-यशवंत थोरात

मी काही इतिहासकार नाही आणि माझा तसा भ्रम देखील नाही. मला ऐतिहासिक पुरावे तपासण्याचं औपचारिक शिक्षण मिळालेलं नाही. म्हणून, मी जे मांडतोय, त्यावर काही प्रमाणात संशयाचं धुकं असणं साहजिक आहे. माझा युक्तिवाद तर्क आणि सामान्यज्ञान यावर प्रामुख्यानं आधारित आहे. त्यामुळेच, कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज (द्वितीय) यांनी केलेल्या युरोप-प्रवासाबद्दल आणि त्या प्रवासात त्यांनी लिहिलेली दैनंदिनी आता पुस्तकरूपानं पुन्हा उपलब्ध झाली असल्यामुळे तर अधिकच- मला दोन प्रश्न पडतात.

पहिला प्रश्न म्हणजे, या अवघ्या २० वर्षाच्या राजकुमाराने – धार्मिक बंदी असताना – स्वेच्छेनं समुद्र ओलांडून – पश्चिमेचा असामान्य प्रवास करण्याची परवानगी ब्रिटिशांकडे का मागितली असेल? ती परवानगी मिळवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागलेला असताना, तो राजकुमार मुंबईत शांतपणे का थांबला असेल ? त्यानं हा दौरा करण्याचा उद्देश नेमका काय होता? आणखी एक प्रश्न: परंपरावादी ब्रिटिश सरकारला त्या राजकुमाराची विनंती मान्य करायला, कोणत्या गोष्टींनी भाग पाडलं ज्यामुळे असा औपचारिक दौरा करणारे राजाराम महाराज, हे पहिले भारतीय राजे बनले? या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी मिळणारी नाहीत.

भविष्यातील संशोधन यावर अधिक प्रकाश टाकेल, पण आजच्या घडीला, तीन गोष्टींचा शोध घेणं आवश्यक आहे एक — राजाराम महाराज यांचा जीवनकाळ, दुसरं – त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव झाला आणि तिसरं – त्यांनी परदेश प्रवासामध्ये लिहिलेली डायरी. राजाराम महाराज हे एकोणिसाव्या शतकाचं (१८०० ते १८९९) अपत्य होतं – महाराजांचा जन्म या शतकाच्या मध्यावर म्हणजे १८५० ला झाला आणि त्यानंतर, बरोबर २० वर्षांनी (१८७० मध्ये) त्यांचं निधन झालं. जेव्हा आपण एकोणिसाव्या शतकाबद्दल बोलतो, तेव्हा आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे, की या शतका इंग्लंड आणि युरोपला आकार देणारे विचार आणि शक्ती, या तत्कालीन भारताला आकार देणाऱ्या कल्पना आणि शक्तींपेक्षा फार वेगळ्या होत्या. त्या काळात इंग्लंड जागतिक सत्ता बनण्याच्या मार्गावर होता; तर भारत हा परकीयांच्या ताब्यात असलेला एक देश होता.

पाश्चात्त्य जगात, १९ वं शतक हा फक्त एक ऐतिहासिक कालखंड नव्हता, तर एका नव्या युगाचा उदय होता- नवे शोध, नवे विचार, आणि नव्या बदलांनी भरलेला.याच शतकात डार्विननं उत्क्रांतीवाद मांडला, लुई पाश्चरनं जिवाणू- विषाणूंच्या परिणामांबद्दल आडाखे बांधले, मारी क्युरी यांनी किरणोत्सारी रेडियम जगासमोर आणलं. तारायंत्र आणि दूरध्वनीमुळे संवाद क्षणात शक्य झाला, वाफेचं इंजिन आणि लोहमार्ग यांमुळे वाहतूक जलद आणि स्वस्त झाली, विजेमुळे तर शहरीकरणाला नवा आयाम मिळाला.

बदल फक्त प्रयोगशाळेत नव्हे, तर समाजातही घडत होते. ॲडॅम स्मिथ, रिकार्डो आणि जॉन स्टुअर्ट मिल यांनी मुक्त बाजारपेठेच समर्थन केलं, तर दुसरीकडे का भांडवलशाहीवर जहाल टीका करत कामगारांच्या शोषणाचं, असमानतेचं आणि कामाच्या अमानवी परिस्थितीचं भान समाजाला दिलं. या विचारसरणींचा प्रभाव इतका खोलवर होता की, १८२० ते १८४८ या कालखंडात, युरोपमध्ये विविध ठिकाणी राजेशाहीला हादरे बसले. लोकशाही, समता आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या. या साऱ्या बदलांनी इंग्लंड आणि युरोपमध्ये एक नवं आणि गतिशील युग निर्माण केलं, यात शंका नाही.

पण खरा प्रश्न असा आहे की, राजाराम महाराजांना या सर्व घटनांची कितपत कल्पना होती? आपण हे जाणतो की, त्यांचं शिक्षण ब्रिटिशांच्या देखरेखीखाली झालं. पोलिटिकल एजंट कर्नल ॲण्डरसन हे चीफ ॲडमिनिस्ट्रेटर, तर कॅप्टन वेस्ट हे गार्डियन- कम्पॅनियन आणि प्रत्यक्ष शिक्षक म्हणून जमशेटजी ऊनावाला हे बुद्धिमान पारसी गृहस्थ अशांच्या सहवासात आणि या शिक्षणपद्धतीतून राजाराम महाराज इंग्रजी साहित्य आणि भाषा यामध्ये पारंगत झाले, इतिहासाची त्यांना आवड होती आणि मराठ्यांच्या इतिहासाची पुरेशी जाणीव होती. प्रशासन आणि न्यायदान व्यवस्थेत त्यांना रस होता, आणि कॅप्टन वेस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या गोष्टी चांगल्या रीतीने समजून घेतल्या होत्या. एकंदरीत, या तिघाही मार्गदर्शकाच्या मनात राजाराम महाराजांच्या विषयी सकारात्मक भावना होती, अशीही नोंद आहे.

त्यामुळे असा तर्क करता येईल की, महाराजांना इंग्लंडमध्ये जे घडतं आहे त्याची काही ना काही कल्पना असावी. परंतु, ती कल्पना किती परिपूर्ण, किती खरी किंवा पारदर्शक होती, हा वेगळा मुद्दा आहे. कदाचित त्यांच्या शिक्षकांनी त्यांना औद्योगिकीकरणाचे फायदे सांगितले असतील; पण त्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दैन्यावस्था, शोषण, आणि अमानवी परिस्थिती, याविषयी मौन बाळगलं असेल. त्यांनी भांडवलशाहीचं कौतुक केलं असेल; पण श्रीमंत आणि गरीब यांच्यातल्या वाढणाऱ्या दरीकडे दुर्लक्ष केलं असेल. उत्पादन आणि मालकी ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसून, ती संपूर्ण समाजाची असते, यासारख्या समाजवादातल्या विचारांपासून त्यांना नक्कीच लांब ठेवलं गेलं असेल.

लंडनच्या ‘इंडिया ऑफिस लायब्ररी’नं २०२२-२३ मध्ये खुली केलेली गोपनीय कागदपत्रं दाखवतात की भारतीय राजपुत्रांच्या शिक्षणासंदर्भात ब्रिटिशांचं धोरण स्पष्ट होतं – ते म्हणजे असे राजे घडवणे जे ‘ब्रिटिश साम्राज्य महान आणि चांगले आहे’ यावर पूर्ण विश्वास ठेवतील आणि आपापल्या संस्थानाचे राज्य, ब्रिटिश विचार-धारेनुसारच चालवतील. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की, शिक्षणाद्वारे राजाराम महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणून नव्हे, तर साम्राज्याच्या व्यवस्थेतील ‘कनिष्ठ भागीदार’ म्हणून घडवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी नक्कीच केला असावा.

पण मग, महाराजांच्या मार्गदर्शकांनी त्यांना भारताविषयी आणि भारतीय इतिहासाविषयी काय सांगितलं असेल? त्यांनी नक्कीच त्यांच्यासमोर ब्रिटिश सत्तेचं आणि त्यामुळे भारताला झालेल्या फायद्याचं सुंदर चित्र उभं केलं असणार. ते कितपत खरं असेल माहीत नाही. परंतु राजाराम महाराजांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून आपल्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न जरूर केला असेल. या लोकांनी त्यांना सांगितलं असणार की, तिसऱ्या पानिपत युद्धातल्या पराभवानंतर सुध्दा, मराठ्यांनी लाल किल्यावर भगवा फडकवण्यात जवळपास यश मिळवलं होतं. त्यांनी हेदेखील सांगितलं असणार की, १८१८ मध्ये तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवल्यामुळे मराठा युगाचा अंत झाला होता. मराठ्यांचा राजा म्हणून त्यांना याचं दुःख झालं असेल. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर ईस्ट इंडिया कंपनीनं प्रथम आपले युरोपीय प्रतिस्पर्धी दूर केले, व्यापारी मक्तेदारी निर्माण केली आणि नंतर थेट किंवा संस्थानांशी करार करून साम्राज्य उभं केलं, या कंपनीनं स्वत: निर्माण केलेल्या परिस्थितीमुळेच व्यापक परंतु अयशस्वी असा १८५७ चा उठाव झाला होता. हा उठाव राजाराम महाराजांचे वय सात वर्ष असताना मेरठमध्ये सुरू झाला आणि १३ महिन्यांनी ग्वाल्हेर इथं संपला.

त्यांना या कथेची दुसरी बाजूही कळली असेल की ही काही मूठभर सैनिकांनी केलेली बंडखोरी नव्हती, तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं. बंडखोरांचा आवाज केवळ उत्तर भारतातच नाही, तर कोल्हापूरच्या राजवाड्यापर्यंत घुमला होता ज्यामध्ये पूर्वीच्या छत्रपतींचे भाऊ – चिमासाहेब महाराजांचा – नानासाहेब आणि इतर नेत्यांशी संबंध असण्याच्या अफवांचा समावेश होता. राजाराम महाराजांना असंही कळवण्यात आलं असेल की जरी त्यावेळी राज्याची अधिकृत भूमिका ब्रिटिशांसोबत असली, तरी चिमासाहेबांवर ‘२७ नेटिव्ह इन्फन्ट्री’नं केलेल्या उठावाच्या संशयावरून, ब्रिटिशविरोधी कारवाईचा ठपका ठेवून त्यांना कराचीला पाठवलं गेलं. उठावानंतर ब्रिटिशांनी कोल्हापूरच्या लोकांवरही क्रूर आणि अमानुष बळाचा वापर केला, संदेश स्पष्ट होता – सहमत व्हा, अन्यथा परिणाम भोगा, जुळवून घ्या नाहीतर…

मला माहीत आहे की, चिमासाहेबांच्या बाबत स्थानिक स्तरावर फारशी कागदपत्रं उपलब्ध नाहीत. मात्र, याचा अर्थ असा नाही की, ती अस्तित्वातच नाहीत. १८५७ च्या उठावासंबंधी कागदपत्रं आज इंडिया ऑफिस तसंच ब्रिटिश लायब्ररीत उपलब्ध आहेत. ती गोळा करण्याची गरज आहे, ज्यामुळे चिमासाहेब महाराजांची गोष्ट आपल्याला पूर्णपणे आणि नीटपणे सांगता येईल आणि आपल्या खऱ्या इतिहासाचा वारसा भावी पिढीला देता येईल. कोल्हापूरचं, या नगरीच्या इतिहासाचं एवढं देणं आपण नक्कीच लागतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, राजाराम महाराजांना माहीत असेल की उठावानंतर ब्रिटिशांनी ‘संस्थानिकांबाबतच्या धोरणा’त मूलभूत बदल केला होता. त्यापूर्वी त्यांची धोरणं प्रादेशिक विस्तारासाठी आणि संस्थानं ब्रिटिश भारतात सामावून घेण्यासाठी होती. व्हिक्टोरिया राणीनं एक नोव्हेंबर १८५८ च्या जाहीरनाम्यात “संस्थानिकांनी ब्रिटिश राजसत्तेच्या निष्ठेची शपथ घेतली, तर त्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याची” घोषणा केली. यामुळेच संस्थानिकांसाठी खालसा धोरणा ऐवजी आमिष दाखवणारे धोरण आणि सामान्य लोकांसाठी – जे प्रामुख्याने हिंदू आणि मुसलमान होते – ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अंमलात आलं, ज्यामुळे पुढल्या काळात देशाचं विभाजन झालं.

मी दोन प्रश्न उपस्थित केले होते : एक, राजाराम महाराजांचा हा दौरा करण्यामागील हेतू काय होता आणि दोन , ब्रिटिश सरकारला त्यांची विनंती मान्य करायला कोणत्या गोष्टीने भाग पाडले ज्यामुळे असा औपचारिक दौरा करणारे ते पहिले भारतीय राजे बनले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एकोणिसाव्या शतकाचा ऐतिहासिक संदर्भ आपण थोडक्यात पाहिला, पण त्या काळात महाराजांनी लिहिलेल्या डायरीचं आकलन गरजेचं आहे. त्यातही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यातले त्यात सोपं आहे कारण राजाराम महाराजांकडून दौऱ्याची विनंती नवीन धोरण लागू झाल्यानंतर करण्यात आली होती. या धोरणा अंतर्गत, संस्थानिकांना आमिष दाखवून खुश ठेवलं जाणार होतं. मग परवानगीला ब्रिटिशांनी इतका वेळ का लावला? कदाचित ब्रिटिशांच्या मनात चिमसाहेबांच्या हद्दपारीची आठवण असावी आणि दुसरे साधेच कारण म्हणजे सरकारचे काम सावकाश चाललेले असते ज्याला ब्रिटिश सरकार अपवाद नव्हते.

पण राजाराम महाराजांचा हा दौरा करण्यामागचा हेतू काय होता, यासाठी त्यांची दैनंदिनीच पाहावी लागेल. या दैनंदिनीची (पुस्तकरूप) प्रत जेव्हा माझ्याहाती आली तेव्हा सुरुवातीला वाटलं की, ती एका मर्यादित राजेशाही दृष्टिकोनातून लिहिलेली, औपचारिक निरीक्षणांची नोंद असेल. पण जसजसं वाचत गेलो, तसतशी त्यांच्या विचारांमधली प्रगल्भता जाणवली. डायरीचं गांभीर्य लक्षात यायला थोडा वेळ लागला पण हळूहळू मला जाणवू लागलं की, ही डायरी दोन स्तरावर लिहिली गेली आहे. एक स्तरावर ही डायरी, राजाराम महाराजांनी सार्वजनिक वाचकांसाठी लिहिलेली ‘पोलिटिकली करेक्ट’ अशी नोंद आहे. आणि दुसऱ्या स्तरावर ती महाराजांच्या मनातल्या आकांक्षांची ‘ब्लू प्रिंट’आहे – असा आराखडा ज्याची जाणीव, त्यांना आपल्या सहकाऱ्यांना किंवा ब्रिटिश ‘पोलिटिकल ऑफिसरां’ना करून द्यायची नव्हती.

परंतु का? याचा उलगडा करण्यासाठी मी तर्क आणि हाताशी असणारी माहितीच्या आधारे, ज्या ज्या व्यक्तींना व संस्थांना महाराजांनी भेटी दिल्या त्यांचं उद्देशानुसार वर्गीकरण केलं. त्यानंतर जे समोर आलं, ते लक्षवेधी होतं –

राजाराम महाराज ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांमधल्या चर्चांना उपस्थित होते / ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये ते शिक्षण धोरणासंबंधीची चर्चा ऐकण्यासाठी बसले / त्यांनी व्हिक्टोरिया राणीची पहिल्यांदा विंडसर पॅलेस आणि नंतर बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतली / ते ब्रिटिश सरकारच्या सदस्यांना भेटले आणि तत्कालीन पंतप्रधान विल्यम ग्लॅडस्टन यांच्या साधेपणाने प्रभावित झाले / त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट देऊन कुलगुरू आणि प्राध्यापकांशी संवाद साधला / ‘इंडिया ऑफिस’ला भेट दिली / भारताला जोडणाऱ्या तार-सेवेच्या उद्घाटनावेळी ते हजर होते / त्यांनी ‘ईस्ट इंडिया असोशिएशन’सारख्या संस्थेला भेट दिली जी त्याकाळी भारतीय नेत्यांच्या व लोकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहचवणारा दुवा ठरली होती / त्यांनी ही संस्था स्थापन करणारे आणि भारतीय राष्ट्रवादाचे जनक असलेल्या दादाभाई नौरोजींची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली / ‘बँक ऑफ इंग्लंड’ आणि मुख्य टपाल कार्यालयात त्यांनी आपला संपूर्ण दिवस घालवला / आणि काउंटी कोर्टामध्ये फौजदारी खटल्यांची सुनावणी ऐकण्यासाठी ते गेले. या सर्व गोष्टी आश्चर्य करण्यासारख्याच आहेत. अवघ्या २० वर्षांच्या एका तरुण राजकुमारानं हे सारं केलं आहे. कुठं जायचं हे ठरवण्यातून त्यांच्या विचक्षण बुद्धीची कल्पना आज करता येतेच; वयाच्या मानानं ते प्रगल्भ होते हेही कळतं, पण या साऱ्या भेटीगाठींचा उद्देश काहीतरी नक्कीच असेल ना? तो काय होता?

या भेटींचं विश्लेषण केल्यावर लक्षात आलं की, जरी या प्रवासाचा आराखडा सरकारने मंजूर केला असला, तरी कोणत्या संस्था आणि व्यक्तींना भेटायचं, हे स्वत: महाराजांनी ठरवलं असावं कारण त्यांच्या या भेटी आणि बैठकांमधून एक सूत्र दिसून येतं. या दौऱ्यामागची ‘किल्ली’ ही आहे की, महाराजांनी जाणीवपूर्वक अशा संस्थांची निवड केली ज्या त्यांना आपल्या कोल्हापूर संस्थानात उभ्या करायच्या होत्या. ते जाणीवपूर्वक अशा सक्षम व्यक्तींना भेटले जे त्यांच्या मनातल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांना मार्गदर्शन करू शकले असते. म्हणून, ही डायरी केवळ त्याकाळच्या वास्तवाची नोंद नाही, तर कोल्हापूरला एकोणिसाव्या शतकाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा उद्देश आणि दूरदृष्टीचं प्रतिबिंबदेखील आहे, याचा पक्का अंदाज बांधता येतो.

दूरदृष्टी, हेतू आणि आकांक्षा यांच्या संगमामुळेच राजाराम महाराज — राजा म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून — वेगळे ठरतात. या दृष्टिकोनातून पाहिलं, तर असं म्हणता येईल की जर शाहू महाराज प्रत्यक्ष साकारलेल्या कार्यांमुळे वंदनीय असतील, तर राजाराम महाराज त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता आणि संभाव्यतेसाठी आठवणीत ठेवले पाहिजेत. शाहू महाराज जसं भव्य साकारलेलं चित्र आहेत, तसं राजाराम महाराज एक भव्य स्वप्न आहेत जे साकार झालं असतं तर स्वातंत्र्यापूर्वीच कोल्हापूर हे मनानं, आत्म्यानं आणि मूलभूत सुविधांनी आधुनिक शहर बनलं असतं आणि शाहू महाराजांनी नंतरच्या काळात घडवून आणलेले सामाजिक बदल अधिक खोलवर रुजून मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले असते.