“माझ्या बायकोच्या अंगावर १००- २०० जण पडले. आमचे कपडे सामान सारं काही चोरीला गेलं. आम्हाला इथे मारण्यासाठी बोलावलं आहे का? योगी फक्त साधुसारखे कपडे घालतात. साधूचे काही गुण नाहीत त्यांच्यात…” महाराष्ट्रातून आलेला एक तरुण अतिशय उद्वेगाने सांगतो. “आम्ही इथे गंगा स्नानासाठी आलो, पण घाटापर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. जिथे जावं तिथे रस्ता बंद असतो. काहीच व्यवस्था नसताना योगींनी इथे येण्याचं आवाहन का केलं? पुन्हा कधीही कुंभमेळ्याला येणार नाही.” गुजरातच्या लता शर्मा संतापलेल्या दिसतात. हे व्हिडीओ अनुक्रमे ‘बीईंग सुमीत ००७’ आणि ‘विशाल अगरवाल’ यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आले आहेत. असे अनेक व्हिडीओ सध्या विविध समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहेत. ‘द फायनान्शिअल एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभाच्या आयोजनासाठी सहा हजार ९९० कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि मेळ्यामुळे सरकारच्या तिजोरीत २५ हजार कोटींची भर पडण्याचा अंदाजही वर्तवला गेला होता. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रं असलेल्या दणदणीत जाहिरातीही केल्या गेल्या. मात्र मौनी अमावास्येला झालेल्या दुर्घटनेत हे सारे दावे गंगेत वाहून गेले आणि समाजमाध्यमांवर हे दावे खोडून काढणाऱ्या पोस्टचा पूर आला.

महाकुंभ सुरू होण्यापूर्वी तिथे उभारलेल्या ‘टेन्ट सिटी’ची कौतुकं अनेक वृत्तवाहिन्यांनी केली. तीन हजार स्वयंपाकघरं, २४ तास वीज-पाणी, ११ रुग्णालयं, ५० हजार सुरक्षा कर्मचारी, अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे असे डोळे दिपविणारे आकडे सर्वत्र झळकत होते. मेळा सुरू झाल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस सारं सुरळीत सुरू होतं. मात्र गर्दी वाढत गेली आणि भव्यदिव्य व्यवस्था तोकडी पडू लागली. १९ जानेवारीला मेळ्यात आग लागली, २८ जानेवारीला चेंगराचेंगरी आणि ३० जानेवारीला पुन्हा आग. कुरबूर, नाराजीचं प्रतिबिंब टीव्ही वाहिन्यांच्या आधी समाजमाध्यमांवर उमटू लागलं. आपले नातेवाईक हरवल्याचं आणि पोलीस ठाण्यांपासून रुग्णालयांपर्यंत सर्वत्र चौकशी करूनही ते सापडले नसल्याचं सामान्य नागरिक, सांगत आहेत. गैरसोयींबद्दल योगी, मोदी आणि पोलिसांना दोष देत आहेत.

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!

एका घाटाकडून दुसऱ्या घाटापर्यंतचा प्रवास सुकर व्हावा म्हणून गंगेवर ३० तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांना क्रमांक देण्यात आले आहेत. घाटांवर उंच खांब उभारून त्यावरही क्रमांक टाकण्यात आले आहेत. जेणेकरून स्नानासाठी गेलेल्या व्यक्तींना आपलं सामान कुठे ठेवलं आहे, आपल्याबरोबरची माणसं कुठे थांबली आहेत हे शोधणं शक्य व्हावं. महाकुंभाच्या सुरुवातीच्या काळात रेल्वे स्थानकापासून घाटाच्या अगदी जवळपर्यंत खासगी वाहनं नेता येत होती. मात्र जसजसं अमृतस्नान जवळ येऊ लागलं तशी गर्दी वाढू लागली. मग खासगी वाहनं १०-१२ किलोमीटर दूरवरच्या वाहनतळावर थांबविण्यास सांगितली जाऊ लागली. तिथून पुढचा प्रवास ई-रिक्षाने करण्याची सुविधा होती. मात्र अमृतस्नानाच्या दोन-तीन दिवस आधी ई-रिक्षालाही प्रवेश बंद करण्यात आला. परिणामी आबालवृद्धांना १२-१५ किलोमीटर पायपीट करणं अपरिहार्य ठरलं. नाराजीचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हाच असल्याचं समाजमाध्यमांतल्या प्रतिक्रियांतून स्पष्ट होतं.

‘क्रेडिबल हिस्ट्री’ या यूट्युब चॅनलवर महाकुंभात सहभागी झालेली एक महिला सांगत होती, “आमची गाडी २० किलोमीटर दूर उभी करावी लागली. आम्ही संध्याकाळी ४ पासून चालतोय आता मध्यरात्र झाली तरी स्नान झालेलं नाही. पूल बांधले आहेत ते बंद ठेवण्यासाठीच का? फक्त व्हीआयपीच माणसं आहेत का? आम्ही माणसं नाही?” हे ‘व्हीआयपी कल्चर’ हा महाकुंभात प्रचंड रोषाचा मुद्दा ठरत आहे. गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू, बाबा रामदेव, हेमा मालिनी, अनुपम खेर, शंकर महादेवन, गुरु रंधावा, रेमो डिसुझा सारखे सेलिब्रिटी सुखेनैव स्नान करतात, फोटोशूट करतात त्यांची छायाचित्रं, व्हिडीओ व्हायरल होतात आणि आपल्याला मात्र तासनतास पायपीट करूनही स्नानाची संधी मिळत नाही. एखाद्या व्हीव्हीआयपीचा ताफा आला की तो रस्ता बंद केला जातो. गर्दी अन्यत्र वळविली जाते आणि मग तिथेही कोणी आलं की पुन्हा रस्ता बंद. कधी एखादा पूल वन वे केला जातो. म्हणजे भाविक ज्या पुलावरून आलेले असतात त्यावरून परत जाण्यास मनाई. परत जाताना वेगळ्या पुलावरून जायचं. भक्तांची राहण्याची सोय एका घाटावर, त्यांचे नातेवाईक सामान सारं काही तिथे असणार पण ज्या पुलाने आले, त्या पुलाने परत जाण्याची परवानगी नाही. मग दुसरा जो कोणता पूल खुला असेल त्याने भलत्याच घाटावर पोहोचायचं आणि पुन्हा मूळ ठिकाणी परतायचं. यात वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत.

ज्या टेंट सिटीचे गोडवे गायले जात होते, तिथल्या टेंटचं भाडं १५०० ते ३५ हजार रुपये प्रति दिन एवढं आहे. सामान्य भाविकांना ते परवडणं कठीण आहे. त्यामुळे अनेकांना उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. अपुऱ्या सोयींमुळे उघड्यावर शौच केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. महाकुंभ मेळ्यात गरीब श्रीमंत यांतील दरी ठसठशीत दिसते. व्हीव्हीआयपी ताफ्यांसाठी रस्ते बंद असल्यामुळे पोलीस आणि भक्तांमध्ये उडणारे खटके ‘अजित अंजुम’ या यूट्यूब चॅनलवर सविस्तर दाखविण्यात आले आहेत. “आमच्यामुळे नेते डिस्टर्ब होणार असतील, तर त्यांच्यासाठीच कुंभमेळा ठेवायचा होता ना. हा जनतेचा मेळा आहे की नेत्यांचा? हे पूल – जे मनमानीपणे बंद केले जात आहेत – ते कोणाच्या पैशांतून उभारले? आमच्या टॅक्सचा पैसा पूर्ण बरबाद केला आहे,” असा उद्वेग या व्हिडीओत लोक व्यक्त करताना दिसतात.

मौनी अमावास्येला संगमावर झालेली चेंगराचेंगरी सर्वांपर्यंत पोहोचली, मात्र ‘लल्लनटॉप’ या वेब वृत्तवाहिनीचे विश्वजीत यादव यांनी एक्सवर पोस्ट केलेला व्हिडीओ ही एकमेव चेंगराचेंगरी असल्याच्या समजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. त्यात जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात कपडे आणि राडारोडा गोळा केला जात असल्याचं दिसतं. त्यात यादव सांगतात की, “इथे आता कोणत्याही माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत. हा राडारोडा झटपट हटवून इथे झालेल्या चेंगराचेंगरीवर पांघरुण टाकलं जात आहे.”

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या संतापात आणखी भर घालणारी वक्तव्यं करत असल्याचंही समाजमाध्यमं दाखवितात योगींच्या सरकारमधले मंत्री आणि ‘निषाद समाज पक्षा’चे अध्यक्ष संजय निषाद यांचं, “जिथे एवढी प्रचंड गर्दी असते तिथे अशी एखादी छोटी-मोठी घटना घडतेच,” हे वक्तव्य त्याचंच द्योतक. चेंगराचेंगरी झाली त्यापूर्वी मेळ्यात कर्ण्यावरून घोषणा करण्यात येत होती, “जो सोवत हैं वो खोवत हैं. उठीये स्नान करीये. भगडद माचने की संभावना हैं. आप पहले आए हैं तो आपको पहले अमृत मिलना चाहिए…” खुद्द आयुक्त विजय विश्वास पंत हेच ही घोषणा करत होते. यूट्युबवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ- शंका होती, तर तातडीने योग्य ती खबरदारी का घेतली गेली नाही – असा प्रश्न उपस्थित करणारा आहे.

या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिलेला संदेश विचार करण्यास भाग पाडतो आहे. ते म्हणतात, “जीवन सुरक्षित ठेवणे हादेखील धर्माचाच भाग आहे. हे संपूर्ण मेळा क्षेत्र हा कुंभच आहे. विशिष्ट क्षेत्रातच स्नान केल्यानेच पुण्य मिळेल असं काही नाही…’ असा समजुतदार संदेश सुरुवातीलाच का दिला गेला नाही? तसं झालं असतं तर कदाचित अनेकांचे प्राण वाचले असते. कुंभमेळ्यांत चेंगराचेंगरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी कुंभात कधी आणि किती बळी गेले, तेव्हा सत्तेवर कोण होतं, कोणी आकडे लपवले वगैरे माहिती पसरवण्याचं काम आता वेगाने सुरू झालं आहे. त्यामानाने आता झालेली मनुष्यहानी अतिशय मामुली आहे, असंही भासावलं जात आहे. त्यात तथ्य असेलही, पण कुंभमेळ्याचं राजकीय श्रेय घेण्याचा, हे सारं सत्ताधाऱ्यांमुळेच घडतंय, असं भासवण्याचा प्रयत्न मात्र यावेळी प्रथमच झाल्याचं दिसतं. अशी काही दुर्घटना घडल्यानंतर माध्यमांनाच नव्हे, तर नातेवाईकांनाही रुग्णालयात जाण्यापासून रोखण्याची, त्यासाठी पोलिसांची साखळी उभी करण्याची, मृत आणि जखमींचा आकडा प्रदीर्घ काळ स्पष्टच न केला जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. अर्थात हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न कितपत सफल झाला, हे येत्या काही दिवसांत मेळा किती सुरळीत पार पडतो, यावरून दिसेलच.

या पार्श्वभूमीवर आपल्या गाण्यांमुळे सदैव चर्चेत असणारी यूट्युबर नेहा सिंग राजपूतने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती म्हणते, “चेंगराचेंगरीत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते हिंदू होते, जखमी आहेत तेही हिंदूच आहेत. मी त्यांच्या बाजूने बोलतेय, तरीही अंधभक्त आणि भाजपचे लोक मला शिव्या-शाप का देत आहेत? कारण त्यांना हिंदूंची नाही भाजपची चिंता आहे. त्यांना हिंदूच्या जगण्या मरण्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना भाजपच्या प्रतिमेची काळजी आहे. मृतांची आणि जखमींची संख्या कमी दाखविली गेली तर भरपाईही कमीच लोकांना मिळणार, बाकीचे वंचित राहणार. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. तो एक राजकीय पक्ष आहे आणि त्याला फक्त हिंदूंची मतं हवी आहेत. विचार करा. कठपुतळी बनू नका.”

चाराचरांत ईश्वर वसतो, अशी शिकवण देणाऱ्या धर्मातील व्यक्तींनी असं अमुक एकाच ठिकाणी, अमुक मुहूर्तावरच स्नान केलं तर पुण्य लाभेल, मोक्ष मिळेल वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवत स्वत:चा आणि स्वत:च्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे, या प्रश्नाचं उत्तर ईश्र्वरावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने शोधलं पाहिजे. vijaya.jangle@expressindia.com

Story img Loader