मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर
रामराज्यात वाल्मीकी-वसिष्ठांच्या आश्रमात रामभक्तांनी असा हैदोस घातला असता तर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामानं आपल्याच असल्या भक्तांचं काय केलं असतं? आपल्याच सांस्कृतिक मूल्यांना आपणच पायदळी तुडवत आहोत हे भान राडाखोरांना आणि त्यांच्या पोशिंद्या संघटनांना आहे का? ज्या नाटकावरून एवढा गदारोळ, मोड-तोड-फोड, भावनाप्रचोदन, पुणे विद्यापीठावर आणि विशेषतः ललित कला केंद्रावर चिखलफेक वगैरे सध्या जे घडतंय त्या पार्श्वभूमीवर त्या नाटकात नेमकं काय होतं, काय घडलं असेल, आणि या घटनेचे वेगवेगळे आयाम समजून घेतले गेले पाहिजेत.
डाव्यांचं कारस्थान?
डाव्यांचं कारस्थान वगैरे जे पसरवलं जातंय त्यात सुतराम तथ्य नाही. कारण असं की पुणे विद्यापीठातली प्राध्यापक मंडळी (लेखकासकट) बहुशः आपापल्या विषयांशी आणि विद्येशी इमान राखून आपापल्या वकुबाप्रमाणे, प्रामाणिकपणे, विद्यार्थिहित समोर ठेवून काम करणारी आणि समाजाबद्दल संवेदनशीलता बाळगणारी असली, तरी इतर बाबतीत मध्यममार्गी आणि स्वतःला सांभाळून राहणारीच आहेत. झुंडीचा भाग नसलेली अशी मंडळी सहसा टोकाला जात नाहीत. दुसरीकडे डावे म्हणजे कोण हाही प्रश्नच आहे. डावं याचा कुठलाही अर्थ घेतला तरी त्या विचाराच्या लोकांच्या देशप्रेमात खोट आहे (आणि याचा उजवीकडचा उलट पक्ष : ‘राष्ट्र वगैरे आम्हालाच काय ते कळतं’) असा जो समज पसरलेला दिसतो तोही अपप्रचारातून झालेला गैरसमज आहे.
हेही वाचा : ‘आवाज उठवणाऱ्या’च्या मागेच चौकशीचे शुक्लकाष्ठ!
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर अकराव्या दिवशी ललित कला केंद्रात हे घडलं म्हणून ‘हा जाणीवपूर्वक केलेला डाव्यांचा खोडसाळपणा आहे, हा व्यापक कट आहे, पुणे विद्यापीठ हा डावे आणि नक्षलवादी यांचा अड्डा बनलाय’ अशा प्रकारचा अपप्रचार समाज माध्यमांवर सर्रास आणि क्वचित् जाहीरपणे केला जात आहे. या अपप्रचारात काडीचंही तथ्य नाही. याचं एक कारण वर सांगितलं आहे.
दुसरं कारण असं की अयोध्येतील पारंपरिक पद्धतीनं नृत्यरूपात रामकथा सांगणाऱ्या ‘कथक’ प्रकारचा आविष्कार पिढ्यान् पिढ्या करणारे अयोध्या शरण मिश्रा यांची विशेष प्रस्तुती २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ललित कला केंद्रात झाली. एवढंच नव्हे, १८४३ साली विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या ‘सीतास्वयंवर’ या मराठी आद्य नाटकाचं पुनरुज्जीवन प्रा. प्रवीण भोळे यांनी १९९९ साली ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना घेऊन केलं होतं. १९९९-२००० दरम्यान त्याचे सुमारे ३५ प्रयोगही केले होते. या प्रस्तुतीला आणि प्रा .भोळे यांच्या खटाटोपाला त्या काळी अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी मोठी दाद दिली होती. या नाटकाचं असंं पुनरुज्जीवन करून सादरीकरण करणारे प्रा. भोळे हे एकमेव रंगकर्मी आहेत. अशा अभ्यासू व्यक्तीला आज मीडिया ट्रायलमधे डावं, राष्ट्रद्रोही वगैरे ठरवलं जात आहे आणि अर्वाच्च्य भाषेत त्यांच्याबद्दल समाज माध्यमांवर लिहिलं बोललं जात आहे, हा दैवदुर्विलास आहे.
ललित कला केंद्राचा विद्यार्थिवर्ग
ललित कला केंद्राच्या नाटकविषयक अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेचा / मूल्यांकनाचा भाग म्हणून हे नाटक (नाटक कसलं, स्किट) विद्यार्थ्यांनी लिहून विद्यार्थ्यांनी सादर करू घातलं होतं. हे विद्यार्थी पदवीपूर्व वयातले म्हणजे १८-२१ वयोगटातले आहेत. विद्यापीठात बहुजन-अभिजन सर्व वर्गांमधून आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून विद्यार्थी येतात. या वयातल्या विद्यार्थ्यांची स्वाभाविक अपरिपक्वता, भाबडेपणा, बेफिकिरी, दिलदारी, उमदेपणा, बावळटपणा, अर्ध्या-कच्च्या सामाजिक-राजकीय जाणिवा-समजा, आणि औचित्यविचार बाजूला ठेवून बेधडक गोष्टी करवू शकणारी या वयातली प्रचंड ऊर्जा-उत्साह हे सगळे आयाम समाजातला प्रौढ-समझदार-परिपक्व वर्ग, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संघटना, पत्रकार आणि प्रशासन-पोलीस यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता, सामाजिक आर्थिक शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमी, आणि उर्मी (मोटिवेशन) यांमध्ये जे कमी-जास्त समाजात सगळीकडेच दिसतं तेच पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसवरही दिसतं.
हेही वाचा : विजय थलपती तमिळ राजकारणाचे हिरो होतील का?
नाटकाची संहिता
वादग्रस्त नाटकाची संहिता सध्या वॉट्सपवर फिरते आहे असं ‘फॉरवर्डेड मेनी टाइम्स’ या शीर्षकावरून दिसतं. नाटकात नाटक असा या संहितेचा फॉर्म दिसतो. नाटकातल्या नाटकात काम करणाऱ्या नटांमधला दोन प्रयोगांच्या मधला विंगेतला संवाद हा या नाटकाचा विषय आहे. दशावतारी, वग किंवा उत्तरेतल्या नौटंकीची प्रहसनात्मक लोकशैली अपेक्षित आहे असं वाटतं. नाटकातल्या न घडलेल्या नाटकातली पात्रं रामायणातली असली तरी संवाद त्या पात्रांच्या मानवी नटांमधले आहेत, दाखवलेल्या भावभावना आणि प्रसंग त्या मानवी नटमंडळींच्या आहेत. संहितेचा शेवट कॉमिक आणि सकारात्मक वाटतो: म्हणजे राम ही व्यक्तिरेखा सादर करणारा, पळून जाऊ घातलेला नट परत येतो आणि रावण ही व्यक्तिरेखा सादर करणारा नट पळून जाऊ घातला आहे असं सूचित करून ही संहिता संपते. हीच संहिता सादर केली गेली असती, का हे कळायला आता मार्ग नाही, कारण नाटक मुळात पूर्ण सादर करू दिलं गेलंच नाही.
औचित्याचा प्रश्न: नाटकाची संहिता
नाटक सादर करू दिलं गेलं असतं तर ज्यांनी चार संवादांनंतरच तिथे राडा घातला त्यांच्याही कदाचित लक्षात आलं असतं की नाटकात आक्षेपार्ह काही नव्हतं आणि नंतर कॅंटीनमधे चहा-वडापाव-मिरच्यांवर ताव मारताना तितकीच गरमागरम भांडण-चर्चा होऊन दिलजमाई-मनोमीलन वगैरे होऊन हा विषय संपला असता.
चारदोन ठिकाणी संहितेत शिव्या आल्या आहेत हे खरं आहे. त्यापेक्षाही असभ्य समजल्या जाणाऱ्या शिव्यांचा मुक्त वापर असलेले नाटक-सिनेमे-मालिका यांची कमतरता ना प्रायोगिक रंगभूमीवर/सिनेमात आहे ना व्यावसायिक. या नाटकाच्या चौकटीत शिव्यांची गरज किंवा औचित्य काय हा प्रश्न अभ्यासाचा भाग म्हणून नक्कीच विचारला जायला हवा. पण शिव्यांच्या वापराबद्दल तक्रार करणारे आणि तथाकथित संस्कृतिरक्षक तरी साधेसरळ आणि सदासौजन्यशील आहेत का हा प्रश्न राहतो. मुद्दा हा आहे की ‘पहिला दगड त्यानं उचलावा, ज्यानं कधीही कुठलंही पाप केलेलं नाही, जो निष्कलंक आहे…’
दुसरा आक्षेप सीता आणि लक्ष्मण या व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या नटांनी एकमेकांना मिठी मारली, आणि सीतेची नट व्यक्तिरेखा सादर करणारा नट सिगरेट ओढताना दाखवला यावर घेतला जातो आहे. मिठी सीता आणि लक्ष्मण या व्यक्तिरेखांनी मारलेली नाही, त्या त्या व्यक्तिरेखांचे नट त्यांच्या त्यांच्या भूमिकांच्या बाहेर असताना हे घडलं असं दाखवलं आहे. हेच सिगरेट आणि शिव्यांबद्दल. इथे शब्दच्छलाचा आरोप होऊ शकतो, पण संहिता काळजीपूर्वक वाचली तर नाटक-अभिनयाबाहेरच्या वाचकालाही हे स्पष्ट दिसेल.
हेही वाचा : पंजाबी, बंगाली, मराठी, कानडी… सगळेच एकमेकांना ‘चले जाव’ म्हणू लागले तर या देशाचं काय होईल?
तिसरा आक्षेप/आरोप अश्लीलतेचा आहे. ‘लैंगिक संदर्भ आणि भाषा यांचा वापर’ या अर्थी अश्लीलता संहितेत कुठेही नाही. आणि अश्लीलतेचा आरोप करायचा झाला तर निम्मे अधिक संस्कृत कवी आणि त्यांचा कुलगुरू कालिदास यांना थेट गजाआडच करावं लागेल. तेव्हा अश्लीलतेच्या आरोपात काहीच दम नाही.
व्हॉट्सअप चर्चांमधला आणखी एक सूर असा दिसला की सर्जकता आणि बोल्डनेस सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करावं का? हा मुद्दा प्रायोगिक/व्यावसायिक रंगभूमी/सिनेमा आणि एकूणच कलाव्यवहाराच्या संदर्भात योग्यच आहे. इथल्या संदर्भात गरजेपेक्षा जास्त अर्थ काढून पराचा कावळा करू नये, कारण मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार वगैरे चर्चेत न्यावी या लायकीचीच ही संहिता नाही. तिचा तसा उद्देशही नाही आणि कुणाच्या धर्मभावना दुखावण्याचा हेतूही तीत दिसत नाही.
आक्षेप आणि आरोप बाजूला ठेवून स्वतंत्रपणे संहितेकडे बघितलं तर काय दिसतं? एक- थोडं फार वाचन असलेला आणि चार नाटकं, सिनेमे प्रेमानं बघितलेला वाचक-प्रेक्षक आणि गेली २० वर्षं पुणे विद्यापीठात अनेक विद्यार्थी पाहिलेला एक शिक्षक या भूमिकेतून मला ही संहिता सामान्य वाटली. हे त्या विद्यार्थ्यांवरचं जजमेंट नाही आणि ललित कला केंद्रावरचं भाष्यबिष्य तर अजिबात नाही. विद्यार्थी वाढीच्या एका टप्प्यावर आहेत, त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. या प्रक्रियेत त्यांना प्रयोगांबरोबरच चुकाही करण्याची पूर्ण मुभा हवी. चुका झाल्या तर त्यांना योग्य ती दिशा दाखवायला त्यांचे शिक्षक समर्थ आहेत. मुलं आहेत, आपलीच मुलं आहेत, त्यांच्या हातून चुका घडल्या तरी मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ, मोडतोड (विशेषतः सार्वजनिक ठिकाणांची), पोलीस, कोर्टकचेऱ्या, कोठडी असलं काही मागे लावून न देण्याची परिपक्वता (आणि थोडीशी तरी विनोदबुद्धी) सगळ्याच समाजानं दाखवावी, आणि अशा घटनांचं राजकीय भांडवल न करण्याचा समंजसपणा आणि उमदेपणा सर्व राजकारणी आणि त्यांचे पक्ष-संघटना यांनी दाखवावा एवढी किमान अपेक्षा आहे. कुटुंब हा जसा मुलांसाठी धडपडत चुका करत शिकण्यासाठीचा सुरक्षित अवकाश असतो तसंच कुठलंही विद्यापीठ हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक वाढीसाठीचा सुरक्षित अवकाशच असला पाहिजे.
औचित्याचा प्रश्न: शुक्रवारचा राडा आणि शनिवारची तोडफोड
नाटकात टोकाचं आक्षेपार्ह काही होतं असं जरी मानलं तरी कुठल्याही, विशेषतः सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, मारहाण, शिवीगाळ समर्थनीय आहे का? तसं करणाऱ्यांना कुणाचीच जरब नसते असंच सगळीकडे का दिसतं? यावर उपाय काय?
स्त्री आणि गुरू यांना देवतासमान मानणाऱ्या उदात्त हिंदुसंस्कृतीचे कैवारी म्हणवणारे रामभक्तच ललित कला केंद्राच्या एका विद्यार्थिनीचा खांदा-मान तुडवून स्टेजवर घुसले, त्यांनी नटमंडळी आणि गुरुवर्य प्रा. प्रवीण भोळे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली आणि तीही ललित कला केंद्रासारख्या आश्रमतुल्य विभागात राडा घालून, ही आयरनी कोणी लक्षात घेतली आहे का? मारहाणीत विद्यार्थ्यांना दुखापत झाली, अनेक विद्यार्थिनींना धक्काबुक्कीत लागलं आहे. इथे गीतरामायणातल्या विश्वामित्राच्या ‘वेदीवर रक्त मांस / फेकतात ते नृशंस / नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता’ या ओळी आठवतात. एवढंच नव्हे तर वसतिगृहामधे ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना ठरवून लक्ष्य केलं जातंय म्हणून बहुतांश विद्यार्थी घरी गेले आहेत आणि केंद्राचं कामकाज ठप्प झालं आहे. या सगळ्याचं इतर विभागांच्या विद्यार्थ्यांवरही दडपण आहे. रामराज्यात वाल्मीकी-वसिष्ठांच्या आश्रमात रामभक्तांनी असा हैदोस घातला असता तर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामानं आपल्याच असल्या भक्तांचं काय केलं असतं? आपल्याच सांस्कृतिक मूल्यांना आपणच पायदळी तुडवत आहोत हे भान राडाखोरांना आणि त्यांच्या पोशिंद्या संघटनांना आहे का? या मुजोरीला आवरायची वेळ आली आहे.
हेही वाचा : बिग बॉस जिंकणाऱ्या मुनव्वरला एवढी मतं दिली तरी कोणी?
विद्यापीठाची भूमिका?
एक संस्था म्हणून काय काय करू नये याचा आदर्श वस्तुपाठच विद्यापीठानं या प्रकरणात घालून दिला आहे.
एक- शुक्रवार आणि शनिवार दोन्ही घटनांमधे विद्यापीठ सुरक्षा प्रमुखांची नेमकी काय भूमिका होती? शनिवारी तर पोलीस आणि सुरक्षा विभाग निवांत उभं राहून ललित कला केंद्राची तोडफोड बघत होता. असं का घडलं असेल?
दोन- परीक्षा हा विद्यापीठाच्या कामाचा अधिकृत भाग आहे. शुक्रवारची घटना परीक्षा होत असताना म्हणजे ऑन-ड्यूटी घडली. राडाखोरांविरुद्ध तक्रार नोंदवणं आणि अशा इतर अधिकृत कामांची जबाबदारी तांत्रिकदृष्ट्या विद्यापीठ प्रशासनावर आहे. हा शिरस्ता पाळला गेला नाही, कारण प्रा. प्रवीण भोळे यांनाच ‘तुम्हीच जाऊन तक्रार नोंदवा’ असं तोंडी सांगण्यात आलं आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायचं नाकारलं. दुसरीकडे कुणाच्या तरी तक्रारीवरून प्रा. भोळे तसेच विद्यार्थ्यांना परस्पर अटक करण्यात आली. म्हणजे चोराला सोडून संन्याशाला सुळी. अशी परस्पर अटक विद्यापीठाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. विद्यापीठानं पोलिसांना तशी लेखी संमती अटक होण्याआधी दिली होती का? एका कमिटेड शिक्षकाची किंमत ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणवून घेणाऱ्या आमच्या कॉलरताठ विद्यापीठाच्या लेखी पायपुसण्याएवढीच आहे का? अवघड परिस्थितीत विद्यापीठ आपल्याच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही, त्यांची फिकीर करत नाही, हात झटकून मोकळं होतं असा समजायचं का? विद्यापीठ आपल्याच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इतकं बेफिकीर आणि ढिसाळ राहणार असेल तर कुठला विभागप्रमुख, प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी जबाबदारी घ्यायला तयार होईल? विद्यापीठाच्या या बेफिकिरीचा पुढच्या वर्षीचे प्रवेश आणि रॅंकिंगवर परिणाम होणार आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी.
तीन- राजकीय आणि विद्यार्थी संघटनांमधून व्यवस्थापन परिषदेत गेलेल्या धुरीणांनी तरी शनिवारचा हल्ला थांबवण्यासाठी काही केलं का? ज्याचं व्यवस्थापन करतायत त्या विद्यापीठाशी किमान एवढी तरी बांधिलकी दाखवावी ही अपेक्षा गैर आहे का?
चार- या प्रकरणात आणखी एक चरचरीत आयरनी आहे. सीता निष्कलंक आणि निष्पाप असूनही जसं तिलाच अग्निदिव्य करून आपलं पातिव्रत्य सिद्ध करावं लागलं, तसाच प्रकार इथे प्रा भोळे, विद्यार्थी आणि ललित कला केंद्राच्या बाबतीत घडत आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळावी म्हणून कोण उभं राहिलं? प्रा भोळे स्वतः, विद्यापीठ नव्हे. तक्रार नोंदवायला कुठलाही प्रोटोकॉल न पाळता कुणाला पाठवलं गेलं? प्रा भोळे यांना. ही मेडिको लीगल केस असताना विद्यापीठाकडून प्रशासकीय आणि लॉजिस्टिक सपोर्ट किती होता? एक मोठं शून्य. ‘कारणे दाखवा’ नोटीस कुणावर बजावली गेली आहे? प्रा भोळ्यांवर. विद्यापीठ कुणासाठी आहे? तत्त्वत: विद्या आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी, विद्या, शिक्षण, संशोधन, विद्वत्ता आणि प्राध्यापक हा विद्यापीठाच्या लेखी सायडिंगला टाकलेला डबा किंवा ऑप्शनला टाकलेला विषय आहे का? कोणास ठाऊक.
हेही वाचा : महाराष्ट्राचे राजकीय अधःपतन चिंताजनक!
खरं तर प्रा. भोळे आणि अटक झालेले विद्यार्थी या सर्वांचा आत्ताच्या पोलीस प्रकरणाचा सर्व आर्थिक आणि प्रशासकीय भार विद्यापीठानं घ्यायला हवा. ललित कला केंद्राचे विद्यार्थी, विशेषतः त्या नाटकाशी संबद्ध, यांना शॉकमधून बाहेर येण्यासाठी समुपदेशनाची गरज असू शकते. त्याची व्यवस्था आणि खर्च करून विद्यापीठ काही संवेदनशीलता आणि माणुसकी दाखवेल का? शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सगळ्यांनाच तातडीनं आश्वस्त करणं गरजेचं आहे. कॅम्पसवरचं नासलेलं वातावरण निवळणं गरजेचं आहे, शैक्षणिक वातावरण पुन्हा मोकळं आणि कामकाज सुरळीत करणं गरजेचं आहे. कुलगुरूही मोठ्या दडपणाखाली असावेत. तरीही त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी मोकळेपणानं बोलावं, पदाच्या आणि औपचारिकतेच्या बाहेर येऊन संवाद उभा करावा, कारण तेही आमच्यातलेच एक आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक आणि प्रामाणिक हात पुढे आला तर सर्व कॅम्पस या प्रसंगात त्यांच्याबरोबर उभा राहील अशी खात्री वाटते.
शिक्षण, संघटना आणि राजकारणी
२००५ मधला भांडारकर संस्थेवरचा हल्ला आणि आत्ताचा नाटकाच्या दुसऱ्या दिवशी झालेली ललित कला केंद्राची तोडफोड यांमध्ये एक मोठं साम्य आहे. दोन्ही घटना निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या आहेत. आपाततः सुनियोजितही असाव्यात. आताही राजकीय भांडवल करणं चालू आहे का? त्यात कुणाचा, कसा आणि काय फायदा आहे, ज्यानं त्यानं या प्रश्नांची उत्तरं शोधावीत.
हेही वाचा : रामकृष्णबाब!
मायबाप राजकारणी आणि विद्यार्थी संघटना वगैरे यांना हात जोडून नम्र विनंती एवढीच की राष्ट्राची पुढची पिढी घडवायचं वगैरे काम आम्ही शिक्षक मंडळी आपापल्या वकुबानुसार पण प्रामाणिकपणानं आणि ‘दीक्षित तो नित्य क्षमी’ (गीतरामायण) या निष्ठेने करत आहोत; शाळा-महाविद्यालयं-विद्यापीठं-शिक्षण-विद्यार्थी यांना तुमच्या राजकारणातली सोयिस्कर प्यादी आणि तात्कालिक राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या चुलीतली लाकडं म्हणून वापरू नका. तुमचं सत्तेसाठीचं वगैरे राजकारण शिक्षणाच्या बाहेरच ठेवा. शिक्षणसंबद्ध खरे प्रश्न मुळातून समजून घेऊन त्यावर खरे उपाय शोधण्यात खरा रस असला तरच या. तसे आलात तर तुमचं मनापासून स्वागतच आहे. आम्ही हे प्रश्न एकट्यानं सोडवू शकत नाही. पोटतिडिकीनं काम करणाऱ्या शिक्षकांचं काम आणि चांगले चाललेले विभाग धुडगूस घालून बंद पाडण्याचा उन्माद आणि कर्मदरिद्रीपणा कृपा करून करू नका.
(या लेखातलं विश्लेषण आणि मतं लेखकाची वैयक्तिक आहेत; त्यांचा पुणे विद्यापीठ आणि तिथला त्याचा विभाग यांच्याशी संबंध नाही. सहकाऱ्यांशी आणि मित्रमंडळींशी ((सगळ्या पाती: आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी, समाजवादी, उदारमतवादी)) झालेल्या चर्चांमुळे स्पष्टता यायला मदत झाली.
mihir.arjunwadkar@gmail.com