चैतन्य प्रेम

सामर्थ्यवान असा भगवंत भक्ताच्या भावबळापुढे झुकतो. इतकंच नाही, तर नऊ योग्यांपैकी हरी नारायण हा राजा जनकाला सांगतो की, ‘‘हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी। हरीची प्रीति त्या तैसी। जे अनन्य हरीपाशीं। हरी त्यांसी अनन्य सदा।। ७८८।।’’ हरीच्या- अर्थात भगवंताच्या ठायी ज्यांची अनन्य प्रीती असते, त्यांच्यावर हरीचीही तशीच प्रीती असते. जे हरीशी अनन्य असतात, त्यांच्याशी हरीही अनन्यच असतो. अनन्य म्हणजे अन्य कुणीही नसणं. भक्त हा भगवंताशी अनन्य असतो याचा अर्थ एका भगवंतावाचून भक्ताचं या जगात अन्य कुणीही नसतं. अनन्यतेची झलक असलेली एक प्रार्थना आपण लहानपणापासून कित्येकदा ऐकली असेल आणि म्हटलीही असेल. ती म्हणजे : ‘त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव र्सव मम देव देव!’ म्हणजे- हे भगवंता तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच बंधू आणि तूच सखा आहेस; नव्हे, माझं म्हणून जे जे कुणी आहेत आणि जे जे काही आहे, ते तूच केवळ आहेस! ही अनन्यता आहे. पण प्रत्यक्षात शब्दांतून व्यक्त होणारी ही अनन्यता कृतीतून प्रकट होत नाही! आपण ही प्रार्थना म्हणतो आणि लगेच आळवतो, ‘देवा! माझा मुलगा आजारी आहे तो लवकर बरा होऊ  दे!’ एवढंच नाही, तर काहीतरी नवसदेखील करतो. मग त्या ‘त्वमेव र्सव’ला काय अर्थ आहे? तेव्हा आमची अनन्यता ही बोलण्यापुरती असते; पण आम्हाला लाभ मात्र अनन्य भक्ताचे हवे असतात. निस्सीम भक्तांना देवांनी जसं संकटातून तारलं तसं आम्हालाही तारावं, ही अपेक्षा असते. एका साधकानं सांगितलं की, घरात सद्गुरूंचं एक तैलचित्र होतं. त्याला रोज नमस्कार करायचा आणि एखादा हार अधेमधे घालायचा, असा नेम होता. पण आई-वडिलांच्या आजारापासून ते नोकरीतल्या बढतीपर्यंत आणि मुलाबाळांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या नोकरी तसंच लग्नापर्यंत; प्रत्येक गोष्ट सद्गुरूंनी निर्विघ्न पार पाडावी, ही अपेक्षा असे! आणि ‘मी सद्गुरूंचं एवढं करतो, मग त्यांनीही माझ्यासाठी एवढं केलंच पाहिजे,’ असं वाटे! हे ‘एवढं करणं’ म्हणजे काय? तर, त्यांच्या तसबिरीला एकदा नमस्कार आणि हार! त्या बदल्यात अपेक्षा मात्र ढीगभर. तेव्हा भगवंत अशा भक्ताला भुलत नाही बरं! नाथ सांगतात, ‘हरीचे ठायीं प्रीति ज्या जैशी। हरीची प्रीति त्या तैसी।’ भक्ती व्यावहारिक असेल ना, तर भगवंतही व्यवहारानुसार जेवढय़ास तेवढा लाभ देतो. पण, ‘जे अनन्य हरीपाशीं। हरी त्यांसी अनन्य सदा।।’ हा नियम पाळतो. अनन्य भक्तापाशी तोही अनन्यच असतो. श्रीमद्भागवत महापुराणात प्रभु म्हणतात की, ‘‘साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदय: त्वहम्। मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि।।’’ म्हणजे- साधनासिद्ध भक्त सदैव माझ्या हृदयात निवास करतात व मीदेखील त्यांच्या हृदयात वास करतो. माझ्याशिवाय अन्य कशाचंही भक्ताला ज्ञान नसतं आणि म्हणूनच मीही त्यांना कधीच विसरत नाही की अंतर देत नाही.