वासना म्हणजेच इच्छा अथवा कामना. या शुभ आणि अशुभ अशा दोन प्रकारच्या असतात. जगाचं वा इतर कुणाचंही बरं-वाईट काहीही होवो, देहसुखाला अनुकूल असं जे जे आहे ते मला मिळालंच पाहिजे, प्रसंगी कुणावरही अन्याय झाला तरी चालेल, या प्रकारच्या सर्व इच्छा वा कामना या अशुभ वासनेत मोडतात. तर आत्महिताकडे जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व कामना, इच्छा, वासना या शुभच असतात. आता ‘रामगीते’त म्हटल्याप्रमाणे माणसाचं मन या प्रकारच्या शुभ अथवा अशुभ वासनांनी नेहमीच भारलेलं असतं. म्हणजे त्याच्या मनात एकतर आत्महिताची प्रामाणिक इच्छा उमलत असते नाहीतर कसंही करून स्वार्थ साधण्याची वासना उसळत असते. शुभ कामनांनी त्याचं मन सकारात्मक, कल्याणप्रद विचारांनी भारलं असतं. अशुभ कामनांनी त्याचं मन नकारात्मक आणि अकल्याणकारी विचारांनी भरत असतं. शुभ कामनांनी अंतकरण शांत, प्रसन्न आणि समाधानी असतं. अशुभ कामनांनी ते अस्थिर, अशांत आणि असमाधानी असतं. अज्ञानभ्रमापायी आपल्या मनाचा स्वाभाविक ओढा हा स्वार्थपूर्तीकडे म्हणजेच अशुभ वासनांच्या प्रवाहाकडेच वाहता असतो. अशुभ वासनांकडे मनाची असलेली ही खेच शुभ वासनांकडे वळवणं, हाच खरा पुरुषार्थ आहे आणि तो प्रयत्नपूर्वक साध्य केलाच पाहिजे, असं प्रभूंनी ‘रामगीते’त सांगितलं आहे. तसंच मनुष्याच्या मनाचं वैशिष्टय़ असं की, ते एकतर शुभ विचारांत राहतं, नाहीतर अशुभ विचारांत राहतं. अशुभ विचारांची पकड सुटली, तर ते शुभ विचारांकडेच वळतं आणि शुभ विचारांचं बोट सुटलं, तर ते अशुभ विचारांच्या कह्य़ात सापडतं. त्यामुळे एकनाथ महाराजांना जो ‘त्याग’ अभिप्रेत आहे तो प्राथमिक पातळीवर अशुभ वासनांचाच आहे. हा त्याग मानसिक पातळीवरचाच आहे. या त्यागाचा विचार सहजासहजी स्थिरावतो का हो? तर, नाही. जो प्रापंचिक आसक्तीतून मनानं सुटला आहे आणि विटला आहे, त्याच्याच मनाला हा विचार शिवतो. एकनाथ महाराज ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या अध्यायात सांगतात, ‘‘जो कंटाळला जन्मगर्भासी। मरमरों उबगला मरणासी। आधी लागली मानसीं। जन्ममरणासी नासावया॥२२०॥’’ जन्म-मरणाचा ज्याला उबग आला आहे आणि जन्म-मरणाच्या या साखळीचाच नाश व्हावा, अशी तीव्र इच्छा ज्याच्या मनात उसळत आहे, त्याच्याच मनात हा विचार सुरू होतो. आता खरं पाहता, जन्म-मरणाचा उबग कुणाला कसा काय येईल, असा प्रश्न आपल्या मनात येईल. कारण एखाद्या गोष्टीचा उबग यायला त्या गोष्टीचा अनुभव आणि पक्की स्मृतीही असावी लागते. एखादा म्हणतो ना की, ‘पत्ते खेळून खेळून कंटाळा आला!’ तेव्हा बरेच वेळा पत्ते खेळल्याचा अनुभव स्मृतीत जमा असतो. तसा जन्म-मरणाचा कंटाळा यायला आधीचे जन्म आणि मृत्यू आठवायला तर हवेत ना? मग इथं ‘जन्म-मरणा’ची आणखी एक छटा लक्षात घेण्यासारखी आहे. हा जन्म आहे अनंत भौतिक इच्छांचा आणि मृत्यूही आहे याच अनंत भौतिक इच्छांचा! मनात इच्छा निर्माण होताच, त्या इच्छेच्या योग्यायोग्यतेचा विचारही न करता मन देहेंद्रियांना त्या इच्छेच्या पूर्तीत जुंपते. इच्छापूर्तीच्या लालसेनं देह-मनाची फरपट होते. मात्र ती इच्छा अपूर्त राहून मरते. पण तोवर दुसऱ्या इच्छेचा मनात जन्म झाला असतो. अनंत इच्छांच्या या जन्म-मरणात होरपळत असलेल्या माणसाला उबग येऊ शकतो! – चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2020 रोजी प्रकाशित
२६२. जन्म-मरण
अज्ञानभ्रमापायी आपल्या मनाचा स्वाभाविक ओढा हा स्वार्थपूर्तीकडे म्हणजेच अशुभ वासनांच्या प्रवाहाकडेच वाहता असतो.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-01-2020 at 00:02 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article ektmayog akp