अतुल सोमेश्वर कावळे

नेमेचि येतो पावसाळा आणि नागपूरला करून जातो खिळखिळा अशी नागपूरची दरवर्षीची अवस्था होऊन बसली आहे. यंदाही त्याचा प्रत्यय आलाच. नागपूरच्या रस्त्यांचा विकास करताना सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करताना जाणते अजाणतेपणी काहीतरी कुठेतरी गफलत झाली आहे असे दरवर्षी पावसाळ्यात सिद्ध होत आहे. अर्थात ज्या काही चुका झाल्या असतील त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आता क्रमप्राप्त होऊन बसले आहे.

rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
Heat stroke, Maharashtra
राज्यावर उष्माघाताचे संकट! जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे वाढला…

सतत तीन चार दिवस पाऊस आला की (आणि तो येतोच) अंबाझरी जलाशय तुडुंब भरले जाऊन ओव्हरफ्लो होतो. हे पाणी पश्चिम नागपुरमधील अंबाझरीच्या आजूबाजूच्या खोलगट भागात शिरते आणि तिथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडतो. हे चित्र दरवर्षीच पाहायला मिळते. इकडे छत्रपती चौकातील रेल्वे पुलाच्या खालीही इतके पाणी साचते की हा मार्गच बंद होऊन जातो आणि मोटरद्वारे पाण्याचा उपसा करावा लागतो. प्रतापनगर चौक ते त्रिमूर्तीनगर चौक दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. शंकरनगर चौकाचेही तेच हाल आहेत. आणि सीताबर्डी भागाचे हाल तर काही विचारू नका. संपूर्ण शहरभर कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती होते आणि हे दरवर्षीचेच चित्र आहे. पण अजूनही प्रशासनाला यावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढता आला नाही.

दरवर्षीच्या या पावसाळी समस्येवर माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे मी खालीलप्रमाणे दोन उपाय सुचवीत आहे.

पहिला उपाय असा की अंबाझरी तलाव ते नागपूर शहरातील सर्व तलाव हे भूमिगत अथवा बहिर्गत (जे शक्य असेल ते) मोठ्या पाइपलाइनद्वारे कायमचे जोडण्यात यावेत. त्याचा फायदा असा होईल की अंबाझरी तलावातील अतिरिक्त पाणी शहरातील अन्य तलावांत सोडता येईल आणि रस्त्यांवर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. शहरात सोनेगाव तलाव, शुक्रवारी तलाव, फुटाळा तलाव, गांधीसागर तलाव असे मोठमोठे तलाव आहेत जे पावसाळ्यात सुद्धा तुडुंब भरत नाहीत. हे सगळे तलाव मोठ्या पाइपलाइनद्वारे एकमेकांशी जोडण्यात आले तर पावसाचे सगळे पाणी रस्त्यांवर वाया न जाता त्याचा भरपूर मोठा साठा शहरात नेहमीसाठी उपलब्ध राहील. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील पाण्याची टंचाई दूर करता येईल. शिवाय एखादेवेळी दुष्काळ पडला तरी सगळी जलाशये भरलेली राहिल्याने पाण्याची फारशी टंचाई उद्भवणार नाही.

दुसरा उपाय असा की रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी २०-२५ मीटर अंतरावर सुमारे २० ते ३० फूट खोलीच्या चार ते सहा इंच व्यासाच्या कूपनलिका खोदण्यात याव्यात. त्यावर लोखंडी जाळी लावण्यात यावी. पावसाळ्यात या कूपनलिकांद्वारे रस्त्यावर वाहणारे पाणी थेट भूगर्भात जाईल. त्यामुळे रस्त्यावर पाणी तर साचणार नाहीच, पाणी थेट भूगर्भात गेल्यामुळे शहराचा भूजल स्तर वाढण्यास मदत होईल. त्यामुळे शहरातील विहिरींना, बोअरवेल्सना मुबलक पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचाई दूर होईल. शहराचे प्रचंड प्रमाणात सिमेंटीकरण झाल्यामुळे शहराचे तापमान प्रचंड वाढले आहे. भूगर्भातील जलस्तर वाढल्यामुळे तापमान कमी होण्यास मदत होईल. झाडांची वाढ होईल. या कूपनलिकांवर छोटी झाडे, लोखंडी कठडे लावावेत. त्यामुळे कुपनलिकांची तोंडे बंद होणार नाहीत. दोन कूपनलिकांच्या मधील भागात झाडे लावावीत. या झाडांमुळे जमिनीची झीज होणार नाही. प्रत्येक कूपनलिकांच्या खाली पाण्याचा साठा तयार झाल्यामुळे या झाडांनाही वाढीसाठी भूगर्भातच मुबलक पाणी उपलब्ध होईल. या कुपनलिका काही काळाने बंद होऊ शकतात किंवा त्यांची खोली कमी होऊ शकते. असे झाल्यास त्या पुन्हा स्वच्छ करण्याची किंवा त्यांची खोली पूर्ववत करण्याचीही व्यवस्था करावी.

हे दोन उपाय केल्यास नागपूर शहरात पूर परिस्थिती तर निर्माण होणार नाहीच, पाणी टंचाईसुद्धा होणार नाही. नागपूर शहरात ही योजना यशस्वी ठरल्यास देशाच्या अन्य शहरांतही ही योजना राबविता येईल. त्यामुळे नागपूर मनपा आणि राज्याचा पाटबंधारे विभाग यांना विनंती आहे की या दोन उपायांवर गंभीरपणे विचार करावा आणि ते लवकरात लवकर अंमलात आणावे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तुत विषयात जातीने लक्ष घालून उपरोक्त उपाय कार्यक्षम ठरू शकतील काय याचा आढावा घेऊन संबंधित विभागांना हे उपाय करण्याबाबत सूचना द्याव्यात आणि दरवर्षी पावसाळ्यात नागपूरची दैना उडून नागपूरकर जनतेला जो त्रास सहन करावा लागतो त्यापासून जनतेची सुटका करावी ही विनंती.

E-Mail : atulskawale@yahoo.co.in