गोव्यातल्या म्हापशात सध्या बोडगेश्वराची जत्रा सुरू आहे आणि जत्राकाळात गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे. मंचुरियनमध्ये रिठा वापरला जातो, रंग, सॉस हानीकारक असतो, तेल बराच काळ उकळलेलं असतं, स्टॉल्स अस्वच्छ असतात अशी अनेक कारणं सांगितली जातायत.
जत्रांदरम्यान बंदीचा ट्रेंड २०१९ पासून…
गोव्यात जत्रांदरम्यान गोबी मंचुरियनवर बंदी घालण्याचा ट्रेंड २०१९ पासून सुरू झाला. एप्रिल २०१९ मध्ये कोलवाले जत्रेच्या वेळी अशी बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर कोविड काळात जत्रा बंदच होत्या. पुढे २०२२ मध्ये वास्को आणि मुरगावमध्येही जत्रांदरम्यान यावर बंदी घालण्यात आली. आता म्हापशात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.
स्टॉल चालकांचं म्हणणं काय?
स्टॉल चालकांचा पोलिसांशी बोलतानाचा एक व्हिडीओ समजमध्यामांवर उपलब्ध आहे. ते म्हणतात, की मंचुरियनवर बंदी असल्याचं ऐनवेळी सांगण्यात आलं, मग आम्ही पाव भाजी विकण्याची परवानगी मागितली. तोंडी होकार देण्यात आला, पण थोड्या वेळाने येऊन काहीच विकता येणार नाही असं सांगितलं. आम्ही स्टॉलसाठी पैसे भरले आहेत, सामान खरेदी करून ठेवलं आहे. आधीच सांगतील असतं तर स्टॉल लावला नसता. बहुसंख्य मंचुरियन विक्रेते उत्तर भारतीय आहेत, त्यामुळे हा स्थानिक विरुध्द परप्रांतीय विक्रेते किंवा स्थानिक विरुध्द बाहेरची खाद्यसंस्कृती असा वाद असावा का, हा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : यंदाच्या ‘ग्रॅमी’त भारतीय कलाकारांची जागतिक धून…
पडणारे प्रश्न…
बंदी केवळ जत्रांपुरतीच का? एरवी आरोग्याची हानी झालेली चालणार आहे का? बंदीसाठी देण्यात आलेली (एक रिठा वगळता) सर्व कारणं यच्चयावत सर्व स्ट्रीटफूड प्रकारांना लागू होत नाहीत का? या काळात हातावर पोटवर असणाऱ्या विक्रेत्यांनी काय करायचं? मंचुरियनवर बंदी असल्याचं विक्रेत्यांना आधी सांगितलं गेलं होतं का? पदार्थावर बंदी घालण्याऐवजी केवळ रिठ्याच्या वापरावर बंदी घातला येणार नाही का? जनतेच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवीच, पण मग ती अशी अर्धीमुर्धी घेऊन कसं चालेल? एकंदरच सर्वच खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी काही मूलभूत नियायमंचं पालन अनिवार्य करणं आणि ते नियम पाळत आहेत याची वेळोवेळी खात्री करून घेणं गरजेचं नाही का?
एक प्लेट पानीपुरी मीडियम तिखा…
मनात कोणतीही शंका न येता आपल्या पचन आणि प्रतिकारशक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण सर्व शहरांमध्ये प्रचंड आहे. अशांचं गणित पक्कं असतं. खिशातून फार दमड्या वजा होता कामा नयेत, पोटात भरभक्कम भर पडावी आणि समाधानाचा झटपट गुणाकार व्हावा. नाईलाज म्हणून असेल किंवा केवळ आवड म्हणून, पण विक्रेत्याचा अवतार, परिसर, भांडी याकडे ढुंकूनही न पाहता एक प्लेट पानीपुरी दो मीडियम तिखा किंवा ऑरेंज गोला दे दो, नमक-निंबू ज्यादा असं बिनधास्त म्हणणाऱ्यांच्या डिक्शनरीत किमान त्या वेळी तरी पौष्टिक, शुद्ध वगैरे शब्दच नसतात.
हेही वाचा : इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार
भेसळीच्या सुरस कथा…
रस्त्यावरच्या प्रत्येक पदार्थाविषयी ते खाणाऱ्या आणि न खाणाऱ्या प्रत्येकाकडे असंख्य सुरस कथा असतात. आपल्याकडे अशा गाड्या, ठेले चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असल्याच्या आविर्भावात प्रत्येकजण त्या सांगत असतो. लस्सीवर ती घट्टं मलई असते ना, तो खरंतर विरघळवलेला बटरपेपर असतो… पावाचं पीठ पायांनी मळतात… बडे रेस्टॉरंटवाले चहा गाळल्यानंतर उरलेली पावडर टपरीवाल्यांना विकतात… फाईव्ह स्टारवाले एकदा वापरलेलं तेल वाडा भजीवाल्यांना विकतात… वडापाव खा, पण हिरवी चटणी घेऊ नका, कारण कोथिंबीर न निवडताच टाकलेली असते… बर्फाचा गोळा, पेप्सी कोला खाल्ला ना की कावीळ होते… यापेक्षाही कहर भीषण दावा म्हणजे उसाचा रस नेहमी विदाऊट आइस घ्यायचा. तो बर्फ शवागारातला असतो म्हणे…
खाणाऱ्यांच्या आणि सांगणाऱ्यांच्या ज्ञानाला आणि कल्पनांना काही मर्यादा नसते. काही दाव्यांमध्ये तथ्य असतं, काही अतिरंजित असतात. वास्तव कदाचित यापेक्षाही भयंकर असू शकतं, याची कल्पना प्रत्येकाला असते, मात्र दृष्टीआड सृष्टी म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण दिवसभराचे २-३ डबे घेऊन फिरणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि स्वस्तात मस्त मजा बहुतेकांना हवीहवीशी वाटते.
हेही वाचा : राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते!
रंग फक्त मंचुरियनमध्येच असतो?
मंचुरियनच्या लाल रंगावरच आक्षेप असेल, तर रस्त्याकडेला मिळणारी चिकन तंदुरी, कबाब, बुर्जी, इंडियन चायनिजच्या गाड्यांवर आजही तुफान विकला जाणारा ट्रिपल शेजवान राईस, चायनीज भेळ, गाडीवरची पाव भाजी यातलं काहीही आठवून पाहा. त्यातला लाल रंग केवळ मसाल्यांमुळे किंवा टोमॅटोमुळे आलेला असतो, यावर स्वयंपाक घरात कधीही पाऊल न ठेवलेली व्यक्तीच विश्वास ठेवेल. एकट्या मंचुरियनवर – अनारोग्यकरक – असा ठपका ठवणाऱ्या अन्न औषध प्रशासनाने इतरही काही गोष्टी तपसाव्यात. पाणीपुरीवाले कुठून पाणी भरतात, तिथे फिल्टर, आरओ असतो का? गेला बाजार नळाला कापडी पिशवी तरी बांधलेली असते का? कोथिंबीर पुदिना किती तास निवडत- धूत बसतात, वड्यांसाठी कोणत्या दर्जाचं तेल, बटाटे, बेसन वापरलं जातं? तेल दिवसाचे किती तास उकळत असतं, वनस्पती तूप म्हणजेच डालडा, पाम तेल किती प्रमाणात वापरलं जातं इत्यादी… पालिकांनी किमान खाऊ गल्ल्यांच्या स्वच्छतेकडे तरी लक्ष द्यावं. विक्रेते आणि ग्राहकांना स्वच्छता राखण्यास भाग पाडावं. स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करावा.
पाकीटबंद पदार्थाचं काय?
एफडीएने स्ट्रीट फुडबद्दल चिंता वाहताना हे ही पाहावं की बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या डबाबंद, पाकीट बंद, टेट्रा पॅकमधल्या रेडी टू कूक पदार्थांतून, चिप्स- बिस्किट्स सारख्या स्नॅक्समधून, बॉडी बिल्डिंगसाठी विकल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडर आणि शेक्समधून किती प्रकारचे आयुष्यभर पाठपुरावा करणारे आजार विकले जातात. त्यात किती प्रमाणात प्रीजर्वेटिव्हज असतात इत्यादी… रस्त्यावरचं, उघड्यावरचं खाऊ नये हे तर इयत्ता पाहिलीपासून शिकवलेलं असतं. त्यामुळे खाणारा सावध असतो. स्वतःच्या जबाबदारीवर तो धोका पत्करत असतो. पण टीव्हीवर बडे स्टार्स, क्रिकेटर्स कोल्ड्रिंक्स, चिप्स खतापिताना पाहून ग्राहक गाफील अवस्थेत आरोग्य बिघडवून घेत राहतो, लहान मुलं सीरिअल्सचे खोके पौष्टिक न्याहरीच्या नावाखाली हा हा म्हणता संपवतात, तेव्हा अन्न व औषध प्रशासनाची काहीच जबाबदारी नसते? की विक्रेता जेवढा मोठा तेवढं अधिक अभय?
हेही वाचा : पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?
स्वीकाराची परंपरा
रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांची एक प्रदीर्घ परंपरा भारतातल्या प्रत्येक राज्याला लाभली आहे. मंचुरियन हा काही त्यातला अविभाज्य घटक वगैरे नाही, हे पूर्ण मान्यच. मंचुरियन, शोर्मा, मोमोज, फ्रँकी ही सगळी त्यात अगदी अलीकडे नव्याने पडलेली भर आहे… अनारोग्याकरक आहे याच्याशीही सहमत… पण वडे समोसे, चाट, दाबेली, दहिवडा, फालुदा, पाव भाजीसुद्धा कधी ना कधी नवखे असेल असतीलच (अनारोग्यकराक तर आजही आहेत). त्यातही सुधारणा होत इथवर पोहोचले असतील. नवं काही उत्सुकतेने आजमावून पाहणं, आवडलं तर स्वीकारणं, आवडलं नाही तर आपल्याकडून काही भर घालत नवनवी रूपं देऊन पाहणं ही आपली खाद्यसंस्कृती आहे. मांचुरियन मधलेही असे अतिघातक जिन्नस वगळून, त्यांना पर्याय शोधून हा पदार्थही उपलब्ध ठेवला पाहिजे…
vj2345@gmail.com