प्रफुल्ल शिलेदार

मणिपूरला गेलो असताना ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम यांची इम्फाळमधील कोरस रिपेर्टरी थिएटरमध्ये जाऊन भेट घेतली. तो काळ असा होता की कोविड हळूहळू ओसरत चालला होता. प्रवासावरील बंधनं शिथिल होत होती. अनेक दिवसांपासून घरात अडकलेली माणसं बाहेर फिरायला जायचे निमित्त शोधत होती. सध्या मणिपुरमध्ये असलेली परिस्थिती आलेली नव्हती, मात्र वातावरणातील तंगपणा जाणवत होता. सोबत हिंदी कथाकार मित्र मनोज रुपडा, कैलाश बनवासी आणि पत्रकार राजकुमार सोनी असे आम्ही चौघे इम्फाळला पोचलो. मणिपुरी कवीमित्र सरच्चंद्र थिय्याम सोबत होते. रतनदा कोविडमधून नुकतेच बरे झाले होते, अशक्तपणा होता. मात्र भेट ठरली आणि २७ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी साडेदहाला आम्ही रतनदांच्या कोरस रिपेर्टरीत पोचलो.

रिपेर्टरीत आत गेलो तशी त्या जागेची भव्यता आणि साधेपणा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जाणवू लागल्या. इम्फाळ शहराच्या बाहेर निसर्गरम्य परिसरात ही नाट्यशाळा वसलेली आहे. झाडेझुडुपे, शेते, खास मणिपुरी शैलीच्या इमारती, भिंतीवर काढलेली चित्रे, पोस्टर्स, स्टोअर रूम्स, प्रॉपर्टी, लायटिंग सारं काही ठेवायला भरपूर आणि नेमक्या जागा. प्रयोगासाठी स्वतः रतनदांनी रेखून तयार केलेले सुमारे दोनशे खुर्च्यांचे अद्ययावत नाट्यगृह होतेच.

रतनदांना भेटायला बागेतल्या एका पाण्याने वेढलेल्या छोट्याशा बेटवजा जागेत आमच्यासाठी खुर्च्या लावून ठेवल्या होत्या. आम्ही तिथे जाऊन बसलो. थोड्याच वेळात ठरलेल्या वेळेस ११ वाजता रतनदा तिथे आले. आजारातून नुकतेच उठले असले तरीही डौल आणि रुबाबदारपणा यत्किंचितही कमी झालेला नव्हता. आम्हा सगळ्यांची चौकशी केली. कोण काय करतोय, काय लिहितोय याबाबत विचारपूस केली. महेश एलकुंचवारांबद्दल आस्थेने विचारपूस केली. औपचारिक बोलण्यानंतर आमची अनेक विषयांवर चर्चा सुरू झाली. आमचा पत्रकार मित्र राजकुमार सोनी याने ती सगळी चर्चा रतनदांच्या संमतीने रेकॉर्ड केली. खूप मोकळेपणाने ते बोलले.

सुरुवातीलाच कलेबाबतच्या शासनाच्या भूमिकेचा मुद्दा आला. कलेबद्दलची शासनाची अनास्था त्यांच्या जिव्हारी लागलेली होती. “कलावंतांची जी कुचंबणा सुरु आहे, त्याविरुद्ध आमची लढाई सुरु आहे. आता खरं तर जग खूप बदललं आहे. काळ बदलला आहे. आज राजकीय इच्छाशक्ती असल्याखेरीज देशाची सांस्कृतिक परिस्थिती बदलली जाऊ शकत नाही हे सत्य आहे. तर कलेकसाठी राजकीय इच्छाशक्ती कलावंत कसे निर्माण करू शकतील हा प्रश्न आहे. संसदेत जे कुणी तथाकथित कलावंत जातात त्यांना कला म्हणजे काय ते कळलंच नाही. कारण ते आपल्या घराचा उंबरा ओलांडून कधी बाहेर लोकांपर्यंत गेलेच नाहीत. ते काय करणार? खरं तर आधी राजाश्रयातही कलावंत होते, ते त्या काळात जगले आणि तगले. मात्र आता कानाकोपऱ्यातले अनेक कलावंत उपाशी मरत आहेत. कलेला आजच्या काळात वाईट दिवस आले असले तरीही मी जगतो आहे कारण मला ठाऊक आहे की राजकारण कलेला दाबून टाकू शकत नाही. संपवू शकत नाही. आपण कलावंतांनी अधिक प्रभावी तऱ्हेने अभिव्यक्त व्हायला हवे.”

रतनदा संथपणे बोलत होते. त्यांच्यातला थकवा हळूहळू जाऊन बोलण्याला धार येऊ लागली होती. “कोरोना काळानंतर आमचीही खूप पंचाईत झाली आहे. इथे येणारे सगळे कलावंत कष्टकरी आहेत. त्यांचेही पोटापाण्याचे प्रश्न असतात. पण आम्ही या कोविडमुळे हरलो नाही. आता पुन्हा जोमाने उभे राहात आहोत.”

गेल्या दोन वर्षात खूप काही बदलले होते. कोरोनाचा फटका कोरस रिपेर्टरीसारख्या सामूहिकपणे नाटक करणाऱ्या संस्थेला बसला होता. पत्त्याच्या बंगल्यासारखे सारे काही कोसळले. मात्र पुन्हा उभं राहायचं आहे. मधल्या काळात आलेली काजळी पुसून पुन्हा उभारी घेण्यास हा अपूर्व जिजीविषा असलेला नाटकातील शिखर पुरुष तयार होता.

संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय यातील दिवसांबाबतही ते सविस्तर बोलले. “सगळ्या मोठ्या संस्थांचे ज्या पद्धतीने अवमूल्यन केले जात आहे त्यामुळे आपल्या देशातील कला अनेक वर्षे मागे फेकली गेली आहे. संगीत नाटक अकादमी किंवा राष्ट्रीय नाट्य विद्यालय यांसारख्या अनेक संस्थांनी परंपरा आणि आधुनिकता यांची सुरेख गाठ मारून मोठी कामगिरी केलेली आहे. तिथे नवे प्रयोग झाले आहेत. त्या शक्यताच आता संपविल्या जात आहेत.”

अनेक संदर्भ देत ते बोलत होते. “आपला देश खरच मोठा आहे. आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आपल्याकडे रवींद्रनाथ आहेत, गांधी आहेत. वारसा आहे. प्रत्येक ठिकाणाची संस्कृती वेगळी आहे. वेगवेगळे खाद्यपदार्थ असतात. वैविध्य आहे. सगळं आहे पण आपल्याकडे राजकारणच जिथे नीट चालत नाही तिथे कलेची गोष्टच सोडा.”

मग अशा परिस्थितीत विश्वास कशावर ठेवायचा रतनदा ? कशाच्या आधारावर पुढे जात राहायचे?

“आपल्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवायचा. जगायचे तर पॉझिटिव्ह थिंकिंग हवे. आयुष्यात आलेल्या संकटांशी आपल्याला सामना करावाच लागतो. अशा परिस्थितीत आपले ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची मंझील वेगवेगळी असते. आपण सकारात्मक विचार करू शकलो नाही तर संवेदनशील माणसाला, कलावंताला टिकून राहणे अवघड आहे. माझे रस्ते फुलांनी आच्छादलेले असतील आणि कुणी माझ्यावर हल्ला करणार नाही अशा समजुतीत राहू नये. प्रत्येक गोष्टीची तयारी हवी.”

“मला कधी नैराश्य नाही आले. नैराश्य ही वेगळी गोष्ट आहे. नैराश्य माणसाचे आयुष्य खराब करते. त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे आणि जोमाने काम करणे हाच त्यावर इलाज आहे.”

कलेबाबत बोलताना अजून एक मुद्दा त्यांनी सांगितला, “कलेत आध्यात्मिकताही हवी. रवींद्रनाथ म्हणतात ‘क्लांती आमार क्षमा करो प्रभू’ म्हणजे माझ्या अशा थकून जाण्याला माफ करा प्रभू. मी थकल्यामुळे मागे राहिलो तर मला क्षमा करा. कलेत स्पिरीचुॲलिटी गरजेची आहे. खरं तर त्याशिवाय ॲस्थेटिक्स येत नाही. मी म्हणतो आहे त्या स्पिरीचुॲलिटीत कुठलेही कर्मकांड येत नाही हे लक्षात घ्या.”

स्पिरीचुॲलिटी आणि धर्म नीट समजून घेतले पाहिजे हे सांगत त्यांनी धार्मिक उन्मादाबद्दल अत्यंत तिटकारा व्यक्त केला. आधी धर्मनिरपेक्ष – सेक्युलर असणे – हा एक चांगला मानवी गुण मनाला जायचा. आता या शब्दाचा उपयोग अपशब्दासारखा केला जातोय.

रतनदांचे संथ लयीतले ठाम बोलणे सुरू असताना मंद वारा वाहात होता आणि जणू त्या प्रसंगाला पार्श्वसंगीत देण्यासाठी खूपशा पक्ष्यांची किलबिल सुरू होती. “कोरसमधले कलावंत इथलेच कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आहेत. आम्ही इथे शेती करतो. कितीतरी फुलझाडे लावलेली आहेत. इथे अन्न उगवतो. माझ्या मते तुम्ही फुले उगवू शकला नाहीत, अन्न उगवू शकला नाहीत तर तुमच्याजवळ सौंदर्य कधीच येणार नाही. तुम्ही एखादे झाड लावाल, तुम्ही रोज बघाल की ते झाड किती मोठे झाले आहे, त्यावर कळ्या उगवल्या आहेत, त्यांची फुले झाली आहेत, तेव्हा तुम्ही त्या झाडाशी एकरूप व्हाल. आनंदी व्हाल. आम्ही इथे आमच्या परिसरात फुलं उगवतो, अन्न उगवतो तेव्हा त्या उगवण्यातील सृजनाचा आनंद, उल्लास आमच्या नाटकाच्या सादरीकरणातून तुम्हाला दिसतो. तुम्हाला सांगू, एखादे झाड, एखादे फूल वाढवणे हे एखाद्या कलावंताला वाढवण्यासारखेच आहे. त्याचे ग्रूमिंग करण्यासारखे असते.”

मणिपूरच्या अस्थिर राजकीय परिस्थितीबाबत तेव्हाही खूप रतनदा अस्वस्थ होते. त्यांना कदाचित काय सुरू आहे आणि काय होऊ शकेल याचा अंदाज आला असावा. आज तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि किती विध्वंस, संहार सुरू आहे ते आपण बघतोच आहोत. रतनदांच्या प्रत्येक नाटकात राजकीय जाणीवा दिसतात. ‘इम्फाल-इम्फाल’ या त्यांच्या नाटकाचे शंभराहून अधिक प्रयोग इथे झाले. या नाटकात मणिपूरचे प्रश्न मांडले आहेत. मणिपूरमधील अनेक कुटुंबातील तरुण मुलांनी विद्रोहाचा मार्ग स्वीकारला आणि घराबाहेर पडून विद्रोही गटांमध्ये सामील झाले. त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल स्वप्ने नव्हती काय ? होती पण त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. त्यांच्या कुटुंबातील लोक हे नाटक पाहायला येत तेव्हा ढसाढसा रडत असत; रतनदा म्हणाले.

“आज आमच्यापुढे तुम्ही कोण आहात ते सिद्ध करा असा प्रश्न उभा केला जातोय. खरं तर हा निरर्थक प्रश्न आहे. मणिपूरमधला प्रश्न बंदुकीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. वेगळे मार्ग नाहीत काय ? तुम्ही कधी आदरपूर्वक, प्रेमाने हाक मारलीच नाही. आमच्या जवळ आलाच नाहीत. अशाने यातून मार्ग निघणार नाही. कारण बंदुकीपेक्षा अनेक वेगळे मार्ग आहेत हे आधी हे समजून घ्यायला हवे. मणिपूरमधले युवक पोटासाठी कोणता मार्ग पत्करत आहेत? तुम्ही त्यांना भेटत का नाही? कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी हिंसा ही अजिबात आवश्यक गोष्ट नाही. प्रेम, मोहब्बत यापेक्षा अधिक प्रभावी शस्त्र जगात कुठलेही नाही. ते वापरून बघा ना.” तीन वर्षांपूर्वीचे त्यांचे शब्द आजही कानात घुमत आहेत.

“मला स्वतःला मार्शल आर्ट उत्तम येते. मला नृत्य माहीत आहे, संगीत जाणतो. सगळ्यांचा मिलाफ करून मी नाटक करतो. दाखवण्याकरता मार्शल आर्ट मी नाटकात वापरलेले नाही. नाटक करताना जे आपोआप आतून येतं ते मी करतो. मी कुणाहीसाठी नाटक करत नाही. प्रेक्षकांसाठीही नाही. एखादा चित्रकार प्रेक्षकांसाठी चित्र काढतो काय ? मात्र मी प्रेक्षकांना माझा चांगला मित्र मानतो. मी शबरीच्या बोरासारखे करतो. आधी मी ते खाऊन बघतो आणि गोड असले तर ते लोकांना देतो. किती नाटके मी तालमी सुरू करून सोडून दिली आहेत याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल.”

“मी नाटक करेन असे मला वाटले नव्हते. माझे आईवडील कलावंत होते. सतत बाहेर राहात असत. त्यांचे सतत प्रयोग सुरू असत. मी देखील त्यांच्यासोबत दौऱ्यावर जात असे. मी विंगेतच लहानाचा मोठा झालो असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मी चौथ्या वर्गात आलो तेव्हा मला मिशनरी शाळेत घातले गेले. खूप चांगली शाळा होती. तिथे मी चौथी-पाचवी केली आणि सहावीला मला जलपायगुडीला पाठवले. तर आसामी, बंगाली, हिंदी जे मिळाले ते मी वाचत आणि शिकत गेलो. पुढे सातवीपासून मी आईवडिलांना निक्षून सांगितले की मला पुढे शिकायचे आहे. आणि पुढे सातवीपासून माझे शिक्षण नीट सुरु झाले.”

बोलता बोलता एनएसडीतील प्रवेशासाठी अल्काझींनी घेतलेल्या मुलाखतीचा प्रसंग त्यांनी सांगितला. आज नाटकाचा उपयोग लोक सिनेमात जाण्यासाठी शिडीसारखा करतात. पण नाटकामध्ये मी जे प्रयोग करतो त्यात इतका आनंद मिळतो की त्यामुळे फिल्मकडे वळावे असे कधी वाटलेच नाही. कितीतरी वेळा अपयश पदरी पडते. मग पुन्हा प्रयत्न करतो. जेव्हा एखादी गोष्ट दिवसरात्र २४ तास तुम्ही ध्यास घेतल्यासारखी करता तेव्हा त्यातून बाहेत पडणं खूप कठीण असतं. खूप गुंतून जातो मी नाटकात. जबरदस्त गुंतलेला असतो. एखादे नाटक करण्यापूर्वी काय काय गोष्टी आवश्यक आहेत आणि मला कुठल्या गोष्टींशी झगडावं लागणार आहे याचा मी विचार करतो. एक प्रकारचं अंतर्गत युद्धच असतं ते. प्रेक्षकांच्या पुढे येण्यापूर्वी ते नाटक आधी माझ्यापर्यंत तर यायला हवं ना ?” रतनदा मंद स्मित करत विचारतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भेटीदरम्यान रतनदा भरभरून बोलत होते. भारतीय कला, मणिपूरचे प्रश्न, त्यांची नाटकाबद्दलची बांधिलकी, अल्काझी, एनएसडीतले दिवस, अनेक गोष्टी बोलण्यात येत होत्या. रतनदांचे ठाय लयीतील बोलणे, मागे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट. त्यांच्या अगदी समोर बसून त्यांचे बोलणे, त्यांचे शब्द, त्यांचे रूप, बोलण्याची शैली मी डोळ्यात साठवून घेत होतो.