चिंतनाला कृतीची जोड हवीच. जे वाचू त्यातलं काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न हवा. ते आचरणात उतरवण्याचा अभ्यास हवा. थोडं आत्मपरीक्षण हवं. नाहीतर राजा जनक आणि नवनारायणांमधील ही चर्चा केवळ शाब्दिक पातळीवरच राहील आणि अत्तराचा वास जसा कालांतरानं उडून जावा, तसा त्या चर्चेचा अंतरंगावरचा ठसा पुसून जाईल. त्यामुळेच जी चर्चा सुरू आहे त्याकडे श्रोत्यांचं पूर्ण अवधान असावं, यासाठी राजा जनक नवनारायणांना सांगत आहेत की, ‘‘तुमच्या कथा सुनिश्चितीं। दिव्यौषधि भवरोग छेदिती। त्रिविध तापांची निवृत्ती। जड मूढ प्राकृतीं ऐकता भावें।।३०।।’’ हे अवधूतांनो, तुमचं जे सांगणं आहे, जो बोध आहे ना तो म्हणजे भवरोगावरचं जणू दिव्य औषध आहे. त्या बोधाच्या श्रवणानं भवरोगाचा नाश होतो. त्रिविध तापांची निवृत्ती होते. हे त्रिविध ताप कोणते? तर परिस्थितीनुरूप होणारे, स्वत:च्या कर्मानुसार होणारे आणि दुसऱ्याकडून होणारे. हे सगळे ताप किंवा दु:खं ही ‘मी’मुळेच अधिक प्रकर्षांनं जाणवतात. आपल्या वाटय़ाचं दु:खं नेहमीच मोठं भासतं. त्यामुळे दु:खं दूर करण्याचे प्रयत्न सकारात्मकतेनं करण्याऐवजी अनेकदा त्या दु:खांच्या जाणिवेनं दु:खांचा विचार करून दु:खी होण्यातचं अधिक शक्ती खर्च होत असते. त्यामुळे या बोधानं जर ‘मी’भाव लयाला जात असेल, तर मग दु:खांच्या जाणिवेच्या उंबरठय़ावर न ठेचकाळता त्या दु:खाच्या निवारणाचे प्रयत्नही सुरू होऊन या तापांचं निवारणही शक्य आहे. पण त्यासाठी हा बोध भावपूर्वक ऐकला पाहिजे. नाथांचाच अभंग आहे ना? ‘आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे’! म्हणजे या बोधाचं श्रवण असो की त्या बोधानुरूप आचरणाची उपासना असो ती आवडीनंही केली पाहिजे आणि भावपूर्वकही केली पाहिजे. त्यात आवड आणि भाव दोन्ही असलं पाहिजे. जी गोष्ट आवडीची असते ती भावपूर्वक केली जातेच. आता एक खरं की अध्यात्माची म्हणा किंवा हा बोध ऐकण्याची आपल्याला सुरुवातीला आवड असेलच, असे नाही. पण अनेक संतचरित्रांतून तुम्हाला दिसेल की, त्या संतांजवळ प्रापंचिक इच्छा धरून आलेला माणूसही जेव्हा त्यांचं प्रेमळ बोलणं ऐकत असे तेव्हा त्याला क्षणभर आपल्या अडीअडचणींचा विसर पडल्याशिवाय राहत नसे. याचं कारणच हे आहे की, रखरखत्या उन्हातून चालून थकलेला जेव्हा एखाद्या वृक्षाच्या छायेत विसावतो तेव्हा क्षणभर पायपिटीच्या कष्टांची जाणीव तोदेखील विसरतो. ही तर कृपाछाया आहे! तेव्हा प्रपंचमायेच्या तापानं दग्ध जीवांना त्या मायेचा निरास होण्याचा काही उपाय समजावा, या कळकळीतून राजा जनकानं नव नारायणांना प्रश्न विचारला. कवि आणि हरी या दोन अवधूतांनी आतापर्यंत राजाच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. आता हरीहून जो धाकटा तो अंतरिक्ष नारायण राजासमोर मायेचं निरुपण करणार आहे. या निरुपणाची सुरुवातच, जी मुळातच नाही, अशा नसलेल्या मायेचं निरुपण करण्यात तरी काय अर्थ आहे, या सुरात झालं आहे! नाथ सांगतात, ‘‘अंतरिक्ष म्हणे राया। तुवां पुशिली हरीची माया। तो प्रश्नचि गेला वायां। बोलणें न ये आया बोलक्याचे।।३२।।’’ हे राजा हरीची माया म्हणजे नेमकी कोणती, हा प्रश्न तू केला आहेस. पण तो व्यर्थच आहे. अरे, माया म्हणजे काय, हे सांगता सांगता भलेभले थकले. कारण जी नाहीच त्या मायेचं वर्णन कोणाच्या आवाक्यात आहे?
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2019 रोजी प्रकाशित
२१६. माया-पेच
चिंतनाला कृतीची जोड हवीच. जे वाचू त्यातलं काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न हवा. ते आचरणात उतरवण्याचा अभ्यास हवा.
Written by चैतन्य प्रेम
First published on: 12-11-2019 at 00:07 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog 216 abn