डॉ. निर्मोही फडके

ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नुकतेच निधन झाले. कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक अशा सगळ्या भूमिकांमधून लीलया वावरणाऱ्या मनोहर शहाणे यांच्या साहित्यविश्वाचा आढावा…

amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

‘आजकालचे हे भडभुजे कशाला चर्च मंदिरावरचं थरकणं बंदिस्त करून टाकतायेत? फार तर ख्रिश्चनांनी टेकडीवर जावं, मुसलमानांनी वाळवंटात जमावं आणि हिंदूंनी नदीकाठ धरावा आणि तिथं यथास्थित बोंबलावं. फुप्फुस तरी साफ होतील. अंगाला चिकटलेला घाण वास मोकळ्या वाऱ्यानं उडून जाईल. …पांढऱ्याशुभ्र, मधाळ डोळ्यांच्या आकाशात मुक्त झेपावणाऱ्या कबुतरासारखं वाटेल!’
(पुत्र – मनोहर शहाणे)

शतक गाठण्याची खातरी देणाऱ्या फलंदाजानं थोडक्याकरता बाद व्हावं,‌ तसं मनोहर शहाणे आयुष्याचं शतक गाठता गाठता आपल्यातून निघून गेले. ‘मृत्यू’ हे ज्यांच्या अव्याहत चिंतनाचं केंद्र राहिलं, ज्या विषयानं त्यांच्या लेखणीची कायम साथ दिली, त्याच्या सोबतीनं मार्गस्थ झाले. आपल्यामागे आपल्या साहित्यकृतींचं ‘मनोहर आकाश’ इतरांसाठी ठेवून.

लेखकाच्या आयुष्यातली अनेक वळणं त्याच्या लेखणीचंही वळण बदलवतात,‌ हे वास्तव आहे. मनोहर शहाणे ह्यांच्या बाबतीतही असं घडल्याचं दिसून येतं. (कोणत्याही साहित्यिकाच्या, कलाकाराच्या कलाकृतीबद्दल लिहिताना त्याच्या चरित्राचे संदर्भ घ्यावेत की, घेऊ नये हा प्रश्न हल्ली बऱ्यापैकी मोडीत निघाला आहे.) निरंतर खळखळणाऱ्या गोदावरीच्या पाण्यावरचं आणि नाशिकसारख्या रहाळसहाळ आयुष्य जगणाऱ्यांच्या मातीतलं त्यांचं आयुष्य गोदाकाठच्या चढ-उतारांसारखंच होतं. त्यांच्या अगदी नकळत्या वयात झालेला त्यांच्या वडिलांचा मृत्यू, नंतरच्या काळात झालेला थोरल्या भावाचा मृत्यू या घटना जशा त्यांच्या आयुष्यातल्या आर्थिक-भौतिक खाचखळग्यांकरता कारणीभूत ठरल्या, तशाच प्रथम पत्नीचा अपघाती मृत्यू, स्वतःच्या पहिल्या, लहानग्या मुलाचा स्वतःच्या हातावर झालेला मृत्यू या घटना मानसिक-भावनिक-वैचारिक बदलांकरता कारणीभूत ठरल्या. कदाचित त्यामुळेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधल्या अवकाशात मृत्यूची एक सावली सतत फिरताना दिसते.

हेही वाचा : एकट्या मंचुरियननेच यांचं काय बिघडवलंय? 

उच्च शिक्षण, गलेलठ्ठ पगाराची नोकरी, थोडक्याच कर्तृत्वावर मिळालेली प्रसिद्धी, मान-सन्मान, बंगला-गाडी असं तथाकथित यशस्वी, ऐषआराम असलेलं चकचकीत आयुष्य पूर्वार्धात त्यांच्या वाट्याला आलं नाही. जेमतेम शिक्षण आणि इकडेतिकडे उमेदवारी करत शेवटी ‘गावकरी’मध्ये मिळालेली नोकरी, यामुळे त्यांच्या आयुष्याला जरा स्थिरता आली. नंतर मिळालेलं ‘अमृत’ डायजेस्टचं काम हे आर्थिक घडी थोडीफार सुधारण्याकरता साहाय्यकारी ठरलं. आयुष्याचा उत्तरार्ध संसार-मुलं आणि साहित्य क्षेत्रातले काही मान-सन्मान यामुळे मात्र आनंदाचे क्षण देणारा ठरला.

एखादा गुणी लेखनाच्या दृष्टीनं लेखक हा त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा अलक्षित राहिल्याची अनेक उदाहरणं आपल्या साहित्य क्षेत्रात आहेत. (वर्तमान काळात लोकसंख्येचा आणि पर्यायानं साहित्यिक-संख्येचा झालेला स्फोट लक्षात घेता ‘गुणी’ शब्दाची व्याख्या बदलली आहे.) मनोहर शहाणे हे अशा अलक्षित, गुणी लेखकांपैकी एक आहेत. १ मे १९३०
रोजी जन्मलेल्या शहाणे यांचं लेखन १९६० च्या सुमारास वाचकांपुढे येऊ लागलं. सुरुवातीपासूनच त्यांच्या लेखणीनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. ‘मानवी अस्तित्व’ हे त्यांच्या लेखनाचं महत्त्वाचं आशयसूत्र होतं.

१९६३ मध्ये ‘धाकटे आकाश’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीनं शहाणे यांना राज्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार असे दोन्ही मानाचे पुरस्कार मिळवून दिले. त्यामुळे, मनोहर शहाणे हे नाव साहित्य-प्रतलावर आलं. त्यानंतर शहाणे ह्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
‘धाकटे आकाश’पासून त्यांच्या लेखणीनं सुरू केलेला अस्तित्वाचा शोध हा शेवटपर्यंत निरंतर चालू राहिला. जंगलात तप करण्यासाठी न जाता माणसांत राहूनच ‘कोऽहम’चं उत्तर शोधण्यासाठी निर्मिलेले हे विविध ललित आविष्कार म्हणायला हवेत.

‘धाकटे आकाश’मधला धाकटा स्वतःचं शरीर म्हणजे काय आणि त्या शरीराचं इतरांच्या जगण्याच्या पातळीवर असलेलं अस्तित्व याचा शोध घेत राहतो. अंती उत्तर म्हणून त्याच्या पदरी ‘एकाकीपण’ पडतं. असं ‘एकला चालो रे’चं दाटपणे झिरपलेलं आणि ‘मृत्यू’ची झाल पांघरलेलं सूत्र शहाणे यांच्या सगळ्याच लेखनात प्रकर्षानं दिसतं.

नातेसंबंधांमधलं गहिरेपण आणि त्याला छेद देत आवेगानं पुढे येणारं तुटलेपण ही साठोत्तरी कालखंडातल्या बहुतेक महत्त्वाच्या साहित्यकृतींची आशयसूत्रं आहेत. त्या कालखंडाचा आणि त्याच्या आगेमागे घडू लागलेल्या स्थित्यंतरांचा तो परिणाम आहे.‌ मनोहर शहाणे यांची संवेदनशील लेखणीही या बदलांशी संवादी राहिली. १९६१मध्ये प्रकाशित झालेल्या ‘शहाण्यांच्या गोष्टी’ कथासंग्रहातल्या ‘सागर किनाऱ्यावर’ या कथेतल्या नायकाला असाध्य रोग होतो. तो आपल्या प्रेयसीच्या आयुष्यातून निघून जायचं ठरवतो. तिला ही गोष्ट कळू नये असं त्याला वाटत असतं. पण शेवटी तिच्या आग्रहाखातर तो तिला हे सांगतो. इथपर्यंत कथा रूढ मार्गानं येते. त्याच रूढ पद्धतीनुसार वाचकाला वाटतं, आता ही नायिका अशा रोगग्रस्त नायकाचा स्वीकार करून ‘थोर’पदी जाईल. पण इथेच ही कथा वेगळी ठरते. ती आपलं आयुष्य पणाला वगैरे लावत नाही.

हेही वाचा : यंदाच्या ‘ग्रॅमी’त भारतीय कलाकारांची जागतिक धून…

‘मला सोडून जाऊ नकोस रे, हे विचार मनात येऊनही ती जागची हलली नाही.’
ही तिची भावविफलता आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यातली विवशता
परस्परांना छेद देत वाचकाला धक्का देतात. (वर्तमानकाळातल्या प्रॅक्टिकल जगण्याचे निकष मात्र इथे लावू नयेत.)
‘मौज’सारख्या प्रस्थापित प्रकाशनानं शहाणे यांच्या सात कादंबऱ्या एकापाठोपाठ प्रकाशित केल्या. दरम्यानच्या काळात ‘सत्यकथे’त त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. ‘धाकटे आकाश’, ‘देवाचा शब्द’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या म्हणता येतील.
शहाणे यांच्या लेखणीमध्ये नाट्य-संहितेची बीजं शालेय वयापासून रुजली होती. त्या वयात त्यांनी शाळेसाठी नाटक लिहिलं होतं. त्यात कामही केलं होतं. पुढल्या लेखन प्रवासात, ‘तो जो कुणी एक’ हा एकांकिका संग्रह, ‘इतिहासाचे दात करवती’ हे नाटक, ‘भुताची पावले उलटी’ हा फार्स, ‘पुत्र’ कादंबरीवरून लिहिलेलं नाटक, जे राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम आलं, हे नाट्यलेखनावरची त्यांची हुकूमत दाखवतं.
त्यांना स्वतःला आपल्या कादंबऱ्यांचं माध्यमांतर करून त्यांचं ‘नाटक’ व्हावं असं वाटे, असा उल्लेख नाट्य-दिग्दर्शक अतुल पेठे यांनी शहाणे यांच्याबद्दल लिहिलेल्या समाज माध्यमांवरच्या श्रद्धांजलीपर लेखांमध्ये केला आहे.
‘पुत्र’ कादंबरी ही भारतीय पितृसत्ताक व्यवस्था आणि पितृसत्ताक मानसिकता यांच्या दाहक प्रभावाखाली असलेल्या समाजाचं भेदक चित्रण आहे. त्याला वरवरची रंगरंगोटी नाही. १९७१ साली लिहिलेल्या या कादंबरीतल्या अनुभवविश्वाची प्रतिबिंबं आज आपल्या समाजात ५० वर्षांनंतरही दुर्दैवानं पाहायला मिळतात. पुत्रसंततीचं उदात्तीकरण आणि कुमारी मातेचा सामाजिक प्रश्न या दोन मुख्य आशयसूत्रांमध्ये बांधल्या गेलेल्या ‘पुत्र’ कादंबरीचा विषय आजही गावागावांमध्ये आणि शहरांमध्ये ज्वलंत आहे.
‘पुत्र’मधलं प्रथमपुरुषी निवेदन वाचकाला एकेका वाक्याला विचारप्रवृत्त करतं. इथेही सुरुवात ‘कोऽहम्’पासूनच होते.
‘…आमच्या मनात आलं, खऱ्याखुऱ्या गोठ्यातच आमचा जन्म झाला असता तर बरं झालं असतं!
आम्हाला म्हणता आलं असतं, आम्ही येशू ख्रिस्त आहोत! आणि एकदा येशू ख्रिस्त झाल्यावर हिंदुस्थानच्या यच्चयावत जंतांना काही उपदेशाचे डोस तरी देता आले असते! परंतु आमच्या आईबापांनी आमची ही संधी हुकवली. तरी काही बिघडलं नव्हतं. आम्ही येशू ख्रिस्तच व्हायचं ठरवलं! फरक येवढाच की, आम्ही स्वतः क्रुसावर जाणार नव्हतो. जमेल त्या शक्तीनं, जमेल त्या जंतांना खिळे ठोकता आले तर आमच्या जन्माचं मोठं सार्थक होणार होतं! प्रत्यक्षात आम्हाला हे जमेल? का गावच्या एखाद्या असाहाय्य, कोणी नसलेल्या, अर्धपोटी, नेहमी चिडवल्या जाणाऱ्या दरिद्री कंठाळ वेड्या म्हातारीप्रमाणं आमचं होईल? देव जाणे!’
एकाच वेळी स्वतःला प्रेषित समजण्याची आणि कःपदार्थ मानण्याची परस्परविरोधी भावना हा मानवी मनाच्या अस्थिरतेचा धागा लेखक अचूक पकडतात. अशी अवस्था वैश्विक आहे. इथेच वाचक ‘पुत्र’मधल्या अच्युतशी जोडला जातो.

हेही वाचा : इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार

‘पुत्र’मधला अच्युत वडिलांपासून मनानं दुरावलेला आहे. आपल्या सावत्र आईच्या मृत्यूचं गूढ बाळपणापासून त्याच्या मनाला व्यापून राहिलं आहे. तिला मुलगा झाला नाही म्हणून तिनं पुलाखालच्या डोहात जीव दिला, आणि आपण आता आपल्या आईला – आपल्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोला – झालेलो एकमेव मुलगा, वडिलांनंतरचा पुरुष आहोत, हे त्याच्या बालसुलभ मनाला झालेलं आकलन त्याच्या मानसिकतेत ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतं.

सावत्र बहिणीबद्दल नायक म्हणतो, ‘तिचं आमच्यावर भलतंच प्रेम! आम्हाला ती उसंतच मिळू द्यायची नाही. येता जाता हाताळायची. तिनंच आम्हाला आमच्या घराण्याचं देऊळ दाखवलं. अंगारेश्वर. तिनं आम्हाला जवळ घेतलं, आमचे तथाकथित पापे घेतले की, आमच्या अंगावर सर्रकन काटा यायचा. वाटायचं, हिच्या आईनं एका भयंकर रात्री पुण्यवाहिनी अशा पवित्र नदीत आपला देह लोटून दिला. का? का ? दुःखानं? हिच्या आईनं हिच्या शरीरात ‘पुनरपि मरणं, पुनरपि जननं’ करणाऱ्या पेशी ठेवून आपल्या शरीराचा कारखाना कायमचा टाळेबंद करून टाकला! आमच्या पहिल्या आईच्या गर्भकोमल अशा काही भावना असतील काय? ज्यांची आमच्या पिताजींनी राखरांगोळी केली असेल? काही असलं तरी आमच्या सख्ख्या आईच्या प्रेमाचा फार मोठा भाग आमच्या वाट्याला यायचा! सध्याच्या आमच्या चालू घराण्यात आम्हीच तेवढे पुरुष होतो ना!’
मुलांच्या पौगंडावस्थेतली बदलती मानसिकता, कोवळीक,‌ स्वप्नील वृत्ती तितक्याच कोमलतेनं, पण स्पष्टपणे लेखक अधोरेखित करतात.
‘एखाद्या सेक्सपाॅटचं स्वप्न आदल्या रात्री पडलेलं आहे, कुठेतरी बिंदूंची साखळी तयार झालेली आहे, ती झोपेतच ओघळून नेसतं ओलं झालेलं आहे अशा अवस्थेत तुम्ही पहाटे फिरायला बाहेर पडा! मग आम्हाला सांगा कसं वाटतं ते!’
तर वर्णभेदावरही तितकंच करकरीत भाष्य करतात.
‘पुढं कॉलेजात गेल्यावर आम्हाला कळलं की माणसाच्या नशिबात कातडीचा रंग जरूर फेरफार घडवून आणू शकतो.’
‘देवाचा शब्द’मध्ये मूल न होऊ शकणारं जोडपं आणि – नायकाची – आई, अशा तीन व्यक्तिरेखांमध्ये होणारा संघर्ष मानवी नातेसंबंधांमधल्या छुप्या हुकूमशाहीचं चित्रण करतात. मूल न होणे हा त्या जोडप्याचा व्यक्तिगत, जैविक प्रश्न नसून तो जणू काही समाजात उलथापालथ करणारा प्रश्न आहे, अशी सामाजिक मानसिकता आजही दिसते. (काही दाम्पत्य आज मूल होऊ न देण्याचा निर्णय घेत असली तरीही) या सामाजिक दबावामुळे आपल्या समाजात फक्त पुरुषाकडूनच नव्हे, तर एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं मानसिक खच्चीकरण कसं करते हे ‘देवाचा शब्द’मधून प्रभावीपणे समोर येतं.
‘लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू’ (१९७८) मधल्या ‘एखाद्याचा मृत्यू’मध्ये सामान्य माणसाच्या सामान्य मृत्यूचं अतिसामान्य नाट्य कसं होतं याचं दर्शन होतं.‌ लेखनाच्या साध्यासुध्या शैलीमागे लपलेली माणसाची भडक स्वभाववैशिष्ट्यं आणि व्यावहारिक नीच वृत्ती (ज्याला हल्ली आपण निरुपायातून आलेला प्रॅक्टिकलपणा म्हणतो) दबक्या पावलांनी वाचकांसमोर येते.

बुऱ्हाडे या सर्वसामान्य माणसाच्या मरणानंतर त्याच्या घरात घडलेलं नाट्य वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून लेखक उभं करतात. बुऱ्हाडेची बायको, बहिणी इ.च्या माध्यमांतून केलेला बोलीचा वापर कथानकाला प्रवाही ठेवतो. व्यक्तिरेखांची वैशिष्ट्यं त्यांच्यातील संवाद हे वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर नकळत भाष्य करतात. उदा. जातींबद्दल भाष्य. ‘जातीत सुधारणा व्हायला हवी, हा मावशीच्या मुलाचा फार आवडता विषय होता. त्याच्या डोळ्यापुढं ब्राह्मण जातीचा आदर्श होता.
(तो म्हणाला,)
‘या हिंदुस्थानात काहीही नाहीसं होत नसतं. फक्त बदलत असतं. गोष्ट मूळ एकच असते.’
बाईपणाचं करुण चित्रण किंवा विधवा स्त्रीचं दुःखी आयुष्य अशा पारंपरिक उमाळे देणाऱ्या चित्राला छेद देणारं बुऱ्हाडेच्या विधवा स्त्रीचं वास्तव चित्रण या कथानकात येतं. एखाद्याचा मृत्यू हा एकेकाच्या आयुष्यात कोणत्या आणि कशा केवळ वरवरच्या उलथापालथी करतो, याचं तटस्थ नाट्य शहाणे यांनी उभं केलं आहे.
‘करत्यासवरत्या दोन्ही मुलांना हाताशी धरून ती जगणार होती. नवरा मेल्यानं आता तिचं काहीच वाईट घडणार नव्हतं.’
‘ओव्हरसीयरला आनंद की, आपल्या अध्यक्षतेखाली अंत्ययात्रा निघाली.’

हेही वाचा : राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते! 

सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय माणसाचं एक स्वप्न असतं आणि ते म्हणजे स्वतःचं घर बांधणं किंवा घर असणं. स्वतःचं घर हेही स्वतःच्या अस्तित्वाचंच एक प्रतीक आहे. ‘लोभ असावा’मध्ये एका माणसानं अनेकांना प्लॉट विकत घेऊन त्यावर घर बांधण्याविषयी लिहिलेली पत्रं आहेत. हा एक वेगळा प्रयोग म्हणूनही नोंदला जावा.
‘झाकोळ’मध्ये दादा आणि गोपाळ यांच्यातला संघर्ष आहे.
‘वडील त्याला पुन्हा ‘परिचित’ झाले होते आणि त्या ‘परिचिता’शी नेहमीप्रमाणं
वागणारा गोपाळ आता पुन्हा आला होता. त्यानंच ‘पटतंय’ म्हणून म्हटलं.’
‘लग्न झाल्यावर कितीतरी वर्षांनी पोरापोरींना तारुण्य फुटायचं. तेव्हा नवराबायकोत काही बोलणंचालणं नाही. रात्रीच्या वेळी संबंध सुरू होई. आणि रात्र संपली की, संबंध संपे. याच काळात आपल्या अस्तित्वाचं बीज टाकलं गेलं!’
‘ससे’मध्ये अप्पा आणि त्यांच्या मुलांमधील संघर्ष, ‘इहयात्रा’मध्ये प्रा. घैसास यांचा स्वतःशी असलेला संघर्ष, असे जीवन-संघर्षाचे अनेक पदर, अनेक व्यक्तिरेखांच्या आणि कथानकांच्या माध्यमातून विविध अंगांनी वाचकांपर्यंत पोहोचतात.

भूक आणि मैथुन या आदिम भावनांबरोबरच भीतीमधून निर्माण झालेली, अस्तित्व टिकवण्याची माणसाची आदिम धडपड त्याला स्वतःपुरत्या विश्वात का होईना स्वतःचं एक केंद्र निर्माण करण्याकडे नेते. असं स्वतःचं केंद्र निर्माण करताना तो आपल्या भोवताली असणाऱ्या अनेकांवर वेगवेगळ्या पद्धतीनं हुकूम गाजवतो. ही हुकूमशाही सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक स्तरांवर असते. कधी कौटुंबिक परिघात असते, तर कधी राजकीय स्वरूप घेऊन ती एका मोठ्या गटाला आपल्या नियंत्रणाखाली आणते. मनोहर शहाणे यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून प्रत्येकाची अस्तित्वाची धडपड आणि त्याकरता प्रत्येकाची दुसऱ्यापेक्षा वरचढ ठरण्याची सुप्त इच्छा मुख्यत्वे करून कौटुंबिक पातळीवर अधोरेखित होत असली तरी आपल्या सांस्कृतिक संचितावर औपरोधिक भाष्य करते.
‘अशी अर्धवस्त्रा आपल्या मुलाची आई आहे, हा विचारच कसा भयकारी वाटतो. आपल्या प्राचीन संस्कृतीचं एक चांगलं होतं. तिनं आमच्या बायकांना चांगलं जोखडबंद करून ठेवलंय. … आम्ही आमच्या नपुंसक संस्कृतीतली एक बाई उचलली व तिच्याकडं पाहून आमची बायको, आमची बायको म्हणू लागलो.’
(‘पुत्र’)

आधिपत्य गाजवण्याच्या सुप्त इच्छेला असलेले अनेक पातळ्यांवरचे संदर्भ आणि कथानकाच्या अनुषंगाने केलेली वातावरणनिर्मिती हे त्या लेखनकृतीला समग्रता देतात. वातावरणनिर्मितीच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असा की, शहाणे ह्यांच्या लेखनकृतींमध्ये त्यांचा भोवताल, विशेषतः नाशिक आणि नाशिकमधल्या वेगवेगळ्या स्थळांचे संदर्भ हे केवळ वातावरणनिर्मिती करता न येता ते एका स्वतंत्र व्यक्तिरेखेची भूमिका निभावतात. त्यांच्या लेखनाबद्दल आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी लिहिलं आहे, त्या सर्वांनी याविषयी आवर्जून विवेचन केलेलं आहे. त्या अनुषंगानं ‘पुत्र’ ह्या कादंबरीमधला हा परिच्छेद पुरेसा बोलका आहे.
‘एक रामभक्त रस्त्यावर उभं राहून राममंदिराच्या कळसाला दुरूनच नमस्कार करीत होता. त्याच्यापास्नं राममंदिर सतरा फर्लांग दूर होतं. आमच्या बापाच्या मनात राममंदिराविषयी व त्याला मिळणाऱ्या भरमसाठ उत्पन्नाविषयी जी द्वेषयुक्त असूया होती, ती आमच्या मनात निर्माण झाली. आम्ही आमच्या बापाप्रमाणंच राम, रामभक्त, त्याचं मंदिर आणि त्याचे पुजारी यांना शिव्या हासडू लागलो.’

‘मनोहर शहाणे यांच्या कादंबऱ्या अनुकरणहीन, अस्सल आहेत’, असं अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे म्हणतात.
‘साठोत्तरी कादंबरीलेखनाच्या क्षेत्रात शहाणे यांचे लेखन रूढ अर्थाने सामाजिक, राजकीय, ग्रामीण अथवा नागर अशा वर्गवारीत बसवता येत नाही. त्यांच्या कादंबरीत मनुष्याच्या सामाजिक वर्तनाची चिकित्सा अवश्य असते, परंतु त्याच वेळी ती सामाजिकतेच्या स्तराखालच्या मनुष्यपणाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.’
वसंत आबाजी डहाके, ललित, दिवाळी, १९९८.
‘शहाण्यांची कादंबरी एका वाचनात उलगडत नाही. त्यासाठी ती पुन्हा वाचावी लागते.’ श्री. पु. भागवत.

हेही वाचा : पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं? 

शहाणे यांच्या ‘पापाचे पाय’ कथेतली मुख्य व्यक्तिरेखा एक वृद्ध स्त्री आहे, जी नातवंडांनी भरलेल्या घरात मृत्यूची वाट पाहत असते. ‘माती’मधला नायक वाळ्या. त्याचे भाऊबंद त्याची शेती गिळंकृत करतात, पण शेतातल्या मातीतच त्याचा मृत्यू होतो.
जीवन आणि मृत्यू ह्यांच्यामधल्या क्षणांची सार्थकता आणि निरर्थकता शोधण्याचा प्रयत्न हजारो वर्षांपूर्वी सिद्धार्थ गौतमानं केला. मला असं वाटतं, तेव्हापासून प्रत्येक संवेदनशील आणि सर्जनशील लेखकाच्या लेखणीमधून हा शोध आजपर्यंत झिरपत आला आहे. त्या लेखण्यांचं तेच एक जीवित कर्म ठरलं. लखलखीत जीवनचिंतन आणि मृत्युचिंतनही करणारी, इतरांना ते करण्यास प्रवृत्त करणारी ‘मनोहर शहाणे’ यांची लेखणी अशा मोजक्या लेखण्यांमध्ये स्थान मिळवून आहे. मनोहर शहाणे यांच्या कथा-कादंबऱ्या इ. बद्दल अनेकांगांनी लिहिलं गेलं आहे, पण ते पुरेसं नाही. एका लघुलेखात तर ते शक्यच नाही.
मृत्यूविषयीच्या त्यांच्याच एका चिंतनानं प्रस्तुत लेखाला विराम.

‘कमानीवरचा पूल शांतमृत होता. त्याच्या कडेचे दिवे गोदेच्या पाण्यावरनं वर उसळणाऱ्या अंधारात प्रकाशकिरण घुसवत होते. गांधीतलावावरचा एकच दिवा पापी माणसाच्या आत्म्यासारखा अंधुक अंधुक होता. पलीकडच्या रामकुंडाच्या पोटातील अस्थिकुंडातील हाडं आपली शरीरं हरवून निपचित होती. त्यांना धड शरीरं सापडत नव्हती की आत्मे गवसत होते….काळं मुर्दाड आकाश थेट आमच्या भुवयांवर उतरलं होतं!’ (पुत्र)

ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांना आणि त्यांच्या अमर्त्य लेखणीला आदरांजली!

(लेखक, व्याख्याता)

nirmohiphadke@gmail.com