डॉ. अजित कानिटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या काळाची गरज म्हणून तेव्हा लोकमान्यांनी सार्वजनिक केलेला गणेशोत्सव आताच्या काळाच्या गरजेनुसार बदलता येईल? कसा?
हा विषय शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय तर नाही किंवा या लेखाच्या शीर्षकात काही चूक तर नाही ना असे प्रथमदर्शनी अनेकांना वाटू शकेल. पण ती जागा मुद्दामच रिकामी ठेवली आहे. त्याचे कारण सांगण्यापूर्वी आजकाल सर्व चित्रपटांत सुरुवातीस असते तसे कातडीबचाऊ निवेदन (Disclaimer!)

की या लेखातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा लेखकाचा हेतू नाही. असे लिहिण्याचे कारण म्हणजे आजकाल कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा शब्दांमधून अनेकांच्या भावनांच्या बांगडय़ा कचकन् फुटू शकतात, समाजमनाच्या आरशाला तडे जाऊ शकतात. आपण सगळेच इतके कचकडय़ासारखे तकलादू व ठिसूळ झालो आहोत! पण या निवेदनात आणखी भर चार वाक्यांची स्वत:बद्दलची आत्मप्रौढी वाटली तरीही. १९७३ ते १९८३ अशी सुमारे दहा वर्षे माझ्या ऐन उमेदीच्या काळात पुण्यातील ‘त्या वेळच्या’ गणेशोत्सवात मी ऊर फुटेपर्यंत अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत ध्वज बेहोष होऊन नाचविला होता, हाताला घट्टे पडेपर्यंत बेलबाग चौक ते लकडी पूल हे अंतर कंबरेचा ढोल न सोडता ढोल वाजविला होता. अखिल मंडई – श्रीमंत दगडूशेठ निंबाळकर तालीम – दत्त गणपती – हिंदू तरुण मंडळ – खडकीबझारमधील गणेशोत्सव मंडळ – या अशा अनेक गणेश मंडळांच्या अनंत  चतुर्दशीच्या मिरवणुकीत दुपारी १२ ते दुसऱ्या दिवशी पहाटेचे ६-७ वाजेपर्यंत काळवेळाचे भान विसरून सेवा व पौरुषवृत्तीने सहभागी झालो होतो. त्यामुळे हा लेख लिहिणारा फुरोगामी.. इ. शेलक्या ‘शिव्यांचा’ धनी होण्याचा पात्रतेचा नाही. तो एक सश्रद्ध पण तरीही डोळस गणेशभक्त होता आणि आहे. असो. गणेशोत्सवाच्या बाबतीत ‘आजचा’ हा शब्द लिहिताना हात धजावत नाहीत कारण सांप्रत काळातील नव्या म्हणीप्रमाणे ‘आजचा’ गणेशोत्सव म्हणजे ‘काय तो मांडव, काय ते खड्डे, काय तो डॉल्बीचा ठणठणाट, ऑल नॉट ओक्के!’ – असाच दुर्दैवाने झाला आहे!

दरवर्षीचे तेच तेदळण

विंदांच्या ‘तेच ते’ कवितेप्रमाणे दरवर्षी गेली निदान १०-२० वर्षे तरी गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, पोलिसांची मिनतवारी, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची मिनतवारी, ‘उत्साहावर विरजण घालू नका, हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे’ या छापाची गुळमुळीत झालेली तीच ठरावीक वाक्ये, मांडव घालणे – काढणे – वाढविणे याबद्दलच्या रशिया- अमेरिकेपेक्षा जास्त प्रदीर्घ चालणाऱ्या वाटाघाटी, सतत वाढत जाणारी गर्दी, नागरिकांची रस्ते बंद झाल्याने होणारी असह्य हतबलता, काळय़ा भिंतींच्या आडून येणारे ‘मुंगळय़ाचे’ डसणारे आवाज (मला ज्ञानात भर घालावी लागणार आहे कारण ‘मुंगळा’ गाण्याची जागा नवीन कोणा डसणाऱ्या पक्षी/ जनावराने घेतली का माहिती नाहीये!), ढोल, ताशा, झांजांच्या अनिर्बंध वापरामागची तरुणाईची बेपर्वाई वगैरे वगैरे. हे असे ‘आज’बद्दल लिहायचे म्हटले तर कदाचित स्वतंत्र पुरवणीच काढावी लागेल. ही यादी संपणारी नाही. त्यात गेली दोन वर्षे भर पडलीये. लकडी पुलावर आडवा आलेला मेट्रोचा लोखंडी पूल! अनेक ‘माननीय संकल्पकांचा’ हा लोखंडी पूल व त्यामुळे जमिनीवरून चार पावले वरच चालणारे एसयूव्ही फॉर्च्युनरचे ‘रथ’ आणखीनच वर गेले. आणि तसाच त्यांचा रागाचा पाराही. आयुष्यात काळय़ा काचेच्या गाडय़ांशिवाय कधीही फिरण्याची शक्यता नसलेले व केवळ ‘सेल्फी’ काढून पुणे मेट्रोची शेखी मिरविणाऱ्या या आमच्याच (नगर) सेवकांना गणेशरथांमुळे मेट्रोच्या काही कोटी रुपयांचा अक्षरश: चुराडा होईल, याची तिळमात्र काळजी नव्हती. त्यांच्या काळजीचे एक कारण होते की अनंत चतुर्दशीच्या त्या दहा तासांत आमच्या रथाचे चाक तर रुतणार नाही ना?! गणेशोत्सवाच्या या ‘आज’चे अत्यंत उद्विग्नता आणणारे असे किळसवाणे स्वरूप आहे. ‘मानाच्या’ गणपतींना विसर्जनाची ठरलेली वेळ पाळता येऊ नये? हजारो पोलिसांना बंदोबस्तासाठी अक्षरश: ताटकळत ठेवताना तुम्हाला काहीच वाटत नाही? ‘मिरवणूक सकाळी ८च्या आत संपवू’ अशी दरवर्षी निर्लज्जपणे घोषणा करत, लक्ष्मी रस्त्याच्या जोडीला कुमठेकर, केळकर व टिळक रस्त्यांची मिरवणुकीसाठी भर पडूनही दुसऱ्या दिवशीचे दुपारचे १२ वाजतात, हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक भूषण व वैभव का, असा प्रश्न पडत नाही? आणि हे केवळ पुण्यासाठी लागू नाही. मुंबईच्या ‘लालबागचा राजा’ म्हणून गौरविला गेलेल्या या राजाची सुरक्षितता ठेवण्यासाठी पोलीस कमिशनरांपासून ते रस्त्यावरच्या पोलीस हवालदारापर्यंत किती हजार माणसांचा जीव दहा दिवस टांगणीला लागतो, हे समजून घ्यायचे असेल तर सदानंद दाते या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अनुभवकथन एकदा अवश्य वाचाच.

आजकडून उद्याकडे!

व्यवस्थापन क्षेत्रात नेहमीच उदाहरण दिले जाते की ‘आजची’ छोटी रेघ त्रासदायक वाटत असेल तर तिला पुसण्याचा प्रयत्न करून व्यर्थ वेळ, पैसा, शक्ती वाया घालवू नका. छोटय़ा रेषेशेजारी दोन-तीन मोठय़ा रेघा चित्रित करा, आपोआप डोळय़ांना खुपणारी ‘छोटी’ रेघ नजरेआड होईल. काहीशा याच विचाराने लेखाच्या उरलेल्या भागात अशा काही मोठय़ा रेघा सुचवितो आहे. अनेकांच्या स्वप्नरंजनातून, भन्नाट कल्पनांमधून – आजच्या भाषेत ज्याला ग्राऊंड सोर्सिग ऑफ आयडियाज अशा नवीन रेषांचे सुंदर चित्र तयार होऊन उद्याचा गणेशोत्सव आणखी देखणा, मनोवेधक व खरोखरच सुखवर्धक व दु:खनिवारक होऊ शकेल. कोणत्या या मोठय़ा रेघा?

सार्वजनिक ते कौटुंबिक असा नवा प्रवास

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव समाजमान्य केले. व्यक्तिगत उपासनेला सामाजिक आराधनेची मान्यता दिली. आज हा प्रवास नव्याने ‘सार्वजनिक ते कुटुंबाकडे’ असे करण्याची नक्की आवश्यकता आहे. माझ्या श्रद्धा, धर्म, विश्वास, जात, राज्य, भाषा, लिंग या सर्व ओळखी माझ्या घराच्या आतमध्ये मी ठेवीन व घराबाहेर वावरताना, समाजात ऊठबस करताना माझी एकमेव व पहिली ओळख ‘भारतीय नागरिक’ अशीच असेल असे करावे लागेल. घराबाहेर जाताना गंधाचे टिळे, ‘गर्वसे कहो..’, जीझस द ओन्ली सेव्हियर, चांदण्या लावलेले स्टिकर्स यांसारखी कोणतीच चिन्हे मी अभिमानाने वागविण्याचे कारण नाही. या माझ्या श्रद्धा आत्यंतिक प्रामाणिक असल्या तरी मी त्यांचे घरात आचरण करीन. त्यांचे घराबाहेर याचे प्रकटीकरण, साजरेकरण, उदात्तीकरण काहीही करणार नाही. असे करता येईल का? अवघड आहे, पण अशक्य नाही. अवघड आहे कारण या गोष्टींची बरीच वर्षे सवय झाली आहे. त्या सवयीच्या गुलामीतून बाहेर यायला स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी संकल्प करून प्रयत्न करता येतील.

‘स्मॉल इज ब्युटीफूल’ असे सांगणारा शूमेकरसारखा या गेल्या शतकातील तत्त्वज्ञ पुन्हा आठवायला लागेल. छोटी गणेशमूर्ती, कर्कश ढोलताशांऐवजी लहान आवाजाचा एखादाच टाळ – मृदुंग, चकाकणाऱ्या वीज खाणाऱ्या रोषणाईऐवजी समईत शांत प्रकाश देणारी एखादी ऊर्जा, गर्दीचे महापूर रस्त्यांवर वाहण्याऐवजी आपण राहतो ती गल्ली, छोटी वस्ती, २५-५० परिचित कुटुंबे, आसपासचेच परिघातले नागरिक अशा लाखो-कोटय़वधी ‘छोटय़ा’ पूजांचे आयोजन व त्यातून नटलेले व खड्डे – खांब यांच्या जंजाळातून मोकळे झालेले गणपती बाप्पा, आणि त्यांच्या आजूबाजूला एकमेकांशी हितगुज करणारे सर्व जाती – धर्म – लिंग – वयोगटांचे नागरिकांचे छोटे छोटे पण जिवंत समूह. असे सगळे ‘उद्या’च्या गणेशोत्सवाचे न्यू नॉर्मल करता येईल का? यंदापासून त्याला सुरुवात करूयात का?

kanitkar.ajit@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legacy of ganesh utsav celebration ganesh chaturthi celebration zws
First published on: 28-08-2022 at 04:01 IST