शिशीर सिंदेकर
भारतीय संस्कृतीची जी सन्मानचिन्हे जगभरात ओळखली जातात, त्यात कालिदासाची साहित्य निर्मिती ही अलौकिक आहे. या कालिदासाचे मेघदूत हे असे काळ कसोटीला उतरलेले अक्षरवाङमय खंडकाव्य आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघदूताची आठवण येणार नाही असा एकही रसिक भारताच्या कोणत्याही भागात सापडणार नाही. मेघदूत हे स्वर्गातील सौंदर्य आणि पृथ्वीवरील व्यथा यांचे अभूतपूर्वरसायन आहे. सहावे महाकाव्य, गीतिकाव्य, आख्यानकाव्य, पंडिती काव्य म्हणूनही ते ओळखले जाते.
रामायण,महाभारत ही धार्मिक नीतिकाव्ये असल्याने समाजासाठी बोधप्रद किंवा आदर्श निर्माण करतात. रामायण, महाभारतात भक्तिभाव दिसतो तर मेघदूतात सौंदर्यदृष्टी मोहवून टाकते. मेघदूतात कालिदासाने यक्षाला नायक केले आहे जो सर्वसामान्य माणूस नाही पण देवही नाही. त्यामुळे त्याला होणारा पत्नीविरह हा सर्वसामान्य माणसाला जास्त जवळचा वाटतो… आणि आषाढात पाऊस घेऊन येणारे ढग हे या महाकाव्यातले मुख्य पात्र आहे.
‘कालिदास’ म्हणजे कोण?
एकीकडे कालिदास नावाची कोणी एक व्यक्ती अस्तित्त्वात होती की नव्हती असा प्रश्न लोक विचारत असताना, वासुदेव विष्णू मिराशी यांनी १९३४ मध्ये मांडलेल्या संशोधनानुसार कालिदास द्वितीय चंद्रगुप्ताच्या आश्रयास होता, हा काळ इ.स.. ३८० ते ४१३ म्हणजे चौथ्या शतकाच्या शेवटी ते पाचव्या शतकात होता असे सिद्ध केलेले आढळते. ‘मेघदूत’ वाचताना मात्र, त्या काळात दळण -वळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना ढगांचे इतके नेमके प्रवासवर्णन एक व्यक्ती कसं करू शकेल असा प्रश्न सहज पडू शकतो. काही तज्ज्ञांच्या मते कालिदास नावाचे एक विद्यापीठ असावे, ज्यात राजाश्रयाच्या आधारावर अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणांहून (रामगिरी ते अलकापुरी) माहिती गोळा करून कुलगुरु कालिदासांकडे आणून देत असावेत आणि कालिदास ते नेमक्या शब्दात मांडत असावेत. किंवा अलौकिक प्रतिभाशक्तीने कालिदासाने हा प्रवास आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभा केला असावा.
कालिदासाविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे म्हणतात की, तो गुप्त घराण्यातील दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या म्हणजेच विक्रमादित्याच्या दरबारात होता. राजा विक्रमादित्याने कुंतलेश्वर प्रवरसेनाकडे कालिदासाला वकील म्हणून पाठवले असता मुलीला त्याचा राग येऊन तिने कालिदासाला निर्वासित केले. एका दंतकथेनुसार गुराखी मुलांमध्ये वाढलेल्या पण अडाणी, मूर्ख, सुंदर अनाथ ब्राह्मण युवकांशी विद्योत्तमा या सुंदर हुशार राजकन्येचे कपटाने लग्न लावण्यात येते, पण खरी परिस्थिती समजल्यानंतर विद्योत्तमा त्याला काली-मातेची उपासना करण्यास सांगते आणि त्या उपासनेतूनच जो घडला तो विद्वान, प्रतिभासंपन्न कालिदास. तो तिथून परत आल्यानंतर विद्योत्तमा त्याला विचारते, ‘अस्ति कश्चित वाग्विशेष: ?’ – तुमची वाणी इतकी विशेष कशी… हे ऐकून कृतकृत्य झालेल्या वाणीने कालिदासाने त्या प्रश्नातला एकेक शब्दापासून सुरू झालेली कुमारसंभव, मेघदूत, आणि रघुवंश अशी तीन काव्ये रचली. किंवा दुसऱ्या कथेनुसार वाकाटकांच्या दरबारात कालिदास असताना मेघदूताचा जन्म झाला.
मेघदूताचा नायक यक्ष म्हणजे देवांपेक्षा कनिष्ठ आणि माणसांपेक्षा उच्च. कुसुमाग्रज म्हणतात, ‘स्वर्गातील देवांचे सामर्थ्य यक्षात नाही पण पृथ्वीवरील लोकांप्रमाणे त्याची बुद्धी मातीमध्ये मलिन व क्षीण झालेली नाही’. मेघदूतात मुख्य रसप्रवाह शृंगार आणि प्रणयाचा. देवांचा प्रणय बंधनातीत, निष्ठाहीन, तर माणसाचा गुदमरलेला आणि दुर्बल.आणि या दोन्हीच्या मध्ये असलेला यक्ष अशी कालिदासाची पात्रयोजना. जी सामान्य माणसाला भुरळ घालते, सामान्य माणूस यक्षात स्वतःचे प्रतिबिंब शोधतो.
मेघदूत हे काव्य म्हणजे या यक्षाच्या विरह व्यथेची अभिव्यक्ती. यक्ष आणि यक्ष स्त्री नायिका हे दोघही अनामिक, त्यांचे नावही कालिदास सागत नाही, यक्षाला कोणत्या अपराधासाठी रामगिरीच्या डोंगरावर एकटा राहण्याची शिक्षा झाली हेही तो सांगत नाही. पहिल्या चार पाच श्लोकातच कथानक आटोपते… म्हणजे ही कथा, उरलेल्या शंभराहून अधिक श्लोकांतून दिसणाऱ्या कल्पनाविस्तार आणि रसाविष्काराचा केवळ एक आधार. महत्व आहे ते कथनशैलीला
यक्षाची शिक्षा सुरू होऊन आठ महिने पूर्ण झाले आहेत. अजून चार महिने घालवायचे आहेत. प्रियेच्या विरहात एकेक क्षण युगासारखा भासतो आहे. तशात विरही जनांना छळणारा वर्षाऋतू सुरू झाला आहे. यक्ष शृंगारप्रधान प्रकृतीचा असला तरी तो भोगी अथवा कामी नाही तर उत्कट रसिक प्रेमी आहे. कुलीन आहे, सुसंस्कृत आहे, सश्रद्ध आहे. परमेश्वराला विसरत नाही. तो हिदू संस्कृतीचा आदर्श आहे, तो चिरवियोगाताही पत्नीशी एकनिष्ठ आहे आणि पत्नीच्या एकनिष्ठतेबद्दल त्याला खात्री आहे. या पत्नीपर्यंत निरोप पोहाचवण्यासाठी मेघ हा यक्षाचा दूत आहे, त्याला कालिदासाने यक्षाचा सजीव मित्रच केले आहे. हा मेघ रसिक आहे,त्याला वीज नावाची पत्नी आहे, त्यालाही विश्रांतीची विरंगुळ्याची गरज भासते.
मेघदूत आणि निसर्ग
मेघदूत आणि निसर्ग हे वेगळे नाहीतच. रामगिरी, आम्रकूट, विंध्य, देवगिरी, हेमकूट, हिमालय हे पर्वत आहेत. नर्मदा, वेत्रवती, निर्विंध्या, गंधवती, चर्मणावती (चंबळ),गंगा, मंदाकिनी या नद्या आहेत. भुईकमळे, जुई, लोध्र, कोरांटी ही फुले आहेत. ककुभ, कदंब, देवदारु, अशोक, निचुल, माधवी या वृक्षलता आहेत. हरणे, कस्तुरी-मृग आहेत, मासोळ्याही आहेत. कावळे, मैना, चातक,चक्रवाक,पक्षी आहेत. भ्रमर, शरभ हे कीटक आहेत. वीज.सूर्य,चंद्र, देव,आकाशगंगा, पौर सुंदरी, किन्नर, यक्ष-यक्षिणी , इंद्रधनुष्य, मोरपिसारा …निसर्गात अजून काय हवे? निसर्ग हा यक्षाच्या भावविश्वाचा एक भाग आहे.
नैसर्गिक घटनांचे अचूक निरीक्षण आहे. कोणत्या ऋतूत कोणती फुले फुलतात, कोणत्या पक्षाचे गर्भाधान केंव्हा होते, प्राण्यांचे स्वभाव… ‘कुंदाची फुले सायंकाळी फुलतात, पाहते ती कोमेजून देठापासून अलग झाल्यासारखीच असतात.पहाटेच्या वाऱ्याची झुळूक येताच ती देठा पासून अलग होतात.’ असे अचूक निरीक्षण कालिदास करतो.
कालिदासाने या श्लोकांसाठी वृत्त निवडले ते मंदाक्रांता म्हणजे मंद चालणारे… १७ अक्षरांचा एक चरण, त्यातल्या चौथ्या, मग दहाव्या आणि सतराव्या अक्षरावर किंचितसे मंद होऊन हे वृत्त एकेका श्लोकात चार-चार चरण अशी मजल-दरमजल करत चालते, मनात रुंजी घालते. हे वृत्त शांत, करुण रसाचे पोषक. सामासिक शब्द कमीत कमी वापरूनही अर्थान्तरन्यास साधणारी कालिदासाची अल्पाक्षरी, तरीही आशयघनतेत सामावलेली आहे. अलंकारांपैकी ‘श्लेष’ मेघदूतात अगदी कमी वेळा वापरला आहे. अनुप्रास मात्र मोठ्या प्रमाणावर योजला आहे. आणि चेतनागुणोक्ती तर निसर्गाच्या वर्णनांत ठायीठायी आहे. मंदाक्रांता वृत्ताला मुळातच लय आहे, सर्व काव्यात यक्षाचे विरहआर्त सूर भरून राहिले आहेत. यातले श्लाेक माधुर्य आणि प्रासादिकता जपणारे, तरीही शृंगार रसपूर्ण. (या काव्यातला पराकोटीचा शृंगार हा अचेतन अशा मेघ आणि नद्या यांच्यातील मीलनाचा आहे त्यात विरही, उपभोगातुर यक्षाच्या मनाचे प्रतिबिंब आढळते. शैलीतील अशा संयमामुळेच प्रासादिकता टिकते) .
मेघदूतात नद्या सुंदर विलासी रमणी आहेत. कमळवेल ही तरुणी आहे. तिचा प्रियकर म्हणजे सूर्य. हा अन्यक्रांतहृदय आहे. (पहाटे सूर्यकिरण कमळावर पडले की कमळ उमलते, आणि त्यावरील दवबिंदू नष्ट होतात) पण मेघदूतात, रात्री सूर्य नसतो म्हणजे तो कमळवेलीला सोडून अन्य स्त्री कडे गेला होता आणि हे दव म्हणजे भग्नहृदया युवतीचे कमळवेलीचे अश्रू आहेत. आणि सूर्य किरण म्हणजे त्याचे हात पहाटे प्रेयसीचा राग घालविण्यासाठी सूर्य आपल्या हातांनी ते पुसतो आहे. (‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात’ या कल्पनेची प्रेरणा दूरान्वयाने इथेच कुठे तरी सापडते)
मेघदूतातील काही श्लोक ‘प्रक्षिप्त’ मानले जातात.काही पाठभेदही आढळतात. नेमिदूत, हंस संदेश,उद्धव दूत ही काव्ये देखील मेघदूताचा प्रभाव दर्शवतात.मेघदूतावर सुमारे १८ टीका-भाष्य लिहिलेली आहेत. मल्लिनाथ,वल्लभदेव यांच्या टीका प्रसिद्ध आहेत. वैशानव आणि बौद्ध कवींनी आपापल्या धर्मपंथांच्या प्रसारासाठी मेघदूताचा उपयोग केला. इसवी सनाच्या आठव्या शतकात जिनसेन नावाच्या एका जैन कवीने “पार्श्वाभ्युदय” हे काव्य रचताना मेघदुतातील प्रत्येक श्लोकातील दोन दोन ओळी समाविष्ट केल्या. गमतीचा भाग असा की शृंगार-प्रधान काव्याचा उपयोग तीर्थकारांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी जैन कवींनी उपयोगात आणले. सर मोलीअर विल्यम्सने कालिदासाला भारताचा शेक्सपिअर म्हणून गौरवले.
मेघदूत आणि मराठी अनुवाद
कृष्णशास्त्री चिपळूणकरांपासून ते कुसुमाग्रजां पर्यंत आणि कुसुमाग्रजांपासून ते शांता शेळकेंपर्यंत अनेक दिग्गज साहित्यिकांना मेघदूताने भुरळ घातली. १८ पेक्षा जास्त अनुवाद आज मराठीत उपलब्ध आहेत. डॉ. अरुणा रारावीकर म्हणतात, ‘कुसुमाग्रजांचा अनुवाद समश्लोकी ,सयमक, आशय, रस, भाव यात सरस ठरतो. काव्य रूपांतरात सर्वात महत्वाचा ‘आशय’, तो नेमका कुसुमाग्रज रसिकांपर्यंत अत्यंत सहजतेने पोचवतात. ( पूर्वमेघाच्या४६व्या श्लोकातील चौथ्या मूळ ओळीत अशी कल्पना केली आहे की, मुक्तामालेच्या मध्यभागी असलेला मोठ्या आकाराचा तो (मेघ) जणू इंद्र नील मणीच आहे आणि चंबळ-चर्मणावती नदीचा प्रवाह म्हणजे धरतीने घातलेला जणू मोत्यांचा सर आहे. मात्र कुसुमाग्रजांनी क्षमाकटीवर हा शब्द-प्रयोग करून तिला कमरपट्टा ठरवले आहे) कुसुमाग्रजांचा अनुवाद सर्वश्रेष्ठ वाटतो तो ‘रस, भाव, आशय, आणि शब्द’ यांना याच क्रमाने महत्त्व देण्यामुळे.
चित्रमयता, शिल्पकला, नृत्यकला, नाद, लयया साऱ्यांचा अनुभव ब.भ. बोरकरांच्या अनुवादातून रसिकाला येतो. तर सी.डी.देशमुख, वसंत पटवर्धन असे इतर क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीचे अनुवादही सुंदर आहेत. मेघदूताचा अनुवाद करणाऱ्या प्रा. वसंत बापटांचा पिंड श्रोत्यांना विश्वासात घेऊन संवाद साधणाऱ्या शाहिराचा! आपण मेघदूत मराठीत का आणतो आहोत, हेही त्यांनी मंदाक्रांता वृत्तातच सांगितले आहे ते असे :
“सद्य:काली गति न उरली वाचकां संस्कृतात ।
सौंदर्याची छबि न पडते शब्द रूपांतरात ।
त्याची थोडी झलक दिसू दे वाचकांना मराठी ।
केली क्रीडा सहज म्हणुनी येथ त्यांच्याचसाठी ।।”
पुढे प्रा. बापट म्हणतात, “ झाली काव्ये कितिक असती, अन पुढेही असोत।
‘या ऐसे हे’, सहृदय मना मोहवी मेघदूत।।”
लेखक नाशिक येथील एका वाणिज्य महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत. shishirsindekar@gmail.com