डॉ. राजेंद्र डोळके

इतिहास हा घडून गेलेल्या गोष्टींचा असला तरी तो लिहिणारी शेवटी माणसेच असतात. विशिष्ट दृष्टिकोन मनात ठेवूनच ती आपले काम करत असतात. त्यामुळे खरा इतिहास आणि खोटा इतिहास असे काही खरोखरच असते का, या प्रश्नाची चर्चा होणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे हा मुद्दा लक्षात घेऊन इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या प्रयत्नांकडे बघितले तर कुणाचेही डोळे उघडू शकतात.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

कलाघ्य: स एन गुणवान् रागद्वेषबहिष्कृता।

भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती।। (१-७)

असे ‘राजतरंगिणी’कार कल्हण आपल्या ग्रंथात म्हणतो. याचा अर्थ असा की, धन्य तो गुणी इतिहासकार ज्याची वाणी, अनुराग व द्वेष यांनी विकृत न होता, सत्यकथनामध्ये निश्चल राहते. ‘खऱ्या’ इतिहासकाराचे लक्षण किती मार्मिक शब्दांत सांगितले आहे कल्हणाने यात!

जिज्ञासा ही मनुष्याची उपजत वृत्ती आहे. या वृत्तीतूनच इतिहासाची निर्मिती होत असते. आपले पूर्वज कसे होते, त्या काळचे जीवन कसे होते यांसारख्या कुतूहलापोटीच मनुष्य आपल्या भूतकाळात म्हणजेच इतिहासात लक्ष घालत असतो. अर्थात मनुष्य जेव्हापासून आहे तेव्हापासूनच इतिहासाची सुरुवात मानावी लागते. ग्रीसमधील हिरॉडटस हा पाश्चिमात्य जगातील पहिला इतिहासकार मानला जातो. आपल्याकडेही फार प्राचीन काळापासून या विषयाला महत्त्व दिले गेले असे दिसते. छांदोग्य उपनिषदात इतिहासाला पाचवा वेद असे म्हटले आहे. ‘इतिहासपुराणं पंचमं वेदानांवेदम’ (७/१-२). रामदास हे अध्यात्माप्रमाणेच समाजाच्या प्रश्नांविषयी जागरूक असणारे असे संत होते. त्यांनी समाजात प्रचंड उलथापालथ करण्याचे सामथ्र्य असलेल्या या विषयाचे महत्त्व ओळखले होते आणि आपल्या ‘दासबोधा’तून या विषयावर विवेचन केले. आधुनिक काळातील विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे यांनी या विषयाचे महत्त्व ओळखून त्यावर केलेले लिखाण प्रसिद्धच आहे.

काटेकोरपणे पाहता निर्भेळ इतिहास म्हणून ज्याला म्हणता येईल त्याचे काम फक्त झालेल्या प्रसंगाची विश्वसनीय हकीकत देणे एवढेच आहे. अर्थात इतिहास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या गोष्टींचे यथातथ्य वर्णन. इतिहास या शब्दाची व्युत्पत्तीच ‘इति ह आस’ म्हणजे ‘असे झाले, याप्रमाणे घडले’ अशी आहे. ‘सत्यकथन’ हा इतिहासाचा आत्मा असतो. म्हणूनच सर्वात श्रेष्ठ सत्यवाङ्मय अशी इतिहासाबद्दल ख्याती आहे.

असे असताना ‘खरा इतिहास’ आणि ‘खोटा इतिहास’ असे काही असते का? आणि एकदा इतिहास लिहिला गेला असताना तो पुनश्च लिहिण्याची काही आवश्यकता आहे का? तो लिहिण्याची आवश्यकता तेव्हा असते, जेव्हा तो इतिहास खोटा, अपुरा अथवा अर्धवट आहे हे सिद्ध करण्याची नवीन इतिहास साधने उपलब्ध होतात तेव्हा! संशोधन ही एक नित्य चालणारी प्रक्रिया आहे. नवीन साधने उपलब्ध झाली की जुने निष्कर्ष बदलावे लागतात. यालाच इतिहास संशोधन म्हणतात. पण असे काहीही झालेले नसताना आहे तोच इतिहास खोटा ठरवून त्यालाच नव्या स्वरूपात सादर करणे अथवा त्यात बदल करणे यामागील हेतू समजून घेणे आवश्यक ठरते.

घटना घडत असताना अथवा घटनेच्या जास्तीत जास्त जवळ असणाऱ्या काळातील लिखाण हे जास्तीत जास्त विश्वसनीय समजले जाते. अर्थात हेही लेखन १०० टक्के सत्य नसते असा इतिहासाच्या अभ्यासकांचा दावा असतो. कारण अप्रामाणिकपणा, विशिष्ट गोष्टींचा अभिमान, अतिशयोक्तीची आवड, ठासून प्रतिपादन करण्याच्या सवयीपासून मनुष्य सर्वस्वी अलिप्त राहू शकत नाही. ज्या व्यक्तींविषयी इतिहास लिहावयाचा त्याबद्दलही जनमानसात रागलोभ व पूर्वग्रह असतात. नेपोलियनला पूज्य मानणारी तसेच राक्षसाप्रमाणे दुष्ट समजणारी दोन्ही प्रकारची माणसे त्याच्या काळात होती. इतिहासलेखनाची वर्तमानकाळातील ही स्थिती, भूतकाळातील स्थितीबद्दल तर बोलायलाच नको. प्रत्येक इतिहासकार आपल्या विशिष्ट गोष्टींचा अभिमान मनात केंद्रवर्ती ठेवून त्यानुसार इतिहासलेखन करतो अथवा उपलब्ध इतिहासातून तसे निष्कर्ष काढतो.

एखाद्या दृश्याचे चित्र ज्या वेळी चित्रकार रंगवतो त्या वेळी आपल्या दृष्टीच्या टप्प्यात जे जे काही येईल ते सर्व चित्रपटावर रेखत नाही तर इष्ट वस्तू तेवढीच ठळकपणे नजरेस यावी या दृष्टीने तो ते चित्र रेखाटेल. बाकीचे सहज दिसणार नाही अशा रीतीने रेखाटेल अथवा अजिबात फाटा देईल. इतिहासकारांचेही असेच असते. इतिहासातून आपल्याला सोयीस्कर असलेली बाजू अथवा पाहिजे असलेले निष्कर्ष समोर आणण्याची तो पुरेपूर काळजी घेतो. कारण एकाच इतिहासातून अनेक निष्कर्ष निघू शकतात. १८५७ च्या उठावासंबंधी ‘ते स्वार्थसाधूंचे एक बंड होते’ आणि ते ‘एक महान स्वातंत्र्ययुद्ध होते’ अशा दोन पक्षांच्या दोन भूमिका सारख्याच आवेशाने मांडल्या गेल्या होत्या. डॉ. आंबेडकर ‘हिंदुचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे’ असे म्हणत असत तर स्वा. सावरकरांनी तो विजयाचा इतिहास आहे हे सांगण्याकरिता ‘सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ लिहिला. सारांश विशिष्ट उद्देशार्थ अथवा प्रचारार्थ इतिहास राबवला जातो आणि तोच ‘खरा’ इतिहास आहे हे सांगितले जाते.

पण हा प्रकार अतिशय घातक आणि जहरी ठरतो जेव्हा, राज्यकर्ते आपल्याला हव्या त्या विशिष्ट कार्याची आणि विचारांची प्रेरणा देण्यासाठी सोयीस्कररीत्या इतिहासाचा उपयोग करतात तेव्हा! आपल्या ईप्सित ध्येयासाठी ते इतिहास व्यवस्थितरीत्या राबवतात. डॉ. सदाशिव आठवले यांनी ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ नावाचा ग्रंथ हा जवळजवळ ४० इंग्रजी पुस्तकांच्या साहाय्याने लिहिला आहे. त्यातील ‘इतिहासाचे दुरुपयोग’ या प्रकरणातील त्यांचे विवेचन लक्षात घेण्यासारखे आहे. ते लिहितात-

‘राजकारणात जनतेच्या भावना चेतवून, त्यांना खेळवून, त्यांना गतकालाची स्मृती देऊन, हुकूमशहा इतिहास कसा बनवितात हे थोडे तपशिलात जाऊन पाहण्यासारखे आहे. अगदी प्राचीन काळापासून महत्त्वाकांक्षी नेत्यांनी कमीअधिक प्रमाणात यशस्वीपणे हे उद्योग केले आहेत. विसाव्या शतकाच्या प्रथमार्धात मुसोलिनीने इटालियन जनतेला संघटित करून एक हुकूमशाही निर्माण केली. पहिल्या महायुद्धानंतर इटालियन लोकांची आर्थिक अवस्था दारुण होती. तेव्हा जनतेला थोडी भाकरी दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या भावनांचा फायदा घेऊन काहीएक कार्यक्रम आखला तर तो यशस्वी होईल असे गणित मुसोलिनीने मांडले. त्याने इतिहासाचा फायदा घेऊन स्वत: आणि मॅरिओ पायोरीसारखे त्याच्या भजनी लागलेले इतिहासकार यांनी इटालियनांना कार्यप्रवण करण्यासाठी इतिहासाला कामाला जुंपले. इटालियनांना सांगण्यात आले की, ‘‘तुम्ही फार मोठे आहात, जगावर राज्य करण्यासाठीच तुमचा सगळय़ांचा जन्म आहे. प्राचीन रोमचे वैभव हा तुमचा वारसा आहे. आपल्याच पूर्वजांनी रोमचे जागतिक साम्राज्य निर्माण केले, ती दोन हजार वर्षांची परंपरा आहे. आणि म्हणून जगावर वर्चस्व गाजवणे हा तुम्हा इटालियनांचा इतिहासाने सिद्ध झालेला असा हक्कच आहे.’’ (पृ. १६८, १६९)

याच काळात जर्मनीत हिटलर हा हुकूमशहा आणि आल्फ्रेड रोझेमबर्ग वगैरे सत्तापूजक इतिहासकार आपल्या जर्मन लोकांनाही काही निराळा इतिहास सांगत होते. ‘‘जर्मनहो, जगावर राज्य करण्याचा हक्क तुमचा आहे, कारण तुम्ही शुद्ध नार्डिक रक्ताचे आहात. तुमच्याखेरीज इतर कोणाच्याही शरीरातून तसे शुद्ध रक्त वाहत नाही. आणि आजपर्यंतच्या मानवजातीचा इतिहास काय सांगतो? राजकारण, समाजकारण, साहित्य, विज्ञान, कला वगैरे सर्व क्षेत्रांत ज्या ज्या महान गोष्टी घडल्या त्या कुणी केल्या? चर्चा करण्याचेच कारण नाही. उत्तमोत्तम गोष्टी फक्त शुद्ध नार्डिक लोकच करू शकतात. त्यांनीच त्या केलेल्या आहेत. इतरांनी काही उद्योग केले, पण त्याला काय अर्थ आहे? मानवी इतिहासातून नार्डिक जर्मन आणि त्यांचे कर्तृत्व काढून घ्या, मग काय उरते? उरतात त्या फक्त मर्कटलीला.’’ (पृ. १६९)

पुढे ते लिहितात, ‘‘यावरून हुकूमशाही राजवटींनी आपापल्या पद्धतीने इतिहासाची राबवणूक कशा प्रकारे केली हे लक्षात येते. त्यातील महत्त्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांचे हेतू सहज समजण्यासारखे आहेत. जनता आपल्या पाठीमागे यावी व आपल्यामागे राहावी त्यासाठी योजलेल्या अनेक हत्यारांपैकी एक म्हणजे इतिहास. पण हे एक हत्यार आहे आणि एक दिवस हे आपल्या मानेवरून फिरण्याचा संभव आहे. याची जाणीव किती तरी काळ सामान्य माणसाला होत नाही. सामान्य माणसाची यात फार मोठी हानी होत असते. अतिरिक्त राष्ट्रवादाने परराष्ट्रीयांना सदासर्वदा शत्रू लेखण्याचे, त्यांचा द्वेष करण्याचे आणि त्यांचा नायनाट करण्याचेच शिक्षण दिले जाते. आणि त्या विघातक कार्यासाठी इतिहासाचा सवंगपणे उपयोग केला जातो.’’

आपल्याकडे पहिल्या वर्गापासूनच इतिहास शिकवला जातो. मोहेंजोदारो संस्कृतीपासून साधारणत: आपल्याकडील इतिहासाला सुरुवात होते. निदान आमच्या वेळी तरी तेथूनच सुरुवात होत होती. त्यानंतर अलेक्झांडर, चंद्रगुप्त, अशोक, मोगल, पेशवे, इंग्रज व आणखी देशी-परदेशी राजवटींचा इतिहास शिकवला जातो. आपल्या देशावर स्वकीयांच्या तसेच परकीयांच्याही राजवटी आहेत. पण आपल्या सोयीचा पाण्डय, ओहम्, पल्लव, चालुक्य, मौर्य, सातवाहन, गुप्त वगैरेंच्याच राजवटींचा इतिहास शिल्लक ठेवल्याने आणि तोच इतिहास विद्यार्थ्यांना प्रारंभापासून शिकवल्याने आपल्या देशाचा समग्र इतिहास विद्यार्थ्यांना कळणार कसा? यातून जी नवीन पिढी निर्माण होईल तिचीही मानसिकता कशी असेल, हे वेगळे सांगायला नको. सारांश, सत्ताधारी ज्या वेळी इतिहास लिहितात अथवा लिहवून घेतात त्या वेळी त्यांची मानसिक घडण ज्या मुशीतून होते तिचा प्रभाव त्या इतिहासावर असतो.

या सगळय़ात सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे इतिहास हा भूतकाळ असतो. आपल्यासमोर आपले वर्तमान असते. आपला इतिहास कितीही देदीप्यमान अथवा कितीही काळाकुट्ट असला तरी वर्तमानातील आपल्या वैभवशाली राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा हे तारतम्याने ठरवले पाहिजे. इतिहासाचे उपयोगही असतात तसेच दुरुपयोगही असतात. इतिहासाचा उपयोग हा समाजात एकता आणि सामंजस्य टिकविण्याकरिता व्हावयास हवा. आपापसात द्वेष आणि भेद निर्माण होण्याकरिता नव्हे. अग्नी हा उपयोगी आहे आणि विध्वंसकही आहे. त्याचा सदुपयोग कसा करावा हे ज्याप्रमाणे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे तसेच इतिहासाचेही आहे. इतिहासाच्या प्रवाहातील अंत:सूत्रांचा अचूकपणे शोध घेऊन सद्य:स्थितीच्या संदर्भात आपण काय शिकू शकतो याचा पूर्वग्रहविरहित मनाने व मर्मग्राही दृष्टीने विचार केला पाहिजे. म्हणजेच वर्तमानाचे भान ठेवून इतिहासाचा अभ्यास झाला पाहिजे. भूतकाळातील लहान-मोठी भांडणे उकरून त्यातील रागद्वेष चेतवण्यात शहाणपण नाही. त्यामुळे इतिहास हा शापच ठरण्याचा संभव आहे. महात्मा गांधी यासंदर्भात म्हणतात, ‘‘If we are to make progress, we must not repeat history, but make new history. We must add to the inheritance left by our ancestors.’’ (गांधी आणि आंबेडकर, ले. प्रा. गं. बा. सरदार, पृ. ६) आपल्याला जर प्रगती साधायची असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देण्यात काही अर्थ नाही. त्यापासून योग्य तो बोध घेऊन नवा इतिहास घडवण्याची आपण उमेद बाळगली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जो वारसा आपल्या हवाली केलेला आहे, त्यात लक्षणीय भर आपण घातली पाहिजे असा गांधींच्या या उक्तीचा इत्यार्थ आहे.

rajendradolke@gmail.com