निना ख्रुश्चेव्हा
रशियातील ‘केपीआरएफ’ म्हणून ओळखला जाणारा, रशियन महासंघाचा कम्युनिस्ट पक्ष हा काही आता सत्ताधारी पक्ष नाही. त्या देशाचे सर्वेसर्वा ठरू पाहाणारे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीच री ओढण्याची गरज या पक्षाला नाही. तरीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात या पक्षाच्या महाअधिवेशनात पुतिन यांना आवडेल असा एक ठराव संमत झाला, तो जोसेफ स्टालिन (सत्तापदी १९२२ पासून १९५२ पर्यंत) आणि निकिता ख्र्रुश्चेव्ह (सत्तापदी १९५३ ते १९६४ पर्यंत) या दोघा नेत्यांविषयी पक्षाच्या भूमिकांमध्ये आमूलाग्र फेरपालट करणारा आहे. ख्रुश्चेव्ह यांनी १९५६ साली तत्कालीन कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपुढे स्टालिनशाहीला धुत्कारणारे भाषण केले होते, ते ‘सीक्रेट स्पीच’ या नावाने पुढे सर्वज्ञात झाले – ते भाषण अलीकडच्या महाअधिवेशनातील ठरावाने ‘अग्राह्य’ ठरवले. या ‘सीक्रेट स्पीच’मध्ये, स्टालिनच्या व्यक्तिवादी राजकारणाला, स्वत:चे महत्त्व आणि सत्ताबळ वाढवण्यासाठी स्टालिनने केलेले लोकानुरंजन आणि टीकाकारांना दिलेली क्रूर वागणूक यांना यापुढे रशियात आणि पक्षात थारा असता कामा नये, असे आवाहन ख्रुश्चेव्ह यांनी केले होते. परंतु याच पक्षाचा ताजा ठराव असा की- ‘हल्लेखोर नाटो संघटनेकडून रशियावर आक्रमण केले जात असतानाच्या आजच्या काळात’ स्टालिनचे गुण पाहिले पाहिजेत, त्या गुणांचे अनुकरण केले पाहिजे!
स्टालिनचे राजकीय पुनर्वसन करणारा हा ठराव करणाऱ्या रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाने, ख्रुश्चेव नेमके काय म्हणाले होते याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे. ख्रुश्चेव यांचा आक्षेप स्टालिनशाहीच्या ३० वर्षांत देशवासियांना उमेद वाटण्याऐवजी भीतीच वाटू लागली, यातून सामूहिक नेतृत्वाऐवजी व्यक्तिस्तोम वाढले, असे ख्रुश्चेव्ह म्हणाले होते. आता मात्र रशियन कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्ह यांच्या या दाव्यांचा खरेपणा काय, असा पवित्रा घेतला आहे. स्टालिनच्या काळात झालेल्या ‘कथित’ अत्याचारांबद्दल ‘खोटीनाटी’ कागदपत्रे ख्रुश्चेव्ह यांनीच जनतेच्या माथी मारली, इतका गंभीर आरोप या दिवंगत नेत्यावर एकेकाळच्या त्याच्याच पक्षाने आता केला आहे.
स्टालिनचे नाव घेताच ‘गुलाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधारछावण्या- प्रत्यक्षात छळछावण्याच- आज आठवतात, अनेकांनी त्यावर अनुभवाधारित लिखाण केलेले आहे, या गुलागमधले क्रौर्य आणि त्यासाठी न्यायव्यवस्थेला दिली गेलेली बगल हे वादातीत आहे… हे सारे आता आपण विसरावे, अशी पुतिनशाहीतल्या रशियन कम्युनिस्ट पक्षाची इच्छा या ठरावातून दिसते. प्रत्यक्षात स्टालिनच्या सत्ताग्रहणानंतरच्या पहिल्या दोनच वर्षांत (म्हणजे दुसरे महायुद्ध दृष्टिपथातही नसताना) तब्बल १५ लाख रशियनांनी रवानगी छळछावण्यांत झाली होती आणि त्यापैकी सहा लाख ८० हजार जणांना प्राणास मुकावे लागले होते. या साऱ्याचे पुरावे मिखाइल गोर्बाचोव्ह यांच्या सत्ताकाळात, ‘ग्लासनोस्त’ धोरणामुळे उघड झालेले आहेत आणि त्यात मूळ कागदपत्रांचाच समावेश आहे. आता मात्र रशियाचा कम्युनिस्ट पक्षच पुन्हा ‘आकांक्षावान आणि काटेकोरपणे कारभार करणारा’, ‘प्रामाणिक’ आणि ‘लोकांना गुलामगिरी व मृत्यूपासून वाचवणारा’ अशी स्टालिनची भलामण करतो, हे चक्रावून टाकणारे आहे. कारण मुळात हा ‘केपीआरएफ’ म्हणून ओळखला जाणारा पक्ष जरी १९९३ मध्ये स्थापन झालेला असला तरी, मुळात तो १९९१ मध्ये बरखास्त झालेल्या सोव्हिएत रशियाच्या (एकमेव) कम्युनिस्ट पक्षा उत्तराधिकारी आहे. तांत्रिकदृष्ट्या आता, ख्रुश्चेव्ह किंवा कोणत्याही अन्य रशियन नेत्याच्या उद्गारांना ‘अग्राह्य’ ठरवण्याचा अधिकार या पक्षाला नाही.
हा ठराव मांडला जात असताना एका नेत्याने थोडाफार आक्षेप घेणारा मुद्दा नोंदवला, तोही ख्रुश्चेव्ह यांची बाजू मांडणारा नव्हता. पण ‘नेमके आजच्या काळातच देशातील सत्ताधारी ‘युनायटेड रशिया पक्षा’ने स्टालिनचे पुनरुज्जीवन चालवलेले असतानाच आपण हे करतो आहोत’ , एवढेच त्या सदस्याचे म्हणणे होते.
पाठ्यपुस्तकांतून पुनर्लेखन!
त्यात तथ्य आहेच. स्टालिनची प्रतिमा उजळवण्याचा उद्योग ब्लादिमिर पुतिन यांना २५ वर्षांपूर्वी सत्ता मिळाल्यानंतर लगोलग सुरू झालेला आहे. राजकीय हेतूंसाठी इतिहासाची फिरवाफिरव करण्याचा साधा मार्ग म्हणजे शालेय पाठ्यपुस्तके बदलणे. तेच पुतिन यांच्या रशियात स्टालिनबद्दल झाले. ‘आधुनिक रशियाचा इतिहास : १९४५ ते २००६’ या पुस्तकात , स्टालिनच्या काळात रशिया कसा चहूबाजूंनी ‘वेढलेला’ होता, ‘अभूतपूर्व परिस्थिती, अभूतपूर्व आव्हाने होती’, अशा काळात स्टालिनसारखा ‘कणखरपणा’ आवश्यकच होता, अशी सूचक विधाने होती.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर २०२३ मध्ये आलेली इतिहासाची नवी रशियन पाठ्यपुस्तके याहीपुढे जाणारी आहेत. स्टालिन हा ‘वंदनीय विजयवीर’ असल्याचे ठसवणाऱ्या या पाठ्यपुस्तकांचे सहलेखक आहेत व्लादिमीर मेडिन्स्की. हे मेडिन्स्की पुतिन यांच्या मर्जीतले. युक्रेन ‘शांतता चर्चे’साठी वाटाघाटी करणाऱ्या रशियन पथकाचे प्रमुख म्हणून पुतिन यांनी याच मेडिन्स्कींना धाडले होते.
हे एवढेच नाही. स्टालिनची जी एकंदर १२० स्मारके आज रशियाभर आहेत, त्यापैकी १०५ स्मारके पुतिन यांच्याच सत्ताकाळात उभारली गेलेली आहेत. स्टालिनचा जो पुतळा १९६६ सालीच मॉस्कोच्या तगन्स्काया उपनगरी स्थानकाजवळून हटवला गेला होता, त्याची जशीच्या तशी प्लास्टरची प्रतिकृती हे यापैकी सर्वांत अलीकडे उभारले गेलेले स्मारक.
रशियात हे स्टालिनस्तोम पद्धतशीरपणे माजवले जात असताना त्याचे स्टालिनच्या कारकीर्दीतच शोभणारे परिणामही दिसू लागलेले आहेत. पुतिन यांच्या रशियातही, स्टालिनच्या सोव्हिएत रशियाप्रमाणेच कोणत्याही प्रखर टीकेला चिरडून टाकले जाते विशेषत: युक्रेनयुद्धावर रशिया कोणीही काही वावगे बोलूच नये, याची तजवीज केली जाते- हे धोरण एकीकडे आणि रशियातील बुद्धिवंत, उच्चपदस्थ मंडळींचे मृत्यू होत असल्याच्या हल्ली वारंवार येणाऱ्या बातम्या दुसरीकडे ! यांची सांगड असू शकते, ही चर्चा अगदी अलीकडे, रशियाचे माजी परिवहनमंत्री अणि कुर्स्क प्रांताचे माजी गव्हर्नर रोमान स्ट्राव्होयिट यांच्या ‘आत्महत्ये’नंतर कुजबुजत सुरू झाल्यास नवल नाही. या स्ट्राव्होयिट यांना ‘युक्रेनी फौजांना अडवण्यातील अपयशा’चा ठपका ठेवून पदावरून दूर करण्यात आले होते. वास्तविक कुर्स्क प्रांतात पुरेशी कुमकच नाही, हे ओळखूनच फार प्रतिकार न करण्याचा निर्णय रोमान स्ट्राव्होयिट यांना घ्यावा लागणार होता. असा निर्णय घ्यावा की पदच सोडावे, हा विचार जसा स्टालिनशाहीत निव्वळ भयापोटी अनिर्णित राहिला असता तसेच पुतिनशाहीतही घडले. ताेवर युक्रेनी फौजा कुर्स्क प्रांतात घुसल्या. मग, याचा दोषारोप झालेले स्ट्राव्होयिटदेखील जिवानिशी गेले. अवहेलनाकारक शिक्षेपेक्षा आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला.
आत्महत्या हा एरवी पलायनवादी मार्ग ठरतो, पण स्टालिनशाही किंवा पुतिनशाहीतल्या आत्महत्या या ‘मरेन पण तुला शरण जाणार नाही’ हे दाखवून देणाऱ्या होत्या, आहेत. जॉर्जियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख व्हिसारिओन लोमिनाद्झे यांनी १९३५ साली स्वत:च्या छातीवर गोळी झाडून, बोल्शेविक कामगार नेते मिखाइल टॉम्स्की यांनी ‘मला धोरणे पटत नाहीत’ अशी चिठ्ठी लिहून १९३६ साली राहात्या घरात केलेल्या आत्महत्यांपासून अनेकांनी १९३७ मध्ये प्रेरणा घेतली, तोवर स्टालिनचे दमनतंत्र अधिकच फोफावले होते. छळापेक्षा मरण बरे असे अनेकांनी ठरवले; सेर्गाे ओर्द्रोनिकिन्द्झ यांची आत्महत्या इतर अनेकांपेक्षा निराळी, म्हणून लक्षात राहाणारी ठरली. या सेर्गो यांनी, ‘ट्रान्स-कॉकेशन रेल्वे’मध्ये काम करणाऱ्या आपल्या भावाला विनाकारण अटक झाल्याच्या निषेधार्थ रुळांवरच जीव दिला. त्यांचा मृत्यू ‘हृदयविकाराने’ झाल्याची खोटी नोंद करण्यात आली होती, हे ख्रुश्चेव्ह यांनी १९५६ सालच्या ‘सीक्रेट स्पीच’मध्ये उघड केले म्हणून पुढे जगाला कळले.
पुतिन यांनी अलीकडेच, रोमान स्ट्राव्होयिट यांच्या अंत्यविधीच्या वेळी प्रथेप्रमाणे माजी अधिकाऱ्यांवर सरकारतर्फे वाहिले जाणारे पुष्पचक्र ‘वाहू नका’ असा नुसता आदेश न देता, अंत्यविधीच्या जागी पोहोचलेले पुष्पचक्र परत घेतले होते! असे प्रसंग लक्षात घेतले तर, पुतिनशाहीत स्टालिनचेच पुनरुज्जीवन होत आहे याचे नवलही वाटणार नाही.
लेखिका न्यू यॉर्क येथील ‘न्यू स्कूल’ या विद्यापीठात, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्राध्यापक असून हा लेख ‘प्रोजेक्ट सिण्डिकेट’च्या सौजन्याने.
Copyright: Project Syndicate, 2025.
http://www.project-syndicate.org