– चैतन्य प्रेम

माणसाला जीवनात नेमकं काय हवं आहे? काय मिळवायचं आहे? – साध्या शब्दांत सांगायचं, तर माणसाला अखंड सुख हवं आहे. आपल्या वाटय़ाला सदोदित सुखच सुख यावं, दु:खं कधीच येऊ नयेत, अशी त्याची स्वाभाविक इच्छा आहे. पण तरी जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही आहेत. लाभ आहे तशीच हानीही आहे. अनुकूलता आहे, तशीच प्रतिकूलताही आहे. अशा द्वैतानुभवात माणूस जगत आहे. त्यातही गंमत अशी की, सुख आणि दु:ख यांची नेमकी व्याख्याही त्याला करता येत नाही. जे त्याला सुखाचं भासत असतं त्याच्या प्राप्तीसाठी तो किती तरी खस्ता खातो. ते ‘सुख’ मिळालं की त्याला काही काळापुरतं हायसं वाटतं. पण कालांतरानं त्या सुखातून दु:खाचे कोंब फुटू लागतात आणि तो मनानं खचून नव्या सुखकल्पनांनी भारला जातो. ग. वि. ऊर्फ काकासाहेब तुळपुळे हे गुरुदेव रानडे यांचे शिष्य. ‘नामसाधनाचे मानसशास्त्र’ हा त्यांचा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. या ग्रंथात ते लिहितात की, ‘जीवन सुख-दु:खाभोवती फिरत असते. सुखदु:खाच्या निवडीत फरक झाला म्हणजे जीवनातही फरक पडतो!’ म्हणजे काय? तर आधीच म्हटल्याप्रमाणे, जीवन म्हटलं की सुख-दु:खं आलीच. फक्त आपण शेवटी जे दु:खाचं होणार असतं त्यालाच सुख आणि जे सुखाचं असतं त्याला दु:ख मानत असतो. निवड चुकते आणि म्हणून जीवन दु:खाचं होतं. ही निवड सुधारली की जीवन आनंदाचं होतं. आपलं सुखाबाबतचं वा दु:खाबाबतचं आकलन ठिसूळ असतं. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘दु:खाचा अभाव म्हणजे सुख,’ अशी आपली सुखाची दु:खावर अवलंबून असलेली व्याख्या असते. सातारा येथील सत्पुरुष डॉ. सुहास पेठे ऊर्फ पेठेकाका यांनी एके ठिकाणी लिहिलंय की, समजा घाटातून जाताना तुमची गाडी बंद पडली, तर वाटतं की देवा का ही अडचण आली? मला वेळेत पोहोचायचं असताना हे संकट का? पण काही वेळात जर कळलं की आपल्यामागून गेलेल्या सर्वच वाहनांना अपघात झाला आहे, की मग लगेच आपण देवाचे आभार मानतो. म्हणतो, ‘अशीच तुझी कृपा राहू दे!’ म्हणजे आधी गाडी बंद पडणं जे दु:खाचं वाटत होतं तेच सुखाचं वाटू लागतं! तेव्हा खरं सुखाचं काय, हिताचं काय, हे जो खऱ्या अर्थानं पूर्ण सुखस्वरूप आहे, तोच सांगू शकतो. ज्यात खरं हित आहे तेच खरं सुखाचं असतं. आपल्या देहाला जखम होणं हिताचं नाही, ही गोष्ट खरी. पण देहाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरला वैद्यकीय हत्यारानं छेद द्यावा लागला, तर ते अंतिमत: हिताचंच असल्यानं त्याला आपण ‘दु:ख’ मानत नाही. तेव्हा जो खरं हित सांगू शकतो आणि त्यासाठी मला जगायला शिकवू शकतो अशा सदगुरूच्याच बोधाच्या आधारानं मला खरं सुखरूप होता येईल. त्यासाठी त्यांच्या सांगण्याप्रमाणे अध्यात्मपथावर चाललं पाहिजे. पण तो पथ, त्यावरचं चालणं याबाबतदेखील शुद्ध आकलन असलं पाहिजे. एक जण काश्मीरला जाऊन आला. त्याच्या मित्रानं उत्सुकतेनं तिथल्या निसर्गसौंदर्याबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘आम्ही फिरलो खूप पण ते पर्वत आणि चिनारची झाडं सारखी मधे मधे येत होती. म्हणून ते निसर्गसौंदर्य काही नीटसं पाहताच आलं नाही!’ तशी गत व्हायला नको! तेव्हा अध्यात्मपथावर चालणं म्हणजे काय, तेही सद्गुरूकडूनच जाणून घेतलं पाहिजे. त्या चालण्यात वरकरणी बदल होऊन उपयोगी नाही. अंतरंगात पालट घडला पाहिजे. तरच खरं सुख उमगू लागेल.