खलनायकी, उन्मत्त आणि अहंकारी व्यक्तीची तुलना हिटलरशी करण्याची पद्धत रुढ आहे. जेव्हा टोकदार टीका करायची असते तेव्हा महाराष्ट्रात अफझलखान आणि तेलंगणामध्ये निजाम या प्रतिमाही वापरतात. हिंसक वृत्तीच्या व्यक्तीस रोहिल्या आणि संघटनेस रझाकार म्हणणे हेही मराठवाड्यात ओघाने होतेच. त्यात अत्याचाराचा मोठा इतिहास दडला आहे. अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ म्हणजे के. चंद्रशेखर राव यांच्या कारभाराला हिणविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना निजाम म्हटले. याच काळात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी हैदराबाद मुक्ती दिन हा मराठवाड्यात ज्या पद्धतीने साजरा होतो तसाच तो तेलंगणामध्ये साजरा व्हावा अशी मागणी केली. ही मागणी केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आली आणि आता १७ सप्टेंबर हा दिवस तेलंगणा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पण या सोहळ्यास ‘मुक्ती दिन’ न म्हणता त्याला ‘एकात्मता दिन’ म्हणावे अशी मागणी ऑल इंडिया मजलिस – ए- इत्तेहादुल मुसलमीनचे नेते ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी केली. त्यांना हा दिवस मुक्ती दिन या नावाने का नको आहे? तसेच भाजपला हा सोहळा स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात करावासा वाटतो आहे, तो केवळ देशभक्तीचे प्रतीक म्हणून की, त्यामागेही काही राजकीय उद्देश आहेत? ॲड्. असदोद्दिन ओवेसी यांची टिप्पणी, त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि वर्तमानातील त्याचे राजकीय अर्थ तपासून बघावयास हवेत कारण त्याचा मराठवाड्याशी आणि महाराष्ट्राशी संबंध आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ५६४ संस्थांचे विलीनीकरण झाले. पण हैदराबादच्या निजामाने विलीनीकरणास विरोध केला. त्यामुळे हैदराबाद हे १६ जिल्ह्यांचे संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी लष्कराची जुळवाजुळव करावी लागली. बेजवाडा ते हैदराबाद हे १६० मैलाचे तर सोलापूर ते हैदराबाद हे १८६ मैलाचे अंतर कापत ‘ऑपरेशन पोलो’ हाती घ्यावे लागले. हा लढा जरी लष्करी असला तरी त्याला ‘पोलीस ॲक्शन’ म्हटले गेले. कारण हैदराबाद हे काही स्वतंत्र राष्ट्र नव्हते. त्यामुळे कारवाई तर झाली ती अंतर्गत सुरक्षेचा भाग म्हणून. तत्पूर्वी झालेल्या चळवळी आणि ऑपरेशन पोलो दरम्यान झालेल्या सैन्य हालचालींचा इतिहास विलक्षण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण खऱ्या अर्थाने एक मोठा भाग अत्याचारी राजवटीतून मुक्त करावा लागला. त्यात अनेकांचे प्राण गेले त्याचे स्मरण आणि तत्पूर्वी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची स्मृती म्हणून १७ स्पटेंबर हा दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा होतो. जर हैदराबाद संस्थाने विलीनीकरण इतर संस्थानाप्रमाणे झाले तर त्याला कदाचित एकात्मता दिन म्हणताही आले असते कदाचित. पण इतिहासातील मुक्ती जणू एकात्मतेचा भाग असे माना आणि तसा सोहळा साजरा करा असे आता ॲड्. ओवेसी सांगत आहेत. हे आवाहन करताना हैदराबाद संस्थान मुक्तीनंतर झालेल्या दंगलीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुंदरलाल समितीचा ( ओवेसी यांच्या भाषेत कमिशन) अहवाल आता नव्याने वाचा असे त्यांचे आवाहन आहे. त्यांची ही कृती नक्की काय दर्शवते? – ओवेसी यांची ही मखलाशी निजामाचे अत्याचार विसरा आणि हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर नंतरच्या दंगली लक्षात ठेवा असे सांगणारी आहे. तर ‘केसीआर’ हे निजाम आहेत असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य इतिहासातील रझाकारी अत्याचार लक्षात ठेवा असे अधोरेखित करत हिंदूच्या भावनांना हात घालणारे आहे. देशप्रेमाच्या भावनांमध्ये प्रादेशिक अस्मिता जपताना खूप वेगवेगळ्या प्रकारची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. ऐतिहासिक हैदराबाद संस्थान लढ्याचे तरच खूपच पदर आहेत. त्यात शस्त्रास्त्राची विक्री करणारे सिडने कॉटनसारखे थेट आंतरराष्ट्रीय दलालही सहभागी होते. तेलंगणासारख्या भागातील जनतेच्या मनातील राग हा जमीनदारांविरुद्धचा होता. त्यामुळेच तिथे कम्युनिस्टांची चळवळही वाढली. मराठवाड्यात लादलेल्या उर्दू भाषेवरुद्धचा लढा तीव्र होता. या इतिहासाचे अनेक चढउतार आहेत. लोकशिक्षणातील अनेक चांगल्या बाबी आणि चुकांची लांबलचक यादीही आहे. शिक्षण, संस्कृतीवर राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या अन्यायाची एक माळच या कालखंडात दिसून येते. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधातील या लढ्याला हिंदू- मुस्लिम अशा संघर्षाची सुप्त धार होतीच पण त्या इतिहासाचे सुलभीकरण आणि उदात्तीकरण मात्र होऊ दिले गेले नव्हते. हैदराबाद मुक्ती लढ्याचे अभ्यासक आवर्जून सांगतात की, हा इतिहास सुप्तपणे हिंदू- मुस्लिम व्देषावर आधारलेला असला तरी तो तसा असू नये यासाठी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हा संघर्ष नक्की कोणाविरुद्ध हे फार छान समजावून सांगत. ते टांगेवाल्याचे उदाहरण देत- ‘गावातील मुस्लिम टांगेवाल्याशी आपले वैर नाही. तो बिचारा पोटार्थी आहे. आपला लढा सरंजामी वृतीने भाषा, संस्कृती आणि अधिकार पदावर केवळ धर्माधारित नेमणुका करून अधिकार गाजविणाऱ्या निजामाविरुद्ध आहे. त्याचा आणि गावातील मुस्लिम टांगेवाल्याचा संबंध नाही. हा लढा जबाबदार राज्यपद्धतीचा आहे.’ ‘काँग्रेसी’ धाटणीचा असा विचारच जणू मागास आहे, असे वातावरण तेव्हा नव्हते. ते तेलंगणा मुक्ती दिनाच्या निमित्ताने उभे राहण्याची भीती आता आता अधिक आहे. तेलंगणा प्रदेशात मुक्ती दिन साजरा करणे योग्यच. या सोहळ्याला मुक्ती दिन म्हणणे हेही बरोबरच. पण तेलंगणा, मराठवाडा किंवा कर्नाटक मुक्ती दिन असे म्हणू नये, तर हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणावे, असे मराठवाड्याचे मानबिंदू असणाऱ्या गोविंदभाई श्रॉफ यांनीच म्हणून ठेवले होते. कारण आधी लढा उभा राहिला आणि नंतर पोलीस कारवाई झाली ती संबंध संस्थान मुक्त करण्यासाठी.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad liberation day sowing and distortion around the liberation struggle tmb 01
First published on: 17-09-2022 at 10:47 IST