अ. पां. देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह

भारतात खासगी टीव्ही वाहिन्यांना वाट देणारे, ‘एटीएम’ यंत्रांची निर्मिती प्रथमच सुरू करणारे, संशोधक उद्योजक प्रभाकर देवधर यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्सविषयक धोरणाला कलाटणी देऊन निर्यात दहापट वाढविण्यास हातभार लावला. आपण भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स कमिशनचे अध्यक्ष असताना आपल्या कारखान्याने सरकारची एकही ऑर्डर स्वीकारू नये हा दंडक त्यांनी स्वतच घालून दिला आणि पाळलाही..

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

प्रभाकर देवधर गेले.. किती नावांनी ते ओळखले जात? राजीव गांधी त्यांना प्रभू देवधर म्हणून पुकारायचे. उद्योग जगतात ते पी. एस. देवधर होते. मित्रमंडळी त्यांना प्रभाकर देवधर म्हणायचे तर घरी ते सगळय़ांचे आण्णा होते.

देवधरांचा जन्म २५ सप्टेंबर १९३४ रोजी पुण्यात झाला. ते पुण्याच्या प्रख्यात नूतन मराठी विद्यालयाचे १९५२ सालचे एसएससी आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर होते. वडील दंतवैद्य असल्याने सर्व उपकरणे घरात होती व ती सर्व ते शाळेत असल्यापासून वापरू लागले होते! सुरुवातीला काही काळ ते ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’च्या वैद्यकीय उपकरणे विकसित करण्याच्या गटात होते. पण लवकरच त्यांनी स्वत:ची ‘अ‍ॅपलॅब इंडस्ट्री’ काढली आणि ६४ वर्षे चालवली. या काळात त्यांनी ६५० उपकरणे विकसित करून कारखान्यात बनवली आणि भारतातच नव्हे तर चीनसहित अनेक देशांत विकली. १९८० ते २०१५ या काळात त्यांनी शंभर वेळा व्यवसायानिमित चीनला भेटी दिल्या आणि २०२० साली चीनवर ‘सिनास्थान’ हे पुस्तक मराठी व इंग्रजीत लिहिले.

हेही वाचा >>>पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

 एटीएम : कंपनीतले आणि दादरचे..

१९६८ साली त्यांनी दादरच्या महाराष्ट्र बँकेसाठी पहिले ‘एटीएम मशीन’ बनवून दिले. त्यांचे सर्व प्रॉडक्ट्स उत्तम विकले जात असतानाही ते आणखी बनवण्यासाठी २-४ कारखाने काढून आपला व्यवसाय २०० कोटीवरून हजार कोटी करण्यात त्यांना रस नव्हता. तर ते नवीन वस्तू विकसित करण्याच्या मागे लागत. त्या अर्थाने ते संशोधक उद्योगपती होते. त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल मोजणारे उपकरण बनवले. शाळा-महाविद्यालयांच्या प्रयोगशाळांना लागणारी कॅथोड रे ऑसिलोग्राफ, रिहोस्टॅटसारखी अनेक उपकरणे तयार केली. ती अनेक वर्षे इंग्लंडमध्ये विकली. एकदा ते आणि मी सोलापूरला गेलो असता तेथील दयानंद महाविद्यालयाला भेट दिली होती. जेव्हा तेथील विज्ञानाच्या प्राध्यापकांना मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर देवधर हे अ‍ॅपलॅब इंडस्ट्रीचे मालक आहेत असे समजले, तेव्हा ते प्राध्यापक म्हणाले होते : तुमची उपकरणे एवढी भक्कम आहेत की, आम्हाला गेल्या २०-२५ वर्षांत काहीही दुरुस्ती करावी लागली नाही!

देवधरांनी ५५ वर्षे कारखाना चालवला आणि आता त्यांचा मुलगा तो चालवतो. पण देवधरांच्या ५५ वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही कारखान्यात संप झाला नव्हता. ते या कंपनीचे अध्यक्ष होते, पण आपल्या केबिनमध्ये बसून कारभार पाहणारे नव्हते, तर शॉप फ्लोअरवर कामगारांत मिसळून आपली वस्तू कामगारांच्या बरोबरीने विकसित करणारे होते. कामगारांपैकी कोणी त्यात एखादी चांगली गोष्ट सुचवली तर ती ते मान्य करून अमलात आणत असत. त्या अर्थाने कामगारांत मिसळणारा हा दुर्लभ मालक होता. कामगारांना पगार मिळाला की तो लगेच खर्च करायची प्रवृत्ती असते आणि मग महिन्याच्या २० तारखेला त्यांना कडकी लागते. मग ते कापड गिरणी कामगारांच्या भाषेत खर्ची (अ‍ॅडव्हान्स) मागायला येतात. त्यासाठी त्यांना फॉर्म भरावा लागतो, खात्याच्या सुपरवायझरची सही घ्यावी लागते. हिशेब खात्याला तो अर्ज द्यावा लागतो व मग एक-दोन दिवसांनी खर्ची मिळते. त्यावर देवधरांनी आपल्या कारखान्यात सन्मान्य तोडगा काढला होता. त्यांनी कामगारांसाठी एक एटीएम मशीन बसवून त्यावर लिहिले होते, ‘यू कॅन ड्रॉ युवर सॅलरी एनी टाइम’. त्यामुळे कामगारांना कोणापुढे हांजी हांजी करावी लागत नसे व पुढच्या महिन्याच्या पगारातून तेवढी रक्कम आपोआप कापली जात असे.

हेही वाचा >>>राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते!

..आणि निर्यात वाढली

राजीव गांधी एअर इंडियात पायलट असताना इंग्लंड-मुंबई एक फेरी झाल्यावर त्यांना मुंबईत एक दिवस सुट्टी मिळत असे. त्यांना इलेक्ट्रॉनिक्सची आवड असल्याने ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये फिरत असत आणि तेथील एक व्यापारी मनुभाई देसाई यांना आपल्या इलेक्ट्रॉनिक्समधील शंका विचारत असत. मग मनुभाई एकदा राजीव गांधींना म्हणाले, ‘तुमच्या शंकांचे निरसन मी करू शकत नाही. तुम्ही प्रभाकर देवधर यांना भेटा’. मग ते देवधरांना भेटायला अ‍ॅपलॅब इंडस्ट्रीत जाऊ लागले.

असे काही वर्षे झाले. दरम्यान, संजय गांधी यांचा विमान अपघात झाल्यावर इंदिरा गांधींनी राजीव गांधींना नोकरी सोडून त्यांना मदत करायला सांगितले. ते त्यांनी नाइलाजाने स्वीकारले. इंदिरा गांधींना रोज शेकडो पत्रे खासगीत येत व त्यातील बरीच तंत्रज्ञानविषयक असत. त्याची उत्तरे राजीव गांधींना देता येत नसत. मग ते एक दिवस देवधरांना म्हणाले, ‘प्रभू, तुम्ही इथे दिल्लीत येऊन राहा’. देवधर म्हणाले, ‘इथे माझा कारखाना आहे. मी नाही येणार’. पण राजीव खूप मागे लागल्यावर देवधर दर शनिवार-रविवारी दिल्लीत जाऊन राजीवना मदत करू लागले.

असेच एक दिवस काम चालू असता, त्या दालनातून इंदिरा गांधी जात असताना राजीव आपल्या आईला म्हणाले, ‘हे प्रभू देवधर तुझ्या इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसीवर टीका करीत आहेत.’ तेव्हा इंदिरा गांधींनी ‘काय टीका आहे’ असे विचारताच देवधर म्हणाले, ‘तुम्हाला जेव्हा तासभर वेळ असेल तेव्हा मी सांगतो.’ ते ऐकल्यावर इंदिरा गांधी देवधरांच्या समोर बसल्या व म्हणाल्या, मला आत्ता वेळ आहे, सांगा. मग देवधरांनी सुधारणा सुचवल्या व त्या अमलात आणल्याने पुढील पाच वर्षांत आपली निर्यात दहा पटींनी वाढेल असे सांगितले, त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘हे तुम्ही मला लिहून द्या.’ देवधरांनी काही केले नाही, कारण त्यांना माहीत होते की, हे राजकारणी लोक तोंडदेखले बोलतात. पण एक महिन्याने इंदिरा गांधींचे सेक्रेटरी गोपी अरोरा यांचा देवधरांना फोन आला की, ‘तुम्ही मॅडमला काही अशुअर केले होते, त्या त्याची वाट पाहात आहेत.’ मग देवधरांनी पॉलिसी लिहून पाठवली. ती इंदिरा गांधींनी १९८४ मध्ये अमलात आणली. देवधर म्हणाले त्याप्रमाणे भारताची इलेक्ट्रॉनिक्समधली निर्यात दहा पटीने वाढली. पण ते बघायला इंदिरा गांधी हयात नव्हत्या. सॅम पित्रोदा आपली अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून भारतात येऊन सरकारला मदत करू इच्छित होते, त्यात त्यांचा काय हेतू आहे हे जाणून घेण्यासाठी इंदिरा गांधींनी देवधरांना अमेरिकेत पाठवले होते. ‘देवधर समिती’ने सुचवल्याप्रमाणे १९९२ साली भारतात अनेक खासगी वाहिन्यांना टीव्ही सुरू करण्याची परवानगी मिळाली होती!

हेही वाचा >>>‘आवाज उठवणाऱ्या’च्या मागेच चौकशीचे शुक्लकाष्ठ!

सचोटी आणि साधेपणा

पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देवधरांना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स कमिशनचे अध्यक्ष केले, पण सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचे बरेच अधिकार कमी केल्याने ते तिथे कंटाळले होते. त्याच काळात त्यांनी ‘कॅपिटल पनिशमेंट’ हा कविता संग्रह लिहिला. त्या वेळी त्यांनी या पदाचे मानधन म्हणून दरमहा एक रुपया घेतला व त्यांच्या या दिल्लीच्या मुक्कामात त्यांचा कारखाना पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले होते की, मी तिथे असेपर्यंत सरकारची एकही ऑर्डर घ्यायची नाही.

‘त्या वेळी तुम्ही राजीव गांधी यांच्या इतक्या जवळचे असताना तुम्हाला एकही पद्म पुरस्कार कसा नाही?’ असे मी विचारल्यावर देवधर म्हणाले, ‘मी तो मागितला पाहिजे होता ना?’ आणि ‘तो मिळाल्याने काय होते हो?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी मलाच विचारला. देवधर २००० ते २०१४ या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते व नंतर २०१४ ते मृत्यूपर्यंत परिषदेचे विश्वस्त होते. करोनाकाळात दोन वर्षे घरी बसावे लागल्याने देवधरांची प्रकृती बिघडू लागली. वजन ३२ किलोने कमी झाले. अखेर २७ जानेवारीला वयाच्या ८९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.