस्थितीत सत्य असते ते असाधारण अवस्थेतही सत्यच असते. तेव्हा शहा म्हणतात यात अजिबात काही चूक नाही.

कारण आता भाजप या पक्षास खरोखरच अशा कोणत्याही कुबड्यांची, टेकूची गरज नाही. तो काळ कधीच सरला. ज्या वेळी भाजपस महाराष्ट्रात काहीही स्थान नव्हते, ज्या वेळी भाजप हा सर्व राजकीय पक्षांस अस्पृश्य होता, ज्यावेळी राष्ट्रीय स्तरावर भाजपचे जेमतेम दोन खासदार होते त्या वेळी भाजपस कुबड्यांची गरज होती. ती गरज बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण केली. असे औदार्य दर्शवणारे बाळासाहेब ठाकरे हे एकटेच नाहीत. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने, पंजाबात अकाली दलाने, ओडिशात बिजू जनता दलाने, आसामात आसाम गण परिषद इत्यादी पक्षांनी आपापल्या प्रांतात भाजपसाठी आपापल्या कुबड्या दिल्या.

परंतु राजकीय पक्षाची बाल्यावस्था आणि निरागस बालकाची निर्मळ परिस्थिती या दोहोंत या राजकीय पक्षांनी गल्लत केली. रांगणाऱ्या बाळास पाहून कोणीही सहृदयी इसम चालण्यासाठी आपला हात पुढे करेल. त्या तुलनेत राजकीय पक्षांच्या बाल्यावस्थेत काहीही निरागसता नसते. राजकीय पक्ष ‘मोठे’, ‘सामर्थ्यवान’ होण्याची फक्त वाट पाहात असतात. तसे ते मोठे झाले की पहिले कृत्य म्हणजे आपापल्या कुबड्यांस ढकलून देतात याचे भान शिवसेना, मगोप, अकाली दल, आसाम गण परिषद आदींस राहिले नाही. त्यांना वाटले आपण कुबड्या दिल्या म्हणजे भाजपस आपल्या पाठिंब्याची कायम गरज लागेल आणि आपलेही स्थान अबाधित राहील. हा भाबडेपणा झाला. राजकारणात मोठे झाल्यावर मोठे होण्यास मदत करणाऱ्यांची रवानगी पहिल्यांदा मार्गदर्शक मंडळांत करायची असते हे चिरंतन सत्य आहे. पक्ष कोणतेही असो. असेच होत असते. असे असताना आपल्या कुबड्यांची गरज भाजपस कायम लागेल असे सदरहू पक्षांनी मानण्याचे काही कारण नव्हते. तसे त्यांनी मानले. त्याची शिक्षा त्यांस मिळाली. या शिक्षा-प्रदानातही एक धडा आहे.

तो म्हणजे सहकारी/ आघाडी/ समर्थक म्हणून राहण्यापेक्षा राजकारणात उघड शत्रुत्व नेहमीच चांगले. शत्रू/ स्पर्धक असल्यास मोकळेपणाने दोन देता येतात आणि त्या बदल्यात शत्रू/ स्पर्धक असल्यामुळे दोन घेण्याचा प्रश्नच येत नाही. सहयोगी/ सहकारी/ आघाडी/ समर्थक पक्षांचे असे नसते. जेव्हा कसोटीचा क्षण येतो तेव्हा कोणताही दांडगा पक्ष हा प्रतिस्पर्ध्यापेक्षा सहयोगी/ सहकारी/ आघाडी/ समर्थक पक्षाची मुंडी पहिल्यांदा पिरगाळतो. म्हणजे भाजपसाठी काँग्रेस आणि काँग्रेससाठी भाजप हे नाते अधिक महत्त्वाचे. उघड उघड स्पर्धा. या तुलनेत सहयोगी/ सहकारी/ आघाडी/ समर्थक पक्षांची अवस्था ना घरचे ना घाटावरचे अशी. असे होते तेव्हा प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शिड्या नंतरच्या काळात कुबड्या ठरतात आणि पाय सुदृढ झाले की ‘योग्य वेळी’ दूर केल्या जातात. अशा अनेक कुबड्या भाजपने गेल्या काही वर्षांत होत्याच्या नव्हत्या करून दाखवल्या.

आता ज्या शिल्लक आहेत त्यांचेही भवितव्य आधीच्या कुबड्यांचे जे काही झाले त्यापेक्षा वेगळे असेल असे नाही. त्यामुळे प्रश्न असतो तो कुबड्या म्हणून स्वत:स वापर करू देणाऱ्यांचा. लघुदृष्टीचे, तात्कालिक स्वार्थाचा विचार करणारे, ईडी-पीडा मागे लागलेले इत्यादी इत्यादींस स्वत:चे रूपांतर कुबड्यांत होऊ देण्याखेरीज पर्याय नसतो. तेव्हा धडधाकट असले तरी राजकीय पक्ष नवनव्या कुबड्यांच्या शोधात राहणार. त्यांना त्या मिळत राहणार. म्हणजे कुबड्या येणार, कुबड्या जाणार! थोडक्यात उगाच कुबड्यांचे असणे सहयोगी/ सहकारी म्हणून मिरवू नये आणि त्या गेल्या तरी कुबड्यांची गरज नाही असे म्हणू नये. ‘कुबडी माझी सांडली गं…’ अशी लटकी तक्रार करण्यात काहीही गोडवा नाही.