रघुनंदन भागवत
गोष्ट आहे १९९०च्या दशकातली. तेव्हा लालू प्रसाद यादव यांचे एक वाक्य आजच्या भाषेत बोलायचे झाले तर खूप ‘व्हायरल’ झाले होते.लागोपाठ तीन निवडणुका जिंकल्याने लालू अतिआत्मविश्वासाने नुसते फुरफ़ुरत होते. त्याच ओघात ते बोलून गेले ‘जब तक समोसेमे रहेगा आलू, तब तक बिहारमे रहेगा लालू’! आज लालूंच्या त्या वाक्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे २०२५ च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा लागलेला निकाल. या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)ने अभूतपूर्व यश मिळवून लालूंच्या पक्षाची पार धूळधाण उडवली.

अनेक तथाकथित विश्लेषक,अभ्यासक, सेफॉलॉजिस्ट्स ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा आभास निर्माण करून आपली स्वतःचीच फसवणूक करून घेण्यात मग्न होते. पण मला मात्र रालोआ पुन्हा मोठ्या बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास होता. बिहारचेच राम विलास पासवान यांना वारे कुठल्या दिशेने वाहात आहेत ते अचूक समजायचे त्यामुळेच ते कायम सत्तेच्या उबेत राहिले. असो. या निवडणुकीत राम विलास यांच्या मुलाने, चिरागने, ‘बाप से बेटा सवाई’ ही उक्ती सार्थ करून दाखवली. त्याने २०२०ची निवडणूक रालोआच्या विरोधात लढवली आणि पराभवाची धूळ चाखली. या वेळी तो अलगद भाजपच्या मांडीवर जाऊन बसला आणि २९ पैकी १९ जागा जिंकून गेला.
चिराग पासवान हा भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेला एकमेव राजकारणी नव्हता. जितनराम मांझी, उपेंद्र कुशवाह हेही त्याच माळेतले मणी. पण भाजप व नीतीश कुमारांचे संयुक्त जनता दल यांनी या मण्यांची अशी एकसंघ माळ गुंफली की या माळेच्या आधारे सत्तेचा मुकुट ते सहज कायम राखू शकले.

नितीश कुमार यांनी सलग २० वर्षें सत्ता उपभोगून परत नव्याने सत्तेवर मांड ठोकू शकतात, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य. त्याचबरोबर भाजप हा बिहारमध्ये प्रथमच पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला हे दुसरे विशेष. तिसरे विशेष म्हणजे रालोआच्या घटक पक्षांचा ‘स्ट्राईक रेट’. भाजपच्या यशाचे गुणोत्तर जवळपास ९० टक्के आहे तर संयुक्त जदचे ८२ टक्के. चिराग पासवान, जितेनराम मांझी, उपेंद्र कुशवाह यांनी सुद्धा प्रथम श्रेणी मिळावली. एक प्रकारे हा एक उत्तम ‘सांघिक विजय’ ठरला.

रालोआच्या या विजयाने काही ‘सांगावा’ दिला आहे त्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.

(१) जुनी गृहीतके कोसळून पडली : जेव्हा मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा वाढीव मतदान हे सरकार बदलासाठी असते हे पाहिले ‘मिथक’ या निवडणुकीतील वाढीव मतदानाने खोडून काढले. या निवडणुकीत वाढलेले मतदान हे सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी झाले. सतत काही वर्षें सत्तेत राहिलेल्या पक्षाला प्रस्थापितविरोधी जनमानसाला तोंड द्यावे लागते हे उपगृहीतक आता कालबाह्य झाले आहे यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

(२) निवडणुका नुसत्या जातीय समीकरणावर जिंकण्याचे दिवस आता संपले : बिहार सारख्या जातीय उतरंड असलेल्या राज्याने या वेळी जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान करून वर्षानुवर्षे चालत आलेल्या साचेबद्ध विचारसरणीला छेद दिला. रोटी, कपडा मकान आणि सडक, बिजली, पाणी हे विकासाचे विषय यावेळी कळीचे मुद्दे ठरले, असे माझे निरीक्षण आहे.

(३) लाभार्थी महिला मतदार हा ‘निर्णायक’ घटक ठरला : सरकारी योजनांचा लाभ झालेल्या महिलांनी प्रचंड प्रमाणात सत्ताधाऱ्यांना मतदान केले आणि निवडणुकीला निर्णायक वळण दिले. यापूर्वी झारखंड व महाराष्ट्रात याची प्रचीती आली होती. बिहारने यात एक पाऊल पुढे टाकले. विशेष म्हणजे महिलांनी शुद्ध आर्थिक लाभाच्या मुद्द्यावर मतदान केले. यात जात-धर्म आडवा आला नाही.

(४) बेरोजगारी हा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा राहिलेला नाही : आता स्वयंरोजगारावर भर दिला जात असल्याने नव्या नोकऱ्या निर्माण करणे हा युवा वर्गाला खेचून आणणारा मुद्दा राहिलेला नाही. नव्या नोकऱ्या निर्माण होण्यावर मर्यादा आहेत हे तरुणांनाही कळून चुकले आहे, हे तेजस्वी यादव यांच्या ‘घरटी एक सरकारी नोकरी’ देण्याच्या अवास्तव आश्वासनाला तरुण वर्ग भुलला नाही यातून दिसून आले.

(५) घराणेशाहीच्या ऱ्हासाची सुरुवात : काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांना जोरदार झटका बसल्यामुळे, राजकीय पक्षातील घराणेशाहीच्या अस्ताला सुरुवात झाली आहे असा निष्कर्ष निघू शकतो. काँग्रेसला घराणेशाहीचा वारंवार फटका बसून सुद्धा तो पक्ष त्यातून धडा घेत नाही. राजद सुद्धा त्याच मार्गाने जात आहे.

(६) मतचोरीचा मुद्दा निष्प्रभ : राहुल गांधींनी ज्यावर राळ उठवली, त्या ‘मतचोरी’च्या कथित मुद्द्याला मतदारांनी केराची टोपली दाखवली. याचा अर्थ माझ्या मते असाही होतो की, जनतेत निवडणूक प्रक्रियेविषयी संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न बिहारी जनतेने हाणून पाडला.

(७) केंद्रातील सरकारवर परिणाम : केंद्रातील आघाडी सरकार बिहार निवडणुकीनंतर कमकुवत होईल म्हणून आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्या तमाम अतृप्त आत्म्यांचा भ्रमनिरास झाला. उलट राज्यसभेत ‘रालोआ’ आता अधिक बळकट होत जाईल.

(८) भाजपमध्ये ‘आयाराम’ वाढतील : बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधून ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या नाटकाचा प्रयोग जोरात सुरू होईल… माझी अटकळ अशी की, भाजपला त्यांच्या स्वागतासाठी नुसता तंबू उभारून चालणार नाही तर एक स्वतंत्र मैदान उभारावे लागेल.

या निवडणुकीचे सर्वात मोठे फलित म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे बिहारमधील राजकारण संपुष्टात आले आहे. त्यांच्या ‘जंगल राज’चा एवढा धसका बिहारींनी घेतला आहे की लालूंच्या पक्षाच्याही मानेवर आता ‘जंगल राजचे भूत’ वेताळप्रमाणे विळखा घालून बसल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले.

त्यामुळे, या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा संदेश ‘समोसेमे रहेगा आलू लेकिन बिहारमे नही रहेगा लालू’ हाच आहे.

raghunandan.bhagwat @gmail. com