– सुधीर शालीनी ब्रह्मे

नवी मुंबई म्हणजेच सिडको आणि सिडको म्हणजेच नवी मुंबई, असे सामान्यपणे मानले जाते. हे समीकरण तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबई वसविण्यासाठी झालेली सिडकोची स्थापना. नवीन नगरे विकास प्राधिकरण म्हणून सिडकोने अन्यही नवीन नगरे वसविली आणि तीच महाराष्ट्रातील ग्राम-नागर संस्कृती संक्रमणाची सुरुवात होती. आता (१७ मार्च) याला अर्धशतक उलटलं आहे, काय होती पहिल्या पिढीची अवस्था?

Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार

१९७४ साली जेमतेम ३००-३५० कुटुंबं नवी मुंबईत रहावयास आली होती. बहुतेक जण बीएआरसीतील होते. सेक्टर १ मधील बी-टाईप येथे ही मंडळी अल्पउत्पन्न गटाच्या घरांत रहात असत. ८० टक्के अमराठी लोक होते. वाशीमध्ये रुजू झालेली, रुजू घातलेली पहिल्या पिढीतली माणसं म्हणजे ललित पाठक (त्यावेळी मुक्त पत्रकार), अच्युत मेनन, ग. तु. साळवी, पुरुषोत्तम मांडे, सुभाष कुलकर्णी, अरूण जोशी, प्रभाकर म्हात्रे, अरविंद वारके, सिमेन्सचे ए. अन. मोडक, फायझरचे सतीश कर्णिक, नोसिलचे भास्कर प्रधान, मोहन ठक्कर तसेच सुरेश गोगटे, दिनकर कौसाडीकर, अनिल सुळे, एच. एन नायक आणि राजा राजवाडे (पाचही जण सिडकोचे अधिकारी) शिवाय आणखी बरेच अज्ञात…

हेही वाचा – यंदा ‘मतदान’ करणार की ‘मताधिकार’ बजावणार?

‘एकस्प्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई’ या पुस्तकाच्या लेखनानंतर नव-नवी मुंबईकरांपैकी एक ललित पाठक यांची भेट झाली. नवी मुंबईतील त्या नव्या दिवसांबद्दल त्यांच्याशी गप्पा झाल्या. महाराष्ट्रातील ग्राम-नागर संस्कृती संक्रमणाच्या काही अज्ञात गोष्टी त्यांच्याकडून कळल्या. त्या नव्याच्या नवलाई बद्दल पाठक सांगतात, ‘सिडकोने सिमेंटचे जंगल उभे केले होते, त्यात जिवंतपणा आणला ते सिडकोग्रस्तांनी’. वाशीमध्ये राहायला आलेल्या सुरुवातीच्या नागरिकांसह पाठक स्वतःला ‘सिडकोग्रस्त’ म्हणवतात. मुळासह उपटून नव्या जागेत रुजताना अनेक व्यापांनी ते ग्रस्त झाले.

गृहप्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “लखलखीत उजेड. २४ तास पाणी, वीज, घराजवळ बाजार, शाळा, मुलांना खेळायला मोकळी जागा; बस्स आणखी काय हवंय माणसाला! पण हे, स्वप्नात दिसलेलं शहर होतं. हायवे पासून दोन-तीन मिनिटांत घरी येऊ शकत होतो. शांत परिसर व सर्वत्र हिरवळ होती. समोरच्या तुर्भे परिसरातील डोंगराचं दृश्य लोभस होतं. पावसाळ्यात तर धबधबे वाहतानाचा रात्री येणारा आवाज भयावह होता.”

परिसराचा आखों देखा हाल ते सांगतात, “मार्केट आहे, दुकानं कुलुपबंद. भाजी मार्केटमध्ये एकच दुकान चालू पण किमान भाज्यादेखील उपलब्ध नाहीत. भाज्यांसाठी मागणी नोंदवावी लागे. मार्केटमध्ये मेडिकल स्टोअर नाही. विद्युत पुरवठा रामभरोसेच! पहिल्या दिवशी रात्रभर डासांनी झोपू दिलं नाही. वीज किती वेळा गेली हे सांगता येणार नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दादरला जाऊन मच्छरदाण्या आणल्या. सायंकाळी दारं खिडक्या बंदच. मच्छरदाणी लावून झोपलो, खूप गरम होऊ लागलं. अखेर परिणाम दिसला तो फ्ल्यूचा. घरी दोन रुग्ण. डॉ म्हात्रेंकडे अतोनात गर्दी. त्यात दिलेली औषधं घेण्यासाठी चेंबूरला जावं लागले. टॅक्सी सेवा नव्हती”. नवी मुंबई परिसरात टॅक्सी आणि रिक्षा सेवा सुरू झाली १९८८ साली.

“जीवन संघर्षाची सुरुवात सकाळी उठल्यापासूनच”, पाठक सांगू लागले. “चहा हा हवाच, त्यासाठी दूधही. सिडकोने एक दुकान दूध विक्रेत्यास दिलं होतं पण प्रकल्पगस्त ते चालू करू देत नव्हते. यावर तोडगा आरे दूध. पण त्यासाठी किमान ५०० लिटर दूध तरी घ्यावं लागणार होतं. या मंडळीनी घरोघरी जाऊन विचारणा केली, लोकांना आरे दूध हवं होतं. आरेचे जनरल मॅनेजर कोटणीस यांची भेट घेतली. कोटणीसनी प्रथम नकार दिला, म्हणाले हे दूध मुंबई बाहेर विकता येत नाही, पण जाता-जाता म्हणाले, कुर्ला इथे मदर डेअरी सुरू होत आहे तिथे भेटा. पाठक यांनी कुर्ला डेअरीतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. ते म्हणाले दूध देऊ पण वाहतूक खर्च तुमचा.

दूध आणावयाचे नक्की झाले. नवी मुंबईतलाच वाहतूकदार पकडला. वाटपासाठी काही मुलं तयार करण्यात आली. पाठक सांगतात, “पहिल्याच दिवशी ५०० लिटर दूध आणण्यासाठी ही मंडळी रात्री १२ वाजता गेली. पहाटे ४.३०च्या सुमारास वाशी पुलावर टेम्पोचे टायर पंक्चर झाले. रस्त्यावर खिळे मिळाले. मग सगळ्यांनी टेम्पो ढकलत-ढकलत वाशी सेक्टर १ ला आणला. दूध वाटप करणारी मुलं आलीच नाहीत. मग सर्वांनी आपापल्या इमारतीत दूध वाटप केलं. दुसऱ्या दिवशी डेअरी मॅनेजरला विनंती केली, आम्हास फक्त २०० लिटर द्या, कारण जवळजवळ १५० लिटर उरलं आहे.

दूध गरम करण्यासाठी, स्वयंपाकासाठी गॅस हवाच. एचपीचं वितरण केंद्र वाशीला होणार असं जाहीर झालं आणि दोन दिवसांत हे केंद्र कुणा एका शहा या व्यक्तीला मिळालं. त्याविरुद्ध या मंडळींनी लढा पुकारला. मराठी माणसांनी दिलेला हा नवी मुंबईतील पहिला लढा. शहा यांची एजन्सी रद्द केली गेली. त्यानंतर सांस्कृतिक बैठक बसविण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याविषयी पाठक सांगतात, “नव-नवी मुंबईकरांचा पहिला-वाहिला सार्वजनिक गणेशोत्सव १९७४ साली वाशी, सेक्टर १ मधील मार्केटच्या भव्य आवारात साजरा झाला. सर्व भाषकांनी एकत्र येऊन केलेला हा एकमेव कार्यक्रम. या नागरिकांनी पदरमोड करून नवी मुंबईला सांस्कृतिक चेहरा दिला.” ८ फेब्रुवारी १९७९ रोजी मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाची स्थापना झाली. मंडळाने एप्रिल १९७९ मध्ये नवी मुंबईत पहिली वसंत व्याख्यानमाला आयोजित केली. उद्घाटक होते साहित्यिक ना. ज. जाईल, सिडकोचे अध्यक्ष प्रा. राम कापसे प्रमुख पाहुणे होते. “पहिलेच पुष्प गुंफले वाकटकर-पेंडसे या त्याकाळी गाजलेल्या पोलीस दलातील जोडीने. कार्यक्रम बरोबर रात्री ९.०० वाजता सुरू होणार होता. मुंबईतील सायन हॉस्पिटल जवळ झालेल्या अपघातामुळे वाकटकर व पेंडसे उशिरा आले. प्रेक्षकांची उपस्थिती कमी झाली. पण दोघांनीही व्याख्यानं रंगवली. सुहासिनी मुळगावकर यांचा एकपात्री प्रयोग, योगाचार्य निंबाळकर यांचं व्याख्यान झालं. व्याखानमालेचा समारोप विश्वास मेंहदळे यांनी केला. काही महिन्यानंतर मेहंदळे यांची नियुक्ती सांस्कृतिक कार्यसंचालनालयात झाली. त्यांनी या संस्थेस ५० हजार रुपयांचे केंद्रीय अनुदान दिले. २३ एप्रिल १९८१ या तिसऱ्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटनाचे बाळ ठाकरे यांनी गुंफले. वाशीनगरच्या न्यू बॉम्बे हायस्कूल इथे हे व्याख्यान झाले. मंचावर कुठलाही स्थानिक नेता नव्हता. व्यंगचित्र या विषयावरले व्याख्यान प्रात्यक्षिकासह यथासांग शांततेत पार पडले.

“शास्त्रीय संगीताचे दर्दी मुरलीधर चिमलगी (संजीव चिमलगी यांचे वडील), अरुण जोशी, डॉ. सतीश उदारे, डॉ. मराठे, अनिल सुळे इत्यादींनी मिळून ‘न्यू बॉम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल’ ची स्थापना केली. या संस्थेतर्फे १९७५ साली पहिलं नाटक बसविलं गेलं. त्यात अरविंद वारके, डॉ. मराठे यांच्या भूमिका होत्या. या संस्थेतर्फे दोन-तीन गायन स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. १९७६ किंवा ७७ मध्ये येथील शाळेच्या सभागृहात भीमसेन जोशींचा कार्यक्रमही झाला. १९८१ साली म्युझिक सर्कलने ‘उघडले स्वर्गाचे दार’ हे पहिलं व्यावसायिक नाटक आणलं, ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे हे नायक होते. हे मंडळ वर्षाला दोन नाट्यमहोत्सव आयोजित करत असे.

हेही वाचा – चांदवडचे शेतकरी महिला अधिवेशन

या काळात आपल्याला भेटलेल्या वल्लीचं वर्णन करताना पाठक जितके नॉस्टाल्जिक होतात तितकेच कृतज्ञ. ते सांगतात, “शामराव वानखेडे हे स्वातंत्र्यसैनिक होते. वय वर्षं ८५. प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त. निवृत्तीवेतन (त्यावेळी) अवघं ४५ रुपये. महात्मा गांधीचे अनुयायी. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू होतं त्या काळात वाशीला मुलाकडे आले होते. एके दिवशी सकाळी घरी आले. काही पत्रं लिहून घेतली आणि विचारलं, “इथे आमच्या सारख्या म्हाताऱ्या लोकांसाठी स्मशानभूमी कुठे आहे? स्मशानभूमी नव्हती. तत्काळ त्यांनी मुख्यमंत्र्याना देण्यासाठी त्याविषयीही पत्र लिहून घेतलं. “मागणी मान्य केली नाही, तर उपोषणाला बसेन” असंही लिहिण्यास सांगितलं. दुपारी दोन वाजेपर्यंत सिडकोत फोन आले व तत्काळ त्यांची मागणी अमलात आणावी असं सांगितलं. तुर्भे इथल्या पोलीस ठाण्यालाही आदेश आले. दुसऱ्या दिवशी वृतपत्रात बातमी आली. पोलिसांचा मला फोन- अण्णा वानखेडे आहेत कोण? सिडकोचे जनसंपर्क अधिकारी राजा राजवाडे सकाळीच माझ्या घरी. नेहमीप्रमाणे आण्णाही हजर. मग सिडकोचे समाजसेवा अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, आण्णांसहित स्मशानभूमीची जागा शोधण्यास बाहेर पडले. अशारितीने हा प्रश्न सुटला. ही घटना १९८४- ८५ च्या सुमाराची…

नवं शहर वसण्याच्या अशा अनेक आठवणी आहेत. आजचं नवी मुंबईचं आखीवरेखीव रूप पाहताना हे शहर इथवर कसं पोहोचलं हे जाणून घेणं गरजेचं आहे…