चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com
ब्रह्मांडी जो शिव होता, तोच पिंडामध्ये जीव रूपानं नांदू लागला. त्या शिवाची जी योगमाया होती, तीच जिवात अविद्यामाया ठरली. मायेची हीच मुख्य भ्रांती ठरली. अंतरिक्ष सांगतो, ‘‘शिवीं जे ‘योगमाया’ विख्याती। जीवीं तीतें ‘अविद्या’ म्हणती। हेचि मायेची मुख्यत्वें भ्रांती। स्वप्नस्थिती संसारू॥ १०३॥’’ या भ्रांतीमुळे माणूस संसारस्वप्नात अडकला. गंमत अशी की, जीवन हे स्वप्न आहे आणि त्यात निद्रेतही माणूस स्वप्न पाहत आहे! राजा जनकाला एकदा स्वप्न पडलं. त्या स्वप्नात तो भीक मागत होता! जागा होताच स्वप्न भंगलं खरं, पण राजा विलक्षण अंतर्मुख झाला होता. आधीच जनक हा वैराग्यशील अंत:करणाचा ज्ञानी राजा होता. माणूस नुसता ज्ञानी असून भागत नाही; तो अनासक्त, विरक्त आणि विचारीही असावा लागतो. तसा नसेल, तर ज्ञान हेच गळ्यातला धोंडा बनून अहंकाराच्या ओझ्यासह माणसाला भवसागरात बुडवतं. तर राजा जनक मुळातच विचारशील वृत्तीचा होता. त्यामुळे आपण भिकारी असल्याचं स्वप्न पाहून त्याच्या अंत:करणात वेगळाच विचार आला. त्यानं ऋषीवरांना विचारलं की, ‘‘मी भिकारी असल्याचं स्वप्न पाहणारा राजा आहे, की राजा असल्याचं स्वप्न पाहणारा भिकारी आहे?’’ काय विलक्षण स्थिती आहे! तेव्हा आपण स्वप्नातच जगत असतो आणि जगतानाच दिवास्वप्नातही रमत असतो. रंगभूमीवर राजाची भूमिका करणारा कलाकार आणि भिकाऱ्याची भूमिका करणारा कलाकार, यांत जो आपली भूमिका उत्तम वठवतो, तो कलाकार खरा ना? मध्यंतरात दोघंही सारख्याच कपातून चहा पितात आणि वडापाव खातात! तसं राजा म्हणून जन्मलेल्याच्या मनात राजेपणाच्या जाणिवेचं अहंकारयुक्त ओझं कशाला? कारण ही भूमिका क्षणभंगुर आहे. राजा जनकही याच वृत्तीनं आपली ‘भूमिका’ अचूक पार पाडत होता आणि म्हणूनच त्याला हा प्रश्न पडला! आपण ‘भूमिके’त असल्याचं विसरतो आणि जी काही आपली समाजमान्य ओळख आहे, त्यातच चिणून घेत अहंकाराचा चिखल माखत जगत राहतो. त्यामुळे जीवन हे स्वप्नासारखं आहे, सरणारं आहे हे स्वीकारतच नाही. त्यामुळे या जीवन संधीचा नीट वापरच करीत नाही. अंतरिक्ष सांगतो, ‘‘ज्यातें म्हणती ‘दीर्घस्वप्न’। तो हा मायावी संसार संपूर्ण। निद्रेमाजीं दिसे जें भान। तें जीवाचें स्वप्न अविद्यायोगें॥ १०४॥’’ राजा, हा जो सर्व मायावी संसार आहे ना, ते दीर्घस्वप्न आहे, हे लक्षात घे. निद्रेत माणसाला जे स्वप्न पडतं ना, ते अविद्येमुळे खरंच भासत असतं! म्हणजे मायेमुळे जागेपणी संसारजगत खरं वाटतं आणि अविद्येमुळे झोपेतलं स्वप्नजगत खरं वाटतं. पण खरी जाग आली, तर दोन्ही स्वप्नांचं वास्तविक स्वरूप लक्षात येतं आणि मन मायाप्रभावातून मुक्त होतं. अंतरिक्ष सांगतो, ‘‘येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न। बोध जाहलिया मिथ्या भवभान। हें अवघें मायेचें विंदान। राया तूं जाण निश्चित॥ १०५॥’’ जागं होताच स्वप्नाचा खोटेपणा कळतो आणि खरा बोध अंत:करणात ठसल्यावर भवभानाचं, अर्थात जगण्यातील मिथ्यत्वाचं भान येतं! हे राजा, हा मायेचा खेळ, मायेची ही कारागिरी तू लक्षात घे, असं अंतरिक्ष सांगतो. पण या ओवीच्या उत्तरार्धात एक सावधगिरीचा सल्ला आहे!