गिरीश कुबेर
समकालीन माध्यमे आज निर्णायक वळणावर असून भविष्यातील आव्हानेही समोर दिसत आहेत. अशा परिस्थितीत माध्यमांनी काय करायला हवे, यासंदर्भात दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान कार्यक्रमात पुणे येथे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेल्या मूळ इंग्रजी भाषणाचा संपादित अनुवाद सारांश.
सर्वप्रथम लतिका पाडगावकर, पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिम्बायोसिस विद्यापीठ यांचे या व्याख्यानासाठी मला निमंत्रित केले याबद्दल आभार. ही दिलीप पाडगावकर यांस आदरांजली वाहण्याची संधी असे मी मानतो. माझी पत्रकारितेची कारकीर्द पुण्यातूनच सुरू झाली. या भाषणाच्या निमित्ताने मला मागे वळून पाहण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. दररोज नवीन चूक करण्याची संधी देणारा हा एकमेव व्यवसाय आहे. आम्ही केवळ आजसाठी काम करत असल्याने रोजचा दिवस आमच्यासाठी नवीन असतो. त्यामुळे समकालीन माध्यमे निर्णायक वळणावर कशी आली आहेत, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणे आवश्यक ठरते.
प्रत्येक पिढीप्रमाणे माझ्या पिढीचा भूतकाळ आणि वर्तमानाशी संघर्ष आहे. भूतकाळ भव्य होता यात काहीच शंका नाही आणि भविष्य हे अनिश्चित आहे, यातच त्याची गंमत आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि मोबाइलसारखे छोटेखानी उपकरण दिवसेंदिवस अधिकाधिक स्मार्ट होत असताना बातमी ही केवळ बातमीदाराची मक्तेदारी राहिली नाही.
हेही वाचा >>>समस्याग्रस्त चिनी अर्थव्यवस्थेच्या ‘स्वायत्त’ संस्थांचीही भिस्त सत्ताधाऱ्यांवरच!
बदललेली बातमी
ऑईल इज टु इंपर्ॉटट टू बी लेफ्ट टु ऑईलमेन असे हेन्री किसिंजर यांचे प्रसिद्ध विधान आहे. त्याचप्रमाणे बातमी केवळ बातमीदारांकडे सोपवणे अयोग्य. तंत्रज्ञानाने हा बदल झाला. बातमीचे लोकशाहीकरण झाले ही निश्चितच स्वागतार्ह बाब. बातमीदारांच्या कह्यातून बातमी बाहेर पडून ऑटो-पायलट मोडवर गेली आहे. कोणताही वेळ न दवडता ती एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करते. त्यातून दोन मुद्दे उपस्थित होतात.
एक म्हणजे ५ डब्ल्यू आणि १ एच (व्हॉट, व्हेन, व्हेअर, हूम, हू आणि हाऊ) हे बातमीचे पारंपरिक स्वरूप आणि व्याख्या आता कालबाह्य झाली आहे. आताच्या परिस्थितीत बातमीच्या व्याख्येत आणखी २ डब्ल्यूंचा समावेश करावा लागेल. पत्रकारितेची व्याख्या समकालीन करण्यासाठी त्यात आणखी २ डब्ल्यू जोडावे लागतील. आताच का आणि पुढे काय (व्हाय नाऊ व व्हॉट नेक्स्ट) हे ते दोन डब्ल्यू. हा अतिशय महत्त्वाचा बदल पत्रकारास आजच्या काळात त्याच्या व्यवसायाशी सुसंगत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील. हे एवढय़ापुरते मर्यादित नाही. प्रामाणिक, सत्य आणि विनातडजोड पत्रकारितेला देशद्रोही म्हणून हिणवले जात असल्याच्या काळात हे दोन डब्ल्यू आणखी आवश्यक ठरतात. भूतकाळात माध्यमांस दडपण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. आणीबाणी हे एक त्याचे उदाहरण. मात्र, आता काळाचा फरक आहे. समाजालाच माध्यमांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. आणीबाणी आणि आधीच्या काळात शोषित आणि शोषकांच्या लढय़ात माध्यमे प्रमुख साधन होती. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ती महत्त्वाचा घटक होती. आता एका गटाकडून ती देशाच्या प्रगतीत अडसर ठरणारी मानली जात आहेत. माध्यमांशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, यावर समाजातील या घटकाचा विश्वास नाही. उच्च पदावरील एखादा व्यक्ती माध्यमे आणि पत्रकारांना प्रेस्टिटय़ूट/लिब्राडू अशी विशेषणे वापरते, त्या वेळी हा समाजघटक आनंद व्यक्त करतो. सर्वात महत्त्वाचे असे उदारमतवाद हे मूल्य जेव्हा शाप ठरवले जाते, त्या वेळी माध्यमांचे खरे काम सुरू होते.
काळ कोणताही असो.. वी विल रॉक यू..
त्यामुळे या संदर्भात आताच का आणि पुढे काय हे दोन प्रश्न महत्त्वाचे ठरतात. त्यांची उत्तरे द्यायची असतील तर पत्रकारांनी रंजन करणे आणि माध्यमांचे रंजनीकरण होणे थांबवायला हवे. माध्यमे ही रंजन करण्यासाठी नाहीत. आपण इथे व्यवस्थेला प्रश्न विचारायला आणि कोणीही सत्ताधारी असला तरी त्याच्या नाकर्तेपणाला आव्हान देण्यासाठी आहोत. प्रसिद्ध अशा ब्रिटिश बँड क्वीन्सचा १९७७ मध्ये ‘न्यूज ऑफ द वल्र्ड’ अल्बम आला होता. त्यात ‘वी विल रॉक यू’ हे गाणे गाजले. काळ कोणताही असो माध्यमांनी ‘वी विल रॉक यू’ अशीच भूमिका घ्यायला हवी.
माध्यमांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताना अथवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास हरवलेला गंभीरपणा पुन्हा आणण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील, असे मला प्रामाणिकपणे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे राजकारणाची आसक्ती सोडायला हवी. माध्यमे फारच राजकारण आणि राजकारणी यांच्या कच्छपि लागलेली दिसतात. ते सोपे असते. पण ते टाळायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे, दोन महत्त्वाच्या आव्हानांकडे माध्यमांनी गंभीरपणे पाहण्यास सुरुवात करायला हवी. तापमान बदल आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) ही ती दोन आव्हाने.
हेही वाचा >>>‘युद्ध गुन्हेगार’ ही किसिंजर यांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू…
दोन महत्त्वाची आव्हाने
तापमान बदलामुळे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या करोनासाथीपेक्षा किती तरी पटीने भयंकर असतील. भारताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे जाहीर केले आहे. हे प्रत्यक्षात शक्य आहे का? याबद्दल माध्यमांनी कधी प्रश्न विचारले आहेत का? आपला देश ८५ टक्के जीवाश्म इंधन आयात करतो आणि किमान पुढील दशकभर तरी तो त्यावर अवलंबून असणार आहे. मग आपण ४७ वर्षांत कार्बन उत्सर्जन शून्यावर कसे आणणार? आपली खनिज तेलाची गरज दररोज ५० लाख पिंप आहे. एका दिवसात ८६ हजार ४०० सेकंद असतात. म्हणजेच एका सेकंदाला आपल्याला ५८ पिंपे खनिज तेल लागते. ते कमी करण्याचे आपले प्रयत्न काय? बातमीदार देशाचे हे वास्तव तपासण्यास तयार आहेत का? आणि खरा प्रश्न हा आहे की, आपण या आव्हानांबाबत खरेच गंभीर आहोत का? याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे माध्यमांचे काम नाही का?
दुसरे मोठे आव्हान म्हणजे एआय. एआयमुळे काय घडू शकते, याचे अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रकरण एक झलक होते. मानवाची जागा एआय ज्या पद्धतीने घेत आहे ते हानिकारक आहे. माध्यमांनी याबद्दल अधिक जागरूक होण्याची गरज आहे. कारण एआयमुळे सर्वात मोठी उलथापालथ माध्यम क्षेत्रात होईल. रोजगार जाण्याचा मोठा धोका असला तरी एआयचा शस्त्र म्हणून वापर विध्वंसकारी ठरेल. विस्तारवादी, शक्तिशाली आणि सर्वव्यापी सरकारे एआयचा शस्त्र म्हणून वापर करू शकतील. हाच प्रकार बडय़ा कंपन्यांबाबत होऊ शकतो. या कंपन्या सरकारशी संगनमत करून एआयचे व्यवस्थापन करणार असतील तर सध्या वाटतो त्यापेक्षा खूप मोठा धोका आहे. माध्यमे या आगामी आव्हानांना समजून घेण्यास तयार आहेत का? माध्यमांनी या आव्हानांकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याची आवश्यकता का आहे? कृत्रिम प्रज्ञा हा खरा धोका नसून, मानवाचा मूर्खपणा त्यापेक्षा धोकादायक आहे; असे युवाल नोआ हरारी म्हणतात.
वास्तवाला सामोरे जाण्याचे आव्हान
आयुष्यातील प्रत्येक पावलावरील मूर्खतेला प्रश्न विचारणे हे माध्यमांचे काम आहे. समाजाला त्याच्या झोपेतून जागे करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. ही जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी आधी माध्यमांना जागे होऊन वास्तवाचा सामना करावा लागेल. ते हे करतील का?
माध्यमे हे करू शकणार नाहीत, असे मानण्याचे काही कारण नाही. वस्तुत: समाजच माध्यमांना वळण लावत असतो. समाजाच्या लायकीप्रमाणे त्याला माध्यमे मिळतात. पारंपरिक माध्यमे अपयशी होत असतील तर नवीन माध्यमांचा उदय होईल. यातून पारंपरिक माध्यमे पुन्हा योग्य मार्गावर येतील. माझे अनेक सहकारी आजही गंभीरपणे पत्रकारिता करीत आहेत. समकालीन माध्यमे निर्णायक वळणावर आहेत हे मान्य. पण ती योग्य मार्ग निवडतील आणि भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ती स्वत:ला आकार देतील, अशी माझी खात्री आहे. या संदर्भात माझे आवडते कवी दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील काही ओळी उद्धृत करण्याची इच्छा होते..
कौन कहता है के आसमान मे सुराख नही होता,एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो..पत्रकारितेची पुढील पिढी व्यवस्थेवर हे प्रश्नरूपी पत्थर भिरकावत राहण्याचे आपले कर्तव्य पार पाडत राहील.