उपेन्द्र कौल
डायबेटिसच्या- अर्थात मधुमेहाच्या रुग्णांना जी औषधं सांगितली जातात, त्यांमध्ये ‘रसायनं’ असतात आणि म्हणून ही औषधं ‘घातक’ आहेत, असा प्रचार करणाऱ्या जाहिरातींचा सध्या सुळसुळाट आहे. मधुमेहापासून तुमची सुटका करू पाहाणाऱ्या कितीतरी ‘डायबेटिस रिव्हर्सल प्रोग्राम’च्या जाहिरातींचा भडिमार इंटरनेटवरून सुरू असतो, काही चित्रवाणी वाहिन्यासुद्धा ‘तज्ज्ञ डॉक्टरां’च्या मुलाखतीच्या नावाखाली जाहिरातच दाखवत असतात. मधुमेहावरल्या औषधांचा दुष्परिणा मूत्रपिंडांवर, यकृतावर, हृदयावर होतो असा या प्रचाराचा रोख असतो. ‘माझा डायबेटिस पूर्णपणे नाहीसा झाला’ असं सांगणाऱ्या स्त्रीपुरुषांना या जाहिरातींमध्ये ‘पेशंट’ म्हणून पेश केलं जातं, त्यामुळे या जाहिरातीत तथ्य असल्याचं कुणालाही वाटू शकतं. पण खरंच तसं आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तो प्रचार खरा असता आणि मग त्यामुळे भारतातल्या मधुमेहाचं निदान झालेल्या एकंदर दहा कोटी दहा लाख रुग्णांना ‘कायमचा सुटकारा’ मिळाला असता, तर बरंच आहे की! पण तसं होत नाही. या तथाकथित उपचारातून ‘सुटका’ वगैरे मिळण्याऐवजी आरोग्यावर भलताच परिणाम- अगदी गंभीर परिणामसुद्धा- होऊ शकतो.

आणखी वाचा-लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?

तो कसा काय, हे पाहण्याआधी एक मान्य करूया की, ‘वजन आटोक्यात ठेवा’, ‘नियमित व्यायाम करा’, कार्बोहायड्रेट कमी खा आणि त्याऐवजी ताज्या भाज्या किंवा फळं खा, चिडचिड करू नका/ उदास राहू नका इत्यादी सल्ले तर डायबेटिसचे कोणतेही डॉक्टर पूर्वापार देतच होते- त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही. पण केवळ या प्रकारे, जीवनशैली बदलल्यामुळे डायबेटिस ‘कायमचा बरा होणार’ वगैरे काही नाही… तुम्हाला औैषधं घ्यावीच लागणार, असं डॉक्टरमंडळी का सांगतात?

कारण, सुमारे साठ टक्के रुग्णांमधलं ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन (HbA1c) म्हणजे रक्तातल्या ग्लूकोजचे प्रमाण या जीवनशैली-नियंत्रणानंतरही वाढत राहू शकतं म्हणून त्यांना औषधांनीच ते आटोक्यात ठेवावं लागतं. अर्थातच, ही औषधं प्रमाणित असायला हवी आणि मुख्यत: त्यांनी रक्ताभिसरणावर,पर्यायाने हृदयावर, मूत्रपिंडांवर दुष्परिणाम होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. तरीदेखील वर्षानुवर्षे डायबेटिसचा सामना करावा लागणाऱ्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणं, हा धोका काही प्रमाणात राहातो. शिवाय मधुमेहींना अधू दृष्टी, व्रण, गँगरीन यांपासून जपावं लागतंच.

त्यामुळे औषधं सुरक्षित असण्याची गरज तर आणखीच वाढते. अनेक मधुमेहींच्या रक्ताभिसरणावर, किंवा मूत्रविसर्जन संस्थेवर परिणाम झालेला असू शकतो, त्यांच्यासाठी आणखी प्रगत औषधं हवीतच. इन्शुलीनचा शोध १०३ वर्षांपूर्वी- १९२१ मध्ये लागला, त्यामुळे पुढल्या काळात रुग्णांच्या रक्तशर्करेचं नियमन मधुमेहाचा शरीरातला फैलाव तर आटोक्यात आणता आला. पण अखेर इन्शुलीन हे प्रथिन आहे आणि ते इंजेक्शनच्या स्वरूपातच घ्यावं लागतं. या इन्शुलीन इंजेक्शनचेही बरेच प्रकार आजघडीला उपलब्ध आहेत. ‘टाइप-वन डायबेटिस’मध्ये रुग्णाच्या स्वादुपिंडात इन्शुलिन तयारच होत नाही किंवा अगदी कमी तयार होतं, त्यांना इन्शुलीनची इंजेक्शनं घ्यावीच लागतात आणि ती आयुष्यभर थांबवता येत नाहीत.

आणखी वाचा-जागतिक हवामानाबद्दल आपण सजग रहायला हवे, कारण…

‘टाइप-टू डायबेटिस’ मात्र प्रौढपणीच – तोही इन्शुलीनच्या कमतरतेमुळे होणारा असतो आणि सहसा तो कुटुंबात मधुमेहाच्या आनुवंशिक आढळामुळे आणि लठ्ठपणामुळे होतो. अशा व्यक्तींना इन्शुलीनखेरीज, रक्ताभिसरण योग्य ठेवण्यासाठीसुद्धा औषधं घ्यावी लागतात. ही ‘कारक घटकां’सारखी औषधं असतात. ती नियमित घेतली तर इन्शुलीन बाहेरून घेण्याची गरज (‘टाइप-टू डायबेटिस’ पुरतीच) उरत नाही. कारण या औषधांचं कार्यच विविध प्रकारे चालतं : (१) याकारक औषधांमुळे स्वादुपिंडात इन्शुलीन तयार होण्याची क्षमता वाढते; (२) परिणामी यकृतातून शर्करा तयार होण्याची आणि ती रक्तात मिसळण्याची भीती कमी होते ; (३) कर्बोदकं अर्थात कार्बोहायड्रेट्सचं योग्य प्रमाणात विभाजन करणाऱ्या विकरांना (एन्झाइम्सना) ही औषधं चालना देतात, त्यामुळे कर्बोदकसाठ्याचा धोका कमी होतो; (४) पेशींची इन्शुलीन-संवेद्यता सुधारते; (५) रक्तातून शर्करा विलग करून, ती मूत्रपिंडांमार्फत लघवीवाटे वाहून नेण्याचं काम योग्यरीत्या होऊ लागतं; (६) चयापचय क्रियेचा वेग योग्य प्रमाणात राहिल्यामुळे पचनाला पुन्हा पुरेसा वेळ मिळू लागतो आणि वारंवार भूक लागण्याचं प्रमाणही या औषधांच्या परिणामी कमी होतं.

याखेरीज अशीही औषधं आहेत ज्यांच्यामुळे रक्तातल्या (HbA1c) ग्लूकोजचं प्रमाण तर सुमारे एक टक्क्यानं कमी होतंच पण त्या औषधांमधल्या कारक घटकांमुळे अन्य लाभही होतात. ही औषधं दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकाराला ‘एसजीएलटी टू’, तर दुसऱ्या प्रकाराला ‘जीएलपी वन’ असं म्हटलं जातं. पण या औषधांचं काम कसं चालतं?

‘एसजीएलटी टू’ म्हणजे सोडियम ग्लूकोज कोट्रान्सपोर्टर-२ या प्रकारातली आणि संदमक (इन्हिबिटर्स) म्हणून काम करणारी रासायनिक द्रव्यं. यात कॅनाग्लिफ्लोझिन, डॅपाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन आणि एर्टूग्लिफ्लोझिन यांचा समावेश असतो. ही द्रव्यं, हृदयविकाराचा धोका असलेल्या किंवा असू शकणाऱ्या मधुमेहींना लाभकारक ठरतात, मूत्रपिंडांनाही ती उपकारक असल्यामुळे ‘डायबेटिक किडनी डिसीझ’ पासून बचाव होतो आणि अल्प प्रमाणात का होईना पण वजन आणि रक्तदाब यांच्या वाढीला ही द्रव्यं अटकाव करतात. रक्तातली शर्करा या द्रव्यांच्या परिणामी लघवीवाटे निघून जात असल्यामुळे, ही औषधं सर्रास सर्व ‘टाइप- टू’ मधुमेहींना सुचवली जातात पण जर एखाद्या रुग्णाला मूत्रमार्गामध्ये किंवा लघवीच्या जागी इन्फेक्शन असेल, तर मात्र ही औषधं टाळणं योग्य ठरतं.

आणखी वाचा-कोणी, कोणाला, किती आणि का दिले?

‘जीएलपी वन’ म्हणजे ‘ग्लूकागॉन-लाइक पेप्टाइड्स- १’ या प्रकारातली रासायनिक द्रव्यं रक्तसंवहनातले दोष (परिणामी हृदयविकाराचा झटका, मेंदूला बसणारा झटका इ.) कमी करणारी असतात, त्यामुळे ज्यांना त्या प्रकारचा धोका असू शकतो अशा (म्हणजे उदा.- उच्च रक्तदाब. कोलेस्टेरॉल, अधिक वजन असलेल्या किंवा धूम्रपान करणाऱ्या) रुग्णांना ती लागू पडतात. मात्र ही द्रव्यं अखेर प्रथिन प्रकारातली (लायराग्लुटाइड) असल्यामुळे ती इंजेक्शनच्या स्वरूपात दररोज एकदा योग्य प्रमाणात द्यावी लागतात. हल्ली ‘आठवड्यातून एकदाच’ इंजेक्शनवाटे घेण्याची औषधंही (सेमाग्लुटाइड, टर्झेपटाइड, ड्युलाग्लुटाइड इत्यादी) उपलब्ध झाली आहेत. युरोप आणि अमेरिकेत हल्ली सेमाग्लुटाइड आणि टर्झेपटाइडला मागणी आणि पसंती फार आहे- पण सध्या तिथं, मधुमेह नसूनसुद्धा निव्वळ वजन वाढू नये म्हणून ही औषधं घेणारे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल अद्याप पुरेसे अभ्यास झालेले नाहीत. मात्र सध्या सेमाग्लुटाइड हा घटक इंजेक्शनऐवजी गोळीच्या (टॅब्लेट किंवा कॅप्सूल) स्वरूपात आणण्यासाठीचं संशोधनही (तूर्तास फक्त रायबेल्सस या नाममुद्रेनं, त्यामुळे बरंच महाग किमतीला) बाजारात आलं आहे.

निव्वळ खाण्यापिण्याच्या, उठण्यानिजण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवून आणि त्यांना व्यायामाची जोड देऊन ज्यांचा मधुमेह आटोक्यात राहणार नाही, त्यांना ‘रासायनिक द्रव्यं’ असलेल्या औषधांशिवाय पर्याय नसतो हे खरं. ‘रसायनं म्हणजे घातकच’, असं जर आजही- म्हणजे, गेल्या काही दशकांमध्ये झालेल्या संशोधनातून औषधांची गुणवत्ता सुधारल्यानंतरही जर सारखं सांगितलं जात असेल, तर मात्र तो अपप्रचार ठरेल. विशेषत: ‘डायबेटिसपासून सुटका’ मिळवण्याच्या नादात या औषधांपासून दूर राहणाऱ्या रुग्णांना कळकळीचा इशारा द्यावासा वाटतो की, हृदयविकार, मूत्रपिंडविकार यांपासून आता सावध राहा.

लेखक हृद्रोगतज्ज्ञ असून ‘गौरी कौल फाउंडेशन’मध्ये कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before blaming diabetes drugs understand what chemicals are used in medicines mrj
First published on: 26-03-2024 at 09:00 IST