समता? की नव्या अर्थाने सर्वोदय?

मुळात मानवी कल्याण कशात मानावे? याविषयी मतबहुलता नेहमीच राहणार. पण उन्नतीच्या ज्या कोणत्या दिशेने वाटचाल करायची तीत, एक मूलभूत निर्णय घ्यावा लागतो.

मुळात मानवी कल्याण कशात मानावे? याविषयी मतबहुलता नेहमीच राहणार. पण उन्नतीच्या ज्या कोणत्या दिशेने वाटचाल करायची तीत, एक मूलभूत निर्णय घ्यावा लागतो. आपल्या मागे राहिलेल्यांनी आपल्याला येऊन गाठेपर्यंत थांबले पाहिजे? की तेही पुढेच सरकतील व आपली वाटचाल त्यांना मारक नव्हे तर पूरकच ठरेल याची काळजी घेतघेत पुढे जात राहायचे? थांबणे म्हणजे समता! व पूरकतेने पुढे जाणे म्हणजे सर्वोदय!!
ओशो हे आपल्या प्रवचनांची वाजवून फी घेत असत. त्यांना एकाने पत्र लिहिले, ‘मला परवडत नाही. तुमच्याकडे गरिबाला मोक्ष नाही काय?’ ओशोंनी उत्तर दिले, ‘आहे ना! आत्ताच्या टप्प्यावर तुझा मोक्ष, म्हणजे कसेही करून अधिक उत्पन्न मिळवणे, हाच आहे.’
कोणाला लाओत्सुचा मार्ग आपलासा वाटेल, कोणाला बुद्धाचा, कोणाला अष्टावक्राचा, कोणाला मीरेचा, कोणाला कबीराचा, हे अजमावत ते उपदेश करत. त्यामुळे ओशोंचे उपदेश एकत्र पाहिले तर प्रचंड विसंगती आढळतात. आपले काम खंडन-प्रूफ दार्शनिक बनण्याचे नसून प्रेमळ डॉक्टरचे आहे, हे त्यांना स्पष्ट होते. डॉक्टर वेगवेगळ्या पेशंट्सना वेगवेगळी औषधे देतो, म्हणूनच तो सुसंगत व योग्य ठरतो. ‘ज्या व्यक्तीचा जसा जिथे उदय, तिला तसा तिथे मी सदय’ अशी ओशोंची जणू घोषणाच होती. सर्वोदय या शब्दाला, ‘शक्य तितके गरीब राहावे’ व ‘दुसरा गाल पुढे करावा’ हे अर्थ काही ऐतिहासिक संदर्भामुळे चिकटले आहेत. किंबहुना असे झाल्यानेच, सर्वोदय हा शब्द चलनातून बाहेर गेला आहे. पण हे शेळपट अर्थ जर काढून टाकले तर, ‘सर्वोदय’ हा शब्द रसरशीत आणि तडफदार बनून पुढे येईल. तसा तो आणला पाहिजे. कारण बऱ्याच गल्लती व गफलती टाळण्यासाठी आवश्यक अशी आणि प्रागतिक पावलांना पुष्टी देणारी अशी, एक अनुपलब्ध संकल्पना उपलब्ध करून देण्याचे काम तो शब्द करू शकेल.
आपण सारी (सध्या जवळजवळ साडेसहा अब्ज) मनुष्ये, प्रत्येकी अगदी विभिन्न स्थितींमध्ये ‘पडलेली’ आणि मग ‘सापडलेली’ आहोत. मानवी इतिहास, असे जरी एकुणात म्हटले तरी, जगभर त्यातील अवस्था व वळणे, ही कधीच एकसमयावच्छेदेकरून घडलेली नाहीत. बाहेरची नसíगक व तंत्रवैज्ञानिक परिस्थिती वा आतली जनुकीय व संस्कारबद्धतेची (कंडिशिनग) परि(!)स्थितीही भिन्न असते. सामाजिक संबंधांचा प्रकार व त्यातून एकेकाच्या वाटय़ाला आलेला भूमिकासंचही काहीही असू शकतात. आपण सारे, ‘अनन्याचे डोही अनन्य तरंग’ आहोत, याला काहीच इलाज असणार नाही. वाटय़ाला येणाऱ्या यशदस्थिती (अ‍ॅडव्हान्टेजेस) व अयशदस्थिती (डिसअ‍ॅडव्हान्टेजेस) प्रकाराने वेगळ्या व प्रमाणानेही कमीअधिक असणार आहेत. त्यांचे वरवंटा फिरवून सपाटीकरण करण्याचा (समतेचा) प्रकल्प, एकुणात डिसअ‍ॅडव्हान्टेजेसच वाढवून ठेवतो हेही आता बहुतेकांच्या लक्षात आलेले आहे.
मानवी कल्याण कशाला म्हणायचे यावर अजिबात मतक्य नाही. कोणी सुख (प्लेझर, ब्लिस नव्हे) या गणिती-चलाची बेरीज अधिकतम करायची असे म्हटले तर कोणी दु:ख(सफिरग, नुसते पेन नव्हे) न्यूनतम करण्याला अग्रक्रम दिला. कोणी शौर्याला तर कोणी शांततेला, कोणी उत्स्फूर्ततेला तर कोणी आत्मसंयमाला, कोणी सक्तीच्या अभावाला तर कोणी क्षमतावर्धनाला, कोणी समूहनिष्ठेला तर कोणी आत्मनिष्ठेला, कोणी कडक न्यायाला तर कोणी क्षमाशीलतेला इत्यादी महत्त्व दिले.
सर्वोदयाची व्यवहार्यता
मानवी कल्याणाची कोणती तरी एकच एक कल्पना ही ‘पूर्ण’ मानून, सर्वाना त्याच ‘अक्षावर’ वाटचाल करायला लावू, असा अट्टहास बाळगणे हे मुळापासूनच हुकूमशाहीवादी आहे. कारण कल्याणाच्या इतर कल्पना मानणाऱ्यांचे निर्दालन करणे त्यात ओघानेच येते. कल्याणाच्या कल्पनांमध्ये बहुविधता असणे हे फक्त धुरिणांच्याच नव्हे, तर सामान्य लोकांच्या बाबतीतही खरे असते. कोणाला स्वत:च्या एकाच क्षमतेत परम-नपुण्य प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा असेल तर कोणाला बेताबेताने पण बहुपलू बनावेसे वाटेल. कोणाला डोक्याला ताप नको असेल तर कोणाला तोच आवर्जून हवाही असेल. कोणाला खूप श्रम करून खूप उच्च राहणीमान हवे असेल तर कोणाला साधे पण निवांत राहायचे असेल. ज्यांना स्वत:च्या हट्टानुसार जग चालवायचे असते त्यांना हे वैविध्य म्हणजे एक अडचण वाटते. पण खऱ्या सर्वोदयवाद्याला हे वैविध्यच मोठा स्रोत वाटते. कारण एका जीवनदृष्टीमुळे समाजाला ज्या बाबतीत तूट येते ती दुसऱ्या जीवनदृष्टीमुळे भरून निघू शकते. म्हणूनच सर्वोदयात एकमेकांशी पूरक व्हायचे असते, समान नव्हे. विभिन्न श्रेयकल्पना व दुरितकल्पना जर घेतल्या तर असे आढळते की दुरिते ही दुरितांना पूरक ठरून घातचक्रे (व्हिशियस सर्कल्स) बनवतात तर श्रेये ही श्रेयांना पूरक ठरून प्रसादचक्रे (व्हच्र्युअस सर्कल्स) बनवितात. जिथे जे दुष्टचक्र तोडता येईल तिथे ते तोडले पाहिजे. उदाहरणार्थ, जर दुर्भिक्षामुळे मारामाऱ्या होत असतील तर अहिंसेचा उपदेश उपयोगाचा नसतो. समृद्धीच वाढवावी लागेल. पण जर अस्मितांमुळे युद्धे होत असतील तर अस्मिता आवरत्या घ्याव्या लागतील. कोणत्या अक्षावर उन्नती होतीय यापेक्षा कोणत्या का अक्षावर असेना, पण ती होतीय हे महत्त्वाचे.
येथे सर्वोदयवाद याचा अर्थ ‘मालकांनी ट्रस्टी बनून उद्योग सांभाळावा’ किंवा ‘जास्तीच्या जमिनीचे दान करावे’ असे वैयक्तिक सद्गुणांवर आधारित परोपकारी कार्यक्रम असा नाही. पण ‘अन्त्योदयाला अग्रक्रम’ (जातिनिहाय नव्हे) या बाबतीत गांधी-विनोबा विचारांशी साधम्र्यही आहे. नेहमी असे बोलले जाते की, ‘श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत आणि गरीब अधिक गरीब!’ आपल्या अमर्त्य सेनांचे गुरू जॉन रॉल्स यांच्या मतानुसार, गरीब हे गरिबीतून बाहेर पडण्याला अग्रक्रम आहे. या मताला अग्रक्रमवाद (प्रायारिटेरियनिझम) असे नावही आहे. गरीब-श्रीमंतातील दरी किती वाढते आहे हे बघण्यापेक्षा, गरिबाचे जीवनमान हे किमान मानकापर्यंत आणण्याला अग्रक्रम द्यावा. मग विषमता सुरुवातीला थोडी थोडी (कमी चढानिशी) वाढावी व जसे वरच्या स्तरात जाऊ तशी ती मग कितीका वाढेना! त्याने गुंतवणूक वाढते, जोखीम उचलण्याची क्षमता वाढते, नूतनीकरणे सापडतात व एकूण विकास होतो. मुख्य म्हणजे श्रीमंतांना अगदीच निरुत्साहित न करतादेखील बराच महसूल मिळतो, जो निम्नस्तरांना उचलण्यासाठी अनुदान म्हणून उपयोगीही पडतो. म्हणजेच वरच्यांची वर होणारी वाटचाल ही खालच्यांना वर ओढण्यास उपयोगी ठरते.  आर्थिक धोरणाविषयीच्या राजकीय विचारांमध्ये आपल्या अमर्त्य सेनांचे गुरू जॉन रॉल्स, यांनी हा जो सिद्धान्त मांडला आहे, तो सर्वोदयवादीच म्हणावा लागेल.  उत्पन्नांच्या वितरणाचा कोणता आकृतिबंध हितावह मानावा याबाबत रॉल्सप्रणीत सूत्र पुढीलप्रमाणे आहे. ‘अनेक संभाव्य विषमतांपकी, अशी विषमता निवडा की जिच्यात, निम्नतम व्यक्तीचे उत्पन्न (इतर विषमतांच्या मानाने) सर्वाधिक असेल.’
समतेच्या घाईने होणारे घोटाळे
दारिद्रय़ गेले की आशा-आकांक्षा पल्लवित होतात. भवितव्य दिसताच संतती ही बालमजुरीच्या रूपात अ‍ॅसेट न वाटता जबाबदारी वाटते. यातून लोकसंख्यावाढीचा दर कमी होतो पण विकासदर वाढलेला असतो. एकदा का सर्वात खालचा माणूस हा ‘नडलेला’ राहिला नाही की त्याला ‘नाडणे’ अवघड होते. यातूनच श्रमिकांची सौदाशक्ती वाढत जाऊन आíथक विषमता कमी होण्याच्या मार्गाला लागते. अनेक देश याच क्रमातून गेले आहेत. आधी विषमता कमी करू आणि मग दारिद्रय़ सापळ्यातून बाहेर पडू असा शॉर्टकट नाही.
‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ या चालीवर ‘आधी निवारण दारिद्रय़ाचे आणि मग सौम्यीकरण विषमतेचे’ हाच खरा मार्ग आहे. पण समतावाद्यांना हे पटत नाही. रॉल्स यांचे विरोधक कट्टर समतावादी रोनाल्ड ड्वोíकन यांनी राज्यसंस्थेवर अशक्य कामगिरी सोपवलेली आहे. ‘उत्पन्नाचे फेरवाटप तोपर्यंत करत राहा की जोपर्यंत कुणालाच कुणाचा हेवा वाटणार नाही’. हेवा वाटून त्रास करून घेणे हा जणू माणसाचा न्यायिक अधिकारच आहे! मी तर म्हणेन की स्वत:चा उद्धार करायचे सोडून इतरांचा हेवा करण्यात ऊर्जा घालवणे हे आत्मघातकी तर आहेच पण अनतिकदेखील. अन्यायकर्त्यांविरुद्ध लढणे आणि सुभाग्यवानांना प्रताडित करणे यात फरक आहे. ड्वोíकनप्रणीत कार्यपद्धती तर अचाटच आहे. प्रथम चलन समान वाटा, मग सर्व गोष्टींचा लिलाव करा. मग विचारा की ‘हेवा वाटतोय का?’ ‘वाटतोय.’ असे उत्तर आले तर पुन्हा आणखी चलन समान वाटा व पुन्हा लिलाव करा व असे हेवारहित वितरण होईपर्यंत करत राहा! यापेक्षा स्टॅलिन परवडला. सगळे श्रम सरकारला द्या आणि सगळे रेशन सरकारकडून घ्या. प्रश्न संपला!
एककल्ली कल्याण-कल्पनेमुळे समतावाद हा हुकूमशाहीवादी असतोच. पण त्यात मोठीच भर एका गोचीमुळे पडते. राज्याने नागरिकांना नि:पक्षपाती वागणूक द्यायची की त्यांना पक्षपाती वागणूक देऊन ठाकूनठोकून समान बनवून सोडायचे? समान बनवण्यासाठी जे दमन लागते, ते करणारे राज्य हे स्वत:च वर्ग बनून आíथक विषमताही पुन्हा आणतेच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Equality raising of new sense

ताज्या बातम्या