वसंत देशमाने
ज्ञानेश्वर माऊलीस समाधी का घ्यावी लागली? तुकाराम महाराजांना वैकुंठास घेऊन जाणारे विमान खरेच आले होते काय? विचारी माणसाच्या मनात कधी मधी उद्भवणाऱ्या या प्रश्नांना उत्तरे नाहीत. ती मिळालीच तर प्रस्थापितांना ती सोयीची नसतात. त्यामुळे एकतर पद्धतशीरपणे जनसमूहाची विचार प्रक्रिया कुंठित केली जाते किंवा एखादा प्रश्न अगदीच डोईजड होऊ लागला तर त्याला दुर्लक्षित करणारी यंत्रणा मजबूत होते. आणि तरीही एखादा मूलगामी विचार समाजमान्य होण्याचा धोका निर्माण होऊ लागला तर त्याचा पाठपुरावा करणाऱ्याचाच बंदोबस्त करण्यात येतो. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची १२ वर्षांपूर्वीची हत्या हे त्याचेच एक उदाहरण होय. पण ते दुर्मिळ नाही. कारण जवळपासच्या काळातच पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा प्रतिभावान व्यक्तींनाही प्रश्न विचारण्याच्या एकमेव गुन्ह्यासाठी आपापला जीव गमवावा लागला.
विकास पावत आहे असे भासणाऱ्या मानव जातीच्या प्रवासात हेच एक आश्चर्यकारक सातत्य आहे. स्वार्थ, भिती आणि अहंकार या मानवी स्वभावातील दुर्गुणांचा अचूक फायदा घेऊन स्वतःला पूरक कथानके रचण्यात प्रस्थापित समूह कमालीचे कुशल असतात. ही कथानके राबविण्यात ते कसलीही कसर ठेवत नाहीत. त्यामुळे क्वचित् प्रसंगी त्यांना माघार घ्यावी लागली तरी पराभव पत्करावा लागत नाही. कारण साम दाम दंड भेद नितीमधे विधीनिषेधतेशी त्यांना काहीच देणेघेणे नसते. आपल्या हितसंबंधांना बाधा पोहोचण्याची शक्यता दिसताच खून खराबाही त्यांना गैर वाटत नाही. किंबहुना ते त्याचे समर्थन करतात. या प्रक्रियेला देशप्रदेश, जात, धर्म यांचा अपवाद नसतो हे विशेष.
तेराव्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे फक्त मराठी भाषांतर केले असते तरी ते फार मोठे ऐतिहासिक कार्य ठरते. पण ज्ञानेश्वरांनी गीतेचे रुपांतर करून ‘भावार्थ दीपिका’ रचली. आपण पूज्य आणि पवित्र मानतो ती ज्ञानेश्वरी हीच. हा भावार्थ सांगताना ‘विनाशायच दुष्कृताम्’ मधे हिंसेचे समर्थन करणाऱ्या गीतेतून ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तयां सत्कर्मी रति वाढो’ असे अहिंसेचे अमृत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना दिले आहे. तत्कालीन परिस्थिती विचारात घेता आत्मा परमात्मा आणि पुनर्जन्माच्या संकल्पना खोडून काढणे शक्य नव्हते. त्याची गरजही नव्हती. परंतु ज्ञानेश्वरांनी बहुजनांसाठी ज्ञानाची कवाडे तर किलकिली केलीच पण कर्मकांडातील अज्ञान उघड करण्याचे धाडसही दाखवले. या गुन्ह्य़ासाठी अपरिहार्य असलेला छळ सुद्धा त्यांनी सहन केला.
एकूण एक प्राणीमात्रांस गुरू मानणाऱ्या व सर्व भूतांचे कल्याण इच्छिणाऱ्या ज्ञानदेवांना माणसांसकट सगळ्या जीवांमधली समरसता हवी होती. न्याय हवा होता. मांगल्य हवे होते. अज्ञान, अहंकार, मत्सर, स्वार्थ आदिंचा नायनाट होऊन सत्य अहिंसेचा आविष्कार हवा होता. एकूणच अज्ञानी माणसाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊलीने आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवदेवतांचे उंबरठे झिजवणाऱ्या अंध भक्तांना अज्ञानाचे अवतार संबोधले आहे. घरात एका देवाची मूर्ती स्थापना करून वेळोवेळी देवदर्शनाला भटकणाऱ्यांवर कडक आसूड ओढले आहेत. एकदा गणपती नंतर दुर्गादेवी, कधी शिवशंकर तर कधी भैरवनाथाच्या पायी नाक घासणाऱ्यांना माऊलींनी चक्क विषयासक्त वेश्येची उपमा दिली आहे. व्रतवैकल्ये आणि कर्मकांडाचे एवढे प्रच्छन्न वाभाडे काढण्याचे धाडस गेल्या आठशे वर्षांत क्वचितच कुणी दाखविले असेल. डॉ. दाभोळकरांनीही असा आगाऊपणा केलेला नाही.
आजकाल गावोगावी श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पठणाचे क्रियाकर्म पार पाडले जाते. तरीही ‘वर्षत सकळ मंगळी’ असे दृश्य चुकूनही आढळून येत नाही. निदान वारकरी मंडळींनी तरी आपलेसे केलेल्या ज्ञानेश्वरांना आत्मसात केले आहे का? या प्रश्नाचे उत्तर ही नकारार्थी द्यावे लागेल. वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञानेश्वरी वाचलेली आहे पण एकाही ओवीचा अर्थ माहीत नाही. मग ती ओवी आचरणात आणणे तर दूरच. ही आपली श्रद्धा आणि हा आपला जीवन धर्म आहे.
ज्ञानेश्वरानंतर कितीतरी उशिरा अवतरलेल्या रांगड्या तुकारामाने तर देवधर्मातील भेदभावात्मक आडमुठेपणा वर कठोर आघात केले. अख्खा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांना माऊली आणि तुकाराम महाराजांना जगद्गुरू मानतो. हे अगदी योग्य आणि बरोबरच आहे. शिवाय ‘नवसा सायासे पोरे होती, तरी का करावा लागे पती’ किंवा ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ ही तुकारामांची भाषा खरेतर ज्ञानेश्वरी ओव्यांहूनही सोपी आहे. ‘अर्थेवीण पाठांतर व्यर्थ’ असल्याची कानउघाडणीही तुकाराम कतात. या उप्परही, सामान्य माणसाचे सोडा, पण तुळशीमाळा गळी बाळगणाऱ्या लाखो स्त्री-पुरुषांपैकी चुकून कुणी संतांची शिकवण प्रत्यक्षात
उतरवेल तर शपथ.
आपला मठ्ठपणा अबाधित ठेवण्याच्या या अबोध अट्टाहासापायी आपण २० ऑगस्ट २०१३ या दिवशी रामप्रहरी डॉ. नरेंद्र दाभोळकर या वीस-एकविसाव्या शतकातील संताचा खून होण्यास कारणीभूत ठरलो. आज १२ वर्षांनंतरही, हा खून का केला गेला हे माहीत असूनही, तो कोणी घडवून आणला हे आपण शोधू शकलेलो नाही. तपासाची आधुनिक साधने व तंत्रज्ञान हाताशी असलेले उच्च विद्या विभूषित अधिकारी आणि विधीन्यायतज्ज्ञ खरोखरच हतबल आहेत? की सार्वत्रिक ढोंगीपणाचा हा परिणाम आहे? ज्याच्या त्याच्या सोयी क्षमतेनुसार या प्रश्नांची उत्तरे वेगळी असू शकतात. पण त्यामुळे महाराष्ट्राला अजून अधिक महान, आधुनिक, विवेकशील आणि खऱ्या अर्थाने विकसित करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या एका निर्मळ निष्पाप महात्म्याचा आपण बळी घेतला हे वास्तव बदलणार नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर, निवडक क्षेत्रातील निषेधाचे तुरळक सूर वगळता उभा महाराष्ट्र पेटून उठला नाही. खुद्द महाराष्ट्र सरकार आणि तपासयंत्रणांची या हत्येमागील सूत्रधार शोधून काढण्यातील उदासीनता जगजाहीर आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेमका कोठे नेऊन ठेवलाय ते ही स्पष्ट झाले. न्याय देवता तर आंधळीच असते. कुणीतरी तिच्या डोळ्यावरची पट्टी काढण्याची बहादुरी केली म्हणून ती डोळस थोडीच होणार आहे.
डॉ. दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू म्हणून जगभर प्रसिद्धी पावले. त्याचे कारण अंधश्रद्धा निर्मूलन हेच त्यांचे ध्येय होते म्हणून नव्हे. त्यांची अशी एकारलेली प्रतिमा निर्माण झाली ती त्यांची धर्म चिकित्सा न परवडणाऱ्या त्यांच्या विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे. प्रत्यक्षात डॉ. दाभोळकर हे बहु आयामी व्यक्तिमत्व होते. क्रीडापटू, व्यावसायिक, संघटक, वक्ते, लेखक, समीक्षक, संपादक आणि समाजसेवक म्हणून अतुलनीय कर्तृत्व त्यांचे नावावर जमा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांनी आरंभलेल्या परिवर्तन चळवळीचा आनुषंगिक भाग होता. एक उपयुक्त साधन होते. राज्य घटनेस अपेक्षित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून विवेकशील समाज निर्मिती हे त्यांचे उद्दिष्ट होते. ही दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे हे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच एका आयुष्यात हे परिवर्तन घडून येणार नाही याची जाणीव सुद्धा त्यांना होती. त्याच वेळी कशानेही खचून न जाता सतत कार्यशील राहण्याची सवय त्यांच्या अंगवळणी पडली होती. आपण निवडलेल्या मार्गावर दृढ विश्वास तर होताच.
‘दाभोळकर’ या अलौकिक बुद्धिमत्तेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात जन्म घेऊन मीरज वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे डॉक्टरकी मिळवल्यानंतर डॉ. नरेंद्र यांना वैद्यकीय क्षेत्रातच मानाचे स्थान मिळविणे सहज शक्य होते. तेथे त्यांना खोऱ्याने पैसा ओढता आला असता. सातारा येथील उदय मंडळाच्या क्रीडांगणावर नित्यनेमाने पाणी मारता मारता कबड्डीमधे पारंगत झालेल्या आणि त्या क्षेत्रातील दोन दोन शिव छत्रपती पुरस्कार मिळवलेल्या डॉ. दाभोळकर यांना त्याच क्षेत्रात वाटचाल करूनही भरपूर माया आणि अत्युच्च पदांचा लाभ झाला असता. थोडेफार नाव कमावलेल्या साहित्य वा सामाजिक क्षेत्रातील वाचाळवीरांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच नव्हे तर कायदेमंडळातही सामावून घेण्यास राजकीय पक्ष टपूनच असतात. या मार्गे अंथरलेल्या पायघड्यांवरून त्यांना आमदार खासदार होणेही अवघड नव्हते. यापैकी एकही मार्ग त्यांना मोहात पाडू शकला नाही. भौतिक सुखाच्या अनेक संधी खुणावत असतानाही डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समाजसेवेचा काटेरी मार्ग निवडावा हे विसाव्या शतकातील दुर्मिळ आणि म्हणूनच आश्चर्यकारक उदाहरण आहे.
झोपडपट्टयातून मोफत औषधोपचार देण्यापासून अनाथांसाठी वसतीगृह उभारण्यापर्यंत अनेक उपद्व्याप डॉक्टरांनी केले. त्यांनीच स्थापन केलेल्या समाजवादी युवक दलातर्फे साताऱ्यातील तरुणाईला यदुनाथ थत्ते, प्रधान सर आणि नरहर कुरुंदकर यांचे विचारधन प्राप्त व्हावे म्हणून सातत्याने व्याख्याने तथा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. बाबा आढाव यांची ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ खेडोपाडी पोहोचविण्यासाठी गाव चावडीवर, वेशीबाहेरील वस्त्यांवर व उघड्या माळरानातही अनेक रात्री जागवल्या. १९७५च्या आणीबाणीला त्यांनी यथाशक्ती विरोध केला. तेव्हाही जनता पक्षाचे जू त्यांना खांद्यावर घेता आले असते. त्यामध्ये तर राजकीय लाभ निश्चित होता. तो राजमार्ग सोडून योगायोगाने गवसलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची पायवाट चालणे त्यांना श्रेयस्कर वाटले. स्वतःसाठी काहीही नको असलेला डॉ. दाभोळकरांमधील कार्यकर्ता अंधश्रद्धा निर्मूलनाकडे परिवर्तनाचे साधन म्हणून पहात होता. देवा धर्माचा निषेध म्हणून नव्हे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे खऱ्या अर्थाने गांधीवादी होते. पण त्यासाठी त्यांना गांधी टोपी परिधान करण्याची गरज पडली नाही. नाही म्हणायला त्यांच्या स्कूटरच्या स्टेपनी कव्हर वरील ‘निर्भय बनो’ या ठसठशीत अक्षरांतून त्यांचे गांधी प्रेम सातारकरांना पहायला मिळाले होते. महात्मा गांधी या व्यक्तीवरील आणि गांधी विचारांवरील त्यांची निष्ठा स्वतःच्या साध्या राहणीतून आणि मवाळ बोलण्यातून व्यक्त होत होती. त्यांच्या लोभस हसण्यातूनही गांधीजींचे खट्याळ हास्य डोकावत असे. गांधी वरील डॉक्टरांची ही भक्ती त्यांच्या सर्वसमावेशकतेतून, सत्यनिष्ठेतून, निस्पृहतेतून, साधेपणातून, अहिंसकतेतून, सहनशीलतेतून, निर्भयतेतून आणि संयमशील तरीही प्रभावी युक्तिवादातून वारंवार प्रतिबिंबित झाली आहे. खरेतर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञानेश्वरांची प्रज्ञा, तुकारामांचे धैर्य, गांधीजींची प्रांजळता, डॉ. आंबेडकरांची बुद्धिमत्ता आणि न्या. रानडे ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंतच्या एकूण एक समाज सुधारकांच्या शिकवणुकीचे सार सामावलेले होते. तेराव्या शतकात जन्म घेणारे ज्ञानदेव जर विसाव्या शतकात जन्माला आले असते तर त्यांनी तेच केले असते जे दाभोळकरांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी देव आणि धर्म या संकल्पना कधीच नाकारलेल्या नाहीत. स्खलनशील मानव जातीची ही अपरिहार्य गरज त्यांना मान्य होती. ते कदाचित अज्ञेयवादी असतील पण नास्तिक नव्हते. वारकरी पंथातील जात धर्म विरहित एकोप्याचे त्यांना कौतुक होते. वारकऱ्यांमधील निरपेक्ष प्रेम त्यांना सुखावत असे. एकमेकांना मिठी मारून पदस्पर्श करण्याची म्हणजेच समोरच्या माणसाला देव मानण्याची प्रथा त्यांना थोर वाटे. डॉक्टरांचा विरोध होता तो केवळ देवाधर्माचे नावे सर्वत्र सुरू असलेल्या लुबाडणुकीला. कर्मकांडाला त्यांचा आक्षेप ज्ञानोबारायांच्या जातकुळीतला असूनही त्यांनी तो सौम्य शब्दात व्यक्त केला आहे. विवेकी विचारांचा त्यांचा आग्रहही तुकाराम महाराजांच्या सडेतोडपणापेक्षा थोडा मृदू भासतो. कदाचित साधनेचे संपादकत्व सांभाळताना अनुसरलेल्या साने गुरुजींच्या सोज्वळ संवेदनशीलतेचा वारसा ते जपत असावेत. गणेशोत्सवास त्यांनी कधीच विरोध केला नाही. त्यांचा विरोध प्रदूषणाला आणि पर्यावरणाच्या हानीला होता.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ निमित्त होते. त्यांच्या परिवर्तनाच्या लढ्यासाठी एक साधन होते. असीम त्यागांनंतर, अथक परिश्रमातून, दीर्घ विचारमंथनाद्वारे भारतीयांना प्राप्त झालेल्या राज्य घटनेतील स्वातंत्र्य समतादि मूल्यांसह धर्म निरपेक्षता आणि वैज्ञानिकता प्रत्यक्ष जीवनात अनुभवायला मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा होती. तोच त्यांचा ध्यास होता.
या ध्यासातूनच त्यांची चळवळ उभी राहिली. चळवळीचे सामर्थ्य वाढत जाऊ लागताच अनायासेच अविचारी, स्वार्थी, अहंकारी व हिंसक तत्त्वांना बळी पडण्याचे प्राक्तन एक समाजसुधारक म्हणून दाभोळकरांच्याही नशिबी आले. विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचीही हत्या झाली. सत्य अहिंसा दया क्षमा शांती समानता अशा अनेक मानवी मूल्यांच्या संवर्धनाचा व समाज प्रबोधनाचा, ज्ञानेश्वर – तुकाराम – गांधीजी – दाभोळकर मार्गे सुरू असलेला प्रवाह २० ऑगस्ट २०१३ रोजी खंडित करण्यात आला. बाराव्या स्मृतीदिनी दाभोळकरांना केवळ श्रद्धांजली अर्पण करून भागणार नाही. विवेकवाद आणि वैज्ञानिकतेचा मार्ग प्रशस्त करणारी प्रबोधनाची वाट चोखाळत रहावे लागेल.
वसंत देशमाने
vsdeshmane@gmail.com